संजना खंडारे
- नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं.
- नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती.
- ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.
"पाणी येतंय... पाणी आलं...!"
एक सहा वर्षांची मुलगी आनंदाने ओरडली आणि क्षणार्धात सादरी पाड्यावर जल्लोष उसळला. लहान मुलं नळाखाली धावत गेली. काहींनी पाण्यात उड्या मारल्या, तर काही जण पुन्हा पुन्हा नळ उघडून-बंद करत त्यातून खरंच पाणी येतंय का, हे पाहत होते. महिलांनी हंडे-कळशा घेऊन नळाभोवती गर्दी केली. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर पाईपमधून बाहेर पडणारा तो पहिला पाण्याचा फवारा पाहताना अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं.
'स्वदेस' चित्रपटात गावात पहिल्यांदा वीज आल्यावर जसा आनंद त्या लोकांना होतो, तसाच काहीसा प्रसंग नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम सादरी पाड्यावर नुकताच घडला. फरक एवढाच की, तिथे वीज आली होती आणि इथे पहिल्यांदाच नळाला पाणी. आजवर पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांना, मुलींना आणि कधी कधी लहान मुलांनाही डोंगरदऱ्या उतरून नर्मदेच्या काठापर्यंत जावं लागायचं. उन्हातान्हात डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन परत चढावं लागायचं. आता मात्र त्याच पाड्यावर नळाची तोटी फिरवताच पाणी वाहू लागलंय.
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही जिथे पाण्याचा एक हंडा मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत होता, त्या सादरी पाड्यावर अखेर नळाचं पाणी पोहोचलं. मात्र हे पाणी सरकारी योजनेतून नाही, तर ग्रामस्थांच्या श्रमदानातून आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नांतून आलं. या बदलामागची कहाणी नेमकी काय आहे ? याचा आढावा ‘बाईमाणूस’च्या या विशेष ग्राऊंड रिपोर्ट मधून बघणार आहोत.
(17 मे ला अखेर सादरी गावात नळाद्वारे पाणी पोहचलं)
नर्मदेच्या काठावरचं तहानलेलं गाव
सादरी हे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं एक दुर्गम आदिवासी गाव. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं असूनही पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला. गावातील दोन पाड्यांमध्ये मिळून सुमारे ६० ते ७० कुटुंबं राहतात. दोन्ही गावांची लोकसंख्या ३५०-४०० च्या आसपास आहे. रस्ता, मोबाईल नेटवर्क, आरोग्य सुविधा आणि शासकीय यंत्रणेचा नियमित संपर्क अशा मूलभूत गोष्टींचा अभाव आजही या भागात जाणवतो. पावसाळ्यात डोंगरातील झरे वाहतात. मात्र हिवाळा सुरू होताच हे झरे आटू लागतात. उन्हाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होते. महिलांना आणि मुलींना डोंगरदऱ्या उतरून नर्मदेच्या काठावर जाऊन पाणी आणावं लागतं. काही कुटुंबांकडे गाढवं असल्यास त्यांच्यावर पाणी वाहून आणलं जातं, तर अनेकांना दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करत डोक्यावर हंडे घेऊन परत यावं लागतं.
याच भागामध्ये यंग फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून काम करतंय. या फाऊंडेशनच्या माध्यमातूनच सादरी गावात नळाद्वारे पाणी पोहचणं शक्य झालं. या फाउंडेशनचे संस्थापक संदीप देवरे यांच्याशी बाईमाणूसने संवाद साधल्यावर ते सांगतात, "सातपुड्याच्या भागात आजही अनेक आदिवासी पाड्यावर पाणी आणण्यासाठी महिलांबरोबर लहान मुलींनाही जावं लागतं. अनेकदा घरात मोठं कोणी नसेल तर लहान मुलंही पाण्यासाठी दरीत उतरतात. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेवर थेट परिणाम होतो."
मग सरकारी योजना कुठे अडकल्या?
सादरी आणि नंदुरबार भागातील इतर आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याची समस्या नवी नाही. मात्र प्रश्न असा आहे की, स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही आणि जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजना सुरू असतानाही या भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था का झाली नाही? यंग फाउंडेशनचे संदीप देवरे सांगतात की, "या भागात स्वतंत्र ग्रामपंचायती केवळ दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्या. त्याआधी सादरी, उडद्या, भादर, कोंढ्या, पलाई, दापी यांसारखी गावं ३० ते ३५ किलोमीटर दूर असलेल्या समूह ग्रामपंचायतींना जोडलेली होती. त्यामुळे स्थानिक प्रश्नांकडे लक्ष देणारी यंत्रणाच प्रभावीपणे उभी राहिली नाही."
