अविनाश उषा वसंत
- 'मटका किंग' ही नवीन वेब सीरिज नुकतीच प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अभिनेता विजय वर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. ही कथा जुगाराचा बादशाह आणि चित्रपट निर्माता रतन खत्रीच्या जीवनावर आधारित आहे.
- रतन खत्री... पाकिस्तानातील कराची येथून फाळणीनंतर मुंबईत स्थलांतर केलेला एक सिंधी तरुण. छोटे-मोठे उद्योग करता-करता मुंबईत ‘मटका किंग’ बनला.
- मुंबईत सगळ्यात अगोदर मटका हा कल्याण भगतने सुरू केला हे जरी खरं असलं तरी रतन खत्रीने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले हेदेखील तितकेच सत्य आहे.
कष्टकरी, कामगारवर्गाचे प्राबल्य असलेला मुंबईतील परळ नाका... रस्त्याच्या दुतर्फा उभ्या-आडव्या पसरलेल्या चाळी... दोन चाळींमध्ये अगदी अरुंद, अंधारी बोळ... अक्षरश: एखादा माणूस जेमतेम जाऊ शकेल... याच बोळात 10-15 स्टुलांवर ओळीने बसलेले ‘रायटर्स’ आणि त्यांच्या पुढ्यात उत्सुकता आणि चिंतेचे संमिश्र भाव चेहर्यावर असलेले ‘खेळाडू’... या रायटर आणि खेळाडूंमध्ये अत्यंत सावध हालचाली चाललेल्या... कुणी खेळाडू रुपया, कुणी दोन रुपये देतोय आणि ‘रायटर’ त्यांच्या हातात लाल, पिवळ्या, पांढर्या रंगाची चिठ्ठी कोंबतोय...
70 ते 90च्या दशकात सकाळी सहापासून अगदी रात्री बारापर्यंत रायटर आणि खेळाडूंमध्ये हा सावध ‘खेळ’ मुंबईभर रंगत असे…
दिवसाची बेगमी करून देण्याची आशा कष्टकर्यांमध्ये जागवणार्या या खेळाची पोलिसांच्या दप्तरी ‘मटका’ म्हणून नोंद होती आणि समाजामध्ये या मटक्याबद्दल प्रचंड कुतूहल होते. परंतु मटका हे नाव कसे रूढ झाले, याची कुठेही नोंद नाही. काही जणांच्या मते, ‘आकडे’ हे मातीच्या मडक्यात पत्ते टाकून काढीत असत, म्हणून मडक्याचा हिंदी शब्द ‘मटका’ असा रूढ झाला.

रतन खत्री मटका किंग कसा बनला?
रतन खत्री... पाकिस्तानातील कराची येथून फाळणीनंतर मुंबईत स्थलांतर केलेला एक सिंधी तरुण. छोटे-मोठे उद्योग करता-करता मुंबईत ‘मटका किंग’ बनला. रतन खत्री याच्या मटक्याला ‘मेन बाजार’ म्हणून ओळख होती. हिंदी सिनेमाला नेहमीच अशा वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाची गरज आणि कुतूहलदेखील वाटत असते. रतन खत्री त्याला अपवाद नव्हता. रतन खत्री याच्या जीवनावर ‘धर्मात्मा’ हा चित्रपट आला तर ‘रंगीला रतन’ हा चित्रपट रतन खत्री याने स्वत:च निर्माण केला. असा पोलिस आणि समाजाच्या नजरेत ‘गुन्हेगार’ असलेला रतन खत्री मात्र कष्टकरी जनतेमध्ये खूपच विश्वास कमावून होता.
सकाळी सहा वाजता मटक्यावर पैसे लावणार्या खेळाडूंची गर्दी धंद्यावर होत असे ती त्यामुळेच. साधारण सकाळी नऊ वाजता पहिला ‘आकडा’ जाहीर होत असे, याला मटक्याच्या भाषेत ‘ओपन’ म्हणून संबोधत. त्या काळात फोनव्यतिरिक्त कोणतीही आधुनिक सुविधा नसतानादेखील ही ‘खबर’ जाहीर झाल्या झाल्या, अक्षरश: काही सेकंदांत सगळ्या धंद्यावर पोहोचत असे. अगदी परदेशातसुद्धा...! आणि ताबडतोब त्याची वाटणीदेखील होत असे. त्यानंतर पुन्हा रात्री बाराच्या सुमारास ‘क्लोज’चा आकडा काढला जाई.
