Skip to main content

‘खरात’ आपल्या ‘घरात’ नको असेल तर काय करायला हवं…?

Article in Marathi
Vinayak Savle
25 Mar 2026
1081 views
 ‘खरात’ आपल्या ‘घरात’ नको असेल तर काय करायला हवं…?

विनायक सावळे 


खरात नको आपल्या घरात, असे म्हणताना आपण हे समजून घेतले पाहिजे की ज्योतिष, मंत्र-तंत्र आणि चमत्कारांच्या नावाने चालणाऱ्या संपूर्ण फसवणुकीलाच आपल्या घराचा दरवाजा बंद केला पाहिजे. कारण भोंदूंचा दरवाजा बाहेर नसतो; तो घरातूनच उघडतो.


नाशिकमधील भोंदू बुवा अशोक खरात प्रकरणाने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय वातावरणालाही धक्का दिला आहे. श्रद्धेच्या नावाखाली होणारी लूट किती भयावह असू शकते, ती किती संघटित असू शकते आणि ती घराघरात किती विद्रूप पद्धतीने शिरू शकते याचे हे सुन्न करणारे उदाहरण आहे. अशा घटना घडल्या की लोक संताप व्यक्त करतात, निषेध करतात आणि दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी करतात. पण या संतापाच्या पलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, असा भोंदू आपल्या घरात कधी येऊ नये यासाठी आपण काय करायला हवे?


या प्रश्नाचे उत्तर केवळ कायदा किंवा पोलिसांमध्ये नाही. त्याचे उत्तर आपल्या कुटुंब संस्कृतीत आहे. परंतु या प्रकरणाकडे पाहताना एक मोठी चूक आपण टाळली पाहिजे. अशोक खरात याला केवळ एक व्यक्ती म्हणून पाहणे, गुन्हेगार म्हणून पाहणे धोकादायक आहे. कारण खरात हा अपवाद नाही; तो एका मोठ्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो. देव आणि धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या अंधश्रद्धेच्या भयंकर बाजाराचा तो प्रतिनिधी आहे. ज्योतिष सांगणारे, मंत्र-तंत्र करणारे, जादूटोणा उतरवणारे, ग्रहशांती करणारे, भविष्य बदलून देण्याचे आश्वासन देणारे असंख्य बुवा-बाबा आपल्या समाजात फिरत आहेत. खरात हा त्या संपूर्ण व्यवस्थेचे उघड झालेले रूप आहे. म्हणूनच केवळ “खरात वाईट आहे” असे म्हणणे पुरेसे नाही. 


खरात नको आपल्या घरात, असे म्हणताना आपण हेही समजून घेतले पाहिजे की ज्योतिष, मंत्र-तंत्र आणि चमत्कारांच्या नावाने चालणाऱ्या संपूर्ण फसवणुकीलाच आपल्या घराचा दरवाजा बंद केला पाहिजे. नाहीतर एक विचित्र मानसिकता तयार होते. आपण म्हणतो,  “खरात भोंदू होता, पण आमचे गुरू वेगळे आहेत.” “तो फसवा होता, पण आमचे ज्योतिष खरे आहे.” अशा प्रकारे आपण एका भोंदूला दोष देतो आणि दुसऱ्याला पवित्र मानतो. ही मानसिकता बदलली नाही तर समाजात खरातसारखे भोंदू संपणार नाहीत; फक्त त्यांची नावे बदलत राहतील.


User Image


म्हणूनच आपल्या कुटुंबातील सर्वांनी एक मूलभूत गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे की कोणत्याही ज्योतिषाला माणसाचे भविष्य सांगता येत नाही. आणि भविष्य सांगता येत नाही म्हणून ते बदलता देखील येत नाही. ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींशी माणसाच्या आयुष्यातील घटना जोडण्याचा जो दावा केला जातो तो विज्ञानाने कधीच मान्य केलेला नाही. त्यामुळे हात पाहणे, कुंडली जुळवणे, अंकशास्त्र, राशीफल, ग्रहशांती, रत्न-खडे, वास्तुदोष यांसारख्या गोष्टी या प्रत्यक्षात भविष्य सांगण्याच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीचे प्रकार आहेत.


