Skip to main content

साडी, कपाळावर कुंकू आणि भरतनाट्यम नृत्यांगना… कोण आहे ही पाकिस्तानची ७१ वर्षीय ‘शीमा किरमानी’, जिला आजही सरकार घाबरतं…?

Article in Marathi
Mahesh Kumar Munjale
13 May 2026
4 min read
13 views
साडी, कपाळावर कुंकू आणि भरतनाट्यम नृत्यांगना… कोण आहे ही पाकिस्तानची ७१ वर्षीय ‘शीमा किरमानी’, जिला आजही सरकार घाबरतं…?

महेशकुमार मुंजाळे




  • जगप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि पाकिस्तानातील महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या ७१ वर्षांच्या शीमा किरमानी यांना पाकिस्तानी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जगभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.


  • पाकिस्तानमध्ये सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सांस्कृतिक हक्क आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात असते. त्यातूनच कट्टर इस्लामी संघटनांच्या निशाण्यावर शीमा किरमानी या कायम राहिल्या आहेत.


  • लोकांच्या हृदयापर्यंत आपले विचार पोहचण्यासाठी कला हेच एकमेव प्रभावी माध्यम आहे, हे जाणून नृत्य, चित्र आणि कवितांमधून समानतेचे, न्यायाचे संदेश देणाऱ्या शीमा किरमानी यांच्या संघर्षाची कथा खास ‘बाईमाणूस’च्या वाचकांसाठी…





सबंध जगभरात अतिशय व्हायरल झालेलं कोक स्टुडिओचं ‘पसूरी’ हे गाणं आठवतयं… या गाण्याने हे दाखवून दिलं की संगीताला कोणत्याही देश आणि संस्कृतीचे बंधन नसतं… पाकिस्तानी गायक अली सेठ आणि गायिका शाए गिल यांच्या ‘पसूरी’ गाण्याने पाकिस्तानपेक्षा भारतातून अधिक व्ह्युज मिळवले यातच सगळं काही आलं. आपण मात्र या पसूरी गाण्याबद्दल न बोलता गाण्याच्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला साडी नेसून, कपाळावर भलं मोठं कुंकु लावून भरतनाट्यम करताना वारंवार दिसते त्यावर बोलणार आहोत. कोण आहे ही नृत्यांगना जी साडी नेसून पाकिस्तानमध्ये भरतनाट्यम करतेय…?


वयाची एक्काहत्तरी ओलांडलेल्या या पाकिस्तानी महिलेचं नाव आहे, शीमा किरमानी….

जगप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि पाकिस्तानातील महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या एक खंबीर सामाजिक कार्यकर्त्या. 


पाकिस्तानमध्ये सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सांस्कृतिक हक्क आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात असते. त्यातूनच कट्टर इस्लामी संघटनांच्या निशाण्यावर शीमा किरमानी कायम राहिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी  शीमा किरमानी यांना कराचीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. 

पाकिस्तानातील जगप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि महिला हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या शीमा किरमानी यांच्या या घटनेचा चित्रफीत स्वरूपातील प्रसंग समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


“तुम्ही मला अशा प्रकारे ओढू शकत नाही. मी ७१ वर्षांची आहे.”


या घटनेचा चित्रफीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. माहितीनुसार, ७१ वर्षीय शीमा किरमानी या कराची प्रेस क्लबबाहेर “औरत मार्च” या  महिला हक्कांशी संबंधित कार्यक्रमासाठी परवानगी मिळावी यासाठी आंदोलन करत होत्या. त्यावेळी काळ्या गणवेशातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचे चित्रफितीत दिसून आले. या कारवाईदरम्यान त्यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आपल्या खास साडी आणि कपाळावरील बिंदीत दिसणाऱ्या ७५ वर्षीय किरमानी या पोलिसांना म्हणताना ऐकू येतात, “तुम्ही मला अशा प्रकारे ओढू शकत नाही. मी ७१ वर्षांची आहे.”


