(राजू परुळेकर)
परशा पहिला नव्हे... पाटील सुद्धा पाहिले नव्हेत... किंबहुना हे ते नव्हेच!
हे मी ‘सैराट’ या चित्रपटाचं समीक्षण लिहित नाहिये. मला व्यक्तश: नागराज मंजुळे आवडतात. किंबहुना प्रत्येक मराठी माणसाला खुप पैसे मिळावे असं मला वाटतं. मराठी माणसाने लढावं नि माझ्या खानदानाला पैसे मिळावे असं मला वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही मराठी चित्रपटाबद्दल,कलेबद्दल काही मुद्दे असतील तर मी ते गल्ल्याचं काम फत्ते झालं की मांडतो.
‘सैराट’ हा काळानंतर आलेला Cliche मसाला सिनेमा आहे. माझं हे त्यावरचं लेखन मी कला,कलाजीवन व त्यातील जीवनवाद इतपत मी मर्यादित करून घेतलय.
तर परशा पहिला नव्हे, किंबहुना तो “तो” नव्हेच ज्यासाठी बाजूचे व विरोधी भांडत आहेत.
पहिला ‘सामना’ चित्रपटातला मारुती कांबळे! 1974 मध्ये हिंदुराव पाटील याला मास्तर विचारतो, “मारुती कांबळेचं काय झालं?” मारुती कांबळे हा दलित रिटायर्ड जवान हिंदुराव पाटलाच्या सरंजामी साम्राज्याला आव्हान देतो. त्याचा काटा काढला जातो. तो चित्रपटात फार दिसत नाही पण अख्खा चित्रपट त्याच्या भासाने आणि क्रूर गायब होण्याने भरून राहतो. मारुती कांबळेचं चित्रपटात फार नसणं हे एका बलाढ्य संघर्षाचं प्रतिक बनतं.
हिंदुराव पाटलाने त्याचा खून केला हे कळत राहातं. ते शेवटी जीवघेणं अंगावर येतं…या चित्रपटाला चित्रपटाची नवीन भाषा आहे….अगदी बॉडी लैंग्वेज पासून. मराठी चित्रपटात हा जातीयतेचा अमानुष अविष्कार प्रथमच आला. मराठी प्रेक्षकाला तो कळलाच नाही. तेव्हा झी सिनेमा नसल्याने मार्केटिंग हे एका निर्मात्यावर पडायचं. १९७४ साली आलेला चित्रपट ‘सामना’ चालला नाही. पुढे एका जर्मन शिष्टमंडळाला तो प्रचंड भावला. त्यामुळे तो बर्लिन फिल्म फेस्टिवलसाठी निवडला गेला. तेव्हा फेस्टिवल रोज होत नसत! त्यामुळे मराठीत खळबळ झाली..हळूहळू तोंडी-लेखी पसरत जाऊन 1975 साली हा चित्रपट पुन्हा थिएटर मध्ये लागला आणि तेव्हा लोकं तो पाहू लागले
दुसरा ‘कोर्ट’ हा चित्रपट 2015 साली आला. त्यात एक निष्पाप सफाई कामगार जो गटारीच्या भोकात जाऊन तिथल्या विषारी वायूंनी आधी एक डोळा गमावतो नंतर जीव गमावतो…तो मागासवर्गीय आहे, नायक आहे, चित्रपटात दिसत नाही. त्याचं नसणं जीवघेणं अंगावर येतं. या चित्रपटाचा दुसरा नायक न वाकणारा आंबेडकरी चळवळीतील शाहीर आहे. बलाढ्य व ब्राह्मणवादी जातीय व्यवस्था, न्यायव्यवस्था त्यालाही निष्पाप असताना मोडून काढू पहाते… हे सांगण्याची वेगळी ब्लॅक हयुमर व छाया प्रकाशाची सिनेमाची भाषा लेखक व दिग्दर्शकाने निवडलीय…
विषारी जातीयता नि व्यवस्था नि समाज यांची काहीही करुन दुर्बलांना चिरडण्याची राक्षसी आकांक्षा याचे भीषण वास्तव श्वास बंद करते. कोर्ट हा चित्रपटही काही धो धो चालला नाही. उच्चवर्णीय व मध्यमवर्गाने या दलित शोषितांच्या आवाजावर जवळपास बहिष्कारच टाकला.
1974 साली ‘सामना’ हा चित्रपट रामदास फुटाणे व 2015 साली ‘कोर्ट’ चित्रपट हा विवेक गोम्बर या एकांडया निर्मात्यानी कला व जीवनवाद यांच्या मिश्रणातून निर्माण केले. त्यातल्या लेखक व दिग्दर्शकामागे अजस्र पैसे मार्केटिंग लावणारी संस्था नव्हती. हे चित्रपट त्यांच्या काळाच्या पुढे होते. अश्या कथानकांवर व प्रयोगांवर या कंपन्या पैसे लावत नाहीत…."
