Skip to main content

भूतांना गावात मोकळीक मिळावी म्हणून गुरा-ढोरांसह हे अख्खं गावच वेशीबाहेर राहायला जातं…

Article in Marathi
Suresh Thakur
31 Dec 2025
7 min read
32 views
भूतांना गावात मोकळीक मिळावी म्हणून गुरा-ढोरांसह हे अख्खं गावच वेशीबाहेर राहायला जातं…

एखादं नांदतं गाव तीन-चार दिवसांसाठी आहे त्या ठिकाणाहून एकदम गायब होतं. कालपर्यंत जिथल्या एसटी थांब्यावर, तिठ्यावर, चौकामध्ये स्थानिक प्रवाशांची, गावकऱ्यांची लगबग होती ती अचानक दिसेनाशी होते. नवख्यांसाठी हे सगळंच आक्रीत असतं. इथे दिसणारा माणसांचा राबता असा कुठे गायब झाला? याबद्दल कुतूहलमिश्रित आश्चर्य त्यांच्या मनात पर्यायाने चेहऱ्यावर उमटतं. या कुतूहलाच्या खोलात जायचा जेव्हा प्रयत्न होतो त्यावेळी कळतं की, गावपळणीमुळे सगळं गावच निर्मनुष्य झालं आहे.


आज जगभरात 31 डिसेंबरची धुम सुरू असून लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक प्लॅन बनवले आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील शिराळा या गावात मात्र वेगळीच लगबग सुरू आहे. सह्याद्रीच्या कुशित वसलेले शिराळे हे सुमारे 80 कुटुंबे असून 350 लोकसंख्या असलेले हे गाव आहे. शिराळा गावचे देवस्थान श्री गांगेश्वराने सोमवारी ‘हुकुम’ म्हणजे कौल दिला असल्यामुळे शिराळा गावातील 80 कुटुंबांनी आपले सामान बांधायला सुरूवात केली आहे. बुधवारपासून पुढच्या पाच दिवसांसाठी शिराळेवासीय गुरे-ढोरे, कोंबडी, कुत्र्यांसह आपले गाव सोडून नजीकच्या सडुरे गावच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या राहुट्यामध्ये आपला संसार थाटणार आहेत.


कोकणात फक्त या एकाच गावात गावपळणची प्रथा पाळली जात नाही तर आचऱ्यापासून अनेक गावांमध्ये ही परंपरा पाळली जाते. या गावाला आज पहाटे पहिल्या प्रहराला जाग आलेली असणार. गोठ्यातील गाई, वासरे, बैल, म्हशी, पहाटेपासून शेपट्या वर करून आणि हंबरून सांगत असतील, ‘बा माझ्या मालका, आम्हालादेखील तुझ्याबरोबर पळून यायचं हाय.’ शिराळा किंवा आचरे गावातील समस्त शेतकरी, दुकानदार, व्यावसायिक, मजूर, बायाबापड्या आणि मुलेदेखील आज पहाटेच उठून आपला बाडबिस्तरा आवरून दुपारचे दोन कधी वाजतात आणि रामेश्वराच्या नगारखान्यातील नगारा कधी दणाणतो याची वाट पाहत असतील.


User Image


हळूहळू आज दुपारचा प्रहर जवळ येईल. दुपारी दोन वाजता श्रीदेव रामेश्वर संस्थानाचे सर्व बारा-पाच मानकरी रामेश्वर मंदिरात जमा होतील. एकमुखाने रामेश्वराला गाऱ्हाणे घातले जाईल, ‘बा देवा रामेश्वरा महाराजा, तुझ्या हुकमाप्रमाणे आज आम्ही गाव फोडत आहोत. सगळ्यावर रखवाली खरी करून तुझी ही प्रभा खरी करून घे.’ या गाऱ्हाण्याला ‘होय महाराजा’चे स्वर आणि घंटा गाभाऱ्यात निनादू लागताच रामेश्वराच्या प्रांगणात तोफा गर्जू लागतील. नगारखान्यातील प्रचंड नगारा दणाणू लागेल. सर्व बारा-पाच मानकऱ्यांच्या हाताने रामेश्वराचे पहिले महाद्वार बंद होईल. त्यानंतर दुसरे महाद्वार, दिंडी दरवाजा - असे करत करत रामेश्वराच्या समोरील दरवाज्याचा लाकडी आडणा बारा-पाच मानकऱ्यांच्या हातांनी अलगद सरकवला जाईल. कानठळ्या बसवणारे तोफांचे प्रचंड आवाज, पुन्हा नगारखान्यातील तापलेल्या चामड्यावरील दणदणाट!


