Skip to main content

जिवा महालेंच्या १४ व्या पिढीची शोकांतिका; मुलगा केस कापतो, आई मजुरी करते, वडील अंथरुणावर…!

Article in Marathi
Vitthal Sable
23 May 2026
5 min read
3232 views
जिवा महालेंच्या १४ व्या पिढीची शोकांतिका; मुलगा केस कापतो, आई मजुरी करते, वडील अंथरुणावर…!

विठ्ठल साबळे



  • एकीकडे 'राजा शिवाजी' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ११४ कोटींची विक्रमी घोडदौड सुरू असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष इतिहास घडवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीच्या नशिबी मात्र गरिबी आणि वनवास आला आहे.


  • वीर जिवा महालेंचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ गेल्या ११ वर्षांपासून अर्धांगवायूने खाटेवर खिळलेले असून, कुटुंबाची चूल पेटवण्यासाठी त्यांची पत्नी शेतमजुरी करते, तर तरुण मुलगा प्रतीक केस कापण्याचे काम करतो.


  • कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आणि वडिलांच्या महागड्या गोळ्या औषधांचा खर्च झापत नसल्याने, तरुण मुलगा प्रतीक सपकाळ याला स्वतःचे शिक्षण अवघ्या दहावीतच अर्धवट सोडावे लागले.


  • ‘बाईमाणूस’ने प्रत्यक्ष जिवा महालेंच्या मूळ गावी जाऊन केलेला हा अत्यंत विदारक असा  स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट…



‘’होता जिवा म्हणून वाचला शिवा…’’ ही केवळ महाराष्ट्राच्या इतिहासातील एक ओळ नाही, तर ती या मातीची अस्मिता आहे. जेव्हा एखादा समाज आपल्या रक्षकांचा इतिहास विसरतो, तेव्हा त्या समाजाच्या अधोगतीला सुरुवात होते. आज नेमकी हीच परिस्थिती आपल्या अवतीभवती पाहायला मिळत आहे. अलीकडेच, म्हणजेच १ मे २०२६ रोजी भारताच्या चित्रपटसृष्टीत 'राजा शिवाजी' नावाचा एक भव्य आणि ऐतिहासिक चित्रपट संपूर्ण जगभरात रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या काही आठवड्यांत तब्बल ११४ कोटी ८० लाखांचा अभूतपूर्व गल्ला जमवला. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान जेव्हा रुपेरी पडद्यावर ‘वीर जिवा महालें’ची शौर्यगाथा आणि त्यांचा पराक्रम जिवंत करतो, तेव्हा थिएटरमध्ये बसलेला प्रत्येक प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी अवघं वातावरण भारावून जातं... 


१०० कोटींहून अधिक रुपयांची नफा मिळवणारी ही सिनेसृष्टी अन् टाळ्या वाजवणारा हा समाज... पण या झगमगाटाच्या मागे दडलेला अंधार किती भीषण आहे, हे पाहण्यासाठी आपल्याला ‘जिवा महाले’ यांच्या मूळ गावी जावं लागेल.


‘जिवा महाले’ यांचे वंशज आजही हयात आहेत याचा जेव्हा 'बाईमाणूस'ला शोध लागला तेव्हा ‘बाईमाणूस’ची टीम पोहचली थेट कोंढवली या जिवा महाले यांच्या गावात… सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम कोंढवली गावाच्या दिशेने जातानाच  पहिला धक्का रस्त्यातच बसला.


User Image

कोंढवली गावाच्या वेशीवर पोहोचण्यापूर्वी रस्त्याने जाणाऱ्या अनेक स्थानिक नागरिकांना, त्या गावात जाण्यासाठी पत्ता विचारत होतो. वीर जिवा महालेंचे गाव कोंढवली नेमकं कुठं आहे? तिथे त्यांचे वंशज राहतात का?  त्यावर लोकांनी सांगितलं की, गाव तर चार-पाच किलोमीटरवर अंतरावर आहे,  पण "तिथे जिवा महालेंचे वंशज राहतात का, याची आम्हाला काहीच कल्पना नाही."


