(अक्षय शारदा शरद)
आसाम... ईशान्य भारतातलं सर्वात मोठं राज्य. या राज्यातून मानव आणि हत्ती यांच्यातल्या संघर्षाच्या बातम्या सातत्याने आपल्या कानावर येतात. खरंतर हत्तींचा अधिवास असलेल्या राज्यांत आसामसह कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. पण आसाममध्ये मानव आणि हत्ती यांच्यातल्या संघर्षाने टोक गाठल्याचं चित्र आहे. सरकारच्या आकडेवारीमुळे हे चित्र अधिक स्पष्ट होतंय.
आशियाई हत्तींची सर्वाधिक संख्या भारतात आहे. एकूण आशियाई हत्तींपैकी 60 टक्के हत्ती भारतात असल्याचे केंद्र सरकारची आकडेवारी सांगते. राज्यांचा विचार केला तर कर्नाटक नंतर सर्वाधिक हत्ती हे आसाममध्ये आढळतात. पण चिंतेचं कारण म्हणजे आसाममधल्या हत्तींच्या मृत्यूत वाढ होतेय. आसाम सरकारच्या आकडेवारीनुसार, मागच्या पाच वर्षांत राज्यातील 384 हत्तींचा मृत्यू झालाय. विजेच्या धक्क्याने यातील सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे.
याच हत्तींना 13 ऑक्टोबर 2010 ला भारताच्या राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाने राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलं. पुढे पर्यावरण मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तबही केलं. अतिशय बुद्धिमान आणि संवेदनशील असलेले हत्ती आपला अमूल्य वारसा बनले. पण त्यांचं एकूण अस्तित्वच सध्या धोक्यात आलंय. 
हत्तींच्या मार्गात अडथळे?
वेगानं शहरीकरण होण्याचा हा सगळा काळ आहे. ते करताना माणसं आपल्या हव्यासापोटी नैसर्गिक अधिवास नष्ट करत आहेत. यात सरकारंही मागं नाहीत. कधी कुठला प्रकल्प पुढे करून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. जमिनी सपाट केल्या जातात. त्याचा परिणाम वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर होतो. आणि मग हत्ती असो की, बिबट्या यांना अन्नाच्या शोधात थेट मानवी वस्त्यांत प्रवेश करावा लागतो. एकूण सर्वांसाठीच ही चिंतेची बाब आहे.
आसामचा विचार केला तर, इथले अनेक चहा उत्पादक हत्तींचा अधिवास असलेल्या राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण करत असल्याचे अहवाल आहेत. हे अतिक्रमण होत असताना मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात असल्याची नोंद केंद्र सरकारच्या 2015 च्या वन अहवालात वाचायला मिळते. तसंच विषबाधा करूनही अनेकदा हत्तींना संपवलं जातं.
वन्यजीवांची मानवी वस्तीत प्रवेश केल्यावर आत्मसंरक्षणासाठी नागरिकांकडून त्यांच्यावर हल्ले केले जातात. आसाममधल्या हत्तींच्या मृत्यूच्या सर्वाधिक घटना विजेच्या धक्क्याने झाल्या आहेत. त्याचं मूळ कारण या हत्तींच्या येण्याजाण्याच्या मार्गात बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या विजेच्या तारा हे आहे. अशाप्रकारे वन्यजीवांच्या नैसर्गिक मार्गात अडथळे निर्माण केल्यानं येत्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
आसाम सरकारच्या उपाययोजना
मानव आणि हत्ती यांच्यातला संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने आसाम सरकारनं अनेक उपाययोजना केल्या. सकारात्मक पावलं टाकली गेली. त्याचाच भाग म्हणून हत्तींच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना देण्यात देणाऱ्या भरपाईत वाढ करण्यात आली. सुरवातीला ही रक्कम 4 लाख इतकी होती. ती वाढवून पाच लाख इतकी करण्यात आली. शेतीचं होणारं नुकसान विचारात घेऊन त्यादृष्टीनेही वाढीव भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली होती. 
