(अक्षय शारदा शरद)
कॅनबेरा ही ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी. ऑस्ट्रेलियातलं महत्त्वाचं शहरही! अगदी देशाच्या संसदेपासून 1841 मध्ये उभारण्यात आलेल्या सेंट जॉन द बॅप्टीस्टच्या चर्चपर्यंत अनेक महत्त्वाच्या वास्तू या शहराशी जोडल्या गेल्यात. तशीच वेगवेगळी शहरंही! 1913 सालीच या शहराच्या उभारणीला सुरुवात झाली.
दुसऱ्या महायुद्धानंतर या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ लागला. दोन एककेंद्रीय वर्तुळाकार रचना असलेल्या 'कॅनबेरा'ला म्हणूनच आगळंवेगळं महत्त्वं आहे.
ऑस्ट्रेलिया हा खरंतर जगातल्या मोठ्या जीवाश्म इंधन उत्पादक देशांपैकी एक. जीवाश्म इंधन हे ज्वलनशील असल्यानं ते पर्यावरणासाठीही घातक. मात्र असं असतानाही राजधानीचं शहर असलेल्या 'कॅनबेरा'नं वेगळी वाट पकडली. सध्या हे शहर शंभर टक्के अक्षय ऊर्जेवर चालतंय. म्हणजेच स्वच्छ ऊर्जेवर. त्यामुळे शहराच्या जीवाश्म इंधन ते अक्षय ऊर्जा या प्रवासाची गोष्ट हा सध्या चर्चेचा विषय बनलाय.
अक्षय ऊर्जा म्हणजेच नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी ऊर्जा. यालाच 'स्वच्छ ऊर्जा' किंवा 'नुतनीकरणक्षम ऊर्जा' असंही म्हटलं जातं. ऊर्जा सुरक्षा आणि एकूणच पर्यावरण राखायचं तर अक्षय ऊर्जा हा एक उत्तम पर्याय म्हणून बघितला जातो. त्यामुळे शंभर टक्के स्वच्छ ऊर्जेवर चालणारं शहर 'कॅनबेरा' जगातल्या मोठ्या शहरांसाठी एक रोल मॉडेल म्हणून पुढं आलंय.
जगातलं 'शाश्वत शहर'
2017ची गोष्ट. माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भर संसदेत कोळशाचा तुकडा उंचावत जीवाश्म इंधन हेच भविष्याची ऊर्जा असल्याचं म्हटलं होतं. ज्या शहरात ही घोषणा झाली; आता त्याच शहराने जीवाश्म इंधनाला मूठमाती देत अक्षय ऊर्जेच्या दिशेनं आपली पावलं टाकलीत. त्यासाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा आधार घेतला गेलाय.
ऑस्ट्रेलियातल्या एकूण वीज उत्पादनातला 40 टक्के वाटा हा अक्षय ऊर्जेचा आहे. 2030 पर्यंत हे प्रमाण 82 टक्क्यांपर्यंत पोचण्याचा अंदाजही व्यक्त केला जातोय. त्यादृष्टीने कॅनबेरा शहर हे एक मॉडेल म्हणून उभं राहतंय. त्यासाठी 2020 मधेच महत्त्वपूर्ण पावलंही उचलली गेली. पुढच्याच वर्षी म्हणजे 2021ला इंग्लंडच्या 'यूस्विच' या ऊर्जाविषयक प्लॅटफॉर्मनं जगातलं पहिल्या क्रमांकाचं 'शाश्वत शहर' म्हणून कॅनबेराची घोषणा केली.
सध्याच्या घडीला या देशातल्या वीज उत्पादनात अक्षय ऊर्जेचा वाटा केवळ 40 टक्केच आहे हे इथं लक्षात घ्यायला हवं. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधन वापरलं जातंय. अशावेळी त्याला बाजूला करून कॅनबेरा 100 टक्के पवन आणि सौर ऊर्जेपर्यंत कसं पोचलं हे समजून घेणंही तितकंच रोचक आहे.

जीवाश्म इंधन लॉबीला विरोध
ऑस्ट्रेलियात असलेल्या रूढीवादी सरकारनं बदलांना कायमच विरोध केला. त्याचाच भाग म्हणून अक्षय उर्जेसंदर्भातल्या योजनांवर टांगती तलवार आली. अशा योजनांना परंपरावाद्यांनी विरोध केला. किंबहुना अशा योजनाच बंद पाडण्यात आल्या. कोळसा आणि गॅसवर निर्भर देश बनवणं हे यांचं उद्दिष्ट होतं. अक्षय उर्जेचा पर्याय बाजूला ठेवण्यात आला. याचा परिणाम अक्षय उर्जेवर होणं साहजिक होतं.
