खांडववन का जाळले गेले होते? तिथे इंद्रप्रस्थ नगरी (आजची दिल्ली) उभारता यावी म्हणून. म्हणजेच, महानगर उभे करायला उभे जंगल जाळणे ही गोष्ट आपल्याला नवीन मुळीच नाही तर. ही जंगलं जाळली जात असतांना तिथे राहणारे जीव-प्रजीव व आदिम समाज जो चित्कार करतात, त्याला आदिवासी भाषेत ‘किक्यारी’ म्हणतात! आजही आदिवासी किक्यारी करतच असतात, आपल्याला मात्र ती ऐकू येत नाही!
गेल्या काही वर्षात कोविड 19 ह्या व्हायरसच्या निमित्ताने आपले जगणे अंतर्बाह्य ढवळले गेले आणि अनेक मूलभूत गोष्टींकडे पुन्हा एकदा मागे वळून पाहण्याची गरज निर्माण झाली. अशीच एक मूलभूत समजली जाणारी संज्ञा म्हणजे ‘आदिवासी’.
वास्तवतः ‘आदिवासी’ ही संज्ञा एक अति गुंतागुंतीची, काहीशी सामाजिक-राजकीय गरजेपोटी तयार केली गेलेली, तर काहीशी सांस्कृतिक अशी आहे. त्यामुळे ही संज्ञा फार जबाबदारीने, मुद्दाम अवतरण चिन्हात लिहायला हवी.

पण ह्या संज्ञेहूनही जटील प्रश्न हा आहे कि मागे वळून पाहत तर आहोत आपण, परंतु ह्या ‘आदिवासी’ची एरव्ही आपल्याला कधीही न ऐकू आलेली हाक आज तरी ऐकू येणार आहे का?
“नाही, आपल्याला ‘आदिवासी’ची हाक, त्यांची ‘किक्यारी’ कधीही ऐकू येणार नाही!” असे माझे वैयक्तिक उत्तर स्पष्ट असले तरी, ह्या कोविडोत्तर काळात ‘आदिवासी’ कडून ऐकण्याजोग्या, शिकण्याजोग्या ज्या काही थोड्याफार गोष्टी मला माहित आहेत त्यांची मांडणी मी इथे करणार आहे! परंतु ‘आदिवासी जीवन’ म्हणजे केवळ अद्भूत-अद्वितीय-सुंदर, असा रंजक आणि भाबडा समज बळकट करण्यासाठी ही मांडणी नाही.
तर ‘आदिवासी’ ह्या संकल्पनेत व जीवन-दृष्टीत एकूण सर्व्हाइवलच्या काही महत्वाच्या किल्ल्या अजूनही दडलेल्या आहेत असे आढळते, तर ह्या किल्ल्यांनी काही गंजलेली कुलुपे उघडू शकतात का हे पहायचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.
जमिन, स्थळ आणि परिसर… आदिवासींच्या जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
Land, Territory, Space – अर्थातच जमिनीशी, स्थळाशी, परिसराशी आदिवासींचे नाते कमालीचे घट्ट असते. डोंगरावर राहणारे, नदीकाठी वास्तव्य असलेले किंवा मैदानी भागात स्थिरावलेले निरनिराळे आदिवासी समूह पाहिले कि ह्या नात्याची उकल होते. डोंगराळ भागातील आदिवासींच्या शरीराची ठेवण, आवाज लावण्याची पद्धत, बोलणे, भाषा, पोशाक, आहार-विहार हे नदीकाठी वास्तव्य असलेल्या आदिवासी समाजापेक्षा खूप निराळे असतात.
उदाः गद्दी, गुज्जर, बकरवाल, तोधपा असे व ह्या सारखे भारताच्या उत्तरी टोकावर स्थित अनेक समूह हिमालयीन जमिनीशी लगडून जगतात. त्यांचे उबदार आणि जड कपडे, तोंडात असणारे हुक्का-बिडी, सदैव पडत असलेल्या थंडीत कमीत कमी उघडले जाणारे तोंड व त्यामुळे त्यानुरूप तयार झालेल्या भाषांचा वापर हे सारे स्थळाशी असलेल्या आदिवासी नात्याला अधोरेखित करते.
अन्नाचे म्हणाल तर पहाडी बकरा, कोमडी इत्यादींचे मांस ह्यांच्या जेवणात नित्य असते, त्याच सोबत राजमा, सोयाबीन, पनीर व लाहुल सारख्या भागात उगवणारा बटाटा आणि लाल कोबी ह्यांचे हिमाचली समूहांमध्ये मुबलक सेवन होते. तीच बाब त्यांच्या गायन वादन नर्तनाच्या बाबतीत. हिमाचली पहाडी ‘नाटी’ हे नृत्य अधिकतर एका जागेवरच स्थिर राहून हातापायांच्या अगदी मोजक्या व संथ हालचाली करून सादर केले जाते.