User Image

या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठली. त्यानंतर संबंधित प्रकरणात गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानातील महिला चळवळी, सार्वजनिक आंदोलनांवरील निर्बंध आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः भारतीय शास्त्रीय नृत्यकलेशी जोडलेल्या कलाकाराला अशा प्रकारे ताब्यात घेतल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला असून सामाजिक माध्यमांवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


पाकिस्तानच्या शीमा किरमानी यांच्या संघर्षाबद्दल जाणून घेणं अत्यावश्यक आहे. पाकिस्तानची प्रतिगामी, बुरसट मानसिकता बदलून त्यात समानतेचे, आदराचे, मानवतेचे बीज रोवणे तितके सोपे नव्हते. नुसतेच भाषणबाजीतून, सेमिनार, परिषदा घेऊन हे साध्य होणार नव्हते. थेट हृदयापर्यंत संदेश गेला, तरच काही फरक पडण्याची शक्यता आहे, अशी जाणीव शीमा किरमानीला झाली होती. लोकांच्या हृदयापर्यंत आपले विचार पोहचण्यासाठी कला हेच एकमेव प्रभावी माध्यम आहे, हेही त्यांनी जाणले होते. मग नृत्य, चित्र आणि कवितांमधून समानतेचे, न्यायाचे संदेश देणे चालू झाले. शीमा किरमानी यांच्या आयुष्याची चित्तरकथा खास ‘बाईमाणूस’च्या वाचकांसाठी…


शीमा किरमानी यांची संघर्ष कथा…


खचाखच भरलेल्या नाट्यगृहाचा पडदा वर जातो. अंधाऱ्या रंगमंचावर हलक्याशा प्रकाशात अंगभर काळी ओढणी गुंडाळलेली, पाठमोरी उभी असलेली स्त्री दिसते. विंगेतून एकामागून एक वेगवेगळ्या पुरुषांचे आवाज येऊ लागतात. "यह एक माँ है’, "यह एक बहेन है’, "यह एक बेटी है’. या अशा प्रत्येक पुरुषी आवाजावर, त्या पाठमोऱ्या स्त्रीच्या अस्वस्थ लयबद्ध हालचालींचा वेग वाढत जातो. शेवटचा एक पुरुषी आवाज येतो, "यह एक बिवी है’. तेवढ्यात ती स्त्री त्या पुरुषाचे वाक्य कापत, अंगाला गुंडाळलेली काळी ओढणी दोन्ही हातानी उंचावत त्वेषाने "मैं एक इन्सान हूं’ असं म्हणते. 


नाट्यगृहात आधीपेक्षा जास्त शांतता पसरते. ती स्त्री हळूहळू वळते आणि प्रेक्षकांकडे आत्मविश्वासाने, तीक्ष्ण नजरेने रोखून पहात, धीरगंभीर आवाजात म्हणते, "मैं एक औरत हूं’. नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. ती कथ्थक नृत्यप्रकारातील विविध मुद्रा करत एका विशिष्ट लयात रंगमंचावर वावरत प्रत्येक शब्दावर जोर देत, काहीशा करुण स्वरात "मैं एक आग्याकारी बिवी. जिसे अपने शौहर की दुसरी बिवियों के साथ मिलजुलकर रहने का हुक्म है’, "शादी मेरी थी, फैसला मेरे बाप का था’ या आणि अशा विविध वाक्यांतून ती एका सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्याचे पदर उलगडत जाते. नाट्य-नृत्य कलाप्रकारांची सांगड घालत एकामागून एक सोडलेले हे दाहक वास्तवाचे वाक्-बाण प्रेक्षकांत बसलेल्या हळव्या मनांना कधी चिरून जातात, कळतही नाहीत. वयाची एक्काहत्तरी ओलांडलेल्या या पाकिस्तानी महिलेचं नाव आहे, शीमा किरमानी….


