अप्सरा आगा
- लाखो वारकऱ्यांच्या पावलांनी आषाढी वारीचा रस्ता भरून जातो. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष आणि भक्तिभावाने भारलेलं वातावरण या सोहळ्याचं दृश्य असतं.
- पण या जनसागरामागे काही हात सतत झाडू, ब्रश आणि पाण्याचा पाइप हातात घेऊन काम करत असतात.
- मध्यप्रदेशातून दरवर्षी महाराष्ट्रात येणारे बद्रीलाल मेहतर यांचं कुटुंब लाखो भाविकांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या स्वच्छतागृहांची साफसफाई करत वारीचा अदृश्य भार उचलतं. विठ्ठलाच्या वाटेवरच्या या न दिसणाऱ्या श्रमांची ही गोष्ट.
आषाढी वारी म्हणजे लाखो पावलांचा प्रवास. टाळ-मृदंगाचा अखंड नाद, "ग्यानबा-तुकाराम"चा जयघोष, भगव्या पताका आणि विठ्ठलनामात तल्लीन झालेला जनसागर. हजारो किलोमीटरचा हा भक्तीचा प्रवास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीचा भाग आहे. पण या लाखो लोकांच्या गर्दीत एक असा समाजही वावरत असतो, जो वारीचा अविभाज्य भाग असूनही क्वचितच कुणाच्या नजरेत भरतो. लाखो वारकऱ्यांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या स्वच्छतागृहांची दिवस-रात्र साफसफाई करणारे हेच ते स्वच्छता कर्मचारी….वारी संपते, दिंड्या पुढे निघून जातात, पण त्यांच्या श्रमांचा मागमूस कुठेच दिसत नाही.
पहाट अजून पूर्ण उजाडलेली नसते. कुठे टाळांचा मंद आवाज ऐकू येऊ लागतो, कुठे चुलींवर चहाची पातेली चढलेली असतात, तर कुठे एखाद्या दिंडीतून "ग्यानबा-तुकाराम"चा गजर कानावर पडू लागतो. काही तासांत लाखो वारकऱ्यांची पावलं या रस्त्यावरून पुढे सरकणार असतात. पण त्या गर्दीच्या आधीच काही हात मात्र कामाला लागलेले असतात. हातात झाडू, पाण्याचा पाइप, ब्रश आणि निर्जंतुकीकरणाचं साहित्य घेऊन ते तात्पुरत्या स्वच्छतागृहांकडे वळतात. त्यांचं काम संपलं, तरच लाखो वारकऱ्यांचा दिवस स्वच्छतेने सुरू होऊ शकतो.

विठ्ठलाच्या वाटेवरचे अदृश्य वारकरी…
वारी म्हटलं की भक्ती, समता, सेवा, विठ्ठलनाम आणि चालणारी लाखो पावलं यांचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण या चित्राच्या कडेने काही माणसं कायम उभी असतात. त्यांच्याशिवाय वारीची व्यवस्था पूर्ण होऊच शकत नाही. तरीही त्यांच्या नावाचा जयघोष होत नाही. त्यांच्या कामाची दखल क्वचितच घेतली जाते. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील बद्रीलाल मेहतर, त्यांची पत्नी ललिताबाई आणि मुलगा आस हे त्यापैकीच एक कुटुंब.त्यांच्यासाठी आषाढी वारी म्हणजे दर्शनाचा प्रवास नसतो तर, तो त्यांच्या रोजगाराचा हंगाम असतो. वर्षभर गावात कामाच्या शोधात भटकणाऱ्या या कुटुंबासाठी वारी म्हणजे काही दिवसांची निश्चित मजुरी आणि घर चालवण्याची संधी.
लाखो भाविक वापरत असलेल्या तात्पुरत्या स्वच्छतागृहांची साफसफाई करून ते आपला उदरनिर्वाह करतात. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत त्यांचं काम सुरू असतं. स्वच्छतागृह धुणं, कचरा उचलण, दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करणं आणि पुन्हा पुढच्या वारीच्या ठिकाणी निघणं...पुढच्या दिवशी दिंडी पुढे निघते आणि त्यांचाही संसार पुन्हा गुंडाळला जातो. स्वतःचं घर नाही, कायमचा मुक्काम नाही. प्रत्येक ठिकाणी आधी राहण्यासाठी एखादी स्वच्छ जागा शोधायची. तिथे तंबू उभारायचा. तीन दगडांची चूल मांडायची. काही भांडी, थोडं धान्य आणि अंगावरची वस्त्रं एवढाच संसार. पुढच्या मुक्कामापर्यंत तोच त्यांचा पत्ता.