...आणि तो आवाज आचरे पारवाडीपासून आचरे हिर्लेवाडीपर्यंत आणि आचरे वरची चावडीपासून आचरे पिरावाडीपर्यंतच्या आपले सामानसुमान बांधून आणि कान टवकारून असलेल्या समस्त ग्रामस्थांच्या कानी जाईल. समस्त आचरेकरांच्या घरांना, त्यांच्या घरमालकांच्याच हाताने आडणे पडतील, कुलपे लागतील. कुलुपांना चावी लावताना मनात म्हणतील, ‘रामेश्वरा, बा तुला दंडवत. सोडून जातो गाव.’ आणि एकाच वेळी समस्त आचरेवासीय रामेश्वराचे नाव घेऊन, सोबत आपली गुरे, वासरे, कुत्री, मांजरे, पोपट, पाळलेली कबुतरे, कोंबड्या घेऊन सीमेबाहेर पडतील.


आचरे संस्थानच्या बारा चौकड्यांच्या बारा वाड्यांचे बारा हमरस्ते माणसांनी भरून जातील. ‘जनांचा प्रवाहो चालला’ म्हणजे काय हे ज्यांना प्रत्यक्ष अनुभवायचे असेल त्यांनी त्या दिवशी दुपारी एक ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आचरे गावच्या कोणत्याही रस्त्यावर जरी नजर टाकली, तरी त्या नजरेतून दिसून येईल, संस्थान आचरेची ही आगळी परंपरा, विविधतेतून एकता, सामाजिक सलोखा आणि ‘कोणतीही गोष्ट करायची ती दणक्यात’ हा प्रत्येक आचरेवासीयाचा मूलमंत्र.


‘रामेश्वरा, बा तुला दंडवत. सोडून जातो गाव…


गावपळणीची प्रथा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे पंचक्रोशीत पाहायला मिळते. आचऱ्याला लागून असलेल्या वायंगणी, चिंदर, मुणगे, शिराळा आदी गावांतही दर तीन ते चार वर्षांनी गावपळण होत असते. मुणगे गावात मात्र काही समाजाचीच माणसे गावपळणीची प्रथा पाळतात.


आचऱ्याची रामनवमी, डाळपस्वारी, गणेशोत्सव आदी सण-उत्सवांना जसा संस्थानी थाट असतो, एक आगळेवेगळेपण असते ते आगळेवेगळेपण आचरे गावाच्या गावपळणीतही दिसून येते. चार वर्षे पूर्ण झाली, की गावपळणीचे वर्ष आले याची कुजबुज सुरू होते. शेतकरी आपली नाचणी, भुईमूग, भाताची कापणी वेगाने सुरू करतात. ‘न जाणो म्हाताऱ्यान प्रसाद दिल्यान तर आमका गाव सोडूक व्हयो,’ ही चर्चा शेतापासून घरापर्यंत चालू असते. (आचरे गावात श्रीदेव रामेश्वराला प्रेमाने, आपुलकीने ‘म्हातारा’ म्हणण्याची प्रथा आबालवृद्धांत आहे.)


माणसांसोबत गुरेवासरे आणि पोपटांसारखे पाळीव पक्षीही


मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रखवालीचे गाऱ्हाणे घालण्यासाठी सर्व बारा-पाच मानकरी मिळून गावपळणीचा कौल लावतात. ‘देवान गावपळणीचो पोटचो उजवो कौल दिल्यान’ याची खात्री झाल्यावर ही वार्ता क्षणार्धात आसमंतात घुमते. संध्याकाळी शेतकरी लोक गावपळणीत राहण्यासाठी तात्पुरत्या मंडपाचा शुभारंभ करतात. (याला गावपळणीची ‘खुंटी’ पुरणे असे म्हणतात) जागांची पाहणी केली जाते. ही वार्ता मुंबईला समजल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात रामेश्वराचे नाव घेऊन राहण्यासाठी सर्व मुंबईकरांचे पाय रेल्वे बुकिंग ऑफिस, ट्रॅव्हलिंग ऑफिसकडे वळू लागतात.