संदीप देवरे यांच्या मते, समस्येचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारी यंत्रणेची अनुपस्थिती. "ग्रामसेवक सहा-सहा महिने गावात येत नाहीत. तलाठी वर्षानुवर्षे फिरकत नाहीत. कृषी सहाय्यक, इतर अधिकारी यांचाही संपर्क क्वचितच होतो. त्यामुळे एखादा हँडपंप बंद पडला, तर तो दुरुस्त करण्यासाठी कोणाकडे तक्रार करायची हेही ग्रामस्थांना माहीत नसतं," असं ते सांगतात.
या भागातील रस्त्यांचाही मोठा प्रश्न आहे. अनेक पाड्यांपर्यंत वाहन पोहोचत नसल्याने हँडपंप खोदण्याच्या कामातही विचित्र वास्तव दिसून येतं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, "अनेकदा हँडपंप किंवा बोअरवेल गावात न करता रस्त्यालगतच उभारले जातात, कारण यंत्रसामग्री पाड्यांपर्यंत नेणं कठीण असतं. परिणामी, पाड्यात राहणाऱ्या लोकांना पाण्यासाठी पुन्हा अनेक किलोमीटर चालत जावं लागतं." पाणी, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासन या सर्वच पातळ्यांवर दुर्लक्षित राहिलेल्या या भागात सरकारी योजनांचे फलक दिसतात; मात्र प्रत्यक्षात नळातून पाणी येत नसल्याचं वास्तव आजही अनेक पाड्यांमध्ये कायम आहे.
(शासनाच्या योजनेतून नाही तर श्रमदानातून लोकांनी गावापर्यंत पाणी पोहचवलं)
दोन महिन्यांची धडपड आणि नर्मदेतून आलेलं पाणी
सादरी पाड्यावर पाणी पोहोचवण्याचा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता. पाण्याची टंचाई गंभीर होत चालली होती. पावसाळ्यानंतर आटणारे झरे, बंद पडलेले हँडपंप आणि दिवसेंदिवस वाढणारा पाण्यासाठीचा संघर्ष पाहता यंग फाउंडेशनच्या टीमने गावकऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. सुरुवातीला पाड्याजवळच पाण्याचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पाड्याजवळील एका ठिकाणी छोटी विहीर खोदण्यात आली. एका पाड्यात त्या विहिरीला काही प्रमाणात पाणी लागलं. तिथे सोलर पंप आणि पाईपच्या साहाय्याने पाणी टाकीपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र दुसऱ्या पाड्यात विहीर खोदूनही पाणी लागलं नाही. जे थोडंफार पाणी मिळालं होतं, तेही काही दिवसांत आटलं. त्यामुळे या पाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधणं गरजेचं बनलं.
यानंतर गावकऱ्यांसोबत चर्चा करून नर्मदा नदीतून थेट पाणी उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. नदी गावाच्या जवळ असली तरी ती पाड्याच्या खूप खालच्या बाजूला आहे. पाडा डोंगराच्या उंच कड्यावर वसलेला असल्याने नदीचं पाणी वर चढवणं हे मोठं आव्हान होतं. मात्र दुसरा कोणताही पर्याय नसल्याने सोलर पंपाच्या माध्यमातून नदीतून पाणी उचलण्याचं नियोजन करण्यात आलं. यासाठी सर्वप्रथम सोलर पंप, सोलर प्लेट, पाईप, पाण्याची टाकी आणि इतर साहित्य गोळा करण्यात आलं. आर्थिक मदतीची जबाबदारी DJED फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी स्वीकारली. मात्र साहित्य खरेदी करणं हेच पुरेसं नव्हतं. खरा संघर्ष ते साहित्य पाड्यापर्यंत पोहोचवण्यात होता.