User Image

शीमा किरमानी, शास्त्रीय नृत्यांगना, नाट्य दिग्दर्शिका, चित्रकार, अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या, शास्त्रीय नृत्य शिक्षिका आणि अजून बऱ्याच काही. हा असा धावता परिचय करवून दिल्यास शीमा किरमानी या नावामागचा संघर्ष, त्यांचं कार्य, त्यांची व्यापकता लक्षात येणं अशक्य आहे. एकविसाव्या शतकात एक कलाकार आणि शिक्षिका बनण्यात, असा एवढा काय संघर्ष त्यांच्या वाट्याला आला असेल, अशी शंका मनात येण्याची शक्यताही आहे. म्हणूनच शीमा किरमानींबद्दल जाणून घेण्याआधी पाकिस्तानची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. शीमा किरमानी यांची अभिव्यक्त होण्याची भाषा असलेल्या नृत्य-नाट्य-गायन म्हणजेच ‘परफॉर्मिंग आर्ट' विषयी पाकिस्तानमध्ये नेमके काय वातावरण आहे, हे  समजून घ्यावं लागेल. 


कव्वाली गायक साबरीसह कलेच्या अनेक उपासकांच्या हत्या


२०१६ ची घटना. आपल्या सुफी गायनाने आणि कव्वालीने जगभरात प्रेम आणि शांतीचा संदेश पोहोचवणाऱ्या अमजद साबरी, यांची कराचीत हत्या करण्यात आली. भर दिवसा गजबजलेल्या रस्त्यावर दोन मोटारसायकलस्वारांनी साबरींच्या कारला ओव्हरटेक करत धडाधड पाच गोळ्या झाडल्या. या घटनेने पाकिस्तान हादरून गेले. पुढच्या अवघ्या तीन तासांत तालिबानपासून वेगळ्या झालेल्या ‘हकिमुल्लाह महसूद' या दहशतवादी गटाने साबरींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. साबरी यांनी आपल्या कव्वालीमधून ‘ईशनिंदा' केली होती, म्हणून आम्ही त्यांची हत्या केली, असा कबुलीनामा संघटनेने जाहीर केला. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान' चित्रपटातील प्रचंड गाजलेली ‘भर दो झोली मेरी' ही कव्वाली अमजद साबरी यांची होती. 


पाकिस्तानी अभिनेत्री मुस्सरत शाहीनची २०१५ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच २०१५ मध्ये मॉडेल-स्टेज डान्सर संगम राणाची हत्या करून शव पंख्याला लटकवलेलं आढळलं. ड्रमवादक इब्राहिम आणि त्याच्या ग्रुपमधील कलाकार सना यांची २०१४ मध्ये रस्त्यातच हत्या झाली. प्रसिद्ध पश्तो गायिका गुलनार आलियास मुस्कानची २०१३ डिसेंबरमध्ये पेशावर शहरात गोळ्या घालून हत्या झाली. २०१३ मध्ये नामांकित गायिका साऐमा नाज हिला तिच्या भावानेच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तिने उपचारादरम्यान प्राण सोडले. २०१२ मध्ये दोन बंदुकधारी मोटारसायकलस्वारांनी नामांकित पश्तो गायिका गझाला जावेद आणि तिच्या वडिलांची हत्या केली. लोकगीत गायिका आणि टीव्ही अभिनेत्री यास्मिन गुल २०१० मध्ये तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली.


User Image

२००९ मध्ये उभरती गायिका आयमान उदासची तिच्या भावानेच अतिशय क्रूरपद्धतीने हत्या केली. २००९ मध्ये प्रसिद्ध नृत्यांगना शबानाला तालिबान्यांनी घरातून फरफटत नेऊन मिंगोरा शहराच्या एका चौकात गोळ्या घालून मारलं. गोळ्यांनी चाळण झालेल्या, रक्ता-मांसाच्या चिखलात पडलेल्या तिच्या शवावर त्यांनी तिचे पैसे, तिच्या डान्स असणाऱ्या सीडीज आणि तिच्या डान्स अल्बममध्ये असणारे फोटोज फेकलेले आढळले. पार्टी सिंगर समिना सिंधूने एका लग्नसोहळ्यात गर्भवती असल्याने उभे राहून गाणे गाण्यास नकार दिल्याने, भर मैफलीत तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावेळी ती सहा महिन्याची गर्भवती होती. 