ज्या शूरवीराच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्र गर्वाने छाती फुगवतो, त्याच्या स्वतःच्या तालुक्यात, शेजारील गावातील लोकांना जिवा महाले यांच्या वंशजांबद्दल काहीच माहिती नसणं, हीच या समाजाची मोठी खंत आहे. एका बाजूला सिनेमाच्या तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागतात, पण दुसऱ्या बाजूला त्या इतिहासाच्या जिवंत वंशजांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं…


एक हजार एकर इनामाचा इतिहास आणि अवघ्या दीड एकराचा वर्तमान


१० नोव्हेंबर १६५९ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला, पण त्याच वेळी खानाचा अत्यंत क्रूर आणि चपळ अंगरक्षक सय्यद बंडा याने शिवरायांवर तलवारीचा प्राणघातक वार केला. जर त्या क्षणी महाराजांचा अंगरक्षक जिवा महालेंनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून आपल्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात हवेतच उडवला नसता, तर आजचा इतिहास पूर्णपणे वेगळा असता. शिवरायांचे प्राण वाचवणारे हेच ते वीर जिवा महाले, ज्यांचे मूळ आडनाव 'सपकाळ' होते. त्यांच्या या अचाट पराक्रमावर आणि निष्ठेवर खूश होऊन खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना 'महाले' म्हणजे 'महा पराक्रमी' ही पदवी बहाल केली होती. पुढे जाऊन छत्रपती शाहू महाराजांच्या काळात, १७०७ मध्ये या पराक्रमाचा गौरव म्हणून सपकाळ (महाले) कुटुंबाला निगडे आणि साखरे या भागातील तब्बल १००० एकर जमीन इनाम म्हणून देण्यात आली होती.


User Image(जीवा महाले यांच्या 14 वे वंशजांच घर (Photo Credit - Abhijeet Tangade))


पण इतिहास जितका भव्य होता, तितकाच आजचा वर्तमान अत्यंत क्रूर आणि भीषण आहे. 'बाईमाणूसच्या'च्या टीमने जेव्हा कोंढवली गावातील त्यांच्या घरात प्रवेश केला, तेव्हा इतिहास आणि वास्तवातील दरी स्पष्टपणे जाणवली. एकेकाळी ज्या कुटुंबाकडे १००० एकर सुपीक जमीन इनाम म्हणून होती, त्यांच्याकडे आज अवघी दीड एकर जमीन उरली आहे. 


या ऐतिहासिक घसरगुंडीबद्दल बोलताना जिवा महाले यांचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ यांच्या पत्नी जयश्री सपकाळ अत्यंत भावूक होऊन सांगतात की,


 "आमच्या पूर्वजांना महाराजांनी १००० एकर जमीन दिली होती, हे खरं आहे. पण आमच्या पिढ्यान् पिढ्यांमध्ये काही जणांनी सामाजिक कार्यासाठी किंवा गरजांसाठी जमिनी दान केल्या, तर काही जणांनी त्या विकल्या. बदलत्या काळासोबत जमिनीचे तुकडे होत गेले आणि आज आमच्या १४ व्या पिढीपर्यंत पोहोचता पोहोचता हातामध्ये अवघी दीड एकर जमीन उरली आहे." 


ज्या जमिनीवर वर्षभराचे धान्यही पिकत नाही, अशा दीड एकर जमिनीच्या तुकड्यावर आज या शूरवीराच्या वंशजांना आपला प्रपंच चालवावा लागत आहे, हीच या मातीची सर्वात मोठी शोकांतिका आहे.


'होय,आम्ही जिवा महालेंचे वंशज आहोत, पण आज आमच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत’’


आज कोंढवली गावातील एका साध्या घराच्या खाटेवर बसलेले प्रकाश बाळकृष्ण सपकाळ हे वीर जिवा महालेंचे १४ वे वंशज आहेत. पण त्यांची शारीरिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. गेल्या ११ वर्षांपासून प्रकाश सपकाळ हे अर्धांगवायुमुळे पूर्णपणे अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांना स्वतःच्या हाताने पाण्याचा साधा घोटही पिता येत नाही की शरीराची साधी हालचाल करता येत नाही. या कुटुंबावर निसर्गाचा आणि आरोग्याचा कोप एवढ्यावरच थांबला नाही; प्रकाश सपकाळ यांचे वडील बाळकृष्ण महादेव सपकाळ (जिवा महालेंचे १३ वे वंशज) हे सुद्धा दिव्यांग होते. पिढ्यानपिढ्या चालत आलेले हे शारीरिक अपंगत्व आणि दारिद्र्य आज या कुटुंबाचे मानसिक आणि आर्थिक लचके तोडत आहे. घरात दुसरा कोणताही कमावता पुरुष नाही.