धडगावहून सोलर पंप आणि इतर साहित्य वाहनाने आणण्यात आलं. त्यानंतर ते भुषा परिसरापर्यंत पोहोचवून नावेत चढवण्यात आलं. पुढचा प्रवास प्रवास नदीमार्गे करावा लागला. पाण्याच्या टाक्या, शेकडो मीटर लांबीचे पाईप, सोलर प्लेट्स आणि पंप नदीतून वाहून नेण्यात आले. त्यानंतर नदीकिनाऱ्यावरून डोंगर चढत हे साहित्य पाड्यापर्यंत पोहोचवावं लागलं. गावकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान केलं. काहींनी पाईप खांद्यावर घेतले, काहींनी पाण्याच्या टाक्या लाकडांना बांधून खांद्यावर वाहून नेल्या. अनेकदा २५ ते ३० जणांची टीम दिवसभर फक्त साहित्य ने-आण करण्याचं काम करत होती. रस्ता नसल्यामुळे वाहनांची कोणतीही मदत मिळू शकत नव्हती. त्यामुळे प्रत्येक वस्तू मानवी श्रमांच्या बळावरच पाड्यापर्यंत पोहोचवावी लागत होती.
काम सुरू असताना अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला एका डोंगरावरील झऱ्यापर्यंत पाईप टाकण्यात आला होता. मात्र तिथे पुरेसं पाणी मिळालं नाही. त्यामुळे आधी टाकलेली संपूर्ण पाईपलाईन पुन्हा उचलून दुसऱ्या दिशेने नदीकडे नेण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामध्ये दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ गेला. जवळपास दहा ते बारा जणांनी दोन दिवस मेहनत करून पुन्हा संपूर्ण पाईपलाईन टाकली. सोलर पंप बसवण्यासाठी आलेल्या तंत्रज्ञांनाही पाड्यावर मुक्काम करावा लागला. छोट्या-मोठ्या तांत्रिक अडचणी वारंवार समोर येत होत्या. एखादी वायर, नट किंवा इतर किरकोळ साहित्य कमी पडलं तरी ते आणण्यासाठी धडगावपर्यंत फेरी मारावी लागत होती. एका फेरीसाठी सहा ते सात तास सहज खर्च होत होते. काही वेळा तर फक्त छोटासा भाग आणण्यासाठी ८० किलोमीटरचा प्रवास करावा लागला.
अखेर नदीकिनारी सोलर पंप उभारण्यात आला. तिथून पाईपच्या साहाय्याने पाणी डोंगरावरील पाण्याच्या टाकीपर्यंत नेण्यात आलं. त्या टाकीला नळ जोडण्यात आले. जवळपास दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर सादरी पाड्यावरील लोक पहिल्यांदाच नळातून पाणी येण्याची वाट पाहत उभे होते.
(गावातील तरुण ज्यांनी गावात पाणी आणण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली.)
आणि अखेर पाईपमधून बाहेर पडला पहिला पाण्याचा फवारा...
दोन महिन्यांची धावपळ, श्रमदान, साहित्याची ने-आण आणि तांत्रिक अडचणींनंतर अखेर तो दिवस उजाडला. सोलर पंप बसवून झाला होता. पाईपलाईन टाकून झाली होती. पाण्याची टाकीही तयार होती. आता फक्त पंप सुरू करून पाणी वर येण्याची वाट पाहायची होती.
तारीख होती १८ मे त्या दिवशी दिवशी संपूर्ण पाडा एका ठिकाणी जमला होता. लहान मुलं, महिला, वृद्ध, तरुण सगळ्यांच्या नजरा पाण्याच्या टाकीकडे आणि नळाकडे लागल्या होत्या. अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच अशी पाणीपुरवठा व्यवस्था उभी राहताना पाहिली होती. त्यामुळे उत्सुकता, आशा आणि थोडीशी भीतीही सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सोलर पंप सुरू करण्यात आला. मात्र काही मिनिटं झाली तरी पाणी वर चढत नव्हतं. लोकांच्या चेहऱ्यावरील उत्साह हळूहळू कमी होऊ लागला.
"एवढी मेहनत करूनही पाणी आलं नाही तर?" हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. काही वेळाने निराशा पसरू लागली. इतक्यात गावातील काही जण पुढे आले. त्यांनी ज्वारी, नारळ आणि अगरबत्ती आणली. त्यांच्या मते, नर्मदा नदीचं पाणी आपण गावात आणतोय, त्यामुळे नदीची पूजा करणं गरजेचं आहे. त्यांनी नदीमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करत पूजा सुरू केली. आदिवासी समाजातील निसर्गाबद्दलची कृतज्ञता आणि श्रद्धा त्या क्षणी प्रकर्षाने जाणवत होती. दरम्यान, सोलर पंप बसवणारी टीम आणि काही स्थानिक युवक तांत्रिक बिघाड शोधत होते. तपासणी केल्यानंतर सोलर प्लेटला जोडलेल्या केबलमध्ये समस्या असल्याचं लक्षात आलं. वायरिंग दुरुस्त करण्यात आलं आणि पुन्हा एकदा पंप सुरू करण्यात आला.