या अशा कित्येक भयावह घटनांची लांबलचक यादी करता येईल, ज्यात अभिनय, नृत्य, गायन, वादन यांसारख्या कलेच्या उपासकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या सगळ्या मागे पाकिस्तानमधील कलाकारांच्या हत्येमागे कलेच्या बाबत कट्टर इस्लामी विचारधारेतून जन्माला आलेली कटुता कारणीभूत आहे. 


…आणि जनरल झिया-उल-हक यांनी नृत्य-नाटकांवर बंदी आणली


या सगळ्या हत्याकाडांतून कट्टरवादी मुस्लिमांची कलेविषयीची आणि स्त्री-सुरक्षेच्या नावाखाली तिच्यावरचा पुरुषी हक्क अबाधित ठेवण्याची मानसिकता दिसून येते. हा धार्मिक कट्टरतावाद समाजात गटागटाने वावरत होताच, पण याला जेव्हा राजसत्तेची साथ लाभली, तेव्हा पाकिस्तानी कलांवर मोठे संकट आले. १९७६ मध्ये पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सेवा ज्येष्ठतेचे सर्व नियम डावलून जनरल झिया-उल-हक यांना सेनाध्यक्ष बनवले. महत्वाकांक्षी झिया-उल-हकने १९७७ मध्ये भुट्टो सत्ता उलथवून पाकिस्तानमध्ये लष्करी राज्य प्रस्थापित केले, आणि भुट्टोना फाशी दिली. कट्टर इस्लामी विचारांच्या झिया-उल-हकने पाकिस्तानात ‘मार्शल लॉ'  लागू करून हुकुमशाही गाजवायला सुरुवात केली.


आर्ट काउन्सिल आणि नॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स ग्रुपवर बंदी आणली. नृत्यकलेला ‘अन-इस्लामिक' घोषित केले. १९८३ मध्ये शास्त्रीय नृत्यावर बंदी आणली. सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम किंवा नाटक वगैरे सादरीकरण करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र' घेणं बंधनकारक केलं. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलीस परवानगीपत्र आणि स्क्रिप्टच्या सेन्सॉर सर्टिफिकेटसारख्या इतर काही कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक केले. वेगवेगळ्या कार्यालयांच्या, बाबूलोकांच्या हातापाया पडून, त्यांचा छळ सहन करून त्या ‘ना हरकत प्रमाणपत्राचा' कागद मिळवावा लागे. एवढे करूनही त्या कागदावर छापलेली ‘नृत्य, नग्नता, अश्लीलतेस परवानगी नाही; इस्लामी संस्कृतीत बसेल अशीच वेशभूषा करणे बंधनकार आहे. शरीराचे उभार दिसतील एवढे घट्ट कपडे परिधान करू नये. कुठलीही गोष्ट इस्लाम विरोधात जाणार नाही याची दखल घ्यावी.' अशी सूचना वजा तंबी पाळणे बंधनकारक होते. कलाकारांच्या अभिरुचीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अगदी उपजीविकेचा गळा आवळण्याचा हा प्रयत्न होता. म्हणूनच अशा फतव्यांची धास्ती घेऊन पाकिस्तानातील शास्त्रीय नृत्य करणारे कलाकार देश सोडून इतरत्र निघून गेले. 


मात्र त्यावेळी केवळ शीमा किरमानी ही एक स्त्री व्यवस्थेच्या विरोधात आपली नृत्यकला जोपासत उभी राहिली. हे त्या काळचं सर्वात मोठं धाडस होतं. शीमा त्यावेळी साधारण ३२ वर्षांच्या होत्या.


