जोडून आलेल्या सुट्टीचा लाभ नेहमीप्रमाणे भटकंतीसाठी करावा. असा विचार आणि त्यानुसार योजना मनात आधीच तयार होती. भीमबेटका हे ठिकाण यावेळच्या भटकंतीचे प्रमुख आकर्षण होते. नेहमीच्या सवयीनं सरळ जायाचे नाही, हे देखील निश्चित होते. मेहकरपर्यंत समृद्धीचा लाभ घेऊन जमिनीला टायर टेकवले आणि खामगाव- शेगाव-अकोट-अंजनगाव सूर्जी होत परतवाडा मुक्कामी पोहचलो. सकाळी उठल्यानंतर आजूबाजूचा परिसर पाहण्याची कायमची खोड उफाळून आली. हॉटेलच्या खाली आल्यानंतर शेजारीच परतवाडयाचा ठोक व किरकोळ भाजीबाजार आहे. हे लक्षात आले. भाजीबाजाराच्या प्रत्येक गल्लीत चक्कर मारली. ताजा आणि रासायनिक खतांची लक्षात येण्याजोगी कमतरता असलेला भाजीपाला पाहून नकळतपणे मन प्रसन्न झाले.
व-हाड आणि खान्देशातील भाजीबाजारांना असलेली प्रदीर्घ परंपरा पुन्हा एकदा नजरेत भरली. व-हाड आणि खांदेशातील भाजीबाजारात भाज्या व्यवस्थित आणि सौंदर्यदृष्टी ठेवून रचून ठेवलेल्या दिसतात. एवढेच नाही तर आजच्या फाईव्ह जीच्या जमान्यातही हे भाजीबाजार हया प्रांतातील लोकजीवनाचा व लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले जाणवतात. जीवनाच्या बाजारीकरणात आपण आपल्या लोकसंस्कृतीचे हे प्रतिक असलेले असे बाजार हरवून बसलो आहोत. असा काहीसा खिन्न करणारा विचार मनात डोकावून गेला.

चिखलदऱ्यातील सेमाडोह परिसर पाहत भीमबेटक्याच्या दिशेनं कूच करावी, असा विचार करून गाडीचे सूकाणू सेमाडोहकडे वळवले. परतवाडा सोडत असतांनाच मेळघाटातील निसर्गाची चाहुल मनावर गारुड घालू लागली. सागाच्या वृक्षांमधून वाहणारा विविध रानफुलांचा कॉम्बो दरवळ नाकासह मेंदूला गुदगुदल्या करु लागला. परतवाडयाची हद्द संपली आणि घाटाला सुरवात झाली. त्यावेळी मेळघाटाचे सौंदर्य अंगावर येण्यास सुरवात झाली. घाट चढत-चढत रस्ता एका गावात शिरला. या छोटया आदिवासी पाडयातील प्रत्येक घराचे रुपांतर हॉटेलात झालेले दिसले. विकासाची आस लागलेले आदिवासी हॉटेलातून गि-हाईकावर नजर लावून बसलेले होते. हॉटेलांच्या गर्दीत गावाचं नावं वाचण्याची संधी मिळाली नाही.
गावा संपल्याबरोबर रस्ता एका छोटया नदीच्या बाजूनं पळतांना जाणवला. काही आदिवासी लोक गावातून भात खाचरांकडे चालले होते. अचानक चार-पाच मोठया झाडांच्या गर्दीत शेतक-यांच्या बांधावर असते तसे एक छोटसे मंदिर नजरेस पडले. मंदिर पाहून आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. मात्र त्याच्यासमोर जे होते ते पाहून आश्चर्य वाटले. आमच्या नगर जिल्हयात खेडयातील वस्त्यांवर मृत आई-वडिलांची प्रतिकात्मक दगडाची मूर्ती घरासमोर छोटसे मंदिर करुन लावली असते. असाच काहीसा हा प्रकार होता तरी देखील त्यात आणखी काही वेगळेपण जाणवत होते.
