पारशी समुदाय हा भारतातील अल्पसंख्याक समुदायांपैकी एक मानला जातो. भारतीय इतिहासात पारशी समुदायाला एक विशिष्ट असं स्थान आहे. या समाजातून अनेक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वं उदयाला आली. या व्यक्तींनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे.
पारशी समुदाय हा मूळचा इराण येथील रहिवासी होता. विशेष म्हणजे, याठिकाणचे ते राज्यकर्तेही होते. पण अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे आपलं राहतं ठिकाण सोडण्याची वेळ पारशी समुदायावर आली होती. यानंतर जीव मुठीत धरून पारशी बांधव भारताच्या दिशेने निघाले. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरात राज्यातील दुर्गम अशा ठिकाणी एक गाव आहे उदवाडा. या परिसरातील संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोकांनी 1200 वर्षांपूर्वी आपलं पहिलं पाऊल ठेवलं.
याबाबत एक कथा पारशी इतिहासात प्रसिद्ध आहे. गुजरातच्या संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोक जहाजातून उतरले. याठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी स्थानिक राजे जाधव राणा हेसुद्धा उपस्थित होते. पारशी समाजाच्या नेत्याने राजांना भारतात प्रवेश करून वास्तव्य करण्याची परवानगी मागितली. त्यावेळी भाषेच्या अडथळ्यामुळे दोघांमधील संवाद योग्यरित्या होऊ शकला नाही. पण पारशी बांधवांचं म्हणणं त्यांच्या लक्षात आलं. या भूमीवर आधीपासूनच लोक वास्तव्याला आहेत. त्यामुळे तुम्हाला कसे सामावून घेणार, असा प्रश्न जाधव राणा यांना विचारायचा होता.
त्यासाठी सांकेतिक पद्धतीने जाधव राणा यांनी एका पेल्यात काठोकाठ दूध भरून त्यांच्याकडे पाठवून दिलं. राणा यांचं म्हणणं लक्षात आल्यानंतर पारशी समाजातील नेत्याने या दूधात एक चिमूटभर साखर मिसळून दिली. याचा अर्थ दूधात साखर जशी मिसळून दुधाचं चव वाढवते, तसे आम्ही भारतीय समाजात एकरूप होऊन जाऊ, हा संदेश पारशी नेत्याने जाधव राणा यांना दिला. पारशी नेत्याची ही कृती राजे जाधव राणा यांना खूप आवडली. त्यांनी पारशी समुदायाला तत्काळ अभय देण्याचा निर्णय घेतला.
बॉम्बे डॉग दंगल…1832
असो, इथे आपण पारशी समाजाच्या इतिहासाबद्दल इथे बोलणार नसून एरवी शांतताप्रिय असलेल्या पारशी समाजाने एकेकाळी मंबईत कशी दंगल घडवली यावर बोलणार आहोत. पारशी समाज आणि दंगल हे कसं शक्य आहे…? असा प्रश्न तुमच्या मनात स्वाभाविक आला असेल, परंतू हे शंभर टक्के खरं आहे आणि त्यासाठी आपल्याला तब्बल 193 वर्ष म्हणजे 1832 सालापर्यंत जावं लागेल. आजही इतिहासांच्या पानात ‘डॉग रायट 1832’ या नावाने असलेल्या या दंगलीचा उल्लेख सापडतो.
‘डॉग रायट 1832’... हो विश्वासू प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुत्र्यांवरूनच ही दंगल त्याकाळी मुंबईत झाली होती. अठराव्या शतकात ब्रिटिशांच्या बालेकिल्ल्याला या इमानी कुत्र्यांनी हादरवून सोडले होते. त्या काळात मुंबईच्या रस्त्यांवर कुत्र्यांनी जागोजागी उच्छाद मांडला होता. इंग्रज या उपद्रवाने प्रचंड त्रस्त झाले होते. (आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही.)
