- सुरज पटके
"उस एक घंटे मे वो क्लाइंट नही है, एक इन्सान है। जो दुसरे इन्सान में कुछ ढूंढ रही है, वो दे दो बस।
हम ठेहरे मर्द, औरतो के बारे मे हम क्या ही बताये? और तुम ठहरे एक मर्द औरतो के बारे मे हमसे क्या ही समझोगे? सीधा औरतों से ही पूछ लेना, उन्हे जितना सूनोगे, उतना समझ पाओगे!"
'त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर' या अलीकडेच येऊन गेलेल्या वेब सिरीजमधील दोन ‘जिगोलों’मधला हा संवाद. जिगोलो या विषयावर 'त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर' मालिकेनंतर आता याच विषयावर ‘रंगीन’ नावाची वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. एकंदरीतच साहित्य-चित्रपट आणि वेबसिरीज विश्वात जिगोलो या विषयाला धरून बरचं काही होताना दिसतयं.
पुरुषांचे वेश्यागमन याला कथित समाजमान्यता आहे. पण जसा पुरुषांना स्त्रीचा संग-संभोग हवा वाटतो, तसाच स्त्रीयांनाही पुरुषांचा संग-संभोग हवाहवासा वाटतो. परिस्थितीवशात म्हणा, गरज, आकर्षण, आवड, इच्छा काहीही म्हणा, पण यातूनच स्त्रीवेश्येप्रमाणे पुरुष वेश्या (जिगोलो) हा प्रकार अस्तित्वात आला. मात्र, 'पुरुष वेश्या', हा शब्द काढला तरी नाके मुरडली जातात. पण हे वास्तव आहे. यांचे एक जग आहे. त्यांना त्या जगात मिळणारे अनुभव वेगळ्या धाटणीचे आहेत. जिगोलोंच्या विश्वात मारलेला हा एक फेरफटका स्त्री-पुरुष संबंधांचे नवे आयाम दाखवतो.
पुरुष वेश्यांचे संदर्भ पुराणकाळातही आढळतात
'जिगोलो' हा शब्द पूर्वी वापरात असेल-नसेलही, पण पूर्वीपासूनच पुरुष-वेश्या समाजात होते. महाभारतात दर्शविलेल्या काळात, मातृसत्ताक व्यवस्थेत किंवा सत्ताधारी स्त्रिया जिथे जिथे होत्या तिथे पुरुषवेश्यांचे उल्लेख येतात. नंतरच्या काळात ते उल्लेख हळूहळू हरवत जाताना दिसतात. समाज जसजसा काळाप्रमाणे बदलत गेला तसतसा तो स्वतःची नैतिकतेची संकल्पना बनवत गेला. या नैतिकतेच्या ओझ्याखाली समाजाने लैंगिकतेवर बोलणं हे पाप मानलं गेलं. म्हणूनच समाजाचे लैंगिकतेबाबतचे प्रश्न तसेच राहिले.
CA Topper या मालिकेतील एक प्रसंग
भारतीय समाजात 'स्त्री वेश्या' ही संकल्पना शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. परंतु स्त्रियांच्या मानसिक, शारीरिक, लैंगिक गरजांची पूर्तता करणारी व्यवस्था मात्र अभावानेच आढळते. धर्मग्रंथ, पुराणे आणि राजांच्या राजवटीत अनेक महाराण्या आपल्या विश्वासू नोकर माणसं आणि बायकांसहीत अनेक दिवसांच्या मृगयेसाठी किंवा हवापालट म्हणून वेगळ्या ठिकाणी जाऊन राहत असण्याच्या अनेक आख्यायिका आपण ऐकल्या आहेत. अनेक पट्टराण्यांचे विश्वासू नोकर, संरक्षक त्यांचे ‘जिगोलो’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण ते उघड उघड नव्हतं हे नक्की.
तर दुसरीकडे मात्र एका राजाच्या अनेक राण्या, राणीसोबत आलेल्या दासी, महालात असणाऱ्या बायका, किंवा जिच्यावर नजर पडेल ती स्त्री ह्या राजा, सरदारांना सदासर्वकाळ राजरोसपणे उपलब्ध होत्या. याचे अनेक पुरावे सापडतात. तर आधुनिक युगातही पेशव्यांपासून ते शेठ, सरदार, पाटील, सरपंच किंवा सामान्य माणसांपर्यंत कुठल्याही पुरुषाला अनेक स्त्रिया बाळगण्याचं स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे.
‘जिगोलो’ बनणं हे खरंच सोप्पं असतं का?
