विकास परसराम मेश्राम
- पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारी योजनांची जबाबदारी नसून सामूहिक कृतीची प्रक्रिया असल्याचं मध्य प्रदेशातील एका आदिवासी गावाने दाखवून दिलं आहे.
- झाबुआ जिल्ह्यातील बोरपाडा गावात तीन वर्षे गाळाने भरून गेलेली विहीर ग्रामस्थांनी 'हलमा' या पारंपरिक सामूहिक श्रमपद्धतीच्या माध्यमातून पुन्हा जिवंत केली.
- भील आदिवासी समाजाची ही शतकानुशतकांची परंपरा केवळ श्रमदानाची नाही, तर जलसंवर्धन, सामाजिक ऐक्य आणि स्वावलंबनाचा जिवंत वारसा आहे.
- जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, बोरपाडाची ही कथा सांगते की पर्यावरण वाचवण्याचे अनेक उपाय आपल्या लोकपरंपरांमध्येच दडलेले आहेत.
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्याच्या पेटलावद तहसीलमध्ये, मोइचारणी क्षेत्रातील बोरपाडा नावाच्या एका आदिवासी गावात असं काहीतरी घडलं जे कदाचित सरकारी नकाशावर केवळ एक ठिपका असेल, परंतु त्या गावाची जिवंत कहाणी कोणत्याही मोठ्या शहराच्या गजबजाटाइतकीच गुंतागुंतीची आहे. फरक एवढाच की शहरातील समस्या वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये झळकतात, तर गावातील वेदना मुकेपणाने सोसल्या जातात.
तीन वर्षे गाळाखाली गुदमरलेली विहीर
बोरपाडा गावात पाण्याची समस्या एका दिवसात उद्भवली नव्हती. ती हळूहळू, वर्षानुवर्षे अधिकाधिक गंभीर होत गेली होती. गावाच्या मध्यभागी एक सार्वजनिक विहीर होती. या विहिरीच्या तोंडाला सुरक्षेची भिंत बांधणे अत्यंत आवश्यक होतं, परंतु हे काम कधीही पूर्ण झालं नाही. परिणामी, प्रत्येक पावसाळ्यात माती, दगड आणि कचरा विहिरीत साचू लागला. तीन वर्षांच्या काळात विहीर इतकी भरून गेली की त्यात पाण्याऐवजी केवळ चिखल आणि दूषित गाळच उरला होता. पंचायतीची दारं वारंवार ठोठावण्यात आले, प्रत्येक वेळी आश्वासने मिळाली, पण प्रत्येक वेळी हाती निराशाच आली. तीन वर्षांची आशा हळूहळू थकव्यात रूपांतरित झाली होती. आणि थकव्यानंतर जे येतं ते म्हणजे मनाचं तुटणं…
साफसफाईपूर्वीची विहीर (छायाचित्र श्रेय — मुकेश पोरवाल, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
बोरपाडा गावात वागधारा संस्थेने स्थापन केलेल्या ग्रामस्वराज समूहाची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत जेव्हा विहिरीचा विषय निघाला, तेव्हा कोणीतरी म्हणालं की, सरकारची वाट पाहत राहिलो तर आणखी तीन वर्षे निघून जातील. त्याचवेळी ग्रामस्थांच्या मनात पूर्वजांचा तो प्राचीन मार्ग ‘हलमा’आठवला आणि त्याच बैठकीत निर्णय घेण्यात आला की ६ मे २०२६ रोजी बोरपाडा गावात ‘हलमा’ होईल.
… आणि त्या दिवशी गावात हलम्याची गाणी गायली जाऊ लागली
६ मेच्या सकाळी गावात परंपरेची वाद्यं घुमू लागली आणि हलम्याची गाणी गायली जाऊ लागली. या गाण्यांमध्ये केवळ सूरच नव्हता तर त्यात एक आवाहन होतं, श्रमाचा आदर होता, एकत्र चालण्याचा संकल्प होता. या मिरवणुकीने गावाला जाग आणली. घराघरातून माणसं बाहेर पडली. महिलांनी डोक्यावर टोपल्या घेतल्या, पुरुषांनी खांद्यावर फावडी आणि खोदकामाची साधने. विहिरीपाशी पोहोचल्यावर लोकांनी आत डोकावून पाहिलं. तीन वर्षांच्या दुर्लक्षाने विहिरीला जखमी केलं होतं, मोठ्या प्रमाणावर दगड आणि चिखल साचला होता. पण गावकरी थांबले नाहीत. काही जण आत उतरले, काही वर उभे राहिले. दगड बाहेर काढले गेले, माती खणण्यात आली, टोपल्या भरल्या जात होत्या आणि रिकाम्या केल्या जात होत्या.
