निळू दामले
- सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' नावाच्या उंदराचा आता कंबोडियामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे.
- मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. त्याला तसे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पाच वर्षांपूवी त्याचे निधन झाले.
- या कामगिरीसाठी मागावाला कंबोडिया सरकारने सुवर्ण पदकही दिले होते.
कंबोडिया या देशाने ‘मागावा’ नावाच्या उंदराचा एक पुतळा ‘आंगकोर वाट’ या परिसरात उभारलाय. आफ्रिकेतून हा उंदीर कंबोडियानं आयात केला होता. मागावा ७० सेंमी लांबी-उंचीचा होता. त्याचा पुतळा २.२ मीटर उंचीचा आहे. कंबोडियामध्ये आंगकोर वाट हा एक मंदिरांचा काँप्लेक्स आहे, तिथं अनेक मंदिरं आहेत. ११ व्या शतकात विष्णू या देवाची आठवण म्हणून तत्कालीन राजा सूर्यवर्मन या राजाने आंगकोर वाट उभारले. नंतर त्याचं रुपांतर बुद्ध मंदिरांमधे झाले. आंगकोर वाटमधल्या १००० मंदिरांमधे हा उंदराचा पुतळा असेल.
उंदराचाच पुतळा कां?
पाच वर्षांपूर्वी या मागावा उंदराचा मृत्यू झाला. मागावा या उंदराने कंबोडियामध्ये तब्बल १०० भूसुरूंग आणि स्फोटके शोधले. या कामगिरीसाठी त्याला सुवर्ण पदकही मिळाले होते. पाच वर्षाची कारकिर्द पूर्ण करून हा उंदीर जून 2021 मध्ये सेवानिवृत्त झाला होता. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. मागवा या उंदाराचे वजन 1.2 किलो आणि लांबी 70 सेंटीमीटर इतकी होती. तो आठ वर्षांचा होता. मागवा उंदराला नोंदणीकृत असलेल्या अपोपो (Apopo) नावाच्या चॅरिटने प्रशिक्षण दिले होते. ही संस्था टांझानिया येथील असून तिने आतापर्यंत अशा अनेक उदरांना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षित केलेल्या उंदरांना ही संस्था हिरो रॅट म्हणून संबोधते. जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी या संस्थेकडून उंदरांना 1990 सालापासून प्रशिक्षण दिले जाते.
मागावा या उंदराने तब्बल शंभर भूसुरूंग शोधून काढले
मागावा जमीन हुंगत फिरत असे, त्याला जमिनीत खोलवर पुरलेल्या सुरुंगाचा वास येत असे. सुरंग काढणारी माणसं मागावाला जमिनीवर फिरवायची, मागावाने सुरुंग शोधला की सुरूंग निकामी केला जात असे. वीसेक फूटबॉल मैदानांइतक्या जमिनीतले सुरुंग त्याच्यामुळे निकामी झाले. किती तरी माणसांचे प्राण वाचले, किती तरी माणसं अपंग होण्यापासून वाचली.

मागावाच्या मृत्यूनंतर अपोपो संस्थेने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मागवा उंदीर पूर्णपणे बरा होता, मात्र, वयोमानानुसार तो थकला होत. त्याने खाणेपिणे कमी केले होते. अपोपो संस्थेने प्रशिक्षण दिलेल्या उंदरांपैकी मागवा हा सर्वात यशस्वी उंदीर होता. त्याने सुरुंग शोधण्यासाठी एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले होते. टेनिस कोर्टच्या आकाराच्या परिसरात फिरून मागावा अवघ्या 30 मिनिटांत बॉम्ब शोधू शकत होता तिथे पारंपारिक मेटल डिटेक्टरला हे काम करण्यासाठी चार दिवस लागले असते. स्फोटकांमधील रासायनिक कंपाऊंड शोधण्यासाठी प्रशिक्षित, मागवा उंदराने 141,000 चौरस मीटर (1,517,711 चौरस फूट) म्हणजेच सुमारे 20 फुटबॉल मैदानांपेक्षा जास्त जमीन वास घेऊन स्फोटकं शोधून साफ केली होती. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मागवाला PDSA संस्थेने सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलं होतं. मागील 77 वर्षांमध्ये मागवा हा असा एक उंदीर आहे ज्याला हा सन्मान मिळाला होता
भूसुरुंगांचा इतिहास
भूसुरुंग ही एक खतरनाक गोष्ट असते. खड्डे करून ते पुरले जातात, वर माती पसरली जाते. खाली सुरुंग आहे हे कळत नाही. वरून वाहन गेलं की धडाम. बरेच वेळा त्यावरून माणूस गेला तरी त्याचा स्फोट होत असे, माणूस मरत असे किंवा अपंग होत असे. नुकसानीचा आकार सुरुंगाच्या शक्तीवर अवलंबून असे. सुरुंग हे युद्धातलं एक जुनं हत्यार आहे.
आधुनिक काळात सुरुंग विषयक कायदा आहे. सुरुंग कुठं कुठं पेरले आहेत याची माहिती सुरुंग पेरणाऱ्या सैन्याजवळ असायला हवी असा कायदा आहे. युद्ध संपल्यानंतर ती माहिती सार्वजनिक व्हायला हवी कारण नंतर त्या माहितीच्या आधारे सुरुंग निष्प्रभ करणं शक्य होतं. सैन्यामधे सुरुंग पेरणारी एक तुकडी असते. सुरुंग पेरताना त्या त्या क्षेत्रफळाचा नकाशा तुकडीजवळ असतो, नकाशावर ती तुकडी नोंदी करत जाते.
युद्ध सुरु झाल्यावर सैन्याला पुढं सरकत असताना सुरुंग शोधावे लागतात, निकामी करावे लागतात. अनेक वेळा कुठल्या तरी वाटेनं सुरुंग फोडले जातात, नंतर सैन्याची तुकडी (पायदळ, रणगाडे दळ, तोफखाना) पुढं सरकतो.