आसाममधल्या 'नॅशनल हायवे'मधून जात असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हा मानव आणि हत्ती असा संघर्ष पाहायला मिळतो. त्यात कधी लोकांचा मृत्यू तर कधी विजेच्या तारांमध्ये अडकून हत्तींचा मृत्यू होत आहे. याचाच विचार करून हत्तींना या भागात वावरताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसंच त्यांना फिरणं सोप्पं व्हावं यासाठी सुरक्षा जाळी बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला.
आसाम सरकारनं राज्यातील सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांसाठी 'गजमित्र योजनें'तर्गत हत्तींचा अधिवास असलेल्या ठिकाणी पुरेशी खाण्याची व्यवस्था, अचूक देखरेखीकरता एआयसंचलित कॅमेरे अशा अनेक उपाययोजना केल्या होत्या.
|
संबंधित लेख वाचा: |
जनजागृतीसाठी 'हाथी ॲप'ची मदत
गेल्यावर्षी 'आरण्यक' या संस्थेनं 'हाथीॲप' हे मोबाईल ॲप्लिकेशन आणलं. त्यासाठी आसाम सरकारसोबत एसबीआय फाऊंडेशनची मदत घेतली गेली. हत्तींवर देखरेख ठेवणं आणि होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांबाबत लोकांना आधीच जागरूक करणं, माहिती देणं हा ॲपचा महत्त्वाचा उद्देश होता. त्यादृष्टीने 10 ऑगस्ट 2024 ला या ॲपचं अनावरण करण्यात आलं.
अनेकदा हत्तींच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून तारा सोडून त्यांना विजेचे झटके दिले जातात. त्यात या हत्तींचा अनेकदा मृत्यू होतो. कोणत्याही वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे. 'हाथीॲप'चं अनावरण करताना राज्याच्या ऊर्जा मंत्री नंदिता गोर्लोसा यांनी या मुद्याकडे लक्ष वेधलं होतं. तसंच या ॲपमुळे मोठी मदत होणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला होता.
आता 'आरण्यक' संस्थेच्या वतीने आसाममधल्या लोकांमध्ये जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अडथळ्याविना हत्तींना हेरता यावं, शिवाय लोकांचं वन्यप्राण्यांसोबतचं सहअस्तित्व टिकावं हा यामागचा मूळ उद्देश आहे.
वन्यप्राण्यांसोबत सहजीवन हवं
जगात आफ्रिका आणि आशिया मध्ये हत्ती आढळतात. सवाना ( बुश) आणि वन हत्ती या दोन आफ्रिकन तर आशियायी हत्ती ही एकच प्रजाती आहे. 2024 ला आफ्रिकन हत्तींबाबतचं एक संशोधन पुढे आलं होतं. आफ्रिकन हत्तींमध्ये मागच्या 50 वर्षांत सर्वाधिक घट झाल्याची नोंद या अभ्यासात करण्यात आली होती. यात सवाना प्रजातीत हत्तींच्या एकूण संख्येच्या 70 टक्के तर वन हत्ती या प्रजातीत 90 टक्के घट झाल्याची ही आकडेवारी सांगते.
आशियायी हत्तींवरही अशाच प्रकारचं संकट असल्याचं या अहवालात म्हंटलं गेलं. भारतातल्या सर्वाधिक आशियायी हत्तींमध्ये आसामचा दुसरा क्रमांक लागत असताना तिथं सातत्याने हत्तींच्या मृत्यूमध्ये वाढ होणं म्हणून चिंतेची बाब आहे. या येऊ घातलेल्या संकटाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
हत्ती हे जंगल आणि गवताळ प्रदेशांत संतुलन ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे जैवविविधतेच्या संवर्धनात त्यांची मोलाची भूमिका आहे. त्यामुळे मानव आणि हत्ती हा संघर्ष दिवसेदिवस तीव्र होत असताना त्याकडे सरकारी पातळीवरही नीटसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसंच त्यांच्या संरक्षण, संवर्धनासाठी गांभीर्याने पावलंही उचलण्याची गरज आहे.