काही क्षणांसाठी सगळीकडे शांतता पसरली. आणि अचानक पाईपमधून जोरदार फवाऱ्यासह पाणी बाहेर आलं. क्षणभर कुणालाच विश्वास बसला नाही. पण पुढच्याच क्षणी सादरी पाड्यावर आनंदाचा एकच जल्लोष उसळला. लहान मुलं ओरडत नळाखाली धावत गेली. काही जण पाण्यात उड्या मारू लागले. महिलांनी हंडे आणि कळशा घेऊन नळाभोवती गर्दी केली. अनेक जण पुन्हा पुन्हा नळ उघडून-बंद करत होते. जणू हे स्वप्न नाही ना, याची खात्री करून घेत होते.
यंग फाउंडेशनचे संदीप देवरे पुढे सांगतात, "तो क्षण पाहताना मला 'स्वदेस' चित्रपटातील गावात वीज आल्याचा प्रसंग आठवत होता. फरक एवढाच होता की तिथे बल्ब पेटले होते आणि इथे नळातून पाणी वाहत होतं. पण लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद तितकाच मोठा होता." त्या दिवशी सादरी पाड्यावर फक्त पाणी आलं नव्हतं; अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली होती. महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा भार थोडा हलका झाला होता. मुलांच्या शिक्षणासाठीचा वेळ वाढणार होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पाण्यासाठीचा रोजचा संघर्ष काही प्रमाणात तरी कमी होणार होता. संदीप देवरे यांना मात्र त्या दिवसातील आणखी एक गोष्ट विशेष आठवते. "पाणी सुरू होण्यापूर्वी गावकऱ्यांनी नदीची पूजा केली. आपण निसर्गाकडून काही घेतोय, तर त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं, ही भावना त्यांच्यात आहे. तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता," असं ते सांगतात.
(नदीतून बोटीद्वारे साहित्य गावात पोहचवलं गेलं...)
सातपुड्यात शिक्षणाची ज्योत जपणारी यंग फाउंडेशन
सादरी पाड्यावर पाणी पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी यंग फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सातपुडा परिसरातील आदिवासी समुदायांसोबत काम करत आहे. पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, आरोग्य आणि क्रीडा यांसोबतच शिक्षण हा संस्थेच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे.सातपुड्यातील अनेक दुर्गम पाड्यांमध्ये शाळा नसल्याने किंवा शाळा दूर असल्याने अनेक मुलांचं शिक्षण अर्धवट राहत असल्याचं संस्थेच्या निदर्शनास आलं. या पार्श्वभूमीवर यंग फाउंडेशनने स्थानिक मुलांसाठी शाळा सुरू केली. सध्या या शाळेत सुमारे २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला.
संस्थापक संदीप देवरे सांगतात, "शिक्षण आणि पाणी हे एकमेकांशी जोडलेले प्रश्न आहेत. पाण्यासाठी दररोज अनेक तास खर्च करणाऱ्या मुली आणि महिलांवर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे शिक्षणाची संधी वाढवायची असेल, तर पाणी, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांवरही काम करणं आवश्यक ठरतं. सादरी पाड्यावरील पाणी योजना आणि शिक्षणासाठीचे प्रयत्न हे त्याच व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे." असे ते सांगतात.
दुर्गम भागांतील विकासासाठी काम करणारी DJED फाउंडेशन
सादरी पाड्यावर नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या DJED फाउंडेशनने गेल्या काही वर्षांपासून आदिवासी आणि ग्रामीण भागांमध्ये विविध विकासकामांना पाठबळ दिलं आहे. फाउंडेशनचे प्रतिनिधी दिलीप जैन सांगतात की, "संस्थेचं मुख्य काम पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, वृक्षारोपण, प्लास्टिक पुनर्वापर, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये आहे. विशेषतः दुर्गम आदिवासी भागांमध्ये शाश्वत विकासाच्या उपक्रमांवर संस्था भर देते.