या संदर्भात जुने-जाणते धंदेवाले आणि खेळाडू सांगतात की, मटक्याचा आकडा हा बावन्न पत्त्यांमधून काढतात. मात्र या बावन्न पत्त्यांतील गुलाम, राणी, राजा हे पत्ते आधीच काढून टाकलेले असतात. उरलेल्या पत्त्यांमधून तीन पत्ते काढून आकडा जाहीर केला जातो. उदा. एक्का, पंजा आणि छक्का आल्यास त्याची बेरीज ही बारा होते. म्हणजेच शेवटचा आकडा दोन म्हणून ‘दुरी’ हा आकडा म्हणून जाहीर केला जातो. या धंद्यातील बोलीभाषासुद्धा वेगळी असते. उदा. सात या आकड्याला ‘लंगडा’ तर सहाला ‘छक्का’ म्हणतात. दहा या आकड्याला ‘मेंढी’ म्हणतात, तर चारला ‘चौका’ म्हणून ओळखतात. आजही सर्वसामान्यांच्या तोंडी हेच शब्द रूढ झाले आहेत.
तीन एक्के, तीन नव्वे असे एकसारखे पत्ते आले की त्याला ‘संगम पाना’ तर 2,2,4 किंवा 2,2,8 असे आकडे आले तर ‘डी. पी. पाना’ म्हणतात. 1,3,9 किंवा 2,4,9 याला ‘सिंगल पाना’ म्हणून ओळखत. हे शब्द बोलीभाषेत प्रचलित कोणी केले, हे मात्र अजून कोणालाही माहीत नाही. रतन खत्रीच्या ‘मेन बाजार’च्या मटक्याला पैसेदेखील चांगले मिळत. ‘संगम पाना’ म्हणजेच तीन एक्के किंवा तीन नव्वे लागले, तर 1 रुपयाला शंभर रुपये मिळत, तर डीपी पानाला एक रुपयाला अडीचशे रुपये मिळत. एका पांढर्या, पिवळ्या, लाल, हिरव्या अशा साध्या चिठ्ठीवर लिहिलेला आकडा घेऊन खेळाडू आपल्या रायटरकडे गेल्यावर कोणतीही चौकशी न करता लागलेल्या आकड्याच्या प्रमाणात ताबडतोब पैसे मिळत.
खरा ‘मटका किंग’ कोण कल्याण जी भगत की रतन खत्री?
मुंबईत सगळ्यात अगोदर मटका हा कल्याण भगतने सुरू केला हे जरी खरं असलं तरी रतन खत्रीने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले हेदेखील तितकेच सत्य आहे.
मटक्याच्या इतिहासात डोकावून बघायचे म्हटले तर या जुगाराला मटका हे नाव का पडले या बद्दल ठोस काही मिळत नाही. पण याची सुरवात मसाल्याचा व्यापार करणाऱ्या एका कच्छी माणसाने केली. ह्या व्यापाऱ्याच्या देवांना दानधर्म करण्याच्या वृत्तीमुळे तिथले लोक "भगत' म्हणू लागले. त्यानेच 1960 च्या दशकात "कल्याण' नावाने हा मटका जुगार वरळी भागात सुरू केला.
मात्र हा मटका कल्याण जी भगत याने एकाएकी सुरू नव्हता केला. 1941 मध्ये कल्याण भगत कच्छवरून मुंबईत नशिब आजमावयला आला. जवळफास 15 वर्षे कमाईसाठी बरेच हातपाय मारले पण कोणत्याच धंद्यात त्याला यश मिळाले नाही. त्याने किराणाच्या दुकानात मॅनेजरची नोकरी केली, मसाल्यांचा धंदा केला. मुंबईचा कापड उद्योग एका चरमसीमेवर पोहचलेला काळ होता तो… अमेरिकेत गुलामगिरीच्या प्रश्नावरून यादवी सुरू झाली तेव्हा जागतिक बाजारात कापसाचा तुटवडा सुरू झाला.