आज अनेक लोक भोंदू बुवांवर टीका करतात; पण त्यांच्या बोटांत राशीचे खडे चमकत असतात. अशा प्रकारे ते नकळतपणे त्याच अंधविश्वासाला पोसत असतात ज्याविरुद्ध ते बोलत असतात. याउलट एका अशिक्षित ग्रामीण कवयित्रीने मोठे सत्य सांगितले आहे, 


“अरे ज्योतिषा, माझी दारी नको येऊ;

माझे दैव मले कळे , माझा हात नको पाहू.”


या ओळींमध्ये आत्मविश्वास आणि विवेकाची ताकद दडलेली आहे. आपल्या कुटुंबातील मुलांना आणि तरुणांना हे समजावून सांगणे आवश्यक आहे की माणसाचे भविष्य ग्रहांनी नाही तर त्याच्या विचारांनी, कृतीने आणि प्रयत्नांनी घडते.


समाजात अनेकदा असे म्हटले जाते की, " स्त्रिया अंधश्रद्धेच्या केवळ बळी नसतात तर त्या तिच्या वाहकही असतात." परंतु या विधानामागील वास्तव समजून घेतले पाहिजे. स्त्रियांनी हे 'वाहकपण' स्वेच्छेने स्वीकारलेले नसते; ते पुरुषप्रधान धार्मिक व्यवस्थेने त्यांच्या माथी मारलेले असते. जेव्हा एखादी स्त्री बुवाबाजीच्या नादी लागते तेव्हा अनेकदा त्यामागे तिची भावनिक असुरक्षितता, एकाकीपणा किंवा जीवनातील ताणतणाव असतात. मूलबाळ न होणे किंवा केवळ मुलीच होणे याला आजही स्त्रीला जबाबदार धरले जाते. शिक्षण आणि समान संधी पासून स्वातंत्र्यापासून दूर राहिलेली स्त्री हे कोणत्याही भोंदूबुवासाठी सोपे सावज ठरते.


म्हणून ज्या घरात स्त्रीला सन्मान मिळतो, तिच्या भावनांना स्थान मिळते, तिच्या स्वप्नांना पंख दिले जातात आणि तिच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवला जातो, त्या घरात बुवाबाजीला फारशी जागा राहत नाही.  स्त्रीचा सन्मान ही केवळ सामाजिक मूल्याची बाब नाही; ती अंधश्रद्धेविरुद्धची एक महत्त्वाची ढाल देखील आहे.


यासोबतच धर्माच्या नावावरचे राजकारणही ओळखणे आवश्यक आहे. अनेक राजकीय पक्ष आणि धार्मिक संस्था अशा बुवा-बाबांचे उदात्तीकरण करतात. मोठमोठ्या प्रवचनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात, लाखो लोकांचा जनसमुदाय गोळा केला जातो आणि या माध्यमातून धार्मिक भावनांना राजकीय रंग दिला जातो. या सापळ्यात आपले कुटुंब अडकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपली धार्मिक भावना, श्रद्धा ही अशा कोणत्याही प्रकारच्या बुवाबाजीला, धर्माधारित राजकारणाला, सत्ताकारणाला पोषक ठरणार नाही याची आपण प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी.


खरे तर भोंदू बुवा ओळखणे कठीण नसते. जो माणूस चमत्काराचा दावा करतो, जो कर्मकांडांच्या माध्यमातून तुमचे भविष्य बदलून देण्याचे आश्वासन देतो, जो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा आणि संपत्ती गोळा करतो, तो आध्यात्मिक गुरू नसून भोंदूच असतो. खरे अध्यात्म भीती निर्माण करत नाही; ते माणसाला आत्मविश्वास देते आणि विवेकाचा मार्ग दाखवते.


User Image


महाराष्ट्राच्या संतपरंपरेने याच विवेकाचा संदेश दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव किंवा संत गाडगेबाबा यांनी लोकांना चमत्कारांची स्वप्ने दाखवली नाहीत. त्यांनी लोकांना स्वतःच्या श्रमावर आणि विवेकावर विश्वास ठेवायला शिकवले. कर्मकांडांवर टीका केली आणि समाजाला जागवण्याचा प्रयत्न केला.

म्हणूनच आज या संतपरंपरेचा खरा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. कारण संतांचा वारसा जपायचा असेल तर तो केवळ अभंग म्हणण्यात नाही; तो विवेक स्वीकारण्यात आहे.


