जवळपास 20 वर्षे मोहम्मद अथर हुसेन हा तरुण बिहारच्या नवादा आणि आसपासच्या ठिकाणी कपडे धुण्याचे काम करत होता. लोकांच्या घरी जायचा, कपडे धुवायचा आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईतून आपलं घर चालवायचा. वर्षभरापूर्वी 45 वर्षाच्या मोहम्मदने एक सायकल विकत घेतली, हळूहळू चार पैसे अधिक मिळायला लागले आणि आयुष्याचा गाडा चाकावर यायला सुरूवात झाली. कुटुंबाला वाटायला लागलं की आता चार घास सुखाने खायची वेळ सुरू झाली…. मात्र 5 डिसेंबरच्या एका रात्रीने सगळंच उद्स्त झालं…
गावातीलच काही लोकांनी मोहम्मदला चोर समजून जबर मारहाण केली, जवळपास सहा दिवस तो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता आणि अखेर 12 डिसेंबर रोजी त्याने जीव सोडला. बिहारमध्ये गेल्या आठवड्याभरापासून या प्रकरणाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. या प्रकरणामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळातदेखील आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
मोहम्मद अथर हुसेन नामक 45 वर्षीय व्यक्तीला चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली, अनन्वित अत्याचार केले आणि त्यातच त्याचा रुग्णालयात तडफडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 25 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झाले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. हुसेनवर करण्यात आलेल्या अत्याचारांचे तपशील जाहीर झाल्यानंतर त्यावरून खळबळ उडाली आहे.
मोहम्मद हुसेनला त्या दिवशी रात्री एका जमावाने घेरलं. तो चोर आहेत असा या जमावाला संशय आला आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. संध्याकाळी 7 ते मध्यरात्री 2 पर्यंत म्हणजे तब्बल 7 तास त्याच्यावर अनन्वित अत्याचार चालू होते. शेवटी मध्यरात्री पोलीस आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात आणलं तेव्हा तो ओळखूही येत नव्हता इतकी मारहाण करण्यात आली होती, असा जबाब प्रत्यक्षदर्शींनी दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
7 तास अत्याचार, 20 ते 25 जणांकडून मारहाण
हुसेनचा हॉस्पिटलमधला व्हिडीओ दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा भाऊ मोहम्मद चांदला दाखवण्यात आला, तेव्हा त्याचा विश्वासच बसला नाही. त्याने तो व्हिडीओ हुसेनच्या पत्नीला परवीनलादाखवला तेव्हा कुठे हुसेनची ओळख पटली आणि आख्खं कुटुंब नवादामधील रुग्णालयाच्या दिशेनं निघालं. हुसेनचे दुसरे भाऊ शाकिब आलम यांनी सांगितलं की हसेनला सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांचा चेहरा ओळखूही येत नव्हता.
दरम्यान, रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेतील हुसेन यांनी कुटुंबीयांना घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. रोजच्या फेऱ्या संपवून संध्याकाळी हुसेन भट्टपूर गावात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचं टायर पंक्चर झालं. तिथेच शेकोटीभोवती बसलेल्या काही व्यक्तींना हुसेन यांनी गॅरेजच कुठे आहे अशी विचारणा केली. मोहम्मद चांद सांगतात, “तिथे बसलेली ती माणसं दारू प्यायलेली होती. त्यांनी हुसेन यांना नाव, काम विचारलं. नंतर अचानक ते हुसेन यांच्याशी वाद घालू लागले. त्यातल्या एकाने हुसेन यांच्याकडचे सगळे पैसे घेतले. जेव्हा त्यांनी विरोध केला, तेव्हा ते सगळे हुसेन यांना मारहाण करू लागले”.
आधी हुसेन यांना शेकोटीमधल्या जळत्या लाकडानं मारहाण केली गेली. त्यानंतर त्यांना एका खोलीत फरफटत नेलं गेलं. तिथे त्यांचे सगळे कपडे काढून त्यांना नग्न अवस्थेत हात-पाय बांधून ठेवण्यात आलं. एक गरम लोखंडी रॉड त्यांच्या गुदद्वारात घुसवण्यात आला. त्यांचे कान कापण्यात आले. त्यांची बोटे चिरडण्यात आली. त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. त्यांच्या गुप्तांगालादेखील इलेक्ट्रिक शॉक दिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
“प्रत्येक वेळी ते बेशुद्ध झाले की त्यांच्या तोंडावर पाणी टाकून ते नराधम त्यांना जागं करत होते. त्यानंतर पुन्हा मारहाण करत होते. जेव्हा त्यांना वाटलं की हुसेन आता जास्त मारहाण सहन करू शकणार नाही, तेव्हा त्यांनी हुसेन यांच्याभोवती काही दागिने ठेवून त्यांना चोर ठरवण्याचा प्रयत्न केला”, असं मोहम्मद चांद यांनी सांगितलं.
हुसेन यांचा 12 डिसेंबर रोजी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृ्त्यू झाला. मृत्यूआधी हुसेन यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार जवळपास 20 ते 25 जणांनी मिळून त्यांना मारहाण केली होती. त्यात काही अल्पवयीन मुलांचादेखील समावेश होता. संध्याकाळी 7 पासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा हुसेन यांची अवस्था गंभीर होती.
या प्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 10 ते 15 जण अज्ञात आहेत. पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. या सगळ्यांवर आधी मारहाणीचे गुन्हे दाखल होते. मात्र, हुसेन यांच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेले सर्व 9 आरोपी भट्ट गावातील आहेत.