मग भारतासारख्या देशातून कापूस मँचेस्टरला जायला लागला. भाव रोज वरखाली व्हायला लागले आणि न्यूयॉर्क कॉटन मार्केटच्या बंद भावावर सट्टा खेळला जाऊ लागला. न्यूयॉर्कच्या कॉटन एक्स्चेंजचे व्यवहार रोज खुलताना आणि बंद होतानाचे भाव पूर्वी मुंबईत टेलिप्रिंटरवरून कळवले जायचे. भगतने याच मार्केटमध्ये बेटिंग म्हणजे सट्ट्याचा धंदा सुरू केला. एक अशी वेळ आली जेव्हा कल्याण भगतला वाटलं की आता आपल्याला या मार्केटबद्दल पुरेसं ज्ञान मिळालं आहे आणि तिथून सुरू झाला असली मटक्याचा खेळ…
न्यूयॉर्क कॉटनचे भाव स्थिर झाले आणि आकड्यांमधली गंमत निघून गेली होती. रोजची बेटिंगची सवय लागलेले व्यापारी नव्या खेळाची मागणी करू लागले. आणि त्यातून जन्म झाला मटक्याचा... शून्य ते नऊ या आकड्यांवर खेळला जाणारा हा नवा जुगार. पण आकडा कसा काढायचा, तर पत्त्यांच्या कॅटमधून तीन पत्ते काढायचे आणि जिंकणारा आकडा जाहीर करायचा. एक रुपया लावला असेल तर जिंकल्यावर नऊ रुपये. सकाळ संध्याकाळ दोनवेळा संधी... ओपन आणि क्लोज!
ओपन आणि क्लोज… मटक्याचा एक अभिनव प्रयोग
स्थानिक व्यापाऱ्यांतील उत्सुकतेमुळे ही अनोखी सट्टेबाजी कल्याण भगतच्या कल्पक डोक्यातून सुरू झाली. बघता बघता मुंबईत त्या काळी भरभराटीला असलेल्या गिरणी कामगारांमध्ये हा नशिबावर आधारित खेळ प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्यासरशी त्याची उलाढालही कोट्यवधींच्या घरात गेली. कल्याण भगतच्या या धंद्यात रतन खत्री हा त्याचा सहकारी होता. पण मटक्याचा धंदा मात्र रतन खत्रीने वाढवला. मटक्याच्या धंद्यात कोट्यवधीची उलाढाल होतेय हे लक्षात येताच कल्याण भगत आणि रतन खत्री वेगवेगळे झाले.
(कल्याण भगत)
हा नवा खेळ असल्याने त्याची विश्वासार्हता लोकप्रिय करण्यासाठी रतन खत्रीने त्याकाळी अनोखी मार्केटिंग स्ट्रॅटिजी वापरली. पत्त्यांच्या कॅटमधून राजा, राणी, गुलाम असे पत्ते वेगळे काढून उरलेले पत्ते पिसून एका मटक्यात टाकले जायचे. त्यातले पहिले दोन पत्ते हे लोकं काढायची आणि तिसरा पत्ता स्वत: खत्री काढायचा....
कल्याण भगत आणि रतन खत्री वेगवेगळे झाले…
पाकिस्तानातील कराची येथून फाळणीनंतर मुंबईत स्थलांतर केलेला एक सिंधी तरुण. छोटे-मोठे उद्योग करता-करता मुंबईत ‘मटका किंग’ बनला. रतन खत्री याच्या मटक्याला ‘मेन बाजार’ म्हणून ओळख होती. पोलिस आणि समाजाच्या नजरेत ‘गुन्हेगार’ असलेला रतन खत्री मात्र कष्टकरी जनतेमध्ये खूपच विश्वास कमावून होता. सकाळी सहा वाजता मटक्यावर पैसे लावणाऱ्या खेळाडूंची गर्दी धंद्यावर होत असे ती त्यामुळेच. साधारण सकाळी नऊ वाजता पहिला ‘आकडा’ जाहीर होत असे, याला मटक्याच्या भाषेत ‘ओपन’ म्हणून संबोधत. त्या काळात फोनव्यतिरिक्त कोणतीही आधुनिक सुविधा नसतानादेखील ही ‘खबर’ जाहीर झाल्या झाल्या, अक्षरश: काही सेकंदांत सगळ्या धंद्यावर पोहोचत असे.
