ऐश्वर्य पाटेकर
माणूस शरिराची नग्नता झाकण्यासाठी हरतऱ्हेचे कपडे परिधान करत असतो. तसेच मनावरही नाही म्हटले तरी संस्कृतीच्या दबावाचे तथा सभ्यतेचे कपडे चढवत असतो. शरीर दिसते तसे मन दिसत नाही मन हे व्यक्त होण्यातून कळते. मात्र कविता ही एकमेव गोष्ट अशी आहे की तिच्यापासून कुठलेही सत्य लपून राहत नाही. कविता खोटं बोलू शकत नाही. ती सत्य बोलते अन सत्याबरहुकूम वागण्याचा तंतोतंत प्रयत्न करते.
हे जरी खरं असलं तरी बऱ्याचदा कवी व्यवस्थेच्या दबावातनं करतो काय तर तिला प्रतिमा-प्रतीकांच्या सात्विक सोज्वळ कपड्यात गुंडाळून समोर ठेवतो. कवितेचा आत्मा या साऱ्यात घुसमटून जात असावा. तिला खरी कविता कशी म्हणणार? खऱ्या कवितेसाठी कवीस खरंतर खूप मोठी किंमत मोजावी लागते. ती किंमत मोजण्यासाठी कवीत ती धम्मक असावी लागते. मला वाटतं कवी मिलिंद शिंदे यांच्यातल्या कवीत ती धम्मक आहे. म्हणूनच कवितेच्या मूळ ताकदीचा वापर करत स्त्रीत्वाची भावना बिनधास्तपणे ‘तिरिया’ या आपल्या काव्यसंग्रहातून समोर ठेवली आहे.
ऑफिसला जायचे मी..कॉर्पोरेट
थोडं नीटनेटकं राहावं लागतं
नवरा तयार होताना पहायचा
त्याच्या डोळ्यात चिकित्सा उभी राहायची
मग म्हणाला,
कुणाच्या प्रेमा बिमात पडली नाहीस ना ?
मी विषय वाढवला नाही
पुन्हा काही दिवसांनी तीच चिकित्सा, तोच प्रश्न-
एक दिवस कंटाळून म्हणाले,
पडले की सांगेन..
स्त्रियांच्या मागावर सतत ‘पुरुषी डोळे’ असतात. हेच डोळे तिचा घात करतात. तिला काबूत ठेऊ पाहतात. संशयाच्या हिडीस जाळ्यात कसे गुंडाळू बघतात. मात्र या कवितेतील स्त्री किती खंबीरपणे त्याच्या प्रश्नाला उत्तरते. ही एकमेव नाही अशा कितीतरी स्त्रिया या कवितासंग्रहात आल्या आहेत. एकूण ‘स्त्रीसुक्त’च उभं राहिलं आहे. आपल्याला कवीच्या कवितेचा आवाका लक्षात यावा म्हणून हा एकच तुकडा पुरेसा आहे. असे कितीतरी तुकडे आहे जे विस्तवासारखे कवितेच्या वहीच्या पानापानावर ढणढणताहेत.
ते तुकडे जरा न्याहाळले की लक्षात येते की कवीला आपली भावना मांडताना कुठल्याही प्रतिमा-प्रतीकांचा आधार घ्यावासा वाटत नाही. हेच तर या कवीच्या कवितेचं यश आहे. यामुळे झाले काय की स्त्रीत्वाच्या मूळ रूपातली भावना जशीच्या तशी समोर ठेवली आहे. स्त्रीला मांडताना पुन्हा स्त्री निवेदकाचा सूर या कवितेला कवीने निर्मून या कवितेची ताकद वाढवली आहे. त्यामुळेच ही कविता समकालीन कवितेपेक्षा वेगळी होते; नव्हे डोळ्यात ठसते.
एकदा त्याच्या थोबाडावर म्हणाले
हा तुझा मुलगा नाहीये
तुझ्यापासून झालेला नाहीये
याचा बाप दुसराच आहे
असा मोडला ना जागेवर
समदी उतरली मिजास
सारखं माझा पोरगा माझा पोरगा
काडकन मोडला कंबरात..
पुरुषत्वाच्या कंबरड्यात करकचून लाथ हाणणारी ही भावना संबंध पुरुषांना चपराक आहे. म्हणून या कवितेतील स्त्री निखळ सूड घेणारी आहे का? तर तसे नाही. आजपर्यंत पुरुषाने स्त्रीचे जे काही दमन केलेले आहे त्यातून आलेली ही भावना आहे, मात्र या कवितेत पिडलेल्या नाडलेल्या अनेक स्त्रिया आहे.
