Skip to main content

हिंजवडी ‘आयटी हब’च्या चकाकीपलीकडे, हाकेच्या अंतरावर अंधारात जगणारा धनगरवाडा…!

Article in Marathi
Apsara Aga
15 Apr 2026
78 views
 हिंजवडी ‘आयटी हब’च्या चकाकीपलीकडे, हाकेच्या अंतरावर अंधारात जगणारा धनगरवाडा…!

अप्सरा आगा 


  • पुण्याच्या पश्चिमेकडील पवनेच्या कुशीत उभं असलेलं ‘हिंजवडी आयटी हब’... देशाच्या डिजिटल प्रगतीचं प्रतीक. उंच काचेच्या इमारती, लाखोंची वर्दळ आणि झगमगाट…
  • पण याच चकाकीपासून अवघ्या काही किलोमीटरवर मुगावडेच्या डोंगरावर एक वेगळंच वास्तव जगतंय, धनगरवाडा…
  • प्रश्न एकच, प्रगती इतकी जवळ असूनही इथं का पोहोचत नाही?
  • आयटी हबच्या काही किलोमीटर अंतरावर पाणी, वीज, रस्ता आणि शिक्षणासाठी झगडणाऱ्या धनगर समाजाची वेदनादायी वास्तवकथा



पुण्याच्या पश्चिम उपनगर भागात आणि पवनेच्या कुशीत 'हिंजवडी आयटी हब' वसलंय. जवळपास दीडशे ते दोनशे नामांकित कंपन्या या हबमध्ये असून, प्रतिदिन तीन ते साडेतीन लाख कर्मचारी, नागरिक हे या हबमध्ये ये- जा करत असतात. हे आयटी हब जवळपास 2800 एकर जागेत पसरलंय. 'हिंजवडी आयटी हब' भारतातच नव्हे तर जगाच्या नकाशावर नामांकित असणारं प्रसिद्ध आयटी पार्क म्हणून पुणे शहराला लाभलं आहे. गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी या हिंजवडी ग्रामीण भागात सामान्य नागरिकाला जायचं म्हणलं तर, छातीवर दगड ठेवून खासगी वाहन घेऊन जावं लागायचं, कारण डोंगर आणि ओसाड पडलेल्या जमिनीशिवाय तेथे काहीच नव्हतं. परंतु, आज याच ठिकाणी दिवसाला तीन ते चार लाख नागरिकांचा प्रवास होतो. त्यामुळं हिंजवडी आयटी हब परिसराच्या आजूबाजूतील या तीन गावांना सोन्याचा भाव आला.


इतकं सगळं असल्यामुळे हिंजवडी आयटी हबमध्ये काहीही घडलं तरी त्याची बातमी बनते. मग ते पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे आयटी पार्क कसं वॉटर पार्क बनलयं इथपासून ते इथल्या ट्रॅफिकच्या प्रश्नापर्यंत…


User Image


याच हिंजवडी आयटी पार्कपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे, मुगावडे गावाजवळचा डोंगर आणि तिथला धनगरवाडा…पुण्याजवळचे हिंजवडी आयटी पार्क म्हणजे उंचच उंच काचेच्या इमारती, दिवसरात्र झगमगणारे दिवे, परदेशी कंपन्यांची वर्दळ…सगळं काही इथं अत्याधुनिक आणि वेगवान. ‘नवा भारत’ कसा दिसतो, याचं हे जिवंत उदाहरण... पण या चकचकीपासून अवघ्या काही किलोमीटरवरच एक वेगळं वास्तव उभं आहे, मुगावडे गावाजवळचा डोंगर आणि त्यावरचा धनगरवाडा.


आयटी पार्कपासून हाकेच्या अंतरावर असलेला धनगरवाडा.


हा डोंगर चढत वर गेलं की सगळ्यात आधी जाणवते ती शांतता. पण ही शांतता निसर्गरम्य नाही, ती उपेक्षेची आहे. मातीच्या आणि पत्र्याच्या झोपड्या, आजूबाजूला मेंढ्यांचे कळप, गायी आणि जगण्यासाठी सुरू असलेली धडपड, हेच या धनगर वाड्याचं चित्र आहे. इथं वेळ जणू थांबलेला वाटतो, कारण विकासाचा वेग इथं पोहोचलेलाच नाही. हिंजवडीसारख्या आयटी हबच्या शेजारी असूनही या वाड्यावर अजूनही वीज पोहोचलेली नाही. काही कुटुंबांनी स्वतःच्या प्रयत्नाने छोटे सोलर दिवे बसवले आहेत, पण तेही फक्त तात्पुरता दिलासा देतात. रात्री इथं पूर्ण अंधार पसरतो. 