तर ब्रिटिशांच्या इस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई ऑफिसात काम करणारा एक अधिकारी होता, फिशर म्हणून… त्याला मुंबईच्या रस्त्यावरचं एक भटकं कुत्रं चावलं, 1832 चा जुना काळ तो, तेव्हा कुत्रा चावल्यावर घ्यायच्या लशी आल्या नव्हत्या. त्यामुळे हा बिचारा रेबीज होऊन मेला. चांगले 15-20 दिवस त्याने हाल सोसले. त्यामुळे मरताना त्याने आपल्या जमा संपत्तीचा बराचसा हिस्सा इस्ट इंडिया कंपनीकडे सोपवला आणि त्याचा उपयोग मुंबईच्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी करावा अशी अंतिम इच्छा व्यक्त केली.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर इंग्रजांचा जालिम उपाय
इंग्रज सरकारच्या या कुत्र्यांना मारण्याच्या हुकुमामागील इतिहास गो. ना. माडगांवकरांच्या ‘ मुंबईचे वर्णन ‘ या पुस्तकात सापडतो. माडगांवकरांनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘एक सधन इंग्रज अधिकारी कुत्रा चावून निवर्तला, त्याने त्याच्या मृत्यूच्या अंतिम समयी इंग्रज सरकारकडे पुष्कळ द्रव्य देऊन अर्ज केला होता, या अर्जानुसार मुंबईत जागोजागी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असून हे कुत्रे येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या अंगावर धावून येतात, त्यामुळे दरवर्षी आपल्या अनामत ठेवलेल्या द्रव्याचे जे व्याज येईल ते खर्च करून भटक्या कुत्र्यांना मारून टाकावे. त्यानंतरच बहुदा इंग्रज सरकारने हा कायदा अमलात आणला असावा, असे माडगांवकर नमूद करतात.
म्हणूनच इंग्रजांनी या त्रासातून मुक्ती मिळावी यासाठी एक वटहुकूम काढला. इंग्रजांच्या या हुकुमानुसार वर्षातून, ‘तीन ते चार महिने कुत्रे मारावेत, जो कुत्रे मारील त्यास सरकारकडून आठ आणे इनाम मिळेल’. दरवषी इंग्रज सरकार या हुकुमाची जाहिरात छापून नाक्यानाक्यावर लावत असे किंवा शहरात थाळी पिटून घोषणा देत असे. यामुळे कुत्रे मारणारे लोक, सरकारी शिपाई रस्त्यांवरील कुत्र्यांना सरकारी नियमानुसार मारत आणि बक्षिस मिळवीत. हा प्रकार अनेक वर्ष यशस्वीरीत्या पार पडत होता.
कुत्र्यांची शेपटी कापून आणा, इनाम मिळवा
त्या कायद्याअंतर्गत कुत्र्यांना मारणारे लोक कुत्रा मारून पोलिसांकडे जमा करत होते. त्या बदल्यात त्यांना अर्धा रुपया बक्षिस म्हणून मिळत असे. दरवर्षी बरेच कुत्रे मारले जात, काही कुत्री मारून रस्त्यावर टाकली जात होती, यानंतर सरकारी कचऱ्याची गाडी मेलेली कुत्री गोळा करून त्यांना पुरत असे असा क्रम बरीच वर्षे चालू होता. नंतरच्या काळात ब्रिटिश सरकारने या कायद्यात परिवर्तन केले, नवीन बदलानुसार मेलेली कुत्री पोलीस चौकीत जमा करण्याऐवजी त्यांची शेपटी जमा करून बक्षीस घेऊन जावे, असा नियम करण्यात आला.
उद्देश इतकाच की, कुत्राही मरेल, आणि मारणाऱ्याला बक्षीस ही मिळेल तसेच पोलीस चौकीत घाणही होणार नाही. परंतु परिणाम उलटाच झाला मुंबईतील उपद्रवी लोकांनी जिवंत कुत्रांच्या शेपट्या कापण्यास सुरवात केली आणि बक्षीस मिळविण्याचा घाट घातला. नाईलाजाने इंग्रज सरकारने जुनाच कायदा परत लागू केला. इंगज सरकारचा उद्देश काहीही असो, हे प्रकरण त्यांना भारी पडले हे मात्र नक्की.