शीमा किरमानी आणि ‘तेहरिक-ए-निस्वाँ' म्हणजेच स्त्रियांची चळवळ


बुरसट विचारांच्या झिया-उल-हकने इतरही काही जाचक कायदे काढले, ज्यांत स्त्री-स्वातंत्र्याची, लैंगिकतेची, तिच्या नैतिकतेची गळचेपी होऊ लागली. स्त्रियांच्या वेशभूषेवर, त्यांच्या चालण्या-बोलण्यावर, त्यांच्या लैंगिकतेवर आणि त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी वावरावर प्रशासनाच्या नियमावल्या बंधनकारक ठरू लागल्या. धर्माच्या नावाखाली ‘हदुद अध्यादेश', ‘किसास', ‘कियात' आणि ‘ईशनिंदा' असे कायदे बनवले गेले, आणि स्त्रित्वाला, मानवतेला बंदी बनवलं गेलं. या कायद्यान्वये बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी किमान चार पुरुष साक्षीदार असणे बंधनकारक केले गेले. एक महिला अर्ध्या पुरुषाच्या बरोबरीची आहे त्यामुळे चार पुरुषांऐवजी चार महिला साक्षीदार ग्राह्य धरल्या जाणार नाहीत असा नियम बनवला गेला. चौकशी दरम्यान बलात्कार पिडीतेच्या साक्षीला महत्व उरले नाही. अनेक ठिकाणी हदूद कायद्यानुसार बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेवरच व्यभिचाराचा गुन्हा नोंदवला गेला.


User Image

व्यभिचाराची शिक्षा म्हणून थेट फाशीची तरतूद करण्यात आली. असे कायदे केल्यास कोणती स्त्री स्वतःवर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार दाखल करण्याचे धाडस करेल? ‘मार्शल लॉ', ‘हदुद अध्यादेश', ‘किसास', ‘कियात' आणि ‘ईशनिंदा' अशा विविध जाचक कायद्यांनी पाकिस्तानची हवा कोंदट, कट्टरवादी विचारांनी प्रदूषित झाली. स्त्रीला स्त्री म्हणून जन्म मिळणे शीमा किरमानी यांनी १९७९ मध्ये ‘तेहरिक-ए-निस्वाँ' (‘स्त्रियांची चळवळ')  एनजीओ अर्थात स्वयंसेवी संस्था सुरू केली. या चळवळीअंतर्गत १९८० मध्ये कराची शहरात पहिली महिलांची परिषद भरवण्यात आली. या परिषदेत वेगवेगळ्या वर्गांतील स्त्रियांनी उपस्थिती दर्शविली होती. मुख्यतः कामगार वर्गातील स्त्रियांचा सहभाग जास्त होता.


"तेहरिक'ने सुरुवातीला व्हायोलन्स ऑन वूमन्स आणि ‘चद्दर और चार-दिवारी' अशा विषयांना घेऊन सेमिनार व वर्कशॉप घेतले. संस्थेच्या हेही लक्षात आले की, मुख्यतः पुरुषांचे आणि सोबतीने स्त्रियांचेही स्त्री-पुरुष समानतेबद्दल प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्याच वेळी स्त्रिया आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक भेदभावाला कशा सामोरे जात आहेत, हे समाजाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पटवून द्यावं लागणार हे संस्थेला जाणवलं. वर्षानुवर्षांची प्रतिगामी, बुरसट मानसिकता बदलून त्यात समानतेचे, आदराचे, मानवतेचे बीज रोवणे तितके सोपे नव्हते. नुसतेच भाषणबाजीतून, सेमिनार, परिषदा घेऊन हे साध्य होणार नव्हते. थेट हृदयापर्यंत संदेश गेला, तरच काही फरक पडण्याची शक्यता आहे, अशी जाणीव शीमा किरमानी आणि त्यांच्या साथीदारांना झाली होती. लोकांच्या हृदयापर्यंत आपले विचार पोहचण्यासाठी कला हेच एकमेव प्रभावी माध्यम आहे, हेही त्यांनी जाणले होते. मग चित्र आणि कवितांमधून समानतेचे, न्यायाचे संदेश देणे चालू झाले. त्यातही शीमा किरमाणी यांना नृत्याविषयीचे प्रेम स्वस्थ बसू देईना. म्हणून त्यांनी नाटक आणि नृत्य या दोहोंचा मिलाप करून आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याची शक्कल लढविली.