User Image(जीवा महाले यांचे 14 वंशज प्रकाश सपकाळ (Photo Credit - Abhijeet Tangade))


‘बाईमाणूस'शी बोलताना खुद्द प्रकाश सपकाळ यांनी प्रशासनाकडे एकच आर्त हाक मारली आहे. ते म्हणतात,


'आम्ही जिवा महालेंचे वंशज आहोत, पण आज आमच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत; सरकारने आम्हाला इतर काही नाही, तर फक्त रोजच्या गोळ्या औषधांसाठी आणि जगण्यासाठी आर्थिक मदत करावी'. ज्या घरात रोजच्या भाकरीची चिंता आहे, तिथे दरमहा लागणाऱ्या महागड्या औषधांमुळे या ऐतिहासिक कुटुंबाचे होणारे हे प्रचंड हाल व्यवस्थेच्या बधीरतेवर थेट बोट ठेवणारे आहे."


कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आज या घरात प्रचंड केविलवाणी धडपड सुरू आहे.  पत्नी जयश्री सपकाळ कुटुंबाची चूल पेटवण्यासाठी आणि औषधांचा खर्च भागवण्यासाठी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन दिवसभर मोलमजुरी करतात. तर प्रकाश सपकाळ यांचा तरुण मुलगा प्रतीक सपकाळ याने घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती पाहून आपले शिक्षण अवघ्या १० वी नंतर कायमचे सोडून दिले आता तो. वडिलांच्या महागड्या गोळ्या औषधांचा खर्च आणि कुटुंबाची रोजीरोटी चालवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एका केश कर्तनालयामध्ये लोकांचे केस कापण्याचे काम करतो. एका छोट्याशा सलूनमध्ये लोकांचे केस कापून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांवर या ऐतिहासिक कुटुंबाचा प्रपंच आणि वडिलांचे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. 


प्रतीकची बहीण प्रतीक्षा सपकाळ हिचे २०२२ मध्ये लग्न झाले, पण लग्नाचा खर्च भागवताना कुटुंबाचे कंबरडे पूर्णपणे मोडले. सातारा जिल्ह्याचेच रहिवासी असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी त्यावेळी कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत केली होती, परंतु ती मदत या गरिबीच्या अथांग समुद्रात अत्यंत अपुरी पडली. आज हे कुटुंब पुन्हा एकदा कर्जाच्या विळख्यात अडकले आहे.


User Image(14 वे वंशज प्रकाश सपकाळ यांच्या पत्नी जयश्री सपकाळ (Photo Credit - Abhijeet Tangade))


जयश्री सपकाळ म्हणतात,


"बाकीच्या राजघराण्यातील वंशजांची परिस्थिती आज ठीकठाक आहे, ते वैभवात जगत आहेत. आम्ही गर्वाने सांगतो की 'होता जिवा म्हणून वाचला शिवा', पण त्याकाळी राजासाठी जीव देणाऱ्या वीर जिवा महालेंचे आम्ही १४ वे वंशज आज अशा भयानक परिस्थितीत जगत आहोत.... हे खूप वाईट आहे..  माझी सरकारला एकच विनंती आहे, आमच्या गावात जिवा महालेंचे एक भव्य स्मारक व्हावे आणि या आजारी कुटुंबाला गोळ्या औषधांसाठी सरकारने मदत करावी."


लेखक प्रदीप ढवळ यांचा शोध आणि सोन्या पाटलांचे 'हक्काचे घर’


काही वर्षांपूर्वीपर्यंत या कुटुंबाची अवस्था आजच्यापेक्षाही भयानक होती. त्यांच्या डोक्यावर साधे पक्के छप्परही नव्हते. वारा पावसात एका मोडकळीस आलेल्या झोपडीत हे कुटुंब आपले दिवस ढकलत होते. पण या अंधारात आशेचा पहिला किरण दाखवला तो म्हणजे ठाण्याचे एक प्राध्यापक डॉ. प्रदीप ढवळ यांनी. प्रदीप ढवळ हे वीर जिवा महाले यांच्या जीवनावर आणि पराक्रमावर एक ऐतिहासिक पुस्तक लिहित होते. आपल्या संशोधनादरम्यान त्यांना समजले की, ज्या जिवा महालेंनी शिवरायांचे प्राण वाचवले, त्यांचे १४ वे वंशज सातारा जिल्ह्यातील कोंढवली गावामध्ये अत्यंत गरिबीत राहत आहेत. प्रदीप ढवळ स्वतः त्या गावात आले, त्यांनी कुटुंबाची सविस्तर माहिती घेतली, त्यांचे राहणीमान पाहिले आणि हे संपूर्ण प्रकरण पहिल्यांदा मीडिया आणि वृत्तपत्रांमध्ये आणले.


