विसाव्या शतकातील एक जगमान्य महापुरुष, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती. समग्र आंबेडकरी जनतेची दसरा दिवाळी! उद्यापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी भीमोत्सव साजरे होणार. हा संपूर्ण एप्रिल महिना म्हणजे आंबेडकरी विचारांच्या अस्मितेला सालाबादप्रमाणे धार लावली जाण्याचा कालखंड. आंबेडकर जयंतीला आंबेडकरी जनतेत अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते असायलाच हवे. समाजक्रांतीचे विराट तत्वज्ञान मांडणारी ताकद म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दलित मुक्तीलढ्यास आरंभ करून भारतातील दलित अस्पृशांची अस्मिता जागवली ती डॉ.आंबेडकरांनीच. आज थोडेफार प्रगत असलेले आंबेडकरी विचाराचे परंतु असंख्य गटा तटात विभागलेले लोक देखील उद्याच्या दिवसापुरता वेगळा जयभीम घालत नाही. फक्त उद्याच्या दिवसापुरता!

आंबेडकरी जनतेची दखल घ्यायलाच हवी हा विचार इथल्या सर्व बिगर आंबेडकरी राजकीय बिगरराजकीय, सामाजिक बिगरसामाजिक, साहित्यिक बिगरसाहित्यिक, आणि अजून बऱ्याच समूह गटांना करण्यास भाग पडणारा दिवस म्हणजे उद्याचा दिवस. मग काल का तसा विचार का केला जात नाही ? परवा तेरवा काय होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता आवश्यक चिंतन आंबेडकरी समाजाने करणे अत्यंत गरजेचे आहे.
बाबासाहेबांचे स्मरण करणे, त्यांच्या प्रती कृतज्ञता, प्रेम व्यक्त करणे म्हणजे, केवळ उद्या नवे कपडे घालून पुतळ्यावर जाऊन हार घालून येणे नाही. वा नरड्याच्या नसा ताणून भाषणबाजी करणे न्हवे. बाबासाहेबांच्या विचारांचे बळ घेऊन जगण्याचा संकल्प करणे, तो काटेकोरपणे अमलात आणण्यासाठी राबणे हे बाबासाहेबांचे खरे स्मरण ठरेल. वर्णद्वेष वर्गद्वेष जातीय अहंकार इत्यादी कुरुपे कापून काढून बाबासाहेबांच्या विचारांवर नीटस पाऊले टाकणे हे खरे स्मरण असेल.
दुर्दैवाने शिक्षित आंबेडकरी समाजाकडून तरुणांकडून आज काय होतेय? एक भयानक जातीयवाद आंबेडकरी तरुणांकडून पोसला जातोय. तो अत्यंत घातक आहे. परिवर्तनाच्या लढाईमध्ये आवश्यक असणाऱ्या समविचारी, इतर जातीय तरुण विचारवंतांना आंबेडकरी विचारधारेपासून दूर लोटण्याचे कुकर्म या नव्या जातीय अहंकारातून आंबेडकरी तरुण करत आहे. आंबेडकरांनी इथल्या सनातनी इतिहासा बरोबर जी झुंज दिली आणि यश खेचून आणले.
त्या कडव्या झुंजीत बाबासाहेबांच्या बरोबर असणाऱ्या लोकांत फक्त, बाबासाहेबांच्याच समाजाचे लोक होते काय? चित्रे, लेले, चिटणीस, शास्त्री, सहस्रबुद्धे ही सगळी सोबत असलेली माणसे ब्राह्मण जातीची होती. बाबासाहेबांनी यांच्या जातीचा द्वेष केला नाही. त्या जातीत असणाऱ्या, काही लोक बाळगणाऱ्या त्या वाईट वृतीचा त्यांनी द्वेष केला. वाईट वृत्ती विरहीत समविचारी माणूस तो कोणत्याही जातीचा असो तो आपला मैत्र असायला हवा आणि म्हणूनच बाबासाहेबांना त्यांच्या लढ्यात कित्येक सवर्णांनी साथ दिल्याचे आपल्याला दिसते.