येथे दगडात कोरलेल्या मूर्त्यांसोबतच लाकडाच्या स्तंभात ही माणसं कोरलेली दिसली. त्याचबरोबर काही ठिकाणी फक्त सात-आठ दगड सिंमेटच्या कोब्यात रोवलेले होते. छोटया मंदिरासमोर ह्या तीन प्रकारांची गर्दी झालेली होती. हया गर्दीत दाटीवाटीनं एक दांपत्य आपल्या आठ-दहा वर्षांच्या लहान मुलासह त्यातील एकाची पूजा करतांना दिसले. रस्ता चढाचा असल्यानं गाडीचा वेग अत्यंत मंद होता. त्या कुटुंबाला पाहून अचानक गाडीचा ब्रेक कधी लागला ते समजले नाही. मला खाली उतरवून हा प्रकार समजून घेण्यासाठी कदाचित गाडीनं स्वतःला ब्रेक लावून घेतला असावा. गाडीतून उतरून त्या कुटुंबापर्यंत पोहचण्याच्या आधी ते कुटुंब त्यांच्या दुचाकीपर्यंत येऊन पोहचले होते. पळत जाऊन त्यांना गाठले. जवळ गेल्यावर कुटुंब आदिवासीच आहे. हे लक्षात आले.

त्यांच्याशी हिंदीत संवाद सुरु केला. मध्यप्रदेशाचे सख्खे शेजारी असल्यामुळे हिंदीत संवाद साधण्यास त्या लोकांना अडचण आली नाही. त्यांच्याशी झालेल्या संवादात असे लक्षात आले की, हे लोक आत्ताच आपण ज्या गावातून बाहेर पडलो त्या गावचे नाहीत. या गावाच्या बाहेर त्यांचा देव गोलादेव आहे. शेंदूर लावलेल्या दगाडाशेजारी एक छोटा त्रिशूळ लावलेला होता. पिंड नसली तरी गोलादेव हे महादेवाचे नाव आहे, हे लक्षात आले. त्याच्यासमोरील नंदी याची साक्ष देत होता. हे लोक दुचाकीवर देव-देव करत आपल्या गावी परतत असतांना येथे पूजा करण्यासाठी थांबले होते. त्यांच्या पूर्वजांची मृत्यु पश्चात स्थापना त्यांनी गोलादेव समोर केलेली आहे. आम्ही लोक ह्या गोलादेवासमोर आमच्या मृत पूर्वजांना मूर्तीच्या रुपात स्थापित करत असतो. असे ठिकाणं मेळघाटात आणखी काही आहेत. ऐवढी माहिती पुरवून हे लोक मार्गस्थ झाले.
तेवढयात दोन पुरुष आपली दुचाकी थांबवून एका चार-पाच चेहरे कोरलेल्या दगडासमोर पूजा करण्यासाठी बसले. त्यांनी दहा-बारा उदबत्त्या असलेले पॅकिंग उघडले. उदबत्त्या पेटवून त्यांची अर्धी-अर्धी विभागणी केली. अर्ध्या उदबत्त्या तेथे लावल्या आणि अर्ध्या थोडया अंतरावर असलेल्या तसल्याच दगडासमोर लावल्या. त्यांचा हा विधी आटोपल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता. ते त्याच गावातील आहेत असे कळले. परवाच त्यांनी काही चेहरे कोरलेला हा दगड येथे स्थापित केलेला आहे. दगडावर 24 जानेवारी 2024 ही तारीख लिहिलेली दिसली. त्यांच्याशी संवाद साधण्यात अडथळे कमी आहेत, असे जाणवल्यावर जिज्ञासा अधिक उफाळून आली. त्या दोघांपैकी मुख्य असलेल्या पुरुषाचे आई, वडिल, दोन भाऊ आणि एक बहिण असे पाच चेहरे त्या दगडातून डोकावत होते. त्यात बहिण देखील होती. हे पाहून अधिक आश्चर्य वाटले. भाऊबीज व रक्षाबंधन यांना बहिण-भावाची गाणी गाणारे आपण पुरुषसत्ताक मानसिकतेत खरोखर बहिणाला आपली मानतो का? हा विचार उगाच मनात येऊन गेला.