१९८० सालच्या इराक-इराण युद्धात इराणी सैन्यानं एक अघोरी उपाय योजला होता. आठ दहा वर्षाची मुलं रणात पाठवली. ती मुलं पुढं जाताना सुरुंग फुटत, जमीन निर्धोक होत असे नंतर इराणी सैन्य पुढं सरकत असे. या नादात हज्जारो छोटी मुलं मारली गेली. इराण त्या मुलांना शहीद म्हणून गौरवत असे.
कंबोडिया हा जगातला सर्वात जास्त सुरुंगवासी देश आहे. तिथं अजूनही ४० ते ६० लाख सुरुंग जमिनीत चार ते सहा मीटर खोलवर निवांत पहूडले आहेत.
कुठून आले हे सुरुंग?
सुमारे १९७० पासून सुरुंग पेरणी सुरु झालीय. कंबोडियाचा राजकीय इतिहास याला कारणीभूत आहे. कंबोडियाच्या पूर्वेला व्हिएतनाम आहे, उत्तरेला लाओस आणि चीन आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर त्या विभागात उलथापालथी सुरु झाल्या. व्हिएतनाममधे फ्रान्स, अमेरिका घुसलेलं होतं. दोन्ही भांडवलशाही देश. व्हिएतनाम (उत्तरेचा भाग) आणि उत्तरेला चीन हे कम्युनिस्ट देश होते. जगाची वाटणी करण्यात भांडवलशाही आणि कम्युनिस्ट देश गुंतलेले होते.
व्हिएतनाम प्रकरण धगधगायला लागलं तेव्हां शेजारच्या कंबोडियावर वर्चस्व असणं कम्युनिस्ट आणि भांडवलदारांना आवश्यक होतं. कारण तिथून उत्तर कम्युनिस्टमधले कम्युनिस्ट लढवय्ये अमेरिकेनं व्यापलेल्या दक्षिण व्हिएतनाममधे पोचत असत. छोटे देश बळीचा बकरा असतात. प्रत्येक बलवानाला बकरे हवे असतात.
कंबोडियाचा एक राजा असे, तो स्थानिक ख्मेर वंशाचा होता; ना कम्युनिस्ट ना भांडवलशाही अशी स्थानिक कंझर्वेटिव प्रजा त्याच्या पाठी असे. राजा आपलं स्वातंत्र्य टिकवण्याच्या नादात परिस्थिती पाहून कधी कम्युनिस्टांकडं जात असे कधी अमेरिकेकडं.

कंबोडियात चिनी वळणाचे कम्युनिस्ट, व्हिएतनामी वळणाचे कम्युनिस्ट, अमेरिकी आणि स्थानिक कंझर्वेटिव असे ढोबळ चार गट झाले. त्यांची आपसात मारामारी चाले, प्रत्येक गटाला देश आपला असावा असं वाटत असे. प्रत्येक गटाला अमेरिका, चीन, रशिया, व्हिएतनाम यांच्याकडून मदत मिळत असे. हे सर्व गट आणि त्यांना खेळवणारे बलवान देश सतत एकमेकाशी मारामारी करत असत. लढाया करण्याची सामग्री, सुरुंग वगैरे, त्यांना पुरवली जात असे. त्या खटाटोपात कंबोडियात सुरुंग पेरले गेले. मरणारी माणसं कंबोडियन आणि मारणारी माणसंही कंबोडियन. चीन-रशिया-अमेरिका मजा पहात असे. आजही कंबोडिया आणि शेजारचा थायलंड या दोन देशात मारामारी चालूच आहे.
तर मुद्दा येतो सुरुंगांचा. १९७० पासून जमिनीत झोपलेले सुरुंग सतत फुटत असतात. कारण त्यांचा रेकॉर्ड अमेरिका, चीन, रशिया आणि कोणीकोणी उपलब्ध करून देत नाहीत. एक नोंद सांगते की १९७९ पासून आजवर ६५ हजार माणसं सुरुंगामुळं मेलीत, तितकीच जखमी झालीत. सुरुंग शोधण्याचं आजपर्यंत उपलब्ध असणारं तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री मर्यादित काम करू शकतं. एका टेनिस कोर्टाच्या आकाराच्या जमिनीखालचे सुरुंग शोधायचे असतील तर आज एका माणसाला चार दिवस लागतात. त्यात जरा चूक झाली तर शोधक मेलाच समजा.
मागावा या उंदराचं वजन होतं सुमारे सव्वा किलो. तेवढ्या वजनाचा परिणाम सुरुंगावर होत नाही. मागावाला खास प्रशिक्षण दिलेलं होतं. तो तुरुतुरू पळत जमीन हुंगत असे. वास आला की तसं दर्शवत असे. २०१६ साली मागावा कंबोडियात पोचला. २०२२ साली मरेपर्यंत त्यानं १०० सुरुंग शोधून दिले. त्याबद्दल त्याला सुवर्णपदकही देण्यात आलं होतं.
(सौजन्य - niludamle.com)