नृत्याला बंदी असल्याने नृत्याचा उल्लेख न करता प्रबोधनात्मक नाटकांच्या नावाने ‘ना हरकत प्रमाणपत्र' मिळविले जाई. या सर्वावर बोलताना शीमा किरमानी म्हणतात, 


‘माझे राजकारण माझ्या कलेशी एकनिष्ठ आहे आणि मला वाटते की, कलेविना राजकारण होणे शक्य नाही.' परिणामी, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा महिला आणि इतर पीडित लोकांच्या दुःखांबद्दल स्त्रीवादी आणि राजकीयदृष्ट्या सजग नाटकांचे आयोजन केले जाऊ लागले. १९८१ मध्ये कराचीच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या मध्यमवर्गीय भागात एका शॉपिंग सेंटरमधील सर्व महिला प्रेक्षकांसाठी ‘दर्द के फासले' नावाचे पहिला नाटक सादर करण्यात आले. लवकरच "तेहरिक' ही संस्था पाकिस्तानच्या महिला चळवळीचा सांस्कृतिक घटक बनली. समाजातील पितृसत्ताक दृष्टिकोनातून बाहेर पडण्याच्या लढ्यात संस्थेने मोठे प्रयत्न केले. महिलांचे सामाजिक, कौटुंबिक स्थान, त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य या विषयांवरही संस्था प्रकर्षाने लक्ष देऊ लागली.


शीमा किरमानी आणि भारताचं नातं…


मुळच्या कलकत्याच्या, श्री आणि श्रीमती घनश्याम यांनी कराचीमध्ये संगीत-नृत्याचे शिक्षण देणारे केंद्र स्थापन केले होते. या केंद्रात वयाच्या चौदाव्या वर्षापासून शीमा किरमानींनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवायला सुरवात केली होती. पुढे जाऊन त्यांनी त्याच संस्थेत काम करायला सुरुवात केली होती. जनरल झिया-उल-हकचा विमान अपघातामध्ये मृत्यु झाल्यानंतर १९८८ च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. बराच संघर्ष करून बेनझीर भुट्टो पंतप्रधान बनल्या. पाकिस्तानचे इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. भारतासोबत देखील मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पावलं उचलली गेली. त्यापैकी एक म्हणजे सांस्कृतिक संबंधासाठीची ICCR (Indian Council of Cultural Relations) शिष्यवृत्ती. या शिष्यवृत्तीद्वारे शीमा भारतात आल्या, राजधानी दिल्लीत राहिल्या.


लीला सॅमसन, मायाधर राऊत, अलोका पाणिकर आणि राम मोहन या प्रसिद्ध गुरूंकडून शास्त्रीय नृत्यातील भरतनाट्यम, ओडिसी आणि कथ्थकसारखे नृत्यप्रकार आत्मसात केले. १९८० सालापासून नृत्य शिकवणाऱ्या शीमा यांनी भारतातून आत्मसात केलेले ज्ञान स्वतः पुरते मर्यादित न ठेवता पाकिस्तानमध्ये नृत्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. विविध वयोगटाच्या कित्येक स्त्रिया आणि पुरुषांनाही  नृत्यकला शिकवून आपल्या डान्स ग्रुपमध्ये सामिल करवून घेतले. आजही, पाकिस्तानमधील एखाद्या स्त्रीला नृत्याबद्दल आवड निर्माण होणं, त्यासाठी तिने शीमा यांच्यासारख्या गुरुकडे येऊन नृत्य शिकण्याबद्दलची इच्छा व्यक्त करणं, गुरुने त्या स्त्रीला शिष्य करून घेणं, आणि नृत्य शिकवणं केवळ धाडसी नव्हे क्रांतिकारी कार्य आहे.