त्यांचा मृत्यु आणि दफन वेगवेगळया वेळी आणि वेगवेगळया ठिकाणी झालेले आहे. त्यांना परवाच आपण समारंभ पूर्वक गोलादेव समोर स्थापित केले. त्यामुळे ते आता इतरत्र भटकणार नाहीत. अशी स्थापना करण्यासाठी विवाह सोहळ्यासारखा समारंभ आयोजित करावा लागतो. दोन पायाचे अथवा चार पायाचे कापून त्याचे जेवण पाहुण्यारावळयांना व गावक-यांना दयावे लागते. वाजत गाजत हा दगड येथे आणून त्याची स्थापना करावी लागते. हा सर्व खर्च पेलण्याची आपली ऐपत झाल्यावर आपण हा दगड स्थापित करू शकतो. खर्च करण्याची ऐपत हा या विधीतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. वडिलांच्या वकिली पेश्यामुळे महादेव कोळी या आदिवासी समाजातील पाहिलेला असाच एक माणूस डोळयासमोर येऊन गेला. काळी उडीद डाळ व भात याचे जेवण देण्याची ऐपत नसल्यामुळे वयाची पन्नासी उलटी तरी त्याचा विवाह होऊ शकला नव्हता. मूर्तीची पूजा करणा-यानं पुढे सांगितले की दगडात चेहरे कोरलेले, लाकडात चेहरे कोरलेले आणि सिंमेटच्या कोब्यात सात-आठ छोटे दगड रोवलेले हे प्रत्येक घराच्या परंपरेनुसार असते. मात्र हे देखील आर्थिक क्षमतेनुसार असावे, असे वाटून गेले.

त्यानं अर्ध्या उदबत्त्या तेवढयाच आत्मियतेने दुसरीकडे लावल्या संदर्भात विचारले असता. तो माझ्या सासू-सास-यांचा दगड आहे. असे त्यानं सांगितल्यावर माझ्या नागर सुसंस्कृत मनाला धक्का लागला. बायकोच्या अनुपस्थितीत तिच्या आई-वडिलांविषयी त्यानं दाखवलेला आदरभाव मनातल्या मनात मला शरमिंदा करून गेला. आदिवासी लोक गोलादेवच्या समोर आपल्या मृत स्वकियांना आणून बसवतात. त्यामागे कोणतीही अशुभाची व भयाची भावना नसते. हे त्या व्यक्तीच्या एकूण निवेदनावरून लक्षात आलेले होते. तेथे केवळ निखळ प्रेम, स्मृती, आदर ओथंबून भरलेला दिसला.
आत्मा हा शब्द माहिती देणाऱ्या कोणीच वापरला नाही. निसर्गात राहणारा माणूसच अशा विधींचे यांत्रिक कर्मकांडात रुपांतर होऊ देत नाही. त्याची भाषा प्रेमाला व्यक्त करण्यासाठी अत्यंत तोकडी असेल व त्याची प्रेमाची अभिव्यक्ती तरल नसेल;परंतु त्याचे आपल्या माणसांवरील निखळ प्रेम तोकडया भाषेला व तरलतेच्या नावाखालील शाब्दिक फुलो-याला मागे टाकत आकाशाला कवेत घेणारे जाणवते. तेथील सर्व मूर्त्यांना आणि त्यांचा रक्षक गोलादेवसमोर नकळतपणे हात जोडल्या गेले. गाडीत बसलो तर गाडी उभी होती. तेथे एका संस्थेची छोटी कमान होती. हया कमानीवर गावाचे नाव बिलोली गोलादेव लिहिलेले दिसले. मूर्त्यांच्या रुपात गोलादेवाच्या छायेत कायमचे विसावलेले सर्व माणसं आपल्याला अत्यंत प्रेमानं निरोप देत आहेत. अशी जाणीव मनाला स्पर्श करून गेली.