हल्ली 'जिगोलो' ही संकल्पना उच्चवर्गीय स्त्रियांमध्ये लोकप्रिय होऊ लागलेली आहे. ही अनेक कारणांनी अतृप्त असणाऱ्या, स्वतंत्र आणि एकट्या असणाऱ्या स्त्रियांसाठी नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. पैशाच्या मोबदल्यात आपले शारीरिक श्रम विकणे ही गोष्ट तशी सामान्य आहे. परंतु लैंगिक श्रम विकण्याला मात्र आधिमान्यता नाही, मग ती स्त्री असो व पुरुष…
वरवर विचार करता जिगोलोच काम वाटतं तितकं सोपं नसावं. जिगोलो तोच पुरुष बनू शकतो जो इतरांना समजून घेऊ शकतो. विशेषतः ज्याच्याकडे बायकांना समजून घेण्याची कुवत आहे. त्यांना लैंगिकदृष्ट्या उद्युक्त करण्याची, तृप्त करण्याची कला अवगत आहे. जवळजवळ 98% पुरुष कामक्रीडेत फक्त स्वतःचा आनंद बघतात. स्त्रीच्या लैंगिक तृप्ततेशी त्यांचा काही एक संबंध नसतो 'तिला सुख द्यायचंय' ही भावना बाळगण्यापेक्षा 'मला सुख हवंय' हीच भावना पुरुषांच्या मनात अधिक प्रबळ असते.
ऍमेझॉन प्राइम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली "रंगीन" मालिकेचे पोस्टर
जटिल व्याधी, स्वभावातला रुक्षपणा, कोरडेपणा, स्वार्थीपणा, वयानुसार येणारा आळशीपणा अशा वेगवेगळ्या कारणांनी स्त्रियांना आनंद देऊ न शकणारे पुरुष हे एका प्रकारे पितृसत्तेचेच पाईक असतात. बायकांना शारीरिक सुख तर द्यायचं नाहीच, पुन्हा त्यांनी स्वतः त्यावर पर्याय शोधला तर त्याचंही गिल्ट स्त्रियांनाच द्यायचं, जणू काही मोठी चोरी पकडल्याचा फील द्यायचा. वर तिला माफ केल्याच्या अविर्भावात पुढची सगळी वर्ष ती एका न्यूनगंडात राहील असं पाहायचं. मग बायकांनी करायचं तरी काय ? तर अशा कित्येक अतृप्त इच्छा, वासना तना-मनात दडपून टाकून नुसतंच जगत राहायचं फक्त!
‘’या धंद्यात पैसा होता पण, ही दुनिया किती भयानक आहे हे उशीरा कळलं…’’
शॉन (नाव बदललं आहे) हा मुंबईत राहणारा तरूण एक जिगोलो आहे. ‘बाईमाणूस’शी बोलताना शॉन या धंद्यात कसा शिरला हे सांगतो… ‘’माझं दिसणं आणि शरीरयष्टी चांगली होती. मला मॉडेलिंग करायचे होते. तसेच अभिनय करण्याची इच्छा होती. एक दोन नाटकांतदेखील मी काम केलं होतं, परंतु मॉडेलिंगसाठी लागणारे पैसे माझ्याकडे नव्हते. त्यानंतर त्याच मॉडेलिंग एजन्सीद्वारे माझा संपर्क एका एस्कॉर्ट एजंटशी आला.
मला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल,असेही सांगितले गेले. त्यानंतर मी निरनिराळ्या शहरांत अनेक ग्राहकांच्या मागणीवरून पोहोचायचो. ते पैसे तर भरपूर द्यायचे, ज्यात काही टक्के कमिशन हे एजंटचे असायचे, पण वापरदेखील एखाद्या वस्तूप्रमाणे केला जायचा. कधी एकटाच ग्राहक असायचा, कधी एखादे जोडपे तर कधी एखादा ग्रुप लैंगिक गरजा भागवण्यासाठी संपर्क करायचा. महिन्यातून किमान 20 ते 25 दिवस तरी मला हे काम करावं लागायचं.’’
जिगोलो बनल्यानंतर काही भयानक अनुभवांना सामोरं जावं लागल्याने शॉन या व्यवसायातून आता बाहेर पडला आहे. शॉन म्हणतो की, शरीराच्या कार्यक्षमतेला एक सीमा असल्याने मला शरीराचीदेखील निगरानी करावी लागायची. जीम, चांगले डाएट, निरनिराळी उत्पादने यासाठी माझ्या एकूण कमाईचा 80 टक्के भाग खर्च होत होता. त्यामुळे आर्थिक जम पण बसत नव्हता. या व्यवसायातून पैसा कमवेन आणि नंतर हे सर्व सोडून हवं ते करेन याची स्वप्न मी बघत होतो, पण झालं भलतंच.
