भारत लोकशाहीवादी देश आहे. भारतीय घटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीचं काम करण्याचा, कुठेही जाऊन राहण्याचा आणि पसंतीनुसार विवाह करण्याचा अधिकार आहे. पण प्रत्यक्षात देशातील जातिव्यवस्थेमुळे दलितांच्या या मुलभूत अधिकारांवर अनेकदा गदा आणली जाते. जातीय ओळखीमुळे त्यांच्यासोबत भेदभाव आणि हिंसा केली जाते. ही विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येक काळातच काही लोकांनी उघडपणे याविरोधात लढा दिला.
ब्राह्मणवादी व्यवस्थेविरोधात लढणारं असंच एक नाव म्हणजे, चंद्रलेखा… केरळच्या चित्रलेखा यांनी दीर्घ काळ डाव्यांच्या निती आणि धोरणांच्या विरोधात आवाज उठवला आहे. धरणे दिले आहेत. पण मुख्य राजकीय पक्ष आणि पुरोगाम्यांनी त्यांच्या या लढ्याकडे दुर्लक्षच केलेलं दिसून येतं. ई. चित्रलेखा या केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पयन्नूर जवळील कटट्मपल्लीच्या दलित स्त्री ऑटोरिक्षा चालक होत्या. त्या ‘पुलया’ समुदायातून येतात जो केरळमधील दलित समुदाय आहे. त्यांनी दोन दशकं सीपीआय (एम) ट्रेड युनियनच्या मनमानी विरोधात लढा दिला.
2004 मध्ये याची सुरूवात झाली होती. गरीबीमुळे त्यांना नर्सिंगचा अभ्यास मध्येच सोडावा लागला. त्यानंतर त्यांनी पयन्नूर मध्ये ऑटोरिक्षा चालवणं सुरू केलं. पण त्यांच्या या स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या प्रयत्नांना विरोध झाला. एका दलित महिलेकडे बाकीच्या ऑटोरिक्षा चालकांनी हीन नजरेनं पाहिलं. हे चालक तेव्हाच्या सत्तारूढ सीपीआय (एम) पक्षाच्या सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन (सिटू) सोबत जोडलेले होते.

त्यांनी चित्रलेखा यांच्या व्यवसायात हस्तक्षेप सुरू केला. त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्या कुटुंबावरही हल्ले करण्यात आले. पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही लोकांना अटक केली पण तरीही चित्रलेखा यांचं शोषण सुरूच राहिलं. चंद्रलेखा यांच्यावरही अनेक हल्ले करण्यात आले. त्यांना ऑटो स्टँडवर रिक्षा पार्क करण्यास तसंच प्रवाशांना घेण्यास मनाई करण्यात आली.
चित्रलेखाची रिक्शा डाव्यांनी दोनदा जाळली
चित्रलेखा तरीही जिद्दीनं आपला व्यवसाय करत राहिल्या. त्यांचे विरोधीही त्यांच्यावर दबाव आणतच होते. ३१ डिसेंबर २००५ रोजी काही ‘सिटू’ सदस्यांनी (डाव्यांची एक कामगार संघटना) चित्रलेखा यांची ऑटोरिक्षाच जाळून टाकली. त्यानंतर संपूर्ण राज्याचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यानंतर काही स्वयंसेवी संघटनांनी त्यांना नवीन रिक्षा विकत घेऊन दिली. मात्र सिटू सदस्यांनी त्यांना काम करण्यास मनाई केली.
2014 मध्ये चित्रलेखा यांनी कन्नूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 122 दिवस विरोध प्रदर्शन करत आपल्यावरील भेदभावाविरोधात न्याय मागितला. सचिवालयाच्या समोरही त्यांनी 47 दिवस उपोषण केलं आणि मागणी केली की त्यांना त्यांचं काम करण्यात येऊ द्यावं. एका मुलाखतीत त्या म्हणतात, “माझं कुटुंब आत्महत्येच्या कड्यावर आहे. माझा व्यवसाय ‘सिटू’च्या लोकांनी समाप्त केलाय. पोलिस याविषयी काहीही करत नाहीये.”

सीपीआय (एम) चा पारंपरिक विभाग मानल्या गेलेल्या परिसरात चंद्रलेखा यांच्यावरील बहिष्काराला त्यांनी थिय्या समुदायाच्या के. श्रीकांत यांच्याशी लग्न केल्यानंतर सुरूवात झाली होती. थिय्या समुदाय स्वतःला उच्च जातीय म्हणवतो. या आंतरजातीय प्रेम विवाहामुळे स्थानिक डाव्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यांच्या विरोधात झाले. लग्नानंतर चंद्रलेखा यांनी रिक्षा चालवायला सुरूवात केली तेव्हा त्यांना विरोध करणारे सिटू सदस्य हे याच थिय्या जातिचे होते. त्यांच्या संघटनेचा दबदबा इतका होता की कोणीही त्यांच्याविरोधात साक्ष द्यायला तयार होत नव्हतं. त्यामुळे आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतरही साक्षीदाराच्या अभावी ते सुटायचे.
चित्रलेखाचा आंतरजातीय विवाह आणि डाव्यांचा रोष
2023 मध्ये पुन्हा एकदा चित्रलेखा यांचा रिक्षा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इतकंच नाही तर त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या विरोधात एक खोटी केसही दाखल करण्यात आली. त्यात त्यांना अटकही झाली. 2014 मध्ये दोघांनाही तुरुंगवासही घडला. चित्रलेखा यांना काम करण्यापासून थोपवण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी अनेक उद्योग केले.
2016 मध्ये जेव्हा केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आली तेव्हा ओमन चंडी यांनी त्यांना घरासाठी जमीन व पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. पण नंतर डाव्यांचं सरकार येताच त्यांनी हा आदेश रद्दबातल केला. त्यानंतर चंद्रलेखा यांनी केरल उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे हे प्रकरण अजून प्रलंबित आहे.

चित्रलेखा या स्टँडवर काम करणाऱ्या एकट्याच महिला चालक होत्या. पार्किंगच्या क्षेत्रातही मनियानी जातीच्या चालकांची दादागिरी चालायची. ते त्यांना शिवीगाळ करायचे. एक दलित महिला तिथे येते हे त्यांना सहन होत नव्हतं. चित्रलेखा त्यानंतरही लढत राहिल्या. त्यांना याच दरम्यान कर्करोग जडला. कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 5 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या केवल 48 व्या वर्षी त्यांचं यातंच निधन झालं. त्यांना मृत्युनंतरतरी न्याय मिळेल का हेच आता बघायचं आहे.
दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही चित्रलेखाची ही कहाणी सोशल मीडियावर शेअर केली होती. चित्रलेखाचा हा लढा ‘बँडिट क्वीन’पेक्षा कमी नव्हता, असे शेखर कपूरने म्हटले होते. एका ब्रिटिश पटकथा लेखकासोबत शेखऱ् कपूरचा चित्रलेखाच्या आयुष्यावर चित्रपटही बनवायचा होता.
(सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