“आमची आता चौथी पिढी मुगावडेच्या डोंगरावरच जगतेय. आमचे आजोबा-आजी इथे राहायचे, मग आई-वडील, आणि आता आम्ही पण… मात्र इतक्या वर्षांत आमच्या आयुष्यात काहीच बदल झालेला नाही. आजूबाजूचं जग किती पुढं गेलंय, पण आम्ही मात्र अजूनही तिथंच आहोत,’’ असं सत्तर वर्षांच्या बाळूबाई आखाडे हळू आवाजात, पण ठाम शब्दांत आपली कहाणी सांगायला लागतात. त्यांच्या प्रत्येक वाक्यात आयुष्यभराचा संघर्ष दडलेला जाणवतो. 


आयटी हबच्या शेजारी असूनही इथे वीज पोहोचलेली नाही


'आमचं घर म्हणजे गवताच्या पेढ्या रचून, काठ्या उभ्या करून आणि वर पत्रे टाकून बनवलेलं. तोच आमचा आसरा. पावसाळा आला की घर सगळीकडून ओलं होतं, पाणी आत येतं. उन्हाळ्यात तेच घर तापतं. थंडीच्या दिवसांत थंडीपासूनही फारसं संरक्षण मिळत नाही. पण दुसरा काही पर्यायच नाही, म्हणून इथचं राहायचं. आमचं सगळं आयुष्य जनावरांभोवती फिरतं. मेंढ्या, शेळ्या ह्यांच्यावरच आमचं पोट चालतं. त्यामुळे त्यांची काळजी घेणं थांबवून चालत नाही. त्यांच्यासाठी पाणी आणि चारा आणायला रोज डोंगर चढ-उतार करावा लागतो. बायकांनी तर दिवसातून कित्येक वेळा ही पायपीट करायची असते. वय झालं तरी काम थांबत नाही. शरीर थकतं, पण जगणं थांबत नाही,' असं बाळूबाई आखाडे धाडसानं सांगत असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर मात्र भावनिक छटा स्पष्ट दिसत होत्या. 


User Image(बाळूबाई आखाडे)


२०११ च्या जनगणनेत जातीनिहाय स्वतंत्र आकडेवारी नसल्यामुळे धनगर समाजाची नेमकी अधिकृत लोकसंख्या उपलब्ध नाही. मात्र विविध सामाजिक संघटना, अभ्यासक आणि अहवालांनुसार महाराष्ट्रातील धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे १ कोटी ते १.५ कोटी दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. काही अभ्यासक हा आकडा राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९ ते १२ टक्के इतका मानतात.


धनगर समाज प्रामुख्याने पशुपालन, मेंढपाळी आणि शेतीपूरक व्यवसायाशी जोडलेला असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विखुरलेला आहे.

महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्या, माळराने आणि जंगलांच्या कुशीत आपलं आयुष्य उभं करणारा धनगर समाज हा भटक्या जमातीतील एक महत्त्वाचा घटक. पिढ्यानपिढ्या मेंढपाळी करत, निसर्गाशी नातं जोडत जगणारा हा समाज आजही परंपरेला घट्ट धरून आहे. पण काळ बदलला, जग पुढे गेलं, शहरं उजळली तरीही या समाजाच्या आयुष्यात मात्र फारसा फरक पडलेला नाही. परंपरा आणि आधुनिकतेच्या मधोमध अडकलेला हा समाज अजूनही मूलभूत गरजांसाठी झगडतोय, पाणी, वीज, रस्ता, शिक्षण…या सगळ्यांसाठी त्यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे.


शहराजवळ राहतोय की कुठल्या दुर्गम भागात?


धनगर वाड्यावरच्या सुनिता भोसले सांगतात, “रात्री मुलांना अभ्यास करायला उजेड नाही. मोबाईल चार्ज करायलाही खाली गावात जावं लागतं. कधी कधी वाटतं, आपण शहराजवळ राहतोय की कुठल्या दुर्गम भागात?” त्यांच्या आवाजातली हतबलता स्पष्ट जाणवते. त्यांच्या मुलांच्या डोळ्यांत शिकायची इच्छा आहे, पण त्या इच्छेला उजेड देणारी साधनं नाहीत.


