सुरज पटके
- ‘प्लेबॉय’ हे जगातील पुरुषांमध्ये सर्वाधिक विकलं जाणारं मासिक ठरलं होतं. या मासिकाचे संस्थापक होते ह्यू हेफनर, ज्यांचा आज जन्मदिवस आहे.
- ‘प्लेबॉय’ हे ‘पुरुषांच्या मनोरंजनासाठी’ स्थापन झालेलं मासिक. गुळगुळीत कागदावर असलेल्या सुंदर स्त्रियांच्या अर्धनग्न आणि पूर्णनग्न फोटोंसाठी प्रसिद्ध होतं.
- अनेरिकेची स्त्रीमुक्ती चळवळ प्लेबॉयच्या विरोधात होती.
ह्यू हेफनर हे नाव नसेल माहीत कदाचित; पण ‘प्लेबॉय’ माहीत नाही असा, तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या नवतरुणापासून पाऊण हाडं मसणात गेलेल्या म्हाताऱ्यापर्यंत कुठल्याही वयाचा पुरुष जगाचा नागरिक नव्हे. ह्यू हेफनर हा माणूस वयाच्या 91व्या वर्षी निधन पावला. ज्याला इतकं दीर्घायुष्य लाभतं, तो समजा कुणी असामान्य कर्तृत्वाचा मनुष्य असला; तरी त्याच्या उमेदीची वर्षं, त्या वर्षांमध्ये त्याने निर्माण केलेला ठसा; यांचं, त्याच्या मृत्यूसमयी समाजाला बहुधा विस्मरण झालेला असतं. हेफनरचं तसं नाही. एक तर तो जवळपास शेवटपर्यंत काम करत होता, प्रसिद्धीच्या झोतात होता आणि आधुनिक जगताशी संपर्क असणाऱ्या जवळपास प्रत्येक पुरुषाला माहीत होता.
हेफनर यांनी 1953 मध्ये त्यांच्या स्वयंपाकघरातून प्लेबॉय हे मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती. ‘प्लेबॉय’ हे जगातील पुरुषांमध्ये सर्वाधिक विकलं जाणारं मासिक ठरलं होतं. एक काळ असा होता जेव्हा या मासिकाच्या एका महिन्यात 70 लाख प्रती विकल्या जात होत्या. हेफनर यांचा जन्म 9 एप्रिल 1926 रोजी शिकागो येथे झाला. त्यांनी सुरुवातीला अमेरिकन सैन्यात लेखक म्हणून काम केलं आणि नंतर मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली.

‘प्लेबॉय’च्या पहिल्याच अंकात मेरिलिन मन्रोचे नग्न फोटो
ज्येष्ठ लेखक हेमंत कर्णिक यांच्या मते ‘प्लेबॉय’, हेफनर यांच्या संदर्भात ‘काळाचा महिमा’ याला आणखी जास्त अर्थ आहे. 1953 साली ‘यूएस ऑफ अमेरिका’ हा एक सोवळा, सार्वजनिक जीवनात आज आपला देश आहे, तसा कमालीचा ढोंगी देश होता. अशा काळात ह्यू हेफनर केवळ पुरुषांच्या मनोरंजनासाठी ‘प्लेबॉय’ मासिक सुरू करणं, हे धाडसच होतं.
‘प्लेबॉय’ हे ‘पुरुषांच्या मनोरंजनासाठी’ स्थापन झालेलं मासिक. गुळगुळीत कागदावर असलेल्या सुंदर स्त्रियांच्या अर्धनग्न आणि पूर्णनग्न फोटोंसाठी प्रसिद्ध असलेलं. ह्यू हेफनर हा ‘प्लेबॉय’चा संस्थापक. ‘प्लेबॉय’ म्हणजे ह्यू हेफनर आणि ह्यू हेफनर म्हणजे ‘प्लेबॉय’. ‘प्लेबॉय’ या पुरुषांसाठी असलेल्या मासिकाचा संपादक, अशी स्वतःची प्रतिमा हेफनरने जाणीवपूर्वक जोपासली आणि अख्खं आयुष्य त्या प्रतिमेला प्रामाणिक राहत जगला.