लैंगिक गरजा भागवण्यासाठी येणारे विचित्र ग्राहक, त्यांची प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक, त्यांच्याबरोबर करावे लागणारे दारू, ड्रग्स यांचे व्यसन यात मी पुरता अडकलो. एका वेळेला तुमची शारीरिक गरज भागली की, जिगोलोची ही दुनिया किती भयानक आहे ते तुम्हाला समजेल. यातून बाहेर पडण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले, पण एजन्सीवाले मला ब्लॅकमेल करत होते. समाजात इज्जत जाण्याची चिंता मला होती. शेवटी एका वकिलाच्या मदतीने या नरकासमान दुनियेतून मी बाहेर आलो.
‘’समाजाचा एक वेगळा चेहरा बघून सुरुवातीला पूर्णपणे हादरलो होतो’’
जिगोलोच्या व्यवसायात अडकलेला पंकज (नाव बदललं आहे) सांगतो की, एका फिल्मच्या ऑडिशनसाठी मी एका एजन्सीकडे गेलो होतो. आर्थिक चणचण होती, त्यामुळे कामाचीदेखील आत्यंतिक गरज होती. त्या एजन्सीने माझ्या शरीरात, वागण्या-बोलण्यात चुका काढून मी कसा अभिनयासाठी योग्य नाही हे सांगितले. त्यानंतर माझी आर्थिक बाजू ओळखून आणि मला आधार देण्याचा बहाणा करून मला एका एस्कॉर्ट एजन्टच्या संपर्कात आणले गेले. त्यानंतर माझ्या या व्यवसायाला सुरुवात झाली. त्यातील 50 टक्के रक्कम एजंट कमिशन घ्यायचा आणि उरलेली रक्कम मला मिळायची.
आपल्या अनेक ग्राहकांचे विचित्र प्रसंग सांगताना तो म्हणतो की, लग्न झालेली जोडपीदेखील ग्राहक म्हणून यायची आणि त्यांच्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी भरपूर पैसे मोजायची. समाजाचा असा चेहरा बघून सुरुवातीला आतून संपूर्णपणे हादरायला झाले होते, पण आम्ही फक्त पैसे देऊन खरेदी केलेली एक वस्तू असल्याने ते सांगतील ते करायची वेळ यायची. दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता.
जिगोलोंना स्वतःच्या शरीराची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. जे जिगोलो नेटवर्कमध्ये आहेत किंवा वेबसाईटवर आहेत त्यांना दर दोन महिन्यांनी सर्व वैद्यकीय चाचण्या करून त्याचे रिपोर्ट द्यावे लागतात. हे कटाक्षाने पाळले जाते. क्लायंटने कितीही आग्रह केला तरी निरोध लावल्याशिवास संभोग करायचा नाही हे स्पष्ट केले जाते. 2000 च्या दशकापर्यंत अनेक जिगोलोंचे मृत्यू हे एडसने झाल्याची माहिती पंकजनेदिली.
जिगोलो म्हणजे पिळदार शरीराचाच हवा वगैरे भ्रम आहेत. पण तरीही फिटनेससाठी बहुतांश जिगोलो नियमित जिम करतात. तसेच, शरीर, दात अत्यंत स्वच्छ राखण्यावर भर देतात. अनेक जिगोलोंनी आता स्वतःला नेमकी कोणत्या औषधाची, मद्याची एलर्जी आहे त्याची नीट माहिती करून घेतली आहे. कारण जर एलर्जी असलेला एखादा प्रकार क्लायंटने ऑफर केला तर त्याला नम्रपणे नकार द्यावा लागतो, असे पंकज सांगतो.
शॉन आणि पंकज… दोन जिगलोंच्या दोन कहाण्या, दोघांनाही आता वाटते की, हा धंदा म्हणजे दलदल आहे. त्यातून परतीचा मार्ग नाही. तारुण्य सुलभ वयात एका आकर्षणाने यामध्ये आलो पण आता परतीचा मार्ग नाही. त्यांच्यासारखीच अवस्था त्यांच्या या व्यवसायातील मित्रांची आहे. पण भान येईपर्यंत परतीचे दोर कापले गेलेले असतात. जिगोलोच्या धंद्यात एक प्रथा आहे. जो कुणी नवा या व्यवसायात येतो, त्याचे कौन्सुलिंग केले जाते आणि त्याला परावृत्त करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. पण तरीही तो बधला नाही तर मग त्याला या व्यवसायात येऊ देतात.