(नर्मदा नदीवर सोलार बसवताना सोलार टीम आणि गावकरी)
DJED चे संस्थापक दिलीप जैन यांनीच पाच लाखांची आर्थिक मदत या सादरी गावाला केली त्याच मदतीतून गावात पाणी पोहचलं. त्यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितले, "नंदुरबारमधील सातपुडा परिसरात काम करणाऱ्या यंग फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना सादरी आणि आसपासच्या पाड्यांमधील पाणीटंचाईची माहिती मिळाली. सुरुवातीला मी या भागातील परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटी दिल्या. अनेक वर्षे पाण्याअभावी ग्रामस्थांना होणारा त्रास पाहिल्यानंतर या समस्येवर काम करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांचा सहभाग आणि स्थानिक पातळीवर काम करण्याची तयारी पाहून संस्थेने या प्रकल्पासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. दुर्गम भागांमध्ये अनेकदा समस्या सोडवण्यापेक्षा त्या ठिकाणी पोहोचणं हेच मोठं आव्हान असतं. मात्र स्थानिक लोकांचा सहभाग असेल तर कमी साधनसामग्रीतही मोठे बदल घडवून आणता येतात. सादरी पाड्यावरील पाणी योजना हे त्याचं उदाहरण आहे."
अजूनही अनेक पाडे पाण्याच्या प्रतीक्षेत
सादरी पाड्यावर नळाचं पाणी पोहोचलं असलं, तरी सातपुडा पर्वतरांगेतील पाणीटंचाईचा प्रश्न अजूनही संपलेला नाही. सादरीसारखे अनेक आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, तर काही ठिकाणी रस्त्यांचा अभाव आहे. अनेक पाड्यांवर आरोग्यसेवा पोहोचत नाहीत, शाळा दूर आहेत आणि शासकीय यंत्रणेशी संपर्कही अत्यंत मर्यादित आहे.
सादरीमध्ये झालेला बदल हा एका गावापुरता मर्यादित नसून, योग्य नियोजन, स्थानिकांचा सहभाग आणि आवश्यक आर्थिक मदत मिळाल्यास दुर्गम भागांतील प्रश्नही सोडवता येतात, याचं उदाहरण आहे. मात्र प्रत्येक गावाला स्वयंसेवी संस्थांची मदत मिळेलच असं नाही. त्यामुळे अशा भागांपर्यंत सरकारी योजना प्रभावीपणे पोहोचणं तितकंच आवश्यक आहे.
जलजीवन मिशनसारख्या योजनांचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचा असला, तरी सातपुड्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये अजूनही या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली दिसत नाही. डोंगराळ भौगोलिक परिस्थिती, अपुरा संपर्क, प्रशासकीय दुर्लक्ष आणि तांत्रिक अडचणी यामुळे अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले आहेत.
(रस्ता नसल्याकारणाने गावकऱ्यांना अशाप्रकारे सामान गावापर्यंत पोहचवावं लागलं.)
ही एका पाड्याची गोष्ट, मात्र अनेक गावांचं वास्तव…
सादरी पाड्याची कहाणी ही केवळ एका गावाची यशोगाथा नाही. ती विकासाच्या आकडेवारीत अनेकदा हरवून जाणाऱ्या दुर्गम आदिवासी वस्त्यांचं वास्तव समोर आणणारी कहाणी आहे. नर्मदा नदीच्या काठावर राहूनही वर्षानुवर्षे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांचं आयुष्य कसं असतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे सादरी. या गावात पाणी आलं ते एखाद्या मोठ्या सरकारी प्रकल्पातून नाही, तर गावकऱ्यांच्या श्रमदानातून, स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून आणि काही व्यक्तींच्या सामाजिक बांधिलकीतून. दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा नळातून पहिल्यांदा पाणी वाहू लागलं, तेव्हा तो केवळ पाण्याचा प्रवाह नव्हता, तो अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचा शेवट होता.
पाण्याचा पहिला फवारा पाहून आनंदाने ओरडणारी ती सहा वर्षांची मुलगी कदाचित या बदलाचं सर्वात प्रभावी प्रतीक ठरते. कारण तिच्यासाठी हा फक्त नळातून आलेला पाण्याचा प्रवाह नव्हता, तर तिच्या पुढच्या आयुष्यातील संघर्ष थोडा कमी होण्याची आशा होती. तिच्या आईसाठी तो रोजच्या डोंगरदऱ्या चढ-उतारातून मिळालेला दिलासा होता. आणि संपूर्ण गावासाठी तो विकासाचा पहिला प्रत्यक्ष अनुभव होता. सातपुड्यातील अनेक पाडे अजूनही अशाच एका क्षणाची वाट पाहत आहेत. जेव्हा कुणीतरी आनंदाने ओरडेल, "पाणी येतंय... पाणी आलं...!" आणि त्या आवाजासोबत अनेक वर्षांची तहान, प्रतीक्षा आणि उपेक्षा वाहून जाईल.