झी सिनेमा ही एक कॉर्पोरेट कंपनी आहे. त्यांनी अनेक नव्या जुन्या व गाजलेल्या नाटक आणि सिनेमांचे हक्क विकत घेतलेले आहेत. प्रॉडक्ट मार्केटसाठी अनुकूल बनविणे व नवीन ‘would be’ ग्राहक शोधणे हे काम ते करतात. या मसाल्यात “प्रयोग” हे फोडणीसारखे करू दिले जातात. जेणेकरून त्यांच्या मार्केटचा विस्तार व्हावा…
या प्रक्रियेत आपोआप छोटे निर्माते, प्रयोगशील लेखक व दिग्दर्शक एकतर त्यांच्या वळचणीला येतात. मांडलिकत्व न स्वीकारल्यास प्रवाहाबाहेर फेकले जातात.
‘सैराट’ या चित्रपटाची कथा ही सर्व लोकांच्या मनात नॉस्टॅल्जीक बनवणारी पौगंडावस्थेतील हुकमी प्रेमकहाणी आहे.
Boy meets girl…
Boy gets girl…
Boy loses girl…
हा पौगंडावस्थेतल्या शोकांत प्रेमकहाणीचा फॉर्म्युला…
Boy meets girl…
Boy loses girl…
Boy gets girl…
हा पौगंडावस्थेतील सुखान्त प्रेमकहाणीचा फॉर्म्युला…
या फॉर्म्युलात शोकांतिका निर्माण करण्यासाठी वेगवेगळे combinations वापरता येतात..
उत्तर-दक्षिण संस्कृती!
श्रीमंत-गरीब वर्गसंघर्ष!
काळे-गोरे वर्णभेद!
वगैरे वगैरे…
हा फॉर्म्युल इतका वापरला जाऊनही मार्केटमध्ये चालतो कारण माणसाचं अबोध मन पहिल्या प्रेमावर कायम लुब्ध राहातं. कॉर्पोरेट सिनेनिर्मात्यासाठी हेच तयार मार्केट असतं. पण त्याच वेळी कॉर्पोरेट निर्माते नवीन मार्केटची पॉकेटस शोधतात.
नागराज मंजुळे हा कष्टाने वर आलेला ब्रँड आहे. त्याला घेऊन चित्रपटाच्या फॉर्म्युल्यात गरीब-श्रीमंत ऐवजी जात वापरली. चित्रपट तरल वाटेल पण मांसल बनेल याच्यावर नजर ठेवली की, नवा ग्राहक तयार होतो. हजारो वर्षं गावकुसाबाहेर होते, ते कॉर्पोर्टेसचं नवीन मार्केट बनतात हे मार्केटिंगचं संशोधन…
याचा ना आंबेडकरवादाशी संबंध असतो ना आधुनिक प्रयोगशील चित्रपटाशी…. पण निर्माण होणारा प्रत्येक वाद हा जायंट कॉर्पोरेट विश्वाचं मार्केट वाढवते. नि एकांडया प्रयोगशील कलवंताला स्थितिवादाविरुद्ध बंड करण्याअगोदर मार्केटबाहेर फेकून देते…
‘सामना’ व ‘कोर्ट’ सारखे चित्रपट जी जागा निर्माण करू इच्छित होते ती जागा आता कॉर्पोरेट जायंटनी हेरून बदलाविरुद्धच्या स्थितिवादासाठी व्याप्त केली आहे…
बाकी सारे वाद या सिंथेटिक व मायावी व ब्रँड मार्केटिंग आहेत…No Ideology!
“सामना” व “कोर्ट” परत बघा नि मग “सैराट” बघा! माझा कॉर्पोरेट्स, रंजनात्मक सिनेमाला विरोध नाही. जसा फास्ट फुडला नाही. पण चविष्ट फास्ट फूड हे पौष्टीक आहार म्हणून खाण्याबाबत मी धोक्याची घंटा वाजवतोय…
मराठी समाजातून चित्रपट संस्कृतीतील झिरपललेलं खरं जातवास्तव कथानकात असतं. म्हणून ‘कोर्ट’ सारखा चित्रपट समाजाला सहन होत नाही. फक्त गंधर्वयुगी स्वप्न लागतं. ‘सैराट’ने हे वास्तव बदलेलं का नाहीये हे सांगणारा हा प्रयत्न… शिवाय समाजात सर्वच मार्केट नसतात. त्यांनाही हा आवाज देतोय… यात कणभरही व्यक्तिगत काही नाही…
(साभार - Raju Parulekar's Blog)