इथे मला कवीचं मनोगत सांगावसं वाटतं, कवी म्हणतो, प्रत्येकीची आपली स्वतंत्र व्यथा आहे. कधी बंड आहे, कधी तह आहे. पण त्या प्रत्येकीच्या वागण्यात एक भूमिका, एक अस्पष्ट हुंकार आहे, कुठे बेधडक एल्गार आहे. एक एक करून जसं जमेल तसं या सगळ्या कागदावर उतरून बोलू लागल्या. त्याच्याच कविता झाल्या. यांना मुद्दाम कुठल्या छंदात बांधलं नाही. कारण काही आधीच बांधलेल्या आणि काहींनी पाश तोडलेले. या अशा लाजलेल्या पोळलेल्या, बागडलेल्या, पेटून उठलेल्या दिलदार उद्गारांचा लखोटा म्हणजे या कविता.
या कवितांमधून म्हटलं तर एकाच स्त्रीचं म्हणणं मांडलं आहे, असं वाटू शकतं; मात्र हजारो स्त्रियांचं म्हणणं तुकड्यातुकड्यातून व्यक्त झाले आहे. म्हणूनच ही कविता कोण्या एका स्त्रीची राहत नाही. हीच या कवितेची खासियत आहे. परकाया प्रवेश करत मिलिंद शिंदे जे व्यक्त होतात. त्याने आपण स्तिमित होतो. स्तिमित या अर्थाने की ही भावना पुरुष कसा काय मांडू शकतो? सभ्यतेचे सर्व बुरखे टराटरा फाडून पुरुषाला खुलेआम नागवं करणारी त्याच्या लैंगिक वासनेचा धज्जा उडवणारी, स्त्रीत्वाची टेरिफिक भावना कवितेच्या संदर्भात पहिल्यांदा वाचली. हेही वाटू शकतं. स्त्रीत्वाच्या भावनेवर झालेल्या अन्यायाचा नव्हे बलात्काराच्या विरोधातला हा विद्रोह आहे. स्त्रीच्या कातडीत आरपार रुतलेली पुरुषाची वासनांध नजर अशी काही उलगडून दाखवली आहे की पुन्हा पुरुषाच्याच इज्जतीचा नक्षा पुरेपूर उतरवून ठेवला आहे.
स्त्री-पुरुष समानतेचा ढिढिम कितीही पिटवला गेला असला तरी तरी लैंगिकतेच्या संदर्भात तिलाच सतत वेशीवर उभं केलं गेलंय. ‘सीतेची’ अग्निपरीक्षा हा काय प्रकार होता! स्त्रीची शुद्ध-अशुद्धता ठरवायची; मात्र पुरुषाचा वासनांध वळू मात्र मोकाटच, त्याच्या मुसक्या कधी कुणी आवळल्या नाही. बाईची योनी, तिचे उरोज, तिचे नितंब एवढीच ओळख आहे का तिची? पुरुष कितीही सभ्यतेचा ठेंभा मिरवत असला तरी त्याची नजर यातच रुतून बसते.
ही कविता पुरुषाची ही लबाडी उघडी तर पाडतेच; खणखणीत आवाज करत व्यवस्थेच्याही सणसणीत कानफटात लगावते. नव्हे पुरुषाने त्याच्या आतमध्ये त्याच्याच सोयीनं लैंगिकतेची खोटी संस्कृती पाळलेली आहे. तिलाच नेमका सुरुंग लावण्याचं काम ही कविता करते. म्हणून फार महत्त्वाची.
मिलिंद शिंदे हा कवी ‘तिरिया’च्या रूपाने मराठी काव्यप्रवाहात दाखल झाला आहे. ही कविता आपल्या निराळ्या वैशिष्ट्यांनी वाचकांच्या डोळ्यात ठसेल हे निश्चित. चित्रकार मिलिंद कडणे यांचे मुखपृष्ठ आणि रेखाटणे या संग्रहाचा आशय स्पष्ट करणारे झाले आहेत.
(ऐश्वर्य पाटेकर हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रथितयश लेखक-कवी आहेत.)
तिरिया: काव्यसंग्रह
कवी: मिलिंद शिंदे
प्रकाशक: मैत्री पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठ: मिलिंद कडणे
पृष्ठे: ६९
किंमत: २५० रुपये