User Image


आचरा परिसरातील शैक्षणिक संस्था सुट्टीच्या कालावधीत शाळा कशी भरायची याचे नियोजन करतात. सरकारी कार्यालये केवळ चालू ठेवायची म्हणून चालू असतात. ज्यांची शेतीवाडी नाही ते आपल्या पै-पाहुण्यांकडे सांगावा धाडतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत प्रत्येक आचरेवासीयांच्या अंगात गावपळण कशी चढत जाते हे अनुभवायचे असेल तर पर्यटकांनीदेखील गावपळणीच्या दिवसात आचऱ्याच्या शेतकऱ्यांनी उभारलेल्या राहुटीत तीन दिवस, तीन रात्री राहिलेच पाहिजे.


‘एकत्र येऊ या, एकत्र राहू या, एकत्र जेवू या’ हा सहजीवनाचा आनंद त्या झापाच्या कावणातच असतो. त्याचे वर्णन आचरे पारवाडी येथील एका शेतकऱ्याने मालवणी कवनात छान केले आहे.


अशी आमची गावपळान
ऱ्हवाक झापाचा कावान
भुकेक माशाचा जेवान
तानेक पेजेचा धुवान
मजेक इस्पिकाचा कुटान
थंड्येक इडयेचा खुटान
निजेक गोणपाटाचा किंतान
असा तीन दिवस भायर मजेत ऱ्हवान
घराक जावचा नदीतसून पेवान।


खरोखरच आचरे गावाची गावपळण अनुभवायची असेल, तर ती आचरे गावच्या सीमेलगतच असलेल्या गवताच्या झोपड्यांतून आणि झापाच्या कावणातून. वास्तव्य जरी तीन दिवस-तीन रात्री असले, तरी त्याची जय्यत तयारी पंधरा दिवस चालू असते. जमिनी तीन-चार वेळा सारवल्या जातात. प्रत्येकाची घरे नव्याने सजतात. जेवण विभाग, कोंबड्यांसाठी वेगळी जागा, गुरांचा गोठा, झिलग्यांची इस्पिका कुटुची स्वतंत्र खोली, पोरग्यांका धुमशानासाठी वेगळा हॉल आदी हौसेने उभारले जाते. गावपळणीची जेवणेदेखील लज्जतदार लागतात.


सोबत नेलेल्या कोंबड्यांची संख्यादेखील गावपळणीच्या कडाक्याच्या थंडीत कमी करायची असते. नदीच्या माशांचे कालवण आणि शिकारीचे मटण झाल्याशिवाय गावपळणीच्या रात्रीच्या जेवणाला टेस्ट येत नाही. कुर्ल्याला जाणे, वावळीला जाणे आदी कार्यक्रम तर गावपळणीत अलिखित असतात. रात्री एकत्र भजने, भेंड्या, अंताक्षरी, बायकांच्या फुगड्या आदी करमणुकीचे कार्यक्रम म्हणजे गावपळणीची खास मेजवानी. सतत संसारात राबराब राबणाऱ्या बायकांबरोबर पुरुषांचेदेखील माहेरपण या रामेश्वराने एकाच वेळी साजरे करायला दिलेले असते.


म्हणून संस्थान आचरे गावाची गावपळण बारा वाड्यांच्या सीमेबाहेर केवळ साजरी होत नसते, तर ती अक्षरशः संपन्न होत असते. त्यांच्या गप्पा आणि गजाली पुढची गावपळण येईपर्यंत पाच वर्षे अक्षरशः चवीने चघळल्या जातात.


भूतांना गावात मोकळीक मिळावी म्हणून…


आचरे गावाचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर शिवशंभूने चार वर्षांतून एकदा आपल्या भूतगणांना वावर करण्यासाठी हे तीन दिवस दिलेले असतात. त्यामुळे गावात न थांबता सर्व जण वेशीबाहेरची परंपरा जोपासतात. तसेच हा गाव पूर्वी नांदत नव्हता. तो नांदावा म्हणून तीन दिवस गाव ओस पाडेन, असे वचन रामेश्वराने दिल्याने तीन ते चार वर्षांतून ही गावपळण होऊन गाव अक्षरशः ओस पाडला जातो. अशा प्रथा जुन्याजाणत्या माणसांकडून सांगितल्या जातात; पण ‘रामेश्वरावर आमची नितांत श्रद्धा आहे. त्याने म्हटले की जायचे आणि त्याने म्हटले की यायचे,’ हा एकच महानियम आम्ही मानतो. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या बाबींची चर्चा ज्यांना करायची असेल त्यांनी खुशाल करावी! रामेश्वर हीच आमची श्रद्धा, या एकाच मूलमंत्राने भारावून प्रत्येक जण आपले घर सोडत असतो.