पाण्याची समस्या तर इथं सर्वात मोठी आहे. कुठलाही कायमस्वरूपी जलस्रोत नाही. महिलांना रोज दोन-तीन किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागतं. लक्ष्मी काळे डोक्यावर घागर घेऊन परत येताना दिसतात. त्या सांगतात, “दिवसाला दोन-तीन फेऱ्या माराव्या लागतात. पाणी आणण्यातच अर्धा दिवस जातो. उन्हाळ्यात झरे सुकतात, मग अजून लांब जावं लागतं. कधी पाणी मिळेल की नाही, याचीही खात्री नसते.” त्यांच्यासोबत चालणारी लहान मुलंही पाण्याचं ओझं उचलतात. बालपण खेळण्यात नाही, तर जगण्यासाठीच्या कामात जातंय, हे स्पष्ट दिसतंय. 


या वाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नाही. केवळ अरुंद, खडतर पायवाटा आहेत. पावसाळ्यात या वाटा चिखलाने भरतात आणि पूर्णपणे बंद होतात. अशा वेळी कोणीतरी आजारी पडलं, तर त्याला खाली नेणं ही मोठी कसरत होते. “चार-पाच जणांनी उचलून न्यावं लागतं. कधी वेळेत पोहोचता येत नाही,” असं स्थानिक नागरिक सांगतात. रस्ता नसल्यामुळे आरोग्य सेवा, शाळा, आणि सरकारी सुविधा या सगळ्या गोष्टी या वाड्यापासून दूरच राहतात.


User Image


'शिक्षण शाळेपुरतंच राहून जातं'


या सगळ्या परिस्थितीतही शिक्षणाची आस मात्र संपलेली नाही. दिपाली गोरे ही दहावीची परीक्षा दिलेली मुलगी, आपल्या स्वप्नांविषयी बोलताना म्हणते, “मला पुढे शिकायचं आहे, पण आमची परिस्थिती मला थांबवतेय. वडील नाहीत, आई मजुरी करते, पण रोज काम मिळेलच असं नाही. शिक्षणासाठी पैसे काढणं खूप कठीण आहे. शाळेत जायचं म्हणजे दोन-तीन किलोमीटर चालत जावं लागतं. पावसाळ्यात रस्ता चिखलमय होतो. उन्हाळ्यात पाणी नसतं. वेळेवर पोहोचणंही कठीण होतं. वाडीत वीज नाही, त्यामुळे मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करावा लागतो. पण तेही परवडत नाही. त्यामुळे शिक्षण शाळेपुरतंच राहून जातं.”


ती पुढे सांगते, “शिक्षण नसेल, तर आमच्यासारख्या मुलींसाठी पर्याय खूप कमी राहतात. पुन्हा मेंढपाळी, मजुरी तेच आयुष्य. पण आम्हालाही काहीतरी वेगळं करायचं आहे. माझ्यासारख्या अनेक मुलींना शिकायचं आहे, पुढे जायचं आहे. पण परिस्थिती आम्हाला थांबवते. स्वप्नं आहेत, पण ती पूर्ण होण्याआधीच थांबतात.”


‘’आम्हाला उंच डोंगरावर जाऊन राहावं लागतं…’’


अलका ताई सांगतात ,'पावसाळा सुरू झाला की आमचं जगणंच बदलून जातं. आम्हाला उंच डोंगरावर जाऊन राहावं लागतं, कारण खाली घरात पाणी शिरतं. वर झोपड्या करून राहतो, पण त्या झोपड्यांमध्येही अनेकदा पाणी येतं. कधी बसायलाही जागा नसते, तर कधी पावसातच दिवस काढावे लागतात. चार-पाच महिने थंडी आणि पावसात कसेबसे जगावं लागतं. या सगळ्याचा आमच्या आरोग्यावर परिणाम होतो, पण दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नसतात.सर्वात जास्त वाईट वाटतं ते मुलांसाठी. पावसाळ्यात त्यांची शाळाच बंद होते. चार-पाच महिने त्यांचं शिक्षण थांबतं. आम्हाला वाटतं आमच्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, पण परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. आमचं आयुष्य असंच कसं चाललंय, पण मुलांचं भविष्य तरी बदलावं, हीच इच्छा आहे.'