User Image(कोंढवली गावचे सरपंच बाळू जगताप (Photo Credit - Abhijeet Tangade))


या संपूर्ण गंभीर परिस्थितीवर कोंढवली गावचे सरपंच बाळू जगताप यांनी देखील स्थानिक प्रशासनाची आणि ग्रामस्थांची भावना स्पष्ट केली आहे. 'बाईमाणूस'शी बोलताना सरपंच बाळू जगताप म्हणाले,


''होता जिवा म्हणून वाचला शिवा' ही ओळ आम्ही लहानपणापासून फक्त ऐकत आणि वाचत आलो आहे. पण आज जेव्हा प्रत्यक्ष जिवा महालेंच्या वंशजांची ही दुरवस्था आम्ही डोळ्यांनी पाहतो, तेव्हा मन सुन्न होतं. या कुटुंबाला लवकरात लवकर शासकीय स्तरावर योग्य ती मदत मिळावी, हीच आम्हा सर्व ग्रामस्थांची आणि गावाची तीव्र भावना आहे.' 

गावच्या कारभाऱ्यांनी व्यक्त केलेली ही खंत आतातरी प्रशासनाचे डोळे उघडणार का, हाच खरा प्रश्न आहे


लेखक प्रदीप ढवळ यांच्या माध्यमातून जेव्हा हे वृत्त सर्वदूर पसरले, तेव्हा कोळी समाजाचे धर्मसेवक आणि 'समाजकल्याण न्यास'चे संस्थापक डॉक्टर सोन्या पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. एका ऐतिहासिक कुटुंबाला हक्काचे घर नसावे, ही चीड त्यांना अस्वस्थ करून गेली. अखेर, डॉ. सोन्या पाटील यांनी पुढाकार घेऊन २०१८ मध्ये सपकाळ कुटुंबाला एक हक्काचे पक्के घर बांधून दिले.


जर २०१८ मध्ये एका सामाजिक संस्थेने आणि संवेदनशील लेखकाने हा शोध घेतला नसता, तर आज शिवरायांच्या या अंगरक्षकाचे वंशज उघड्यावर आले असते. ही घटना सिद्ध करते की, शासनाचे डोळे उघडण्यापूर्वी नेहमीच समाजातील काही संवेदनशील व्यक्तींना पुढे यावे लागते, परंतु तरीही प्रशासकीय पातळीवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही.


आधार हरवलेली शासकीय बधीरता आणि व्यवस्थेची लाजिरवाणी गोष्ट


‘बाईमाणूस’समोर प्रकाश सपकाळ यांनी शासकीय व्यवस्थेचा जो भोंगळ आणि संतापजनक कारभार मांडला, तो ऐकून कोणत्याही सुजाण नागरिकाचे डोके चक्रावून जाईल. या देशाला आणि राज्याला डिजिटल बनवण्याच्या गप्पा मारणारे प्रशासन एका अपंग आणि हतबल नागरिकाला साधे 'आधार कार्ड' देखील देऊ शकलेले नाही. प्रकाश सपकाळ यांनी सांगितले की, ते मागील अनेक महिन्यांपासून तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारत आहेत. पण तिथल्या कर्मचाऱ्यांची बधीरता अत्यंत टोकाची आहे.


जेव्हा हे कुटुंब प्रकाशरावांचे आधार कार्ड काढायला जाते, तेव्हा तिथले सरकारी कर्मचारी त्यांच्याकडे मतदान कार्डाची मागणी करतात. आणि जेव्हा हे कुटुंब मतदान कार्ड काढण्यासाठी जातात तेव्हा तिथले अधिकारी आधी आधार कार्ड घेऊन या, असे सांगतात...