User Image


आकाशाचे छत म्हणजे आमचा रामेश्वर! तृणांकुराची शय्या म्हणजे आमचा रामेश्वर! दगडाची व चिऱ्याची उशी म्हणजे आमचा रामेश्वर! हीच श्रद्धा प्रत्येक आबालवृद्धाची असल्याने हे तीन दिवसांचे आगळे माहेरपण बायकांबरोबर पुरुषही अनुभवत असतात. गावपळणीच्या काळात आचरे गाव भयाण वाटते. ‘माणसाशिवाय गाव’ ही कल्पना डोळ्यांनी बघणेसुद्धा महाभयंकर असते. तो आवाज, तो कोलाहल, ते हसणे, ती भांडणे, सारे कसे शांत, शांत, रामेश्वरसुद्धा तीन दिवस अगदी शांतपणे कैलासी समाधी लावून बसलेला असतो, आपल्या आचरेवासीयांचे कल्याण चिंतित! गाव पळून गेलेले असले तरी रामेश्वराचे नैमित्तिक कार्यक्रम मात्र तसेच चालू असतात. त्यात खंड नसतो. रामेश्वराची त्रिकाल पूजा, महानैवेद्य, महाआरती आदी कार्यक्रम ठरल्याप्रमाणे, ठरल्यावेळी होत असतात.


म्हणून एक तरी गावपळण अनुभवावी


शेवटी आपलं राहतं, नांदतं गाव प्रत्येकाला कधी ना कधी सोडावंच लागतं. मुलींना लग्न होऊन सासरी जाताना, मुलांना नोकरीनिमित्त परगावी जाताना, थोरा-मोठ्यांना उद्योग-धंद्यानिमित्त परदेशी जाताना आणि शेवटी इहलोकीचे अवतारकार्य संपल्यावर प्रत्येकाला आपला गाव सोडून परलोकी जातानासुद्धा! आनंदात कसे जायचे? पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘कण्हत, कण्हत की गाणे म्हणत?’ हा गाणे म्हणत गाव सोडण्याचा अनुभव एक वेगळाच असतो.


तीन दिवस-तीन रात्रींसाठी सर्व संसारावर तुळशीपत्र ठेवून गाणे म्हणत रमण्याचा तो क्षण! याचा अनुभव गावपळणीच्या या अनोख्या ट्रेलरमधून प्रत्येकाला येत असतो. गावपळणीचे मंतरलेले ते तीन दिवस आणि मंतरलेल्या तीन रात्री प्रत्येकाला आगळंवेगळं तत्त्वज्ञान शिकवून जातात. त्या तत्त्वज्ञानाचे मोल कोणत्याच मापात होऊ शकणार नाही. म्हणूनच प्रत्येक आचरेवासीय आपल्याला धन्य मानतात की, ‘देवानेच आपल्याला संस्थान आचऱ्याच्या कुशीत जन्माला घातले.’ म्हणूनच म्हटले जाते, प्रत्येकाने एक तरी गावपळण अनुभवावी.


गाव भरू लागण्याचे वेध


तीन दिवस-तीन रात्री मजेत घालवल्यावर तेथील बकऱ्यांच्या झुंजी, कोंबड्यांच्या झुंजी मनमुराद अनुभवल्यावर (त्या बकऱ्या आणि कोंबड्यांच्या झुंजीचा निकाल एकाच असतो - जिंकले तरी मटण आणि हरले तरी मटण! शेवटी दोघांचा निकालच आणि जिभेची लज्जत) तीन रात्री झाल्यावर बारा-पाच मानकरी गाव भरविण्याचा कौल लावतात. कौल झाला नाही, एक दिवस वाढला, तरी आचरेवासीय खुशीत असतात.


कारण एक दिवस वाढल्याने येणारी संकष्टी त्यांना त्या झोपडीतच साजरी करता येते. मार्गशीर्षातील व्रते, मार्गशीर्षातील घट त्या झोपडीतच बसतात. शेवटी म्हणतात ना, माणसाचा देव माणसाबरोबरच. पुन्हा चौथ्या दिवशी सर्व मानकरी देवळात जमून गाव भरविण्याचा कौल लावतात. कौल झाल्यावर पुन्हा तोफांचे आवाज, पुन्हा नौबतीच्या इशारती - आपल्या माणसांना परत गावात बोलवण्यासाठी! पण तत्पूर्वीच कौल झाल्याची बातमी वाऱ्याबरोबर सर्व चतुःसीमा पार करते.