आजचा आपला तरुण सरसकट जात बडवताना जास्त दिसतो आणि प्रवृत्तीवर आघात करण्याची वेळ येते तेंव्हा मात्र त्याची कढी पातळ होते. हे निखालस कटू वास्तव जागजागी पाहायला मिळते. थेट आणि प्रत्यक्ष लढ्यात शिक्षित तरुणाचा वाटा अत्यंत अल्प आहे. सोशल मिडियाच्या उपलब्धतेमुळे शहरी तरुण अधिक सशक्तपणे व्यक्त होताना दिसून येतो. पण तो जे काही व्यक्त होतोय, ते कौतुकास्पद न ठरता चिंतनीय ठरते आहे.आंबेडकरी तरुणांच्या डोळ्यावरचा चष्मा आंबेडकरी विचारांचाच असायला हवा हे हजार टक्के मान्य! पण त्या चष्म्यातून त्यांनी आंबेडकरी समाजाबरोबरच समग्र समाज पाहायला, अनुभवायला हवा, मांडायला हवा. परखड आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आज आंबेडकरी तरुणाला आहे.
पेपरमधल्या वधू-वर विषयक जाहिरातीत, एस सी, एस टी क्षमस्वची खिल्ली उडवताना, आपण धर्मांतरित. मातंग, चर्मकार, वा भटके यांच्या मुली कितपत स्वीकारल्या आहेत? आजही लाडवन गोडवन, सोमवंशी, सूर्यवंशीची थेरं आंबेडकरी लग्नसराईत थैमान घालताना दिसतातच. नव साहित्यिक, नव कलावंतांची तर बातच न्यारी. सूर्य नारायण आयुष्यात दोनदा भिला हे आपण जाणतो, सकाळचा नाष्टा म्हणून मारुती लाल फळ समजून सूर्याला गिळायला गेला त्यावेळेस आणि नंतर काय ते राहू केतू शनी साडेसाती ग्रहण वगैरे या म्याटर मध्ये. नंतर बरेच दिवस तो कशाला भ्याल्याचे ऐकिवात न्हवते.
पण हल्ली मात्र तो नवीन दलित कवींना चळाचळा कापू लागल्याचे ऐकून आहोत. हर कवितेत त्याला गिळले, गाडले, जाण्याची धमकी सोसावी लागतेय. कवी लोकांनी पार वाट लावली त्याची! आणि हेच कवी लोक माहिती अधिकारात अर्ज करता का म्हटले की हत्या झालेल्या सतीश शेट्टीचं उदाहरण देतात. नामदेव ढसाळ, दया पवार, राजा ढाले, या कृतीशील कवींची लढाऊ परंपरा विसरून केवळ अनुकरणातून क्रांतीच्या नावचे पुळचट जहरी काव्य प्रसवत आहेत. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा मागोवा घेत पुढे जात, त्यांनी आयुष्यभर जे विचार मांडले, जे विचार मातीतून माणूस घडवायला कारणीभूत ठरले ते विचारधन आज नव्यानं दमदार संकल्प करून जोपासण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.
बाबासाहेब केवळ भावनेतून स्वीकारणे आजच्या काळात अत्यंत लटके आणि तात्पुरते बळ देणारे असेल. इथल्या प्रस्थापित समाज, राज्यकर्त्या समूहाशी लढताना नितांत गरज आहे ती बाबासाहेबांच्या सर्वकश विचारांच्या अभ्यासाची, त्यांच्या सर्व जाती समूहांकडे बघण्याच्या अभ्यासू दृष्टीकोनाची. बाबासाहेबांनी मी तीन गुरु केले असे म्हटले. भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतीराव फुले. या तिन्ही गुरूंनी त्यांची वैचारिक जडणघडण केली. यांच्या कुणाच्याही विचारात जातीपेक्षा प्रवृत्तीवर हल्ला हे सूत्र आपल्याला आढळते, हेच नेमके लक्षात घेवून प्रवृत्ती चेचायला हव्यात. बाबासाहेब समविचारी सहकारी ब्राह्मण समाजाचे, मराठा समाजाचे मैत्र राखून देखील कडवट व अजिबातच तडजोड नसलेली झुंज देत होते.
‘भाला’कार भोपटकर आणि ‘बहिष्कृत भारत’कार आंबेडकर यांच्यातला वाक्युद्धाचा रंग आपण पहिला तर बाबासाहेब जशास तसे ठोशास ठोसा हे धोरण अगदी समर्थपणे वापरत होते हे लक्षात येते. अस्पृश्यांनी देवळात शिरण्याचा अविचार केल्यास त्यांच्या पाठी सडकल्या जाण्याचा संभव आहे” ही धमकी दिल्याबरोबर बाबासाहेब कडक उत्तर देताना म्हणतात, आमच्या पाठी सडकण्याची धमकी देणाऱ्यांची प्रसंग पडल्यास टाळकी शेकण्यास आम्ही कमी करणार नाही.

धोरणाने बाबासाहेबांनी पर जातीतील चांगले लोक स्वीकारले आणि वाईटांना सडकले. बाबासाहेबांच्या अनुयायांना देखील हे सहज शक्य आहे. परिवर्तनाची, क्रांतीची सामाजिक लढाई हा फक्त आपलाच, आपल्याच जातीचा ठेका नसून समाविष्ट होणाऱ्या सर्व परजातीतील समविचारी मित्रांना सामावून घेऊन, त्यांच्या प्रती जातीय अहंकार न बाळगता सामुदाईक लढा लढून जिंकणे ही आजची खरी गरज आहे. दलित समाजात जन्माला आलेल्या बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे एक अखंड संघर्ष! भारतात लोकशाही यावी म्हणून त्यांनी आपले आयुष्य वेचले, विद्वत्ता पणाला लावली.
दलित जातीजमातीत स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. मानवाला खरा मानवी चेहरा देणारे सामाजिक तत्वज्ञान विषद केले. आणि म्हणूनच दलित समाजाचे म्हणून असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, असलेल्या आंबेडकरी तरुण विचारवंतावर इतरांपेक्षा मणभर जास्त जबाबदारी आहे ती बाबासाहेबांचे क्रांतिकारी तत्वज्ञान काटेकोरपणे पाळण्याची. आणि त्याने ती समर्थपणे पेलायला हवी. हे बाबासाहेबांचे खरे स्मरण, वंदन आणि त्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करणे ठरेल.