नाशिकच्या खरात प्रकरणाने आपल्याला एक मोठा धडा दिला आहे. भोंदू बुवांचा प्रश्न केवळ एखाद्या व्यक्तीचा नाही; तो समाजाच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. ज्या समाजात भीती आणि अज्ञान वाढते त्या समाजात भोंदूंची बाजारपेठही वाढते. आणि ज्या समाजात विवेक, आत्मविश्वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो त्या समाजात अशा भोंदूंची दुकाने आपोआप बंद होतात.


मुलांची लग्न जुळवताना कुंडली सोबत घेऊन फिरणारे पालक, उठता बसता कर्मकांड दोरा धागा मांत्रिकगिरी करणारे कुटुंबातील सदस्य," एक लोटा जल, सब समस्या का हल "म्हणत पहाटे लोटा घेऊन स्वतःच्या प्रश्नांना दैवी उपाय शोधणारे कुटुंबीय, कालसर्प योगाच्या भीतीने त्याच नाशिकमध्ये जाऊन नारायण नागबळी करणारी परिवार ही सारीच अशोक खरात निपजण्यासाठी समाजाची जमीन भुसभुशीत करणारी मानसिकता आहे.


म्हणूनच प्रत्येक कुटुंबाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे… आपण आपल्या घरात मुलांना काय देत आहोत? भीती की विवेक? अंधश्रद्धा की विचारशक्ती?

जर आपल्या घरात विचार, समानता, सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची संस्कृती निर्माण झाली, तर कोणताही भोंदू, कोणताही खरात त्या घरात पाय ठेवू शकणार नाही.

कारण भोंदूंचा दरवाजा बाहेर नसतो; तो घरातूनच उघडतो.


(लेखक विनायक सावळे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव आहेत)


Share this article
 पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…
कॉलम

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’च्या आवाहनात एक महत्त्वाचा प्रश्न गायब आहे तो म्हणजे भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खाद्यतेल आयातीवर का खर्च करतो? १९९० नंतरच्या धोरणांनी भारताची स्वयंपूर्ण तेलबिया अर्थव्यवस्था कशी मोडली आणि त्याची किंमत आज महाराष्ट्रातील शेतकरी कशी मोजतो आहे? सोयाबीनच्या पडत्या भावापासून ते हवामान बदलामुळे वाढलेल्या रोगराईपर्यंत, ग्रामीण भारत एका दुहेरी संकटात अडकला आहे. ‘त्याग’ नागरिकांनी करायचा, पण धोरणात्मक ‘खोडा’कडे पाहायचं नाही, हीच आजच्या अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.

4 min read
G
Girish Patil
सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…
कॉलम

सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…

गॉडविट पक्षी, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.

4 min read
N
Nilu Damle
Why Climate Action in India Needs Culture to Succeed
Column

Why Climate Action in India Needs Culture to Succeed

While scientific reports and finance frameworks drive formal climate policy, they often fail to connect with the lived realities of local communities. From stand-up comedy about Mumbai’s air pollution to multilingual rap and local folk traditions, culture is emerging as the "behavioral public infrastructure" needed to translate complex data into emotional engagement and collective action.

6 min read
S
Sanjiv Gopal and Brikesh Singh
 एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?
कॉलम

एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?

सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' नावाच्या उंदराचा आता कंबोडियामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. त्याला तसे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पाच वर्षांपूवी त्याचे निधन झाले. या कामगिरीसाठी मागावाला कंबोडिया सरकारने सुवर्ण पदकही दिले होते.

5 min read
N
Nilu Damle
प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन
कॉलम

प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन

- अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्रांपैकी एक असून, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यासाठी ओळखले जाते. - मात्र या तेजस्वी प्रतिमेमागे व्यक्तिगत शस्त्रास्त्रांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या हत्या हे एक गंभीर वास्तव दडलेले आहे. - ही समस्या केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नसून, जागतिक चिंतेचा विषय बनली असून भारतासह इतर देशांसाठीही अभ्यासाचा मुद्दा ठरत आहे.

4 min read
B
Bhaga Warkhade
‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?
कॉलम

‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?

फॅक्ट-चेक युनिटच्या माध्यमातून सरकारकडून माध्यमांवर नवे नियंत्रण. सरकारच्या नव्या नियमांमुळे पत्रकारितेत वाढतेय सेन्सॉरशिपची मोठी भीती. कायद्याच्या आडून सरकारविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न.

5 min read
B
Bhaga Warkhade

Comments

Comments are currently disabled or loading...