हलमा : आदिवासी समाजाच्या सामूहिक शक्तीची जिवंत परंपरा
‘हलमा’ ही भील आदिवासी समाजाची एक प्राचीन सामूहिक परंपरा... त्याचा थेट अर्थ मिळून काम करणं, कोणतीही मजुरी न घेता, कोणताही करार न करता, केवळ परस्पर स्नेहाच्या बळावर. याचं वैशिष्ट्य असं की यात कोणी नेता नसतो, कोणतीही घोषणाही नसते. हलमा ही भील आदिवासी समाजाची शतकानुशतके जपलेली सामूहिक श्रमाची परंपरा आहे. एखाद्या व्यक्तीसमोर, कुटुंबासमोर किंवा संपूर्ण गावासमोर उभ्या राहिलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी समाजातील लोक कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता एकत्र येऊन काम करतात, त्याला हलमा म्हणतात. शेतीची कामे, विहिरींची दुरुस्ती, बंधारे उभारणे, पाणवठ्यांची साफसफाई, घरबांधणी किंवा नैसर्गिक आपत्तीनंतरची पुनर्बांधणी अशा अनेक कामांसाठी या परंपरेचा वापर केला जातो. हलम्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मजुरी, करार किंवा औपचारिक नेतृत्व यांना स्थान नसते. त्याचा पाया असतो परस्पर विश्वास, सामाजिक जबाबदारी आणि एकमेकांच्या सुखदुःखात उभे राहण्याची भावना.
समुदायाने हलमा केल्यानंतरची विहीर (छायाचित्र श्रेय — मुकेश पोरवाल, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
मध्य प्रदेशातील झाबुआ, अलिराजपूर, धार, बडवानी या जिल्ह्यांसह राजस्थानातील बांसवाडा-डुंगरपूर आणि गुजरातमधील दाहोद परिसरातील भील आदिवासी भागांमध्ये ही परंपरा आजही विविध स्वरूपांत दिसून येते. आधुनिक विकासाच्या भाषेत ज्याला 'सामुदायिक सहभाग' म्हटले जाते, त्याची ही अनेक शतकांपूर्वीपासून अस्तित्वात असलेली लोकाभिमुख आवृत्ती आहे.
गेल्या दोन दशकांत हलमा परंपरेने केवळ सामाजिक नव्हे तर पर्यावरणीय चळवळीचेही स्वरूप धारण केले आहे. झाबुआ जिल्ह्यात अनेक गावांनी हलम्याच्या माध्यमातून जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि वनीकरणाची कामे हाती घेतली. हजारो ग्रामस्थ एकत्र येऊन डोंगरउतारांवर चर खोदणे, माती अडवणारे बांध बांधणे, पाणीसाठे तयार करणे आणि झाडांचे संवर्धन करणे अशी कामे करू लागले. या सामूहिक प्रयत्नांमुळे अनेक भागांमध्ये भूजल पातळीत सुधारणा झाल्याची आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.
"हलमा आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिला आहे’’
त्या दिवसाच्या हलम्याचे नेतृत्व करणारे विष्णू निनामा ‘बाईमाणूस’शी बोलताना म्हणाले,
"आम्ही तीन वर्षे पंचायतीचे उंबरठे झिजवत होतो. प्रत्येक वेळी आश्वासन मिळायचं, काम व्हायचं नाही. जेव्हा आम्ही ठरवलं की आपणच करायचे, तेव्हा मनात एक हलकेपण आलं, जणू एखादं ओझं उतरलं."
हे केवळ शब्द नाहीत. यात त्या माणसाची वेदना आहे जो व्यवस्थेवर विश्वास ठेवत राहिला, वारंवार फसवला गेला, आणि शेवटी स्वतःवर विश्वास ठेवण्याची निवड केली.
सहा मेच्या सकाळी गावात परंपरेची वाद्ये घुमली, हलम्याची गाणी गायली — आदिवासी समुदायातील गावकरी (छायाचित्र श्रेय — मुकेश पोरवाल, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
धूलसिंह वसुनिया यांचं बोलणे हलम्याच्या त्या तात्विक पैलूला स्पर्श करतं जे बाहेरून दिसत नाही. ‘बाईमाणूस’के आपल्या भावना व्यक्त करताना वसुनिया म्हणतात,
"हलमा आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिला आहे. हे केवळ काम नाही हा आमचा मार्ग आहे, हे सांगण्याचा की आम्ही एक आहोत. जेव्हा गाव सोबत असतं, तेव्हा कोणतंही काम मोठं वाटत नाही."
आदिवासी समाजाच्या या तत्त्वज्ञानात एक गहन सत्य दडलेले आहे, एकता ही केवळ भावनिक संकल्पना नाही, ती एक व्यावहारिक शक्ती आहे जी डोंगराएवढ्या अडचणी सुद्धा चिरू शकते.