जिगोलोंची एक अनोखी दुनिया…
जिगोलोच्या या अनोख्या आयुष्यावर पत्रकार मनोज गडनीस यांनी संशोधन केलं आहे. ‘लोकमत’च्या एका दिवाळी अंकात मनोज गडनीस यांनी ‘लाल रुमाल’ या शिर्षकाखाली एक दीर्घ लेख लिहिला आहे. जिगोलोंच काम कस चालतं, जिगोलोंचे किती प्रकार असतात, जिगोलोंचं प्रशिक्षण कशा पद्धतीने होतं, या व्यवसायाचे अर्थकारण, गोपनियता आणि धंद्यातला धोका अशा अनेक अंगाने मनोज गडनीस यांनी वेध घेतला आहे.
मनोज गडनीस सांगतात की, जिगोलोंचा पहिला आणि पारंपरिक प्रकार म्हणजे, रस्त्यावर भपकेदार कपडे घालून आणि उजव्या हाताच्या मनगटाला लाल रूमाल लावून रात्री उभे राहणे. साधारणपणे ज्या शहरात हा व्यवसाय चालतो त्या शहरात त्यांच्या काही जागा ठरलेल्या असतात. आलीशान गाड्यांतून येणाऱ्या मुली, महिला त्यांच्यापाशी येतात. गाड्यांची काच खाली होते. मोजकाच संवाद होतो. व्यवहार पटला तर तो गाडीत बसतो. गाडीत बसल्यापासून तो निघेपर्यंत त्याचा सर्व खर्च ग्राहकालाच करावा लागतो. अनेक हॉटेल्समधून हा व्यवसाय सर्रास चालतो.
अलीकडच्या काळात इंटरनेट, सोशल मीडिया, डेटिंग अँप यांच्या माध्यमातून हा व्यवसाय होतो. इंटरनेटवर जिगोलोसाठी विशिष्ट वेबसाईट आहेत. तिथे लॉगइन करून रजिस्ट्रेशन करत काही पैसे भरले की, जणू अल्बमच उघडला जातो. त्यावरून तुम्हाला हवी ती व्यक्ती तिथे मिळू शकते. नियमित उत्पन्न मिळावे म्हणून अनेक जिगोलो देखील यावर स्वतःची नोंदणी करतात.
अर्थात इथून या वेबसाईटचे मालक जिगोलोला मिळणाऱ्या पैशांमध्ये 35 टक्क्यांचे कमिशन घेतात. त्यामुळे जिगोलोंच्या हाती फारसे काही लागत नाही. पण तरीही नियमितपणे येथून धंदा मिळतो, असे त्यांचे मत आहे. याखेरीज स्वतःचे क्लायंटही त्यांना शोधता येतात. मात्र, इथे एक प्रकारची स्पर्धा लागलेली दिसते. अनेक हायफाय पब्ज, रेस्तरॉं, कॅफेच्या मॅनेजरसोबत जिगोलोंचे सेटिंग असते. त्यानुसार तिथेच अनेकवेळा हे जिगोलो आपला ग्राहक शोधतात किंवा ग्राहकांना जिगोलो सेवा तेथून प्राप्त होते.
जिगोलोंचे प्रशिक्षण अशाप्रकारे होत असते
तीस वर्षांपूर्वीचे जिगोलो आणि आताचे जिगोलो यामध्ये प्रचंड फरक आहे. स्त्रीला काय हवे, हे आपल्याला माहिती आहे अशा आविर्भावात राहणाऱ्या तीस वर्षांपूर्वीच्या जिगोलोंना आता वयामुळे कुणीच विचारत नाही. पण आता दिवस बदलले आहेत. आता जर कुणी नवा तरुण या व्यवसायात आला तर त्याला शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जाते. किमान 15 दिवसांचे हे ट्रेनिंग असते. यामध्ये स्त्रीयांचे शरीर, त्यातील संभोगाचे बारकावे, कलात्मक संभोग करण्याची माहिती, स्त्रीला नजाकतीने कसे हाताळावे, स्त्री आक्रमक झाली तर कसे हाताळावे इथपासून ते तिची भावनिक अवस्था असे अनेक बारकावे शिकवले जातात. याकरिता डॉक्टरांचीही मदत घेतली जाते.
मासिक पाळीच्या आधीचे चार दिवस आणि नंतरचे चार दिवस, (काहीवेळा मासिक पाळीतही जिगोलोंना बोलावले जाते.) यातील स्त्रीच्या मनाची अवस्था, शरीराची अवस्था याची पूर्ण माहिती या प्रशिक्षणात दिली जाते. विशेष म्हणजे, वय वर्षे 20 ते 30 या वयातील स्त्री, 30 ते 40 आणि चाळीशीच्या पुढची स्त्री यांच्या शरीरात होणारे बदल, भावनिक स्थिती यांचेही ट्रेनिंग दिले जाते. कारण ग्राहक कोणता येईल हे सांगता येत नाही.