पुन्हा रस्ते फुलून जातात, माणसांनी आणि गुरावासरांनी प्रेमभराने गावात परतण्यासाठी गाव पुन्हा सर्वांना बोलावू लागते. गावाला माणसांची जाग येऊ लागते. संपूर्ण आचरे संस्थान जुनी कात टाकून नव्या उमेदीने ताजेतवाने होते, आणि पुढील चार वर्षांनी येणाऱ्या गावपळणीची आतुरतेने वाट पाहू लागते.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील वायंगणी, चिंदर, आचरे आणि मुणगे या गावांमध्ये दर तीन किंवा चार वर्षांनी ही गावपळण साजरी होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे गावपळण हे आगळे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारची परंपरा महाराष्ट्रामध्ये तरी अन्य कुठे पाहायला, अनुभवायला मिळत नाही. या गावपळणीदरम्यान सारा गाव संपूर्ण कुटुंबकबिल्यासह अगदी जनावरांसह तीन दिवसांकरिता गावच्या वेशीबाहेर वस्तीला राहायला जातो.


या तीन दिवसांत सगळा नांदता गाव ओस पडतो. संपूर्ण गावात त्या काळामध्ये कुणीही फिरकत नाही. हे का घडतं?, याची कारणं या स्वरूपाच्या परंपरा निर्माणकर्त्या पूर्वजांच्या उदात्त हेतूमध्ये दडलेली आहेत, असे लक्षात येईल. जनमनातील श्रद्धेच्या धाग्याला शास्त्रीय विचारांची जोड देऊन गावपळणीची परंपरा साकारली गेली. समाजाचे स्वास्थ्य, पर्यावरणाचे शुद्धीकरण आणि गावाचे सामूहिक ऐक्य असा तीन हेतूंचा मेळ त्यामागे असावा, असा कयास आहे. या परंपरेविषयी आचरे गावामध्ये दंतकथाही सांगितली जाते.


User Image


गावाचे दैवत आणि सत्ताकेंद्र शिवशंकर अर्थात रामेश्वराने आपल्या भूतगणांना वावरण्यासाठी चार वर्षांतून एकदा तीन वा चार दिवस दिले. तसेच “हा गाव पूर्वी नांदत नव्हता. तो नांदावा याकरिता तीन दिवस गाव ओस पाडेन”, असे वचन लोकांना रामेश्वराने दिले. त्यानुसार फार पूर्वीपासूनच दर तीन-चार वर्षांनी संपूर्ण गाव तीन दिवसांकरिता ओस पाडण्याची प्रथा गावपळणीच्या रूपाने सुरू झाली.


गाव गुण्यागोविंदाने नांदावा यासाठी तीन दिवस वर्षानुवर्षे वाढवलेल्या घरसंसाराकडे पाठ फिरवायची ही गोष्ट नक्कीच सोपी नाही म्हाराजा. या गावपळणीच्या रूपाने तीन दिवसांत जे जीवनशिक्षणाचे तत्त्वज्ञान कळतं ते कोणत्याही अन्य ठिकाणाहून मिळणार नाही, असे जुनेजाणते सांगतात. एखादे गाव काही कारणास्तव काही काळासाठी का होईना; परंतु पळून जाते, हे रंजक वाटत असलं तरीही त्यामागची कुतूहलाची भावना परंपरेच्या निर्मिती हेतूमागील कारणांचा शोध घ्यायला प्रवृत्त करते.


गावपळण शब्दामागील अर्थ समजला तरीही त्यामागील सांस्कृतिक कारण समजण्याकरिता वरील कथा उपयोगी पडते. मात्र हे आणि एवढेच कारण त्या परंपरेच्या निर्मितीमागे असेल का? की त्याहूनही अधिक काहीतरी सामाजिक आरोग्याच्या, पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल?, याचा मागोवा घ्यायला उद्युक्त करते.