परंतु जसजसे तुम्ही हिमाचलकडून पंजाबकडे सरकू लागता, जमीन सपाट होत जाते व वातावरण उष्ण, तसतशी प्रचंड वेगवान व आक्रमक हालचाली आणि उंच उड्या मारून होणारी नृत्य पहायला मिळू लागतात.
ईशान्येकडे दृष्टी वळवल्यास दिसते कि येथील आदिवासी समाज दक्षिण-पूर्व आशियाई भूतान, चीन, बर्मा सारख्या देशांच्या जवळ असल्यामुळे व अनेक समाज तिकडूनच स्थलांतरित होत होत ब्रह्मपुत्रेच्या काठी स्थिरावले असल्यामुळे, ह्या देशांच्या संस्कृतींशी ह्या आदिवासी समाजांचा दाट संबंध असतो.
मग त्यांच्या सानुनासिक भाषा असोत, कापड विणण्याच्या पद्धती असतो वा मासे, पोर्क खाणे असो किंवा अगदी अवरोही चालीतील त्यांच्या गायन परंपरा असोत.
अरुणाचल व आसाममध्ये राहणारे ‘मिसिंग’ ह्या सारखे आदिवासी समाज नदीकाठी राहत असल्यामुळे बांबूने जमिनी पासून वर खेचलेली घर बांधतात.
ह्या घराखालीच त्यांचे पाळीव पशु देखील राहतात. ब्रह्मपुत्रेकाठी अनेक शतकं राहत असल्यामुळे ह्या महाकाय नदीचा स्वभाव ह्या समूहाला नीट माहित असतो, मिसिंग आदिवासी म्हणतात - “आमचे पणजे खापरपणजे आसाममध्ये आले तेंव्हा पासूनच ही नदी वळते तसे आम्ही वळत आलेले आहोत, पण तुम्ही गेली काही दशके ह्या महाबाहू नदीला तुमच्या मर्जीप्रमाणे वळवायच्या भानगडीत पडलात, परिणाम काय तर दर वर्षी भयानक पूर येतो इथे! तुम्ही सारे तर सुरक्षित राहता, घरं मात्र वाहून जातात आमची!” ह्याच धर्तीवर आज ब्रह्मपुत्रेचा अभ्यास करणारे संशोधक सरकारला सांगू लागले आहेत, ह्या पुढील काळात ‘ईंडीजीनस विझडम’ अर्थात देशीय प्रज्ञेचा आधार न घेता ब्रह्मपुत्रेवर बांधलेले कोणतेही बांध किंवा घातलेली भर प्रलयकारी ठरेल.
‘डॉईन पोलो’ हाच आपला धर्म आहे हे आदिवासी जाणतात
ही ‘देशीय प्रज्ञा’ म्हणजे काय? तर ह्याच मिसिंग आदिवासी समाजातील 90 वर्षाच्या एखाद्या आज्जीला तुम्ही विचारले कि ‘राष्ट्र’ म्हणजे काय? तर तिला ही संकल्पना सोडवून सांगता येणार नाही कदाचित; परंतु नदीकाठील जमीन, तिचा भोवताल, तेथील प्रकृती, पाण्याची दिशा, तिथे असलेल्या पशु पक्षी व जीव जन्तु ह्या सर्वांशी तिचा असलेला संबंध तिला खूप नीट ठाऊक असतो.
तसच ‘डॉईन पोलो’ म्हणजेच चंद्र सूर्य हे आपले खरे मायबाप आहेत व त्यामुळे ‘डॉईन पोलो’ हाच आपला धर्म आहे हे ती जाणते. हा ‘सीमबायोटिक’ अर्थात सहजीवनात्मक संबंध अडचणीत कधी येतो? तर जेंव्हा आपला ‘engineering ego’ निसर्गापेक्षाही मोठा होऊन जातो व जेंव्हा आपल्याला असे वाटू लागते कि आपण जमिनीला, नदीला, डोंगरांना आपल्याला हवे तसे वागवू, वाकवू व वापरू शकतो.
परंतु आज पर्यावरणशास्त्री आवर्जून नोंदवतात कि जर आपण जमीन वापर अमुलाग्र बदलला तर आपल्या आसपास शत्रूसारखे वागणारे विचित्र विषाणू तयार होतात. ह्या संदर्भात लक्षात येण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे – “निसर्ग ही माणसाने ओरबाडायची गोष्ट नसून टरकून राहण्याची, आणि म्हणूनच पूजा करायची गोष्ट आहे”, हे आदिवासी स्वानुभवाने जाणतात. ह्या अनुभूतीचे प्रतिबिंब त्यांच्या एकूण जगण्यात, दिनचर्येत, गायन-वादन-नर्तन परंपरेत व कर्मकांडामध्ये दिसते.
महाराष्ट्राच्या सह्याद्री खोऱ्यातील वारली आदिवासी आपले तारपा हे वाद्य वाजवत म्हणतात, आज देव करायचाय. म्हणजे काय तर रात्रभर नाचून गावाचा देव ‘गावदेव’, अन्नाची देवी ‘कणसरी मात’ आणि प्राण्यांचा देव ‘वाघदेव’ ह्यांच्या समोर घुमत घुमत प्रार्थना करायची कि जंगल्यातल्या पाशवी शक्तींपासून आमचे, आमच्या पाळीव पशुंचे व ह्या गावाचे रक्षण करा.