"वारीत लोकांची सेवा करायला मिळते..."
६५ वर्षांचे बद्रीलाल मेहतर आणि त्यांचे कुटुंब वारीत चार पैसे मिळावे म्हणून थेट मध्यप्रदेशमधून इथे येतात. ‘बाईमाणूस’शी बोलताना ते म्हणात,
'’आमचा गावाकडे हाताला कामच नाहीये. काम शोधायला गेलं तर कोणी काम देत नाही, म्हणून मग आम्ही दरवर्षी वारीच्या ठिकाणी स्वच्छतेच्या कामाला येतो. वारीची तारीख ठरली की ठेकेदार आम्हाला फोन करतात आणि आम्हाला बोलवून घेतात. या काळात चांगले पैसे मिळतात. सकाळी सहा ते संध्याकाळी बारापर्यंत काम केल्यानंतर एका व्यक्तीसाठी आठशे रुपये मिळतात आणि वारीमध्ये आलेल्या लोकांची सेवा पण करायला मिळते. हे काम आम्हाला परवडतं आणि लोकांची सेवा करता येते म्हणून समाधान पण मिळतं, यापेक्षा आम्हाला अधिक काय पाहिजे?'’
'सेवा' हा शब्द बद्रीलाल सहज उच्चारतात. कदाचित त्यांच्या दृष्टीने ही केवळ मजुरी नाही. लाखो वारकऱ्यांना स्वच्छ परिसर मिळावा, इतकीच साधी भावना त्यामागे असावी.
वारीला समतेची परंपरा लाभली आहे. विठ्ठलाच्या दारात सगळे समान आहेत, असा संदेश संतपरंपरा देते. पण या समतेचा एक न बोलला जाणारा पैलूही आहे. लाखो लोकांच्या या प्रवासात स्वच्छतेची जबाबदारी उचलणाऱ्या हातांकडे आपण किती वेळा पाहतो? भारतात सार्वजनिक स्वच्छतेचं काम अनेक पिढ्यांपासून विशिष्ट समाजांच्या वाट्याला आलं आहे. बदलत्या काळात व्यवस्था बदलत असली, तरी अनेक सार्वजनिक सोहळ्यांमध्ये ही वस्तुस्थिती अजूनही दिसून येते. वारीही त्याला अपवाद नाही. बद्रीलाल मेहतर यांचं कुटुंब ही केवळ एका कुटुंबाची कथा नाही तर ती सार्वजनिक स्वच्छतेचा भार खांद्यावर घेणाऱ्या हजारो कामगारांची सामूहिक कहाणी आहे.
‘’इथे राहायची आणि जेवणाची जरा अडचण होते’’
साठ वर्षीय ललिताबाई सांगतात,
‘'आम्ही गावात साफसफाई करतो,गटारं साफ करतो,या कामाचे महिन्याला फक्त एक हजार रुपये मिळतात.कधी कधी यादव लोकांच्या शेतात कामाला जातो,पण त्यांनी बोलवलं तरच जातो. तिथे दिवसाचे कामानुसार कधी दोनशे कधी चारशे रुपये मिळतात. शेतातल्या एक दिवसाच्या कामासाठी आम्हाला तीनशे आणि पुरुषांना चारशे रुपये देतात.सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत काम असतं. दिवसभर काम करूनही घर चालवणं कठीण होतं.’’
ललिताबाई म्हणूनच दरवर्षी वारीची तीव्रतेने वाट बघतात. ललिताबाई म्हणतात, "वारीत काम करायला आवडतं, पण राहायची आणि जेवणाची अडचण होते. वारीतल्या लोकांनी जेवण आणून दिलं तरच जेवण, नाही दिलं तर आमचे आम्हीच चुलीवर जेवण बनवतो. काहीच सामान नसतं, जेवढं आहे त्यावरच दिवस घालवतो. पण या कामातून मिळणाऱ्या पैशामुळे घराला हातभार लागतो. म्हणून दरवर्षी येतो."

ललिताबाईंचा मुलगाही आई-वडिलांसोबत कामात हातभार लावतो. पण तो दुसऱ्या ठिकाणी हे काम करतो. कुटुंबाचा प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी श्रम करतो, तेव्हा कुठे घराचा खर्च भागतो. शिक्षण, रोजगार आणि कुटुंबाची आर्थिक गरज यामध्ये तोल सांभाळत हे कुटुंब स्वच्छतेचं काम करत राहतं. वारी संपल्यानंतर ते पुन्हा उज्जैनला परततात आणि पुढील वर्षी पुन्हा याच कामासाठी येतात.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांना स्वच्छ परिसर मिळावा म्हणून बद्रीलाल मेहतर यांच्यासारखी अनेक कुटुंबे स्वतःच्या कष्टाने वारीतल्या लोकांची सेवा करतात.
स्वच्छता ही केवळ व्यवस्था नाही, ती सार्वजनिक आरोग्याची पहिली अट आहे. लाखो लोक एकाच ठिकाणी मुक्काम करत असताना स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई झाली नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण यात्रेवर होऊ शकतात. त्यामुळे या कामगारांचे श्रम केवळ स्वच्छता राखत नाहीत, तर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचंही मूक संरक्षण करत असतात. वारीत चालणाऱ्या प्रत्येक दिंडीचा, प्रत्येक पालखीचा, प्रत्येक वारकऱ्याच्या प्रवासाचा एक दिसणारा भाग आहे. पण त्याच वेळी एक अदृश्य बाजूही आहे. ती म्हणजे झाडू हातात घेऊन काम करणारे, पाणी ओतणारे, कचरा उचलणारे आणि दिवसाच्या शेवटी पुन्हा दुसऱ्या मुक्कामाकडे निघणारे हे श्रमिक.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो पावलं पंढरपूरच्या दिशेने निघतात. त्या पावलांखालची वाट स्वच्छ ठेवण्यासाठी काही हात मात्र सतत मागे काम करत राहतात. त्यांचं नाव दिंड्यांच्या फलकांवर नसतं, त्यांच्या श्रमांचा उल्लेख कीर्तनात होत नाही; पण वारीच्या व्यवस्थेचा कणा त्यांच्याच श्रमांवर उभा असतो. कदाचित म्हणूनच बद्रीलाल मेहतर आणि त्यांच्यासारखी असंख्य कुटुंबंही वारीचीच वारकरी आहेत. फरक इतकाच की त्यांच्या हातात टाळ नाही, झाडू आहे; गळ्यात वीणा नाही, पाण्याचा पाइप आहे; आणि विठ्ठलाच्या भेटीपेक्षा लाखो भाविकांचा प्रवास स्वच्छ आणि सुसह्य व्हावा, हीच त्यांची सेवा आहे.