User Image


पाण्यासाठी रोज दोन-तीन किलोमीटरची पायपीट


कविता आखाडे आपल्या दैनंदिन आयुष्याबद्दल सांगताना अक्षरशः मन मोकळं करतात. त्या म्हणतात, “आम्ही या डोंगराच्या कडेला राहतोय, आणि आमचं मुख्य गाव इथून दोन-तीन किलोमीटर लांब आहे. त्यामुळे अगदी छोट्या-छोट्या गरजांसाठीही आम्हाला पायीच जावं लागतं. कुठे जायचं म्हटलं तरी गाडीची काहीच सोय नाही, कारण इथपर्यंत रस्ताच नाही. एखादं आजारी पडलं, काही तातडीचं काम आलं, तरी आम्हाला पायावरच अवलंबून राहावं लागतं. पाण्याची अडचण तर खूपच मोठी आहे. पिण्याचं पाणी आणण्यासाठी रोज दोन-तीन किलोमीटर चालत जावं लागतं. उन्हाळा आला की हीच पायपीट पाच-सहा किलोमीटरपर्यंत वाढते. कधी कधी इतकं चालून गेल्यावरही पाणी मिळेल की नाही, याची खात्री नसते. पाण्याच्या शोधातच आमचा अर्धा दिवस जातो, त्यामुळे दुसरं काही काम करायला वेळच मिळत नाही. घर, लेकरं, जनावरं सगळं सांभाळताना जीव मेटाकुटीला येतो.''


पुढे त्या सांगतात, ''आमच्याकडे पक्कं घरही नाही. गवत, काठ्या आणि पत्र टाकून उभं केलेली झोपडीच आमचं घर आहे. पावसात ती ओलांडते, उन्हात तापते पण राहायचं तर तिथंच. आम्ही चार पिढ्यांपासून इथेच राहतोय, पण तरीही काही लोक आम्हाला इथून निघून जायला सांगतात. त्यामुळे कायम मनात भीती असते कधी काय होईल, काहीच सांगता येत नाही. स्वतःचं घर नाही, पाणी नाही, रस्ता नाही या सगळ्या अडचणींमध्ये आम्ही कसंबसं जगतोय. त्यात जनावरांसाठीही पाणी आणावं लागतं, त्यांनाही पाणी भरपूर मिळत नसल्यानं जनावरांचंही हाल होतं. त्यामुळं दूधही जेमतेम मिळत नाही. दुधाचे चार पैसे यायचे तेही मिळत नाहीत. त्यामुळे कष्ट अजूनच वाढतात. दिवस कसा सुरू होतो आणि कसा संपतो, हेच कळत नाही. रोजचं आयुष्य म्हणजे फक्त जगण्यासाठीची धडपड झालीय. कधी कधी मनात एकच प्रश्न येतो, आम्ही अजून किती दिवस असंच जगायचं?”


“योजना आहेत, पण पोहोचत का नाहीत?”


मुगावडेच्या डोंगरावरचा हा धनगरवाडा पाहताना एक प्रश्न सतत मनात ठाण मांडून बसतो तो म्हणजे सरकारकडून इतक्या योजना जाहीर होतात, मग त्या इथपर्यंत का पोहोचत नाहीत?


User Image(कविता आखाडे)


उत्तर शोधायला गेलं, की वास्तव अनेक स्तरांवर उलगडत जातं. सर्वप्रथम अडथळा ठरतो तो या समाजाच्या भटक्या जीवनशैलीचा. कायमस्वरूपी पत्ता नसल्यामुळे आवश्यक कागदपत्रं मिळवणं कठीण होत आणि कागदपत्रांशिवाय कोणतीही योजना त्यांच्या दारात येत नाही. परिणामी, ते व्यवस्थेच्या चौकटीबाहेरच राहतात. यात भर पडते ती ‘अनधिकृत वस्ती’ या शिक्क्याची. अनेक धनगरवाडे महसुली नोंदीत नोंदलेलेच नसतात. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने हे वाडे जणू अस्तित्वातच नसल्यासारखे ठरतात. अशा ठिकाणी वीज, पाणी किंवा रस्ता देण्याची जबाबदारी कोणी घेत नाही.