स्त्री-पुरुष समान सहभागाचा आदिवासी आदर्श
रामचंद्र वसुनिया एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधतात. त्या दिवसाचा हलमा केवळ पुरुषांचा नव्हता तर गावातील महिलाही तितक्याच समर्थपणे त्या श्रमात सहभागी होत्या. टोपल्या भरण्यापासून कचरा उचलण्यापर्यंत... हे भील समाजाच्या त्या परंपरेचं प्रतिबिंब आहे जिथे सामूहिक कामात स्त्री-पुरुष भेद नसतो. सोबत राहणं, सोबत घाम गाळणं हीच त्यांची समानता आहे, आणि ती कागदावर लिहिलेल्या कोणत्याही अधिकारापेक्षा अधिक खरी आहे.
वागधाराच्या ग्राम स्वराज समूहाने या हलम्यात जी भूमिका निभावली, तीही लक्षवेधी आहे. त्यांनी गावकऱ्यांना उत्तरे दिली नाहीत तर त्यांनी प्रश्न विचारण्याची आणि उत्तरं स्वतः शोधण्याची जागा निर्माण केली. आधुनिक विकासाच्या भाषेत याला "सामुदायिक सहभाग" म्हणतात, परंतु वास्तव त्यापेक्षाही अधिक खोल आहे लोकांवर विश्वास ठेवणं, त्यांच्या बुद्धिमत्तेवर, त्यांच्या परंपरांवर, त्यांच्या परस्पर नातेसंबंधांच्या शक्तीवर. हा विश्वासच विकासाचा खरा पाया आहे.
हलम्यात योगदान देणाऱ्या आदिवासी समुदायाच्या महिला — बोरपाडा गाव (छायाचित्र श्रेय — मुकेश पोरवाल, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
वागधारा संस्थेचे सामुदायिक सहजकर्ता मुकेश पोरवाल या हलम्याला एका मोठ्या संदेशाचे रूप देतात "आम्हाला असं वाटतं की हे केवळ एका दिवसाचे काम राहणार नाही. या गावाने जे केले, त्याने इतर गावांनाही वाट दाखवलीये. आपल्या स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा." हे वाक्य केवळ एका गावाबद्दल नाही. हे त्या प्रत्येक समूहाला लागू होते जो व्यवस्थेच्या प्रतीक्षेत थकलेला आहे आणि ज्याने स्वावलंबनाची वाट निवडण्याची हिंमत केली आहे.
जलसंवर्धनाचा लोकमार्ग म्हणून हलमा
शहरी दृष्टिकोनातून आदिवासी समाजाकडे पाहताना अनेकदा एक गोष्ट विसरली जाते ती म्हणजे, या समुदायांनी शतकानुशतके एकत्र राहण्याची कला जपत ठेवली आहे. हलमासारख्या परंपरा आजच्या 'टीमवर्क' किंवा 'सामुदायिक विकास' यांसारख्या संकल्पनांपेक्षा कितीतरी जुन्या आणि कितीतरी खोल आहेत, कारण त्यात वेतनाची अपेक्षा नाही, कीर्तीची इच्छा नाही. आहे तर केवळ एक सहज मानवीय भाव की जेव्हा माझा शेजारी संकटात असेल, तेव्हा मी त्याच्यासोबत उभा राहीन.
आधुनिकतेच्या प्रवाहात जेव्हा गावोगावी व्यक्तिवाद पसरत आहे, तेव्हा हलमासारख्या परंपरांचे महत्त्व अधिकच वाढतं. मध्य प्रदेशातील आदिवासी भागांमध्ये वागधारा ही परंपरा जिवंत ठेवत आहे. कारण हलमा हे केवळ एक सामूहिक कार्य नाही ती समाजाच्या शक्तीचा उत्सव आहे. आज जेव्हा प्रत्येक समस्येवर सरकारी योजनेची अपेक्षा ठेवली जाते, तेव्हा बोरपाडाचे गावकरी हे सांगतात की, प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याच हातात, आपल्या एकजुटीत, आपल्या पूर्वजांनी दिलेल्या शहाणपणात.
हलमा करताना बोरपाडा गावातील लोक (छायाचित्र श्रेय — मुकेश पोरवाल, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
बोरपाडाच्या विहिरीत जेव्हा ते दगड उचलले जात होते, तेव्हा केवळ विहीर मोकळी होत नव्हती एक विचारही मोकळा होत होता, की आपण स्वतः काहीतरी करू शकतो. आपण केवळ व्यवस्थेचे दर्शक नाही तर आपल्या आयुष्याचे घडवणारे आहोत. हलम्याने त्या दिवशी केवळ विहीर साफ केली नाही त्याने तीन वर्षांचं दुखणं साफ केलं, निराशेचा गाळ काढला आणि आत्मसन्मानाचे पाणी वर आणलं.