प्रत्यक्षात तो तसाच होता की नव्हता, हे सांगणं कठीण आहे. ह्यू हेफनरने शाळेत असल्यापासूनच लिखाण करणे, संपादन, व्यंगचित्र काढणे असले उद्योग सुरु केले होते. त्याच्या काही परिचितांच्या म्हणण्यानुसार तो स्वभावाने भिडस्त होता! पण 22 वर्षांचा होईपर्यंत (त्याच्या म्हणण्यानुसार) सेक्सचा अनुभव न घेतलेल्या या माणसाच्या डोक्यात आपल्याला काय करायचं आहे, हे हळूहळू स्पष्ट होत होतं. शाळेतल्या मैत्रिणीशी लग्न करून त्याने संसार सुरू केला आणि कधी कॉपीरायटर, कधी सर्क्युलेशन मॅनेजर, अशा नोकऱ्या करत असताना त्याने स्वतःचं मासिक काढायचं नक्की केलं. नग्न स्त्रियांचे फोटो देणारं प्रतिष्ठित मासिक. तेव्हाही ‘अश्लील’ म्हणवणारे फोटो देणाऱ्या पत्रिका होत्या; पण त्यांचं काम पोलिसांचा, कायद्याचा डोळा चुकवून चालायचं. हेफनरला ते उघडपणे करायचं होतं. त्याने नातेवाईकांकडून, मित्रांकडून पैसे उसने घेतले. स्वतःचे पैसे घातले आणि डिसेंबर 1953 मध्ये पहिला अंक प्रसिद्ध केला.
त्यावेळी एका नव्या नटीचं नाव हॉलिवूडमध्ये घेतलं जाऊ लागलं होतं. चारेक वर्षांपूर्वी आर्थिक अडचणीत असताना तिने स्वतःचे नग्न फोटो एका फोटोग्राफरला घेऊ दिले होते. त्याने ते 50 डॉलरला विकले. हेफनरच्या नजरेस पडल्यावर त्याने ते 500 डॉलर्सला खरेदी केले. मुखपृष्ठावर तिच्या साध्याशा फोटो शेजारी त्याने सेंटरस्प्रेडवरच्या तिच्या नग्न फोटोची जाहिरात केली आणि त्या पहिल्या अंकाच्या तब्बल 50000 प्रती खपल्या!
ती नटी होती, मेरिलिन मन्रो. ‘प्लेबॉय’ला सनसनाटी, यशस्वी आरंभ करू दिल्याचं श्रेय त्याने तिलाच दिलं. तिच्याविषयी त्याला इतकी जवळीक वाटत राहिली; की मेल्यानंतर स्वतःच्या पार्थिवाला पुरण्यासाठी त्याने तिच्या कबरीच्या शेजारची जागा चक्क 75000 डॉलर मोजून आरक्षित केली.
बुडत चाललेलं करिअर सावरण्यासाठी या मासिकाचा आधार
प्लेबॉय मासिकाची लोकप्रियता इतकी जास्त होती की त्याच्या कव्हर पेजवर नग्न छायाचित्रे प्रकाशित करण्यास महिला उत्सुक असायच्या. हे मासिक पुरुषांमध्ये नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिलं. पण यामधील कंटेंटमुळे त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागलं. या मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसल्यानं अभिनेत्रींना प्रसिद्धी मिळते, असं म्हटलं जायचं. अनेक अभिनेत्रींनी आपलं बुडत चाललेलं करिअर सावरण्यासाठी या मासिकाचा आधार घेतला. या मासिकाच्या कव्हर पेजवर अनेक सेलिब्रिटी दिसले. यात जेन मॅन्सफिल्ड आणि पामेला अँडरसन यांच्याशिवाय बो डेरेक, किम बासिंगर, फराह फेवकट आणि मॅडोना यांचाही समावेश आहे. हेफनर यांनी शिकागोमध्ये पहिला प्लेबॉय क्लब सुरू केला. यात ‘प्लेबॉय’चा लोगो सशाच्या कानासारख्या टोप्या घातलेल्या वेट्रेसही होत्या. त्यानंतर हेफनर यांनी यूकेमध्ये तीन प्लेबॉय कसिनो सुरू केले.
‘प्लेबॉय’ म्हणजे फक्त उत्तान, उच्छृंखल, उथळ नव्हे, तर…
उत्तान, उच्छृंखल, उथळ या तीन विशेषणांनी ह्यू हेफनरच्या जगप्रसिद्ध ‘प्लेबॉय’ मासिकाचं वर्णन केलं जातं. अलीकडच्या काळातल्या भारतीय मानसिकतेच्या संदर्भात हे वर्णन जुळणारं असलं तरीही स्त्रियांची नग्न छायाचित्रं, एवढीच ‘प्लेबॉय’ची ओळख नव्हती. तत्त्वज्ञ बर्ट्राण्ड रसेल – मार्टिन ल्युथर किंग- मार्शल मॅक्लुआनपासून फिडेल कॅस्ट्रोपर्यंत, आणि व्लादिमीर नाबोकॉव, फ्रँक सिनात्रा-बॉब डिलनपासून मार्लन ब्रॅण्डोपर्यंतच्या तमाम वलयांकित व्यक्तींच्या समग्र मुलाखती आणि मार्गारेट अॅटवूड आणि हाराकी मुराकामींच्या कथांसाठीसुद्धा वाचक ‘प्लेबॉय’कडे वळत होता. मधल्या काळात इंटरनेटच्या अतीव प्रभावामुळे ‘प्लेबॉय’चं सगळ्याच बाजूंचं वेगळेपण गळून पडलं. हेफनरने 2015 मध्ये छापील अंकाचं प्रकाशन थांबवून इंटरनेट एडिशन तेवढी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, पण या निर्णयाला दोन वर्षे उलटली नाही तोच हेफनरच्या सीईओ पदावर कार्यरत असलेल्या मुलाने मार्च-2017 पासून पुन्हा छापील अंक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलाय…

हेमंत कर्णिक त्यांच्या एका लेखात लिहितात की, आज इंटरनेटमुळे वाटेल तेवढे नग्न फोटोच काय, व्हिडीओसुद्धा फुकटात बघणं शक्य झालं आहे. परिणामी 2016 साली ‘प्लेबॉय’ला डळमळत्या स्थितीमधला धोरणबदल म्हणून ‘आम्ही नग्न स्त्रियांचे फोटो यापुढे छापणार नाही,’ असं जाहीर करावं लागलं. कारण अर्थात, खप खूपच कमी झाला होता. ग्लॅमर उरलं नव्हतं. हा काळाचा महिमा. पण ‘प्लेबॉय’, हेफनर यांच्या संदर्भात ‘काळाचा महिमा’ याला आणखी जास्त अर्थ आहे. सेक्स हा विषय बाद होता. केमिस्टच्या दुकानात अविवाहित स्त्री गर्भनिरोधक औषध/उपकरण मागू शकत नसे! अशा वेळी ‘पुरुषांना स्त्रीदेहाचं जबर आकर्षण वाटतं आणि त्याला राजरोस वाट मिळत नसल्याचे कुपरिणाम समाजाला भोगावे लागतात,’ या बाबतीत काहीतरी कृती करण्याचं हेफनरने ठरवलं. ही कृती म्हणजे ‘प्लेबॉय’.
‘प्लेबॉय’ सुरू होताच त्यावर प्रचंड टीका झाली. पण तेव्हा हेफनरचा सूर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, मोकळ्या सामाजिकतेच्या पुरस्काराचा होता. सेक्सचं आकर्षण नैसर्गिक आहे, हे मान्य व्हायला हवं, असं म्हणत असताना गर्भपाताला कायदेशीर मान्यता असावी; चरस, गांजा यांवर बंदी नसावी, यालाही हेफनर पाठिंबा देत होता. इतकंच नाही; आफ्रिकन अमेरिकनांना गोऱ्या अमेरिकनांपासून वेगळं ठेवणारे जे कायदे दक्षिणेच्या राज्यांमध्ये अजूनही लागू होते, ते रद्द करावेत, ही सुद्धा त्याची एक मागणी होती. 1960 च्या पूर्वी ह्यू हेफनर हा प्रगतीशील चळवळ्या माणूस म्हणून ओळखला जात असणार!
स्त्रीमुक्ती चळवळ विरोधात
1960 नंतर अमेरिकेत स्त्रीमुक्ती चळवळीने जोर धरला. त्या चळवळीतल्या बायका हेफनरच्या कडव्या विरोधक बनल्या. ‘प्लेबॉय’मध्ये फोटो छापण्या अगोदर हेफनर ‘होतकरू’ तरुणींना ‘प्लेबॉय बनीज’ – सशाच्या माद्या – बनवत असे. म्हणजे, अत्यंत तोकडे कपडे घालून, तीन इंच उंच टाचेची पादत्राणं घालून आणि ढुंगणाकडे तोकडी पांढरी शेपटी लावून ‘प्लेबॉय क्लब्ज’ मध्ये गिऱ्हाइकांना सेवा देणाऱ्या वेट्रेसेस. त्यांना पगार नसे. गिऱ्हाइकांकडून मिळणारी टिप हीच त्यांची कमाई. हेफनरच्या आलिशान वाड्यात येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी देखील या बनीजना पाचारण केलं जाई. मग एका स्त्रीवादी चळवळवालीने बनी बनून या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि नंतर तो छापला.
तिच्या सुरात सूर मिळवणाऱ्या अनेक जणी निघाल्या. कुणी म्हणालं, हेफनर म्हणजे एक भडवा आहे, उच्चभ्रू भडवा; बस्स. एकीने सांगितलं, त्याच्या मित्रांना शरीरसुख देण्याचा आग्रहसुद्धा हेफनर बनीजना करत असे. एकीने तर त्याच्यावर आणि त्याच्या मित्रावर बलात्काराचा आरोपच केला. तो दोघीतिघींना एकत्रपणे त्याच्याशी ग्रुप सेक्स करायला लावतो, असंही म्हटलं गेलं. या टीकेने हेफनर अर्थातच संतापला. ‘मी मुलगा-मुलगी यांच्यातलं पारंपरिक रोमँटिक नातं जपण्याचा प्रयत्न करतो आहे. या स्त्रीमुक्तीवाल्या बाया माझ्या शत्रू आहेत,’ असं तो म्हणू लागला. त्याच्या या म्हणण्याकडे कुणी लक्ष दिलं नाही.
हेफनर यांची अजब जीवनशैली
लेखक आणि समीक्षक शशिकांत सावंत सांगतात की, प्लेबॉयचे वैशिष्ट म्हणजे त्याने एक संस्कृती तयार केली. प्लेबॉयचे नाईट क्लब होते ज्यात तरूणी तोकड्या कपड्यांमध्ये वावरत. प्ले बॉय मधून फॅशन, पत्त्यासारखे खेळ, जुगार, विनोद, कथा, चावट कथा अशा अनेक विषयांवर लेख असत. प्लेबॉयची मुलाखत हे प्लेबॉयचे एक मोठे आकर्षण होते. अनेक महिने तयारी करून मान्यवर पत्रकार लेखक अशा मुलाखती घेत.
प्लेबॉयचा संस्थापक आणि संपादक प्रमुख ह्युज हेफनर हा तसा मध्यमवर्गात वाढलेला होता. पुरूषांच्या भावनांना उत्तेजित करणारं आणि सेक्सला महत्त्व देणार मासिक हव होतं अस त्याच्या मनात घोळत होतं. त्याने मासिकासाठी चित्र घेतलं तेही सशाचे.सशाला बनी म्हणत आणि प्लेबॉय क्लबमधील तरुणींना प्लेबॉय बनी म्हणत. ससा वेगाने पुनरूत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

हेफनर यांची जीवनशैली देखील त्यावेळी प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरली. त्याकाळी ह्यू हेफनरच्या प्रायव्हेट जेटची जोरदार चर्चा होती. काळ्या रंगाचे आणि त्यावर प्लेबॉय बनीचे मोठ चित्र असलेलं हेफनर यांचं जेट विमानतळावर सर्वात उठून दिसायचं. 1960 मध्ये त्यांनी ते खरेदी केलं होतं. या विमानाला ‘बिग बनी’ नावाने ओळखलं जायचं. विमानाला मनासारखी रंगरंगोटी करण्यासाठी त्यांना खास अमेरिकी सरकारकडून परवानगीही मिळाली होती. त्याच्या या आलिशान विमानाची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची.