अगदी परदेशातसुद्धा...! आणि ताबडतोब त्याची वाटणीदेखील होत असे. त्यानंतर पुन्हा रात्री बाराच्या सुमारास ‘क्लोज’चा आकडा काढला जाई. रतन खत्रीचा आकडा सर्वात जास्त विश्वसनीय आहे असे मत तयार झाले. आकडा काढण्यासाठी खत्री कोणाकडूनही पत्ते काढून घ्यायचा. काळबादेवीच्या परिसरात किंवा दक्षिण मुंबईतील जिमखान्यात एजंटसमोर आकडा काढला जायचा. हा आकडा काढायचा मान रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही माणसाला, वेटरला, भिखाऱ्याला मिळायचा. त्यामुळे रतन खत्री च्या 'मुंबई मेन' चा बोलबाला वाढत गेला.
"रायटर' मटक्याचा आकडा हा कस्टमरला एक दोन इंची कागदाच्या चिटोऱ्यावर लिहून द्यायचा. ह्या एक दोन इंचाच्या चिटोऱ्यात इतका विश्वास भरलेला असायचा की जगातल्या कोणत्याही विश्वासाला तोडून टाकेल. कोणत्याही भागीदारी व्यवसायात जेवढी जोखीम तेवढीच जोखीम, कोणतेही कायदेशीर मान्यता नसलेला तो चिटोरा द्यायचा. त्यातून फक्त जो कोणी सेवा देत आहे त्याचे कमिशन वगळून, रतन खत्रीने हा विश्वास जास्त मिळवला, त्याचीही कारणे होती. जुन्या लोकांच्या सांगण्यावरून रतन खत्रीला गरिबांनी पैसे जिंकावे असे वाटायचे. बहुतेक ग्राहक श्रमिक मजूर असायचे ते कोकणातले, उत्तर भारतातले, झोपडपट्टीत राहणारे असायचे.
त्यामुळे सणावाराला त्यांना खुश करण्यासाठी "लकी नव्वा', "लकी मेंढी' हे आकडे नेहमी नक्की निघायचे. कॅलेंडरमध्ये असणारे शुभ दिनांकचे गणितही सणावाराला जमून येत असल्यामुळे हा वर्ग खुश व्हायचा. निदान त्या एका दिवशी चांदी होत असल्यामुळे ते पण खुश. तो रतन खत्रीच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता हे कोणाला कळून यायचे नाही. मग कपडा खात्यात, चाळीत, झोपडपट्टीत अरे 'ते' लखपती झाल्याच्या बातम्या यायच्या पण नक्की 'ते' कोण हे कधी कळायचे नाही. घरदार, दागिने विकलेले मात्र लोकांना लगेच दिसून यायचे , यातून पुढे काय काय होत असेल हे तुम्हाला माहीतच आहे.
कल्याण भगतपेक्षा रतन खत्रीचे प्रस्थ का वाढत गेले?
तिसऱ्या जगात रतन खत्रीचं प्रस्थ वाढत होते. तो सेलिब्रिटी झाला होता, त्याला भेटायला लोक लांबून लांबून यायचे. त्यातले बरेचशे 'सिंडिकेट' असायचे, म्हणजे एजंट. त्यांना त्यादिवशी आकडा कसा काढतात हे बघायला मिळायचे. नेमक्या कोणत्यातरी दिवशी त्या सिंडिकेटच्या गाडीचा नंबर आणि मटक्याच्या आकड्याचा नंबर सेम आला, कधी खत्रीने नवीन घेतलेल्या गाडीचा नंबर सेम आल्याच्या घटना घडल्या आणि लोक आता त्याच मागावर राहायला लागले.
रतन खत्रीकडे आलेल्या पाहुण्यांच्या गाडीचा नंबर काय आहे, खत्रीने कोणत्या रंगाचे कपडे घातले, तो रंग कोणत्या आकड्याशी जुळतो, खत्री आज कितीला उठला, खत्रीच्या घरात आज किती माणसे आहेत वैगेरे वैगेरे अशा टीप टिपर सांगायला लागले. त्यांना ह्या टीपसाठी पैसेही मिळायला लागले.
