रमजानच्या पवित्र महिन्यात काश्मीरच्या गुलमर्ग मध्ये फॅशन डिझायनर शिवन-नरेश यांनी आयोजित केलेल्या फॅशन शोमुळे वाद पेटला आहे. जो आता जम्मू-काश्मिर विधानसभेतही पोहोचला आहे. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या ठिकाणी या शोची खूप निंदा झाली आहे आणि काही धार्मिक व्यक्तींनी याला सांस्कृतिक आक्रमणही म्हटलेलं आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात अंग प्रदर्शन करणाऱ्या लोकांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. डिझायनर शिवन-नरेश यांनी माफी मागितली आहे. पण लोकांचा विरोध सुरूच आहे आणि त्यांना केवळ माफी नको आहे.
काश्मीरमधील गुलमर्ग येथे 8 मार्च रोजी झालेल्या फॅशन शोवरून वाद सुरूच आहे. शुक्रवारी, श्रीनगर न्यायालयाने फॅशन शोच्या फोटोशूट डायरेक्टर्स, एले इंडिया मासिकाचे मुख्य संपादक आणि शोमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्सविरुद्ध नोटीस बजावली. हा आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी फैजान आय. नझीर यांनी दिला. आदेशात म्हटले आहे- तक्रारीची चौकशी करण्यात आली. तक्रारदाराने तिन्ही आरोपींवर कारवाईची मागणी केल्याचे समोर आले. फॅशन शो आयोजित केल्याबद्दल आरोपींवर बीएनएसच्या कलम 296, 299 आणि जम्मू आणि काश्मीर उत्पादन शुल्क कायदा, 1958 च्या कलम 50-अ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या शोमध्ये अश्लील आणि अनुचित सामग्री होती.
आदेशात म्हटले आहे की, आता हे न्यायालय या प्रकरणात दखल घेण्यापूर्वी आरोपीची बाजू ऐकेल. आरोपींना नोंदणीकृत पोस्टाने न्यायालयात हजर राहण्याची सूचना दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी 8 एप्रिल 2025 रोजी होईल. आरोपीने न्यायालयात हजर राहावे.
खरंतर, फॅशन शोमध्ये अनेक मॉडेल्सनी बर्फावर रॅम्प वॉक केला. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्थानिक लोकांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. लोक म्हणतात की सरकार रमजानमध्ये अशा फॅशन शोचे आयोजन कसे करू शकते? मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या प्रकरणात आपला विरोध व्यक्त केला आहे.

फॅशन शोवरून विधानसभेतही गोंधळ
विधानसभेतही गोंधळ झाला या मुद्द्यावरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ झाला. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि काँग्रेसच्या आमदारांनी चर्चेची मागणी केली होती. वाद वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी फॅशन शोच्या चौकशीचे आदेश दिले. अब्दुल्ला म्हणाले होते - हा एक खाजगी कार्यक्रम होता. सरकारकडून परवानगी घेतली नव्हती. मी जे पाहिले ते कोणत्याही वेळी आणि विशेषतः रमजान महिन्यात आयोजित केले जाऊ नये. अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास पोलिस कारवाई करतील.
हा शो फॅशन डिझायनर जोडी शिवन आणि नरेश यांनी आयोजित केला होता. जेव्हा प्रकरण वाढले, तेव्हा शिवम आणि नरेशने माफी मागितली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते - रमजानच्या पवित्र महिन्यात गुलमर्गमध्ये झालेल्या आमच्या कार्यक्रमाचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. आम्ही सर्व संस्कृती आणि परंपरांचा आदर करतो.
या प्रकरणात कोण काय म्हणाले...
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, रमजानच्या पवित्र महिन्यात अशा प्रकारची घटना अश्लील तमाशात रूपांतरित होणे धक्कादायक आहे. या कार्यक्रमांद्वारे खासगी हॉटेल व्यावसायिकांना अशा अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याची परवानगी देणे निंदनीय आहे, जे आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. सरकार याला वैयक्तिक बाब म्हणून जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही.
हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष उमर फारूक म्हणतात की हे अत्यंत लज्जास्पद आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात गुलमर्गमध्ये एक अश्लील फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. फोटो आणि व्हिडिओ पाहून लोकांमध्ये संताप पसरला. सूफी, संत संस्कृती आणि लोकांच्या धार्मिक दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या खोऱ्यात हे कसे सहन केले जाऊ शकते? यामध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे.