भौगोलिक परिस्थितीही इथं मोठा अडथळा ठरते. डोंगराच्या कडेला, दुर्गम भागात वसलेले हे वाडे, इथपर्यंत रस्ता नाही, त्यामुळे वीज लाईन टाकणं, पाणीपुरवठा करणं ही कामं खर्चिक आणि वेळखाऊ ठरतात. परिणामी, योजना कागदावरच राहतात.


पण प्रश्न फक्त भौगोलिक अडचणींचा नाही. तो प्राधान्यक्रमाचाही आहे. शहराच्या अगदी जवळ असूनही या वाड्यांकडे ‘दुर्गम’ म्हणूनच पाहिलं जातं. लक्ष केंद्रित होतं ते शहराच्या विस्तारावर, आयटी पार्कच्या विकासावर; आणि अशा छोट्या वाड्या मात्र दुर्लक्षित राहतात. यासोबतच स्थानिक पातळीवर ठोस पाठपुरावा करणारी यंत्रणाही नसते. या वाड्यांमध्ये संघटित नेतृत्व किंवा प्रभावी प्रतिनिधित्व नसल्यामुळे त्यांच्या मागण्या वरपर्यंत पोहोचत नाहीत. मतदारसंख्या कमी आणि विखुरलेली असल्यामुळे राजकीय इच्छाशक्तीही कमी भासते.


आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माहितीचा अभाव. अनेकांना योजनांची माहितीच नसते, आणि जरी माहिती असली तरी अर्ज प्रक्रिया, कागदपत्रं, अटी या सगळ्यांचा गुंता त्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. अशा सगळ्या घटकांच्या संगमातून एक कटू वास्तव उभं राहतं ते म्हणजे योजना अस्तित्वात आहेत, पण त्या पोहोचण्यासाठी जी व्यवस्था, कागदपत्रं आणि इच्छाशक्ती लागते, तीच या वाड्यांपर्यंत पोहोचलेली नाही. म्हणूनच, प्रगतीच्या अगदी शेजारी असूनही हा धनगरवाडा अजूनही अंधारातच आहे.



एकीकडे प्रगतीचा वेग, दुसरीकडे उपेक्षेचं ओझं


हिंजवडीसारख्या भागात डिजिटल भारताची स्वप्नं साकार होत असताना, अगदी शेजारीच अशा वाड्यांमध्ये लोक अजूनही मूलभूत गरजांसाठी झगडत आहेत, हा विरोधाभास खूप मोठा आहे. एकीकडे प्रगतीचा वेग, तर दुसरीकडे उपेक्षेचं ओझं या दोन टोकांमध्ये हा समाज अडकलेला आहे. धनगर समाजाचा प्रश्न हा फक्त सुविधांचा नाही, तर ओळखीचाही आहे. भटक्या जीवनशैलीमुळे त्यांना स्थैर्य मिळत नाही. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रं, स्थिर पत्ता हे सगळं नसल्यामुळे ते अनेकदा व्यवस्थेच्या कक्षेबाहेरच राहतात. त्यामुळे त्यांचा विकास हा कागदावरच राहतो, प्रत्यक्षात नाही.


User Image


आज गरज आहे ती या धनगर वाड्यांकडे खर्‍या अर्थाने पाहण्याची. रस्ता, पाणी, वीज, शिक्षण या सगळ्या सुविधा इथं पोहोचायला हव्यात. फक्त योजना जाहीर करून उपयोग नाही, त्या प्रत्यक्षात अंमलात यायला हव्यात. कारण विकास तेव्हाच खरा, जेव्हा तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. मुगावडेच्या डोंगरावरचा हा धनगरवाडा ही केवळ एक कहाणी नाही, तर अशा हजारो वाड्यांचं प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे. इथं संघर्ष आहे, पण हार नाही. अडचणी आहेत, पण आशा अजून जिवंत आहे. दीपालीसारख्या मुली अजूनही स्वप्न पाहतात, बाळूबाई अजूनही जगण्याची धडपड करतात, आणि कविता अजूनही तोच प्रश्न विचारते, ''आम्ही अजून किती दिवस असंच जगायचं?”


(Apsara Aga is a mentee at the Climate Change Media Hub of the Asian College of Journalism. The program is supported by Interlink Academy, Germany.) (This story is produced under Project Dharitri, a joint undertaking by Asar and Baimanus on Climate Change & Gender reporting.)
Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...