खत्रीच्या आजूबाजूला आकड्यांची असणारी मांडणी आणि त्यातून येणारी संभाव्यता याचे कधीतरीच जुळणारे गणित लावले जायचे. काही खास लोकांच्या सांगण्यावरून, 'जे लोक ह्या आकड्यात गणित लावत बसतात त्यांना केवळ ह्या दुनियेत रमायचे असते. ह्या आकड्यांच्या स्वप्नात रमायचे असते. त्यांना उघड्या डोळ्यासमोर माणसे नाहीतर आकडे दिसायचे. ह्यातच दिवस ढकलायचा असतो. सकाळी पहिल्यांदा बघितलेली रिक्षा टॅक्सी त्यांचा नंबर, शाळेत जाणाऱ्या मुलाचा शाळेतला रोल नंबर असे विविध मार्ग ते काढायचे. हे सर्व आपल्या मनाचे समाधान करायला. रतन तीन पत्ते उघडे टाकायचा त्यात कोणतेच गणित नव्हते. पण त्याकाळी पेपरमध्ये कोणता आकडा कधी येणार याची भाकिते पानभर लेखात मांडलेली असल्याची. कधी अख्खा पेपर त्यावर असायचा. लोक आकड्यात व्यस्त असायची. रतन मात्र ओपनची तीन आकडी संख्या, क्लोजची तीन आकडी संख्या एवढाच विचार करायचा. दिवसातले हे दोन्ही आकडे सेम काढण्याऱ्याला जॅकपॉट मिळायचा. एखाद दुसऱ्याला मिळाला असेल, पण रतनचा जॅकपॉट रोजच ठरलेला असायचा. रोजची कमाई आभाळाशी झटत होती.'

चोवीस तास आकड्यांच्या स्वप्नात रमणारे…
आता असा काळ आला की कोणत्याही एरियात 'रतन' वा 'खत्री' टोपणनावाचे कोणतरी असतच. बॉलिवूडच्या सिनेमातही रतन खत्री नावाचे पात्र असत, एवढी भुरळ पडली होती या नावाने. खत्रीची उठबस ही असे बॉलिवूडच्या लोकांच्यात. तो आडून सिनेमात पैसे ही लावी. 'रतन रंगीला' सिनेमा त्याने निर्मिलेला होता. अनेकांना तो रेसकोर्सवर ही दिसे. पण स्पर्धक भगत घराण्यापेक्षा रतन खत्रीची राहणी साधी होती. जास्त बडेजाव मिरवत नसे.
नव्वदच्या दशकात एक मोठी 'मांडवली' झाली, नेमकं काय झाले ते कोणाला माहीत नाही त्यात राजकीय सत्तेतील लोकही होते असे म्हटले जाते. मोठ्या रकमेवर रतन खत्रीचा 'मुंबई मेन' चा धंदा खालसा करून दुसऱ्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्याला पैसे मिळाले आणि खरा रतन खत्री त्यावेळी संपला. लोकांना नंतर तो दिसायचा पण जोवर सत्ता असते तोवर लोक सलाम करतात नंतर नाही, खत्रीचे तेच झाले.
रतन खत्रीने अशीच स्वप्ने दाखवली, खोटी. त्याच्या दर्यादिलीने एक दोन दसऱ्या पोळ्याला सुखायचे. पण त्याने धंद्यात चिटिंग केली नाही असे जवळपास सगळेच बोलतात. आता हेच आकडे कम्प्युटरवर येतात, कोणत्या आकड्याला पब्लिक मधून लोड आहे हे कळते. त्यामुळे तो आकडा येत नाही, डुबणारेच जास्त असतात.
अगदी कालपरवापर्यंत मुंबईतील काही वर्तमानपत्रांमधून शुभांक म्हणून हे आकडे जाहीर होत. या धंद्यातून मिळणारे उत्पन्न शासनाच्या तिजोरीमध्ये जात नसे, म्हणून शासनाने स्वत:ची अधिकृत लॉटरी सुरू केली. आज या धंद्यात रतन खत्रीचा पूर्वीइतका दबदबा आणि सहभागही राहिलेला नाही. बंद झालेला नसला तरीही मटकासुद्धा फारसा चर्चेत नाही. मात्र, आता कष्टकर्यांच्या मटक्याची जागा उच्चभ्रूंच्या बेटिंगने घेतली आहे. सरकारचा कर भरतो म्हणून कायदेशीर लॉटरी मागेही 'मटक्याचीच' आयडिया होती. म्हणजे त्यात कायदेशीर जोखीम, सरकारी करासह. मग आले 'लोटो' चे नंबर... अशा भरपूर आयडिया निघत राहिल्या. कारण ह्या व्यवस्थेत सरळमार्गाने कोणाचीच स्वप्ने पूर्ण होणार नाही. मग अशी सोपी साधने येत राहतील स्वप्ने चेतवायला, अमर होऊन...