…आणि मुंबईचे पारशी संतापले
पारशी धर्मात कुत्रा हा पवित्र मानला जातो आणि उत्तर कार्यात त्याची गरज लागते. ज्या प्रमाणे हिंदू धर्मात कावळ्याचे महत्व आहे त्याच प्रमाणे पारशी धर्मात कुत्र्याचे महत्त्व आहे. 1830 सालच्या सुमारास सर जमशेटजी जीजीभाई , शेट मोती चंद खेमचंद , शेट देविदास मनमोहन दास इत्यादी नामांकीत पारशी मंडळींनी ‘कुत्र्यांना न मारता लांबवर कुठेतरी सोडून द्यावे’ अशी सरकारला विनंती केली.
म्हणूनच इंग्रज सरकारनेही ही विनंती मान्य करून कुत्र्यांना न मारता त्यांना पकडण्याचा हुकूम काढला आणि पकडलेल्या कुत्र्यांना शहराबाहेर वखारीत ठेवून, नंतर जहाजाने त्यांना शहराबाहेर सोडत. असा प्रकार काही काळ चालला. परंतु दुष्परिणाम असा झाला की रस्त्यावरचे कुत्रे संपले आणि बक्षिसाच्या हव्यासाने कुत्रे पकडणारे लोकांच्या दारातून, वाड्यातून कुत्रे पळवू लागले. कुत्रे पाळणाऱ्यांमध्ये पारशी लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
पारशी समाजाने मुंबईत दंगल घडवली
दारातील कुत्रे पळवणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी पारशी समाजाने 7 जून 1832 रोजी हरताळ पाळून, दंगा केला अशी ब्रिटिश कागपत्रांमध्ये नोंद आहे. या दिवशी त्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्या काळात इंग्रजांना लागणाऱ्या बहुतांशी अन्नपदार्थांचा पुरवठा याच पारशी दुकानांमधून होत होता, हे हेरूनच हरताळ योजला गेला होता. जेणे करून इंग्रजांनी हा कायदा रद्द करावा तसेच कुलाब्यातील इंग्रज वसाहतीकडे जाणारा इतर मालही मारहाणकडून रोखला गेला. अनेक इंग्रजांच्या गाड्या थांबवल्या गेल्या, त्यांची कार्यालये उघडू दिली नाहीत. यामुळे दंगलीला चांगलेच यश आले होते.
3 जून 1832 रोजी पारश्यांनी हरताळ केला. इंग्रज सैनिक आणि इतर अधिकाऱ्यासाठी फोर्ट मध्ये पाव घेऊन जात असलेल्या गाड्या अडवून त्यातले पाव आणि मांस रस्त्यावर फेकले. खाटकांच्या दुकानांची मोडतोड केली. अनेक दुकान आणि ऑफिसेस उघडू दिली नाहीत. एवढेच नाहीतर मुंबई हायकोर्टाचे (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) न्यायाधीश जे होते ते रस्त्याने जात असताना त्यांची बग्गी अडवून त्यात चक्क रस्त्यावरचा कचरा आणि 2-5 मेलेल्या घुशी टाकल्या.
अखेर इंग्रज नरमले
या दंगलीमुळे इंग्रज सरकार चांगलेच पेचात पडले होते. शेवटी हतबल होऊन शहरात शांतता नांदावी या साठी पारशी जमावावर फलटण पाठवली आणि दंगल क्षमविली, बऱ्याच जणांना अटक केली, कैदेत टाकले, शिक्षा झाली. धुमाकूळ घालणाऱ्या बऱ्याच पारशाना कैद करून 2-2, 3-3 वर्षांच्या शिक्षा सुनावल्या. पारशी लोकांनी केलेल्या या दंगलीत उच्चभ्रू पारशी समाजाचा समावेश नव्हता. या उलट 7 जून 1832 साली झालेल्या दंगलीला क्षमविण्यासाठी या उच्चभ्रू पारशी समाजाने स्वतःहून पुढाकार घेतल्याची नोंद सापडते.
त्यानंतर सरकारने कुत्रे पकडण्यासाठी बैलगाड्यांवर पिंजऱ्याची सोय केली …सरकारी खात्यातील नेमणूक केलेले शिपाईच कुत्रे पकडतील आणि या लोखंडी पिंजऱ्यात टाकतील असा नियम केला. बैलगाड्यावर लोखंडी पिंजरे ठेवून गल्लोगल्लीच्या भटक्या कुत्र्याना पकडणे आणि शहराबाहेर नेऊन सोडणे चालू केले. त्यांच्या करता मग पांजरपोळ ही बांधले.