याखेरीज स्टॅमिना वाढविण्यासाठी कोणती औषधे घ्यावी, ती किती वेळा घ्यावी, त्याचा डोस किती असावा, याचीही माहिती दिली जाते. याचसोबतीने संवाद साधण्याची कला देखील शिकवली जाते. नेमकेपणाने कसे बोलायचे, एखाद्या महिलेला जर शृंगांरिक संवाद आवडत असतील तर त्याचा मेळ कसा साधायचा हे देखील ट्रेनिंगमध्ये सांगितले जाते. या ट्रेनिंगनंतरच त्यांना या व्यवसायात उतरविले जाते, अशी माहिती मनोज गडनीस देतात.
एका जिगोलोला किती पैसे मिळतात?
जिगोलांचे अर्थकारण हे त्यांच्या वयानुसार बदलत जाते. 20 ते 30 या वयोगटातील जिगोलोंपेक्षा 30 ते 40 या वयोगटातील जिगोलोंना जास्त पैसे मिळतात. त्यांना अनुभव जास्त असल्यामुळे हे पैसे जास्त मिळतात असे म्हटले जाते. यामध्ये तारुण्य आणि स्टॅमिना याचा काहीही संबंध नाही. तीन हजार ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान एक दिवस अथवा रात्र असा हा दर आकारला जातो. एका रात्रीसाठी जर बुकिंग केलेले असेल आणि दोनवेळा परफॉर्मन्स अपेक्षित असेल तर प्रत्येक परफॉर्मन्ससाठी स्वतंत्र पैसे आकारले जातात.
तीन हजार ते 80 हजार हा जिगोलोंचे व्यक्तीमत्व, अनुभव, रुप यावर आधारित असला तरी, सर्वसाधारण जिगोलोंच्या बाजारात रात्रीचा सरासरी दर हा 8 ते 10 हजार रुपये इतका आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, मास्टर, म्हणजे ज्याच्या नेटवर्कमध्ये तुम्ही असतात त्याला त्याचे कमिशन जाते आणि जर वेबसाईटवरून बुकिंग आलेले असले तर जरा जास्त कमिशन जाते. साधारणपणे नेटवर्कमध्ये असलेल्या जिगोलोने आठवड्यातून चार दिवस काम करणे अपेक्षित असते. त्याच्या मनाने सुट्टी घेतली असे होत नाही. त्याच्या सुट्टीसाठी त्याला अगोदर कळवावे लागते. कारण काहीवेळा एखाद्या ग्राहकाला विशिष्ट जिगोलोच हवा असतो.
या धंद्याचे काही नियम आहेत. एखाद्या क्लायंटला आपण कितीही आवडलो तरी, जोवर तो त्याच्या विषयी अथवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर स्वतःहून बोलत नाही तोवर आपण त्यावर बोलायचे नाही. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला कधीच कोणताही सल्ला द्यायचा नाही. तसेच, त्याचा जरी नंबर तुमच्याकडे असला तरी त्याने बोलावल्याशिवाय त्याला संपर्क करायचा नाही. सोबत असताना फोटो काढायचे नाहीत. क्लायंटलाही काढू द्यायचे नाही. कोणत्याही प्रसंगाचे शूटिंग करायचे नाही.
आजच्या काळात पॉर्न इंडस्ट्री विस्तारली आहे, वेश्या जशा कॉलगर्ल झाल्या, तसं पुरुष वेश्या 'जिगोलो' झाला, भांडवलशाही स्त्री शरीराचं वस्तूकरण करते, तशीच ती पुरुष शरीराचंही वस्तूकरण करते. सध्या वेश्या व्यवसायाला मान्यता मिळण्याबाबत चर्चा घडते आहे. मानवी मनाचं शोषण व्यवसायाखाली नजरेआड केलं जातं. शोषणाच्या प्रश्नाला लपवण्यासाठी 'जिगोलो' हे फॅशनेबल व व्यावसायीक स्वरूपाचं नाव उपयोगी ठरतं. श्रीमंत महिला जिथे पुरुषांवर बोली लावतात व त्यातून 'जिगोलो मार्केट' उभं राहतं हे या काळातलं सत्य आपण कुठपर्यंत दडपून ठेवणार आहोत!
(संदर्भ - लोकमत दीपोत्सव 2022 )