ह्या समाजातील पुरुष ‘रवाळी’ करतात तेंव्हा ते गाव सोडून जंगलात जाऊन राहतात. मांस, मद्य, शिकार ह्या सर्वांचा त्याग करून आठवडा भर उपवास करून जंगलाची माफी मागतात; कि जंगल देवा, आमच्या जगण्यामुळे तुला दुखावले गेले असल्यास आम्हाला माफ कर.
जंगल असो कि तळे, ते राखायचे असते ही उपजत समज असलेले महाराष्ट्र - गुजराथ - मध्यप्रदेश सीमेवरील राठवा भिल्ल आदिवासी समाज देखील तळ्याकाठी गोलाकार करून फक्त पोटापुरती मासेमारी करतात, सर्व मासे एकाच टोपलीत जमवतात व तुझं माझं न करता शेवटी प्रत्येकाला समान वाटणी केली जाते.
अति संचय, अति लोभ, व अति स्पर्धा हे अन्नसुरक्षाचक्राचे पक्के शत्रू आहेत हे ह्या समाजाला नेमके समजते. हे लहान लहान आदिवासी समाज जणू एका आदिम साम्यवादाचे यशस्वी प्रतिनिधित्व करत असल्यासारखे भासतात, परंतु त्याच बरोबर अन्य सर्व मानवी समाजांप्रमाणेच गतिशील असलेले हे समूह कुठल्याश्या गोठलेल्या एकच एक विचाराधीन जगत नसून स्वतःच्या भोवतालात होत असलेल्या प्राकृतिक बदलांची नोंद घेत त्यानुसार स्वतःला बदलत असलेले दिसतात.
म्हणून आदिवासी समाजांच्या ‘देव’ ह्या संकल्पनेत बराच बदल झाला
राठवा भिल्ल असोत कि वारली, हे पोटापुरती शेती करायला लागल्यापासून शिकारीवरचे त्यांचे अवलंबन कमी झालेले दिसते. मध्य भारतातील बैगा हे आदिवासी म्हणतात, “जल, जंगल, जमीन व त्यात राहणारे जीव ह्यांची स्थिती व लय जाणून त्यांच्याशी सामंजस्यानेच वागले पाहिजे, किंबहुना माणसाच्या जगण्यासाठी ते गरजेचेच आहे.
पृथ्वीशी केलेला विचित्र खेळ देवाच्या इच्छे विरुद्धचा असतो आणि म्हणूनच कालांतराने माणसाच्याही विरोधात जाणाराच ठरतो.” इथे आदिवासी ‘देव’ ह्या संकल्पनेचा विचार कसा करतात हे लक्षात घ्यायला हवे, मुळातच निसर्गाच्या फार जवळ असल्यामुळे हे समूह पंच महाभूतांच्या विराट शक्तींचा प्रत्यत वारंवार घेत असतात, आणि मग आपसूकच त्यांच्यात मानवी अस्तित्वाच्या खुजेपणाची जाणीव बळकट होते जाते – ह्यातूनच एक समर्पणाची भावना तयार होऊन हे समाज निरनिराळ्या निसर्ग शक्तींकडे देव म्हणून पाहू लागतात.
गम्मत म्हणजे, निसर्गातील प्रत्येक घडामोड व अवघे विश्वच सतत गतिमान असल्याचा साक्षात्कार झालेले आदिवासी समाज कोणत्याही अध्यात्मिक परंपरा जोपासतांना दिसत नाहीत, कारण अधिकतर अध्यात्मिक परंपरांमध्ये माणसांनी त्यांची गतिमान अवस्था सोडून स्थिर राहण्याचा अभ्यास करायचा असतो.
ह्याचा एक अर्थ असा देखील लावता येऊ शकतो कि अध्यात्मिक परंपरांचा संबंध अधिकतर नागरी समाजांशी आहे, आदिम समाजांशी नव्हे.
पुढे जेंव्हा ह्या निसर्ग-धर्म पाळणाऱ्या समूहांचे ध्रुवीकरण होऊन हिंदू आदिवासी, बौद्ध आदिवासी, ख्रिश्चन आदिवासी असे तुकडे होत गेले तेंव्हा मात्र आदिवासी समाजांच्या ‘देव’ ह्या संकल्पनेत बराच बदल झालेला दिसून येतो.
उदा: आसाम मधल्या काही घरांमध्ये पती आपला आदिम धर्म पाळतांना तर पत्नी नव-वैष्णव होऊन शंकर देव ह्यांनी स्थापित केलेल्या वैष्णव नाम-घरात जाऊन कृष्ण-पूजा करतांना दिसतात.
दक्षिणेची गोष्ट अजून निराळी. इथे कोया, इरुला, