इंद्रजित खांबे
- प्रख्यात छायाचित्रकार रघु राय यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झालं आहे. रघु राय बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
- रघु राय यांना भारतीय छायाचित्रण आणि छायाचित्र पत्रकारितेचे 'जनक' मानलं जायचं. त्यांची कारकीर्द पाच दशकांहून अधिक काळ चालली, ज्यात त्यांनी भारत आणि जगातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचं छायाचित्रण केलं.
जग सेल्फीचं असलं तरीही जगाचा नव्याने शोध घेऊ पाहणाऱ्या संवेदनशील सजग छायाचित्रकारांचं महत्त्व जराही कमी झालेलं नाही. शेवटी, मोबाइलने सेल्फी घेताना वा इतरांना प्रसंगानुरूप टिपताना आपण आपल्यापलीकडच्या जगाचा फारसा विचार करत नसतो. पण रघु राय यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार हातातल्या कॅमेऱ्याचा वापर मुख्यत: स्वत:पलीकडचं जग टिपण्यासाठी, आपलं भाष्य नोंदवण्यासाठी करत असतात. त्यातून समूहांचे- माणसांचे, ठिकाणांचे स्वभाव उजळतात. बघणाऱ्याचं परिस्थितीचं आकलन विस्तारण्यास मोलाची मदत होते. मुख्य म्हणजे, वर्तमानातला तो क्षण संदर्भमूल्य प्राप्त होऊन कायमस्वरूपी इतिहासाच्या पटलावर कोरला जातो.
गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या दैनंदिन संवादामध्ये फोटो या माध्यमाचा वापर विलक्षण वाढलाय. एखादा माणूस जेव्हा स्वतःचा सेल्फी काढून तो फेसबुक, इन्स्टाग्रामवर अपलोड करतो, तेव्हा तो नुसता फोटो न राहता, ते त्या व्यक्तीचं एक सामाजिक, राजकीय भाष्य ठरून जातं. त्यामुळे सध्याच्या सेल्फाळलेल्या काळात जिथं प्रत्येक माणसाकडे कॅमेरा आहे (मग तो मोबाइलचा का असेना), तर मग नेमकं छायाचित्रकार कोणाला म्हणायचं, हा एक महत्त्वाचा प्रश्न.
जशी आज मोबाइल कॅमेऱ्यामुळे छायाचित्रणाची कला एका मोठ्या स्थित्यंतरातून जातेय, तशी ती यापूर्वीही गेली आहेच. फक्त तिचा वेग आणि आवाका आजच्याएवढा मोठा नव्हता. छायाचित्रणाचे अनेक प्रकार आहेत. त्या प्रत्येक प्रकारामध्ये वेगवेगळे प्रयोग होत राहिले आहेत. त्यात इंटरनेट हे माध्यम येण्यापूर्वी हे प्रयोग त्या-त्या छायाचित्रकाराच्या भौगोलिक सीमारेषांत अडकून राहायचे. परंतु गेल्या दहा वर्षांत इंटरनेटचा वाढलेला पसारा आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, फ्लिकर यांसारखी फोटो शेअर करणारी माध्यमं यामुळे वेगवेगळ्या प्रयोगांची एक चांगली घुसळण पाहायला मिळतेय. त्यामुळे छायाचित्रणाच्या इतिहासात वेगवेगळे प्रयोग केलेले छायाचित्रकार बाजूला काढणं फार अवघड गोष्ट आहे. तरीही स्ट्रिट फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आणि फोटो जर्नलिझम या जगण्याला स्पर्श करणाऱ्या तीन प्रकारांमधील जगावर छाप सोडणाऱ्या छायाचित्रकाराविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

फोटोग्राफी आणि ‘डिसायसिव्ह मुव्हमेट’
स्ट्रिट फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आणि फोटो जर्नलिझम हे तिन्ही प्रकार एकमेकांची सख्खी भावंडं असल्यासारखी आहेत. कित्येक छायाचित्रकारांनी या तिन्ही माध्यमांमधून एकाच वेळी काम केलं. त्यात आधुनिक छायाचित्रणाचं ज्यांना जनक म्हटलं जातं, ते म्हणजे फ्रेंच छायाचित्रकार हेन्री कार्टिअर ब्रेसाँ. ब्रेसाँ यांनी छायाचित्रणाला दिलेली देणगी म्हणजे, ‘डिसायसिव्ह मुव्हमेट’ ही संकल्पना. कोणत्याही घटनेचं छायाचित्र काढत असताना नेमक्या जादुई क्षणाची वाट पाहायची, तो क्षण येताच शटरचं बटण दाबायचं. तो क्षण म्हणजेच ब्रेसाँ यांनी सांगितलेला छायाचित्र काढण्याचा, छायाचित्रकारानं निर्णय घेण्याचा ‘डिसायसिव्ह मुव्हमेंट.’ त्या काळी कॅमेरा हा फिल्मचा असायचा. एक छायाचित्र काढून झालं की, पुढचं काढण्यापूर्वी फिल्म पुढे सरकवावी लागायची. त्यात काही सेकंद वाया जायचे. त्यामुळे नेमका क्षण पकडणं गरजेचं असायचं. कालांतराने कॅमेरा तंत्रज्ञान विकसित झालं. ब्रेसाँ यांच्या डिसायसिव्ह मुव्हमेंटच्या तत्त्वज्ञानाची अनेकांनी मोडतोड करून नवीन तत्त्वज्ञानही मांडलं.
आजच्या डिजिटल युगात एका सेकंदाला कॅमेरा आठ छायाचित्रं काढतो. रोल बदलण्याची भानगड नसते, कारण मेमरी कार्डवर असंख्य छायाचित्र स्टोअर होऊ शकतात. त्यामुळे ब्रेसाँ यांच्या काळात नेमका क्षण पकडणं जेवढं कौशल्याचं काम होतं, त्या मानाने आज ते थोडं सोप्पं झालेलं आहे. कालांतराने ब्रेसाँ यांनी हंगेरीचे रॉबर्ट कापा यांच्यासोबत मॅगनम फोटोज नावाची संस्था सुरू केली. ज्या संस्थेला छायाचित्रणाच्या जगात, एका विद्यापीठाचं स्थान आहे. जगभरातून उत्तमोत्तम छायाचित्रकारांना त्यांनी यात सामील करून घेतलं. जगभरात वेगवेगळ्या गोष्टींचं दस्तऐवजीकरण करण्यासाठी बळ दिलं. मॅगनमच्या ७५ वर्षांच्या इतिहासात केवळ ८५ छायाचित्रकार त्यात स्थान मिळवू शकले, ज्यात एक भारतीय छायाचित्रकार होते. ते म्हणजे, रघु राय…
अन् रघू राय यांचा फोटोग्राफीत शिरकाव झाला
छायाचित्रकार याबद्दल भारतापुरता विचार करायचा झाला, तर भारताच्या इतिहासात जागतिक पातळीवर नाव असलेलं एक नावं, रघु राय. १९७०नंतर भारतीय फोटोग्राफीत रघु राय नावाच्या पर्वाची सुरुवात झाली.फोटोग्राफीचा विचार रघू राय यांनी व्यवसाय म्हणून केला तो १९६५ साली. तोवर स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं आणि वर्षभरापुरतंच का होईना, सरकारी कामही मिळालं होतं. त्यात मन लागेना, म्हणून कॅमेरा घेऊन फिरू लागले आणि मोठे बंधू एस. पॉल यांना भेटून फोटो दाखवले. मग ‘हिंदुस्तान टाइम्स’ मध्ये वृत्तछायाचित्रकार म्हणून लागले आणि पुढल्याच वर्षी ‘द स्टेट्समन’चे छायाचित्र विभागप्रमुख झाले, असा रघू राय यांचा व्यवसायप्रवेश.
ही सुरुवात कशी झाली, त्याचा किस्साही खूप मजेशीर आहे. रघु राय यांचे ज्येष्ठ बंधू एस. पॉल हे उत्तम छायाचित्रकार होते. एक दिवस ते एका गावात छायाचित्र काढायला जाणार होते. रघु रायही त्याच्यासोबत गेले. एस.पॉल यांनी रघु राय यांना एक साधा कॅमेरा रोल टाकून दिला. गावात पोहोचताच रघु राय यांना अतिशय निरागस, गोड असं एक गाढवाचं पिल्लू दिसलं. रघु राय त्याचा फोटो काढायचा प्रयत्न करू लागले. कॅमेऱ्याला झूम लेन्स नसल्यामुळे त्या पिल्लाच्या जवळ जाणं गरजेचं होतं. पण तसं केलं की ते पिल्लू दूर पळायचं. त्यात परत कॅमेरा हे गावातल्या मुलांना आकर्षण असल्यामुळे त्यांच्यासोबत १०-१२ पोरं मागून फिरत होती. त्यामुळे ते पिल्लू अजूनच बिथरत होतं.

चांगला दोन-तीन तास हा खेळ चालला आणि शेवटी त्या पिल्लानं हार मानली, ते एका जागी स्तब्ध उभ राहिलं. रघु राय त्याच्या समोर गेले. त्याचा एक फोटो काढला. कालांतराने तो डार्करूममध्ये डेव्हलप केला गेला. एस. पॉल यांनी तो पाहिला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते रघु राय यांना म्हणाले, की हा खरंच एक अप्रतिम फोटो आहे. आपण हा न्यूयॉर्क टाइम्सला पाठवून देऊ. न्यूयॉर्क टाइम्स त्या वेळी जगभरातून चांगल्या छायाचित्रांना पहिल्या पानावर प्रसिद्धी देत असे आणि काय आश्चर्य, न्यूयॉर्क टाइम्सच्या फोटो एडिटरलाही तो प्रचंड आवडला आणि त्यांनी तो चक्क छापलाही. त्याच क्षणी रघु राय या माणसाचं आयुष्य बदललं. सिव्हिल इंजिनिअरींगचं घेतलेलं शिक्षण तसंच सोडून त्यांनी छायाचित्रकार होण्याचं ठरवलं आणि भारतीय छायाचित्रण कलेत रघु राय पर्वाला सुरुवात झाली.
रघु राय यांच्या फोटोग्राफीत नेमंक काय वेगळपणं होतं…?
तिथपासून पुढल्या सुमारे ५० वर्षांत त्यांनी छायाचित्रणात जे काही केलं, ते देशाला स्वतकडे पाहायला लावणारं होतं. वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तिमत्वांकडे निराळय़ा नजरेनं आणि माणूस म्हणून पाहू शकणारं होतं.. श्रमिकांची गर्दी आणि कलावंताचं लोभस एकलेपण किंवा भोपाळच्या संहाराची तिडीक आणि मशीद पाडली जाण्यापूर्वीच्या अयोध्येची सहजरम्यता अशा कित्येक टोकांना रघू राय यांची छायाचित्रं नेमकेपणानं जणू चिमटीत पकडतात..
रघु राय यांनी त्यांचं सर्व काम भारतात केलं. भारत हा एवढा विविधतेनं नटलेला देश आहे, की मला पूर्ण आयुष्यात कधीच दुसऱ्या देशात जाऊन काम करावसं वाटलं नाही, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते. १९७७मध्ये ते ‘मॅगनम’ला निवडले गेले. ते भारताचे पहिले मॅगनम छायाचित्रकार. राय यांनी कोणत्या विषयावर काम नाही केलं? कदाचित जागतिक छायाचित्रणाच्या इतिहासात रघु राय यांनी जेवढी पुस्तकं केली असतील, तेवढी खचितच दुसऱ्या कोणी केली असतील. वाराणसी, कोलकाता, मुंबई, दिल्ली, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, पुष्कर मेळा, कुंभमेळा, बांगलादेश फाळणी, शास्त्रीय संगीतामधील महत्त्वाच्या व्यक्ती, झाडं, ताजमहाल, शीख, तिबेट, भोपाळ वायू दुर्घटना अशा विविध विषयांवरील जवळपास ३०हून अधिक पुस्तकांवर त्यांनी काम केलं.
भोपाळ वायू दुर्घटनेच्या लढ्याला रघु राय यांच्या फोटोंमुळे कसं बळ मिळालं?
या सर्वांमधील मुख्य धागा म्हणजे, त्यांनी प्रत्येक विषयावर काम करताना सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवलं. भोपाळ वायू गळतीनंतर तिथं पहिल्यांदा पोहोचणाऱ्या छायाचित्रकारांमध्ये रघु राय हे होते. त्यांनी भोपाळ वायू दुर्घटनेच्या काढलेल्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस फोटोचं पहिलं पारितोषिक मिळालं. परंतु नंतरही ते वेळोवेळी भोपाळमध्ये जाऊन पीडितांची छायाचित्रे काढत राहिले. गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या लढ्याला रघु राय यांच्या छायाचित्रांमुळे बळ मिळालं.

रघु राय यांच्या छायाचित्राचं वैशिष्ट म्हणजे, अतिशय वाइड फ्रेम्स. अतिशय मोठा आवाका ते त्यांच्या छायाचित्रांमधून चित्रित करतात. जगभरातील कित्येक छायाचित्रकार हे रघु राय यांच्यापासून प्रेरणा घेऊन काम करत आहेत. नंतरच्या कालखंडात पाब्लो बार्थेलेमेव, किशोर पारेख, स्वपन पारेख, सोबराब हुरा असे काही फोटोग्राफर जागतिक पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करत आले.
आज आपल्याकडे ७८० वेगवेगळ्या भाषा आहेत. सांस्कृतिक विविधतेनं नटलेल्या या देशात छायाचित्रित करण्यासारख्या असंख्य गोष्टी आपल्याकडे आहेत. तरीही आपण आजपर्यंत जगाला एक रघु राय सोडले, तर दुसरं नाव देऊ शकलो नाही. परंतु ही परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. त्यासाठी गरज आहे गांभीर्यानं विचार करण्याची. आपली शेती, खेडी, माणसं, संस्कृती छायाचित्रित करण्याची. त्यासाठी समाजाचा पुढाकारही गरजेचा आहे. जर प्रयोगशिलता हा मापदंड लावून येत्या काळात आपण काम केलं, तर नक्कीच भारत हा छायाचित्रणाच्या जगात आघाडी घेऊ शकतो. आणि जागतिकीकरणाचा वेग पाहिला, तर हे काम करण्यासाठी फार काळ आपल्याकडे नाही, हे सुज्ञ माणसाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
(इंद्रजित खांबे हे प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत.)