गावपळणीच्या अनुसरणातून दर तीन वर्षांनी गावामध्ये पसरलेली रोगराई, दूषितपणा, वातावरणातील हवेची खालावलेली गुणवत्ता यांत सुधारणा होण्याबरोबरच समाजामध्ये सलोखा, ऐक्य पुनर्स्थापित व्हावे, दुरावलेली नाती-माणसे परत एकत्र यावीत, सामाजिक स्वास्थ्याबरोबरच सामूहिक सहजीवनाची लोकभावना वाढीला लागावी, ही कारणे असणे अधिक संयुक्तिक वाटते. त्यामुळे गावपळण ही फक्त सांस्कृतिक परंपरा न राहता जिल्ह्याची ती एक आगळी विशुद्ध ओळख ठरते.


आचऱ्यातील गावपळण ही साधारणपणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंतच्या काळात दर तीन किंवा चार वर्षांनी होते. तीन किंवा चार वर्षांनी येणाऱ्या गावपळणीची तयारी ही मार्गशीर्षा आधीपासूनच सुरू झालेली असते. तीन दिवस राहण्यासाठी जागा पाहून ठेवलेल्या असतात. नोकरीधंद्यानिमित्ताने घराबाहेर गेलेल्यांना बोलावणी धाडली जातात.


या तीन दिवसांत दूर गेलेल्या नि दुरावलेल्या सर्वांसोबत मनभरून जगण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. आचऱ्यातील बारा वाड्यांचा गाव रिकामा करण्यासाठी तसेच पुन्हा भरण्यासाठीही रामेश्वराकडे कौल मागितला जातो. असा कौल मिळाल्यानंतर गावाबाहेरच्या वेशीनजीकच्या जंगलात माडाच्या झापांनी बांधलेल्या कावणामध्ये गाव तीन दिवसांकरिता राहायला जातो.


गजाली, चेष्टामस्करी यांना उधाण येतं, एकत्र जेवणे, बकऱ्या-कोंबड्यांच्या झुंजी लावणं, विविध खेळ, भजनादी करमणुकीचे कार्यक्रम यांत सहभागी होत वाडीवस्तीवरील लहान-थोर, स्त्री-पुरुष सर्वच अक्षरशः गावपळणीचे हे तीन दिवस खऱ्या अर्थाने जगतात. मुणगे गावातील काही समाजच फक्त गावपळणीची प्रथा पाळतात. देवाचा कौल मिळाल्यानंतर साजऱ्या होणाऱ्या या परंपरेला अनुभवण्याची सिंधुदुर्गातीलच नाही, तर या प्रथेविषयी उत्सुकता असणारेही लोकही वाट पाहत असतात. हे तीन दिवस आणि त्यानंतरचेही काही दिवस चैतन्याने वाहणारे असतात.


आचरे, चिंदर या गावांची गावपळण अनुभवलेली माणसे, तर नेहमीच इतरांना ‘एकदा तरी गावपळण अनुभवायला येण्याचे’ आवतण देतात, इतका त्याचा बोलबाला आताशा झालेला आहे. लेखक सुरेश ठाकूर यांनी त्यांच्या पुस्तकात आचरे पारवाडीच्या शेतकऱ्याचे कवन प्रसिद्ध केले आहे.


“अशी आमची गावपळान
ऱ्हवाक झापाचा कावान
भुकेक माशाचा जेवान
तानेक पेजेचा धुवान
थंड्येक इड्येचा खुटान
निजेक गोणपाटाचा किंतान
असा तीन दिवस भायर मजेत ऱ्हवान
घराक जावचा नदीतसून पेवान…”

लोकपरंपरा अस्तित्वात येण्यामागे नक्कीच कार्यकारणभाव लपलेला असतो. श्रद्धा-अंधश्रद्धा अशा चष्म्यातून त्याकडे पाहण्याऐवजी त्यापलीकडच्या कारणांचा शोध घेताना अनेकविध पर्यायांचे मार्ग कधी समोर दिसतात, तर कधी एखादाच नामी उपाय त्याला पुरेसा ठरतो. हे पर्याय स्वीकारताना किंवा उपायांची अंमलबजावणी करताना त्याद्वारे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक हित राखले जाईल, याचाही विचार कुठे तरी फार पूर्वीच करून ठेवल्याचे लक्षात येते. अन्यथा, या परंपरा इतका प्रदीर्घ काळ आपले मूळ रूप तसेच ठेवून कालौघात बाह्यतः बदलल्या तरीही अव्याहतपणे टिकल्या नसत्या. त्या परंपरांच्या रुजण्यातच याची गुपिते दडलेली आहेत. सिंधुदुर्गातल्या गावपळणीची परंपरा ही त्यापैकीच एक.

Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...