‘’मला अशा जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने येत असतात’’


शीमा किरमानी म्हणतात,‘पाकिस्तानमध्ये मतभेद व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे, थेट खून करणे. मला अशा जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने येत असतात.' त्या पुढे त्यांचा अनुभव सांगतात, एकदा त्या आणि त्यांचा नाट्यवृंद कराची विद्यापीठात सादरीकरण करण्यासाठी गेला होता. तेव्हा, ‘स्टेजवर जर कुणी स्त्री-पुरुष जोडपे म्हणून काही सादर करताना दिसले, तर आम्ही त्यांना जीवे मारू' अशी धमकी तेथील काही विद्यार्थ्यांनी दिली होती. इतर वेळी शीमा आणि त्यांचा ग्रुप काही कार्यक्रमानिमित्त सादरीकरणासाठी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जातात, तेव्हा बऱ्याचदा तेथील कर्मचाऱ्यांकडूनच धमक्यांची पत्रे त्यांना मिळत असतात. तुम्ही कट्टरपंथीयांचा, तालिबान्यांचा रोष पत्करलाय, असं कुणी त्यांना जेव्हा म्हणतं तेव्हा, त्या शांतपणे हलकेसे हसून, ‘होय, जर तो रोष नाही पत्करला, तर आमच्या कामाला चळवळ कशी म्हणता येईल ना?' असं म्हणतात. ‘मला हे माहीत आहे की, प्रेक्षकांत एखादा तालिबानी येऊन बसला आणि त्याने एखादा बॉम्ब ठेवला, तर तो फुटून आम्ही सगळे मरून जाऊ, पण त्यासाठीसुद्धा आमची तयारी आहे.


User Image

जेव्हा मी सादरीकरणासाठी तयारी करून बाहेर पडते, तेव्हा माझ्यावर हल्ला करण्यासाठी, मला मारण्यासाठी कुणी आलाय काय, हे सगळीकडे नजर फिरवून पाहते' असं जेव्हा त्या अगदी शांत निर्विकारपणे बोलून जातात तेव्हा आपल्याच अंगावर काटा येतो. अशा बिकट सांस्कृतिक, सामाजिक गरमा-गरमीच्या माहोलात शीमा किरमानी मागील चाळीस वर्षांपासून अविरतपणे शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देत आहेत. जीवे मारण्यासाठी येणारे सततचे धमक्यांचे फोन, मेसेजेस, पत्र सर्व दुर्लक्षित करून त्यांचे ज्ञानदानाचे कार्य चालूच आहे. एकोणिसाव्या शतकात भारतात सावित्रीबाई फुलेंनी समाजाच्या विरोधात उभं राहून स्त्री शिक्षणासाठी जे कार्य केलं, त्याच संघर्षाच्या जातकुळीतून प्रवास करत शीमा त्यांच्या विद्यार्थ्यांकडून नृत्याचे धडे गिरवून घेत आहेत.


आपल्या शेकडो विद्यार्थ्यांना घेऊन शीमा किरमानींनी आजवर चीन, इजिप्त, इंडोनेशिया, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, नेपाळ, बांग्लादेश, भारत, बहरीन, श्रीलंका आणि नेदरलँडसह जगातील अनेक देशांमध्ये सादरीकरण केले आहे. शीमा या १९८९ मधील ड्यूक युनिव्हर्सिटी, नॉर्थ कॅरोलिना येथे झालेल्या प्रतिष्ठित अमेरिकन डान्स फेस्टिव्हलच्या इंटरनॅशनल कोरियोग्राफर वर्कशॉपमध्ये निमंत्रित पहिल्या पाकिस्तानी नर्तकी ठरल्या होत्या. १९९७ मध्ये त्यांना हॅम्बर्ग थिएटर फेस्टिवल आणि १९९९ मध्ये कलकत्ता येथील नंदीकर महोत्सवात निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रेक्षकांमध्ये प्रिन्स ऑफ वेल्स, थायलंडची रानी, ​​पॅलेस्टिनी लीला खालद, बेनझीर भुट्टो आणि जॅकलिन केनेडी ओन्नासिस या दिग्गजांचा समावेश होता.