या अशा विचित्र आणि दुष्ट चक्रव्यूहात अडकून प्रकाश सपकाळ मागील अनेक दिवसांपासून तालुक्याला हेलपाटे मारत आहेत. एका जागेवरून हलता न येणाऱ्या अपंग व्यक्तीला सरकारी उंबरठे झिजवायला लावणाऱ्या या यंत्रणेला साधी पेन्शन योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणे देखील शक्य झालेले नाही.


ज्या पूर्वजांनी या महाराष्ट्राच्या गादीला, शिवशाहीला स्वतःच्या रक्ताचा आधार दिला, त्यांच्याच वंशजांना आज एका कागदाच्या तुकड्यासाठी, एका अधिकृत ओळखीसाठी सामान्य माणसाची प्रशासकीय यंत्रणेसमोर फरफट होत आहे. हीच या लोकशाहीची सर्वात मोठी शोकांतिका आहे. 


User Image(कोंढवली गावचे ग्रामस्थ जितेंद्र आंबळे (Photo Credit - Abhijeet Tangade))


कोंढवली गावचे ग्रामस्थ जितेंद्र आंबळे यांनी समाजाच्या मानसिकतेवर थेट बोट ठेवले. जितेंद्र 'बाईमाणूस'शी बोलताना म्हणाले,


"प्रकाश सपकाळ यांचे वडीलही अपंग होते आणि हेही ११ वर्षांपासून अपंग आहेत. हे कुटुंब कधी घराबाहेर पडूच शकत नाही. मग बाहेरच्या समाजाला कसं कळणार की हेच जिवा महालेंचे खरे वंशज आहेत? जर समाज आणि शासन यांच्याकडे लक्ष देणार नसेल, तर या ओळखीला काय अर्थ आहे?"  

राजघराण्यांचे वैभव, मंत्र्यांची तटस्थता आणि अनुत्तरीत प्रश्न


आज एकाच इतिहासाच्या सावलीत दोन टोकांचे वास्तव पाहायला मिळते. सातारा राजघराण्याचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आज खासदार आहेत, तर आमदार शिवेंद्रराजे भोसले राज्याचे मंत्री आहेत. कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराज खासदार असून, त्यांचे सुपुत्र संभाजीराजे माजी खासदार आहेत. हे सर्वजण आज अत्यंत सन्मानाने आणि राजकीय वैभवात जगत आहेत. पण दुसरीकडे, ज्या वीर जिवा महालेंनी शिवरायांसाठी स्वतःचे रक्त सांडले, त्यांचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ मात्र आज भीषण गरिबीत गोळ्या औषधांसाठी वंचित आहेत..


User Image

राजघराण्यांना हे राजकीय वैभव आणि रक्षकांच्या वंशजांना मात्र साध्या कागदपत्रांसाठी होणारे  हाल, हा विरोधाभास मनाला अस्वस्थ करणारा आणि समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारा आहे.

एकीकडे 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या नावाखाली बॉक्स ऑफिसवर ११४ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे, तर दुसरीकडे दीड एकर जमिनीवर, लोकांचे केस कापून आणि शेतात मजुरी करून औषधांचे पैसे गोळा करणारे जिवा महालेंचे खरेखुरे वंशज आहेत. चित्रपटाचा गल्ला मोजणाऱ्या या उथळ समाजाला आणि घोषणाबाजीत मग्न असलेल्या शासन प्रशासनाला, अंथरुणावर खिळलेल्या या कुटुंबाचे अश्रू कधी दिसणार? 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' ही ओळ फक्त राजकीय भाषणांमध्ये टाळ्या मिळवण्यापुरतीच मर्यादित राहणार, की या जिवंत इतिहासाला त्याचा हक्क आणि सन्मान मिळणार? हाच आजचा सर्वात मोठा, जळजळीत प्रश्न आहे!


या ऐतिहासिक कुटुंबाला हक्काची मदत मिळवून देण्यासाठी आपणही पुढे येऊ शकता. जर तुम्हाला या कुटुंबाला आर्थिक किंवा वैद्यकीय स्वरूपात मदत करायची असेल, तर कृपया 'बाईमाणूस' टीमशी ९३०७३०९२७० या क्रमांकावर थेट संपर्क साधावा. तुमचे एक छोटेसे पाऊल या कुटुंबाला मोठा आधार देऊ शकते.
Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...