दरम्यानच्या काळात स्थानिक सरकार आणि संघीय सरकार असा संघर्षही पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियात राज्य आणि प्रदेशांना मोठ्या प्रमाणात स्वायत्तता आहे. ऑस्ट्रेलियन सरकारला त्यांच्या अनेक निर्णयांवर प्रभाव पाडण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे उघडउघड हा संघर्ष पहायला मिळाला. स्थानिक सरकारांनी संघीय सरकारमधल्या जीवाश्म इंधन लॉबीला विरोधही केल्याचं यातून स्पष्ट दिसतं.
हे लेख पण वाचा :
१) हे गाव लई न्यारं, हितं ‘सौर उर्जेचं’ वारं…
२) ‘’आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही, जंगल आमच्या जगण्याचा आधार आहे’’
कॅनबेराचा कल अक्षय उर्जेकडेच...
कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियन राजधानी क्षेत्र ( एसीटी ) या संघीय जिल्ह्यात वसवण्यात आली आहे. 'एसीटी'कडे केंद्रशासित प्रदेश म्हणून पाहिलं जातं. इथं पर्यावरण समर्थक सरकार सत्तेत आहे. त्याचाच भाग म्हणून कॅनबेरानं जर्मनीत आपलं एक प्रतिनिधी मंडळ पाठवलं. इथलं सौर ऊर्जा शहर असलेल्या 'फ्रायबर्ग'चा अभ्यास करण्यात आला.
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीत सौर ऊर्जेसंदर्भातल्या अभ्यासाचं विश्लेषण केलं गेलं. आणि शहरासाठी आवश्यक त्या गोष्टी घेतल्या गेल्या.
स्थानिक आणि संघीय अशी थेट रचना असल्याने शिवाय राज्यांना आणि प्रदेशांना विशेष स्वायत्तता दिली गेल्याने त्यांनी संघीय सरकारच्या अनेक धोरणांपासून लांब राहणं पसंत केलं. विशेषतः हवामान बदलविषयक राजकारणापासून. त्यामुळेच 'कॅनबेरा'त अक्षय ऊर्जा कंपन्यांना मोकळीक मिळाली. इतर राज्य मोठ्या प्रमाणात कोळसा आणि गॅस कंपन्यांना मोकळीक देत असताना कॅनबेरानं मात्र अक्षय उर्जेकडे आपला कल कायम ठेवला.
एका आकडेवारीनुसार, सध्याच्या घडीला कॅनबेरामध्ये तीन सौर ऊर्जा फार्म आहेत. 95 टक्के अक्षय ऊर्जेवर आधारित वीज ही पाच पवन ऊर्जा फार्मद्वारे पोहोचते आहे. विशेष म्हणजे हे फार्म न्यू साऊथ वेल्स, साऊथ ऑस्ट्रेलिया, व्हिक्टोरिया स्थित आहेत. त्यामुळे यांचीही कोळसाआधारित असलेली विजेवरची गरज हळूहळू कमी होत आहे.
फायदा काय झाला?
अक्षय ऊर्जेचा वापर वाढल्याने इतर शहरांच्या तुलनेत इथल्या लोकांचा विजेवर होणार खर्च वाचला. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता जीवाश्म इंधनावर होणाऱ्या इतर घटकांच्या परिणामामुळे तसेच बाजारातील चढउताराचा परिणाम जीवाश्म इंधनातून वापरल्या जाणाऱ्या विजेवर होतो. तो अक्षय ऊर्जेमधे होत नाही. त्यामुळे त्याचाही फायदा इथल्या नागरिकांना झाला.
कॅनबेरामधल्या घरांवर तुम्हाला सोलर पॅनल दिसतात. इथं नागरिक स्वतः हे सोलर पॅनल बसवू शकतात. त्यामुळे याचं स्वरूपही विकेंद्रित आहे. तसेच सरकारच्या मदतीमुळे अशा प्रकारच्या सोलर पॅनलच्या उभारणीतही लोकांचा उत्साह दिसतो. इलेक्ट्रिक कारमधल्या बॅटरी घरातली वीज गेल्यावर उपयोगात आणण्याची योजनाही इथं चालू करण्यात आली आहे.
भविष्यात इथले कोळशावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पही 100 टक्के बंद होतील. एकुणात काय तर कॅनबेरातलं अक्षय ऊर्जेचं हे मॉडेल ऑस्ट्रेलियातल्या इतर राज्यांसाठी एक आदर्श म्हणून उभं राहतंय. पर्यावरणालाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. त्यामुळे केवळ ऑस्ट्रेलियातच नाही तर हवामान बदलाचं गंभीर संकट जगासमोर उभं राहत असताना सर्वांसाठीच कॅनबेराची अक्षय्य ऊर्जेची वाट महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.