२००६ मध्ये त्यांना ‘डान्स इन पाकिस्तान' या प्रस्तुतीकरणासाठी सीएनडी पॅरिसने निमंत्रित केले होते. २००७ पर्यंत पाच वर्षांसाठी कराची येथील पाकिस्तान नॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स ग्रुपचे कोरियोग्राफर आणि कलात्मक संचालक म्हणून त्यांनी काम केले. पारंपारिक प्रयोगाद्वारे जगभरातील अनेक पारंपारिक, लोक आणि शास्त्रीय नृत्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि कोरियोग्राफी केली. ‘1000 Peace Women from across the Globe' या विभागात २००५ मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शीमा यांना नामांकित करण्यात आले होते.


‘‘कुराणात नृत्य कलेविरोधात कुठलेच पुरावे सापडत नाहीत’’


देश-विदेशात पाकिस्तानची मान उंचावूनही शीमा किरमाणी देशातील कट्टरपंथी मुस्लिम गटांचा रोष आजही पत्करत आहेत. त्या म्हणतात की, ‘कुराणात नृत्य कलेविरोधात कुठलेच पुरावे सापडत नाहीत. तरीही धर्माच्या ठेकेदारांना नृत्याविषयी नेहमीच आकस राहिला आहे. सुफी संप्रदायातील काही लोकांचे म्हणणे आहे की, नृत्य म्हणजे थेट अल्लाहशी संवाद साधणे. या उलट काही लोकांना नृत्य केवळ अ-मुस्लिम नव्हे, तर ते हिंदू धर्मातून आलेली प्रथा वाटते. म्हणून ते त्याला अधिक तीव्रतेने विरोध करताना दिसतात. पण मला एक समजत नाही संगीत-नृत्याला धर्माच्या कोंदणात कसं बसवू शकतं कुणी? हिंदू नृत्य आणि मुस्लिम नृत्य हा काय प्रकार असेल नेमका? हे ‘हिंदू बॉम्ब आणि मुस्लिम बॉम्ब' म्हणण्यासारखं आहे. बॉम्ब जीव घेताना धर्म पाहून नसतो घेत, तसच मला नृत्याबाबत वाटतं. म्हणूनच त्याला हिंदू नृत्य, मुस्लिम नृत्य असं संबोधायला नको.' नृत्याला विरोध करण्यामागे जसे धार्मिक कारण आहे, तसे जन्मोजन्मी पुरुषसत्ताक पद्धतीत वाढलेली पुरुषी मानसिकता हेदेखील एक कारण आहे. 


User Image

शीमा सांगतात, ‘स्त्रियांना त्याचं शरीर नेहमी लपवून, लपेटून ठेवायला सांगणारी ही संस्कृती आहे. इथे त्यांनी त्यांच्या शरीराचा अभिमान बाळगायचा नसतो. स्वतःच्या शरीराला लपवण्यासाठी इथल्या मुली पाठीत बाक काढून उभ्या राहतात. त्यामुळे त्यांच्या पाठीचा कणा वाकलेला आढळतो. म्हणूनच सर्वात पहिल्यांदा कणा ताठ होण्यासाठी मला त्यांच्याकडून काही व्यायाम करवून घ्यावे लागतात. त्या नंतर नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात होते.' शरीराचा आणि आत्मसन्मानाचा कणा ताठ झालेली स्त्री जेव्हा स्टेजवर उभी राहते, तेव्हाच ती समाजासमोर स्वतःचं महत्व पटवून द्यायला सुरुवात करते. शीमाजी म्हणतात, ‘ती जेव्हा उभी राहते आणि आत्मविश्वासाने म्हणते ‘ही आहे मी, आणि हे माझं शरीर' तेव्हा तिचं हे असं उभं राहणंचं पुरुषी मानसिकतेला असुरक्षित वाटण्यास प्रवृत्त करतं'


Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod

Comments

Comments are currently disabled or loading...