माफी मागूनही लोकांचा विरोध सुरूच…
भारतात लोकांच्या भावना आता भावात्मक प्रतिक्रियेपेक्षा जास्त असतात. कोणाचा स्वीकार करायचा, कोणाला महत्त्व द्यायचं हे यात ठरवलं जातं. यात नवल नाही. सामुदायिक मूल्यांचं महत्व आहे आणि त्यांचा प्रभाव जनमताच्या पलिकडेही पसरलेला आहे. भारताच्या या वास्तवाचा स्वीकार करतानाच मी एकमेकांप्रती सहनशील राहण्याची वकालतही करेन. जेव्हा कोणाला याची जाणीव होते की आपल्या कामामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि माफी मागून ते जर आपली चूक सुधारू इच्छित असतील तर त्यांना माफ करायला नाही पाहिजे का?
डिझायनर शिवन-नरेश यांनी माफी मागितली आहे. पण लोकांचा विरोध सुरूच आहे आणि त्यांना केवळ माफी नको आहे. पश्चातापापेक्षा ठोस कारवाईची मागणी आणखी एक मुद्दा पुढे आणते. ज्या देशात सांस्कृतिक आणि धार्मिक संवेदनशीलता सार्वजनिक आयुष्यात खोलवर रुतल्या आहेत तिथे वास्तविक तहाचा एखादा रस्ता खरंच आहे का? लोकभावनेचा सन्मान करणं हा भारताच्या कामाचा एक प्रकार आहे. एक आधारभूत मूल्य ज्यावर भारत उभा आहे.
सार्वजनिक जीवन पुढे चालू राहण्यासाठी तयार झालेला अलिखीत नियम आहे हा. पण याची सीमा काय असावी? विरोध हा नेहमी शिक्षेकडे घेऊन जातो का, जरी पश्चाताप हा खरा असेल? चुका स्विकारणे, खंत प्रकट करणे आणि सुधारणा करणे यांना काही अर्थ नाही का? की आम्ही असा एक समाज झालो आहोत जो माफ करायला तयार नाही? जो प्रत्येक चुकीला शेवटपर्यंत ओढत नेतो, फरफटत नेतो, शिक्षा आणि सूड यांची कथाच पुनरावृत्त करत राहतो?
माफी मागूनही रणवीर अलाहाबादीयाला खतरनाक गुन्हेगार ठरवलं
आम्ही रणवीर अलाहाबादीया प्रकरणात असंच काही पाहिलं. जिथं एका चुकीच्या विनोदावर तिखट प्रतिक्रिया आल्या आणि त्याच्यावर असे आरोप झाले जणू तो एक खतरनाक गुन्हेगार आहे. विरोध केवळ माफी व कारवाई पर्यंत मर्यादीत राहिला नाही. तो त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचला आणि त्याच्या घरच्यांनाही याचा त्रास सहन करावा लागला. त्याच्या विनोदानं लोकांच्या भावना आहत झाल्या हे खरं आहे पण अनेक गोष्टी समोर येत आहेत. तेव्हा समय रैनाकडे काही करण्याचा उपाय नव्हता, तात्काळ तर नक्कीच नाही.

लोकभावनेच्या अशा प्रतिक्रिया केवळ सामान्य माणसांपुरत्या मर्यादीत नाहीत. काही वेळेस सरकारी घोषणांविरोधात प्रतिक्रिया उठतात. उदा. राम मंदिर उद्घाटनावेळी ड्राय डेची घोषणा आणि मांस विक्रीवर प्रतिबंध. सार्वजनिक नीति किंवा सामाजिक व्यवहार धार्मिक संवेदनांनी प्रभावित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. फार पूर्वीपासून हे सुरू आहे. 1813 च्या सुरूवातीस ब्रिटीशांनी भटक्या कुत्र्यांना मारण्याचा कायदा आणला तेव्हा पारशी समुदायाने त्याला विरोध करत 1832 मध्ये दंगे घडवले. ती बॉम्बे डॉग दंगल म्हणून ओळखले जातात.
पारशी समुदायासाठी कुत्रे हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने हे घडले होते. एप्रिल 2022 मध्ये दक्षिण-पूर्व दिल्लीच्या महापौरांनी नवरात्रीला मांस दुकानं बंद ठेवण्याचं आव्हान केलं होतं. अनेक लोक या काळात मांसाहार करत नाही हे कारण यासाठी देण्यात आलं. याविषयी अधिकारीक सूचना निघाली नाही कारण लोकांनी त्याला विरोध केला. लाईव्ह रोस्ट शो ‘ऑल इंडिया बकचोद’ (एआयबी) यांनीही मुंबई आर्चडायोसिस व ख्रिश्चन समुदायाची विनाशर्त माफी मागितली होती. शिख मान्यतेप्रमाणे गुरूद्वाराच्या परिसरात धुम्रपान किंवा अंमली पदार्थ सेवनाची निंदा केली जाते.
भारतीयांच्या आस्था आणि भावना
भारतात नेहमीच आस्था व भावना यांना महत्त्व देण्यात आलं आहे. काही लोक याला परंपरेचा सन्मान म्हणून बघतात तर काही लोक याला धार्मिक संवेदना सार्वजनिक जीवनाला कसा आकार देतात याकडे बघतात जे नेहमीच एखादा विशेष धर्म मानणाऱ्यांच्या समजेपलिकडचे असतात. राज्याने लावलेले प्रतिबंध, इतकेच नाहीतर अस्थायी प्रतिबंध देखील धार्मिक अनुष्ठानासाठी आदर्श झाले आहेत. भारत जसजसा आपली वैविध्यपूर्ण आणि बहुसंख्यवादी ओळख पुढे नेत आहे, असे वाद मोठ्या प्रमाणात घडणार आहेत. आम्हाला आस्था, शासन आणि वैयक्तिक आवड यांच्यात संतुलन साधण्याचं आव्हान असणार आहे.
जेव्हा लोकांच्या भावना दुखावतात तेव्हा नागरिक समाज अपेक्षा करतो की जबाबदार व्यक्तीनं माफी मागायला पाहिजे. त्याचे परिणामही भोगायला पाहिजेत. पण काही लोकांसाठी ती माफी पुरेशी नसते तेव्हा काय करायचं? आमचा समाज असाच राहिल का की जिथे एका चुकीसाठी त्या व्यक्तीला कायमचं दोषी ठरवण्यात येईल? आम्ही एक अधिक न्यायपूर्ण दृष्टिकोन स्वीकारू शकत नाही का- असा दृष्टिकोन ज्यात गुन्हेगार गुन्हा स्विकारतो आणि त्याला पश्चाताप करण्याची, चुक सुधारण्याची व आपला विकास करण्याची जागाही मिळेल?
(आमना बेगम अंसारी या स्तंभलेखिका आणि युट्युबर आहेत. लेखातील विचार हे त्यांचै वैयक्तिक आहेत.)