या विमानात हेफनर यांच्यासाठी अलिशान खोली तयार करण्यात आली होती. त्याकाळी त्यांच्या मनोरंजनासाठी मोठं सिनेमागृह, डिस्को देखील उभारलं होतं. अगदी हेफनरसाठी महागड्या फरपासून तयार केलेल्या गाद्या आणि सेवेला अनेक सौंदर्यवती देखील होत्या. हेफनर यांच्या अलिशान जेटमध्ये त्याकाळी अनेक बड्या लोकांच्या पार्ट्या रंगायच्या. पण फक्त पार्टीसाठी नाही तर व्हिएतनाम युद्धाच्यावेळी देखील दिलदारपणे हेफनर यांनी आपलं अलिशान विमान वापरायला दिलं होतं. या विमानातून 40 अनाथ मुलांना त्यावेळी व्हिएतनामधून अमेरिकेत आणलं गेलं.
शशिकांत सावंत म्हणतात की, ज्या काळात रंगीत टिव्ही आणि शेकडो चॅनेल्स नव्हती त्या काळात प्लेबॉयने नव्या संवेदना निर्माण करणे आणि त्याची तृप्ती करणे याचा मोठाच वसा घेतला होता. प्लेबॉयच्या वाढीच्या काळातच नेमकं हिरॉईन, चरस, कोकेनसारखे ड्रग्ज घेणे, साहित्यातून नव्या नव्या अनुभवांचे वर्णन उदा. हेन्री मिलर कवीतेमधून अनुभवांची पूर्ण नवी मांडणी करणारे कवी अॅलन गिसबर्ग, ग्रेगरी कोर्सो, बिटल्स पासून रोलिंग स्टोनपर्यंतचे पॉप रॉक ग्रुप्स, बॉब डिलनची, बॉब मार्लेची गाणी, अॅंडी वॉरहॉलची पेटिंग, शांततेसाठी निघालेले लांबलचक मार्च, मुक्तपणे जगणे, कम्युनमध्ये राहणे, हिप्पी संस्कृतीचा उदय, आणि अध्यात्मिक अनुभवाची ओढ आणि त्यातून रमण महर्षींपासून ओशो रजनीशानपासून अनेकांचे शिष्यत्व घेणे या गोष्टी घडत होत्या. रमण महर्षींचा गंडा बांधायला बीटल्स आले होते. आणि अगदी स्टीव जॉबदेखील भारतात आध्यात्मिक शोधासाठी येऊन गेला.
पुढे या जनरेशनचे वय जसे वाढत गेले तसे अनेक टेलिव्हीजन चॅनेल, कॉमिक्स आणि पुढे इंटरनेट, त्यानंतर मोबाईल आणि आता फेसबुक पासून व्हॉट्स अॅपपर्यंत सोशल मिडिया या मार्गांनी संवदेनांची भूख भागवणारे शेकडो प्रकारच्या अॅप्स आणि चॅनेल्स निर्माण झाले आहेत. साहजिकच आता प्ले बॉयची गरज उरली नाही. पण हे सारे नव्हते त्या काळात प्ले बॉयने ही गरज निर्माण करणारे तत्वज्ञानच निर्माण केले आणि ती शमवणारी अंक आणि इतर गोष्टीही दिल्या. साहजिकच मानवी प्रगतीवर आणि जगण्यावर (कदाचित अधोगतीवरही) परिणाम करणारे प्लेबॉय हे एक महत्त्वाचे उत्पादन होते. त्याची दखल इतिहासाला घेणे आवश्यकच आहे.
प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी सदैव मादक ललनांच्या घोळक्यात स्वतःचे फोटो देणाऱ्या हेफनरची दुसरी बायको त्याच्यापेक्षा 38 वर्षांनी लहान होती. त्यानंतर 2011 मध्ये त्याने 25 वर्षांच्या मुलीशी लग्न करण्याचं जाहीर केलं. पण लग्नाच्या पाच दिवस अगोदर ती पळून गेली. तरी पुढच्या वर्षी परत आली आणि त्याच्या वयाच्या 87 व्या वर्षी हे लग्न झालंच. 27 सप्टेंबर 2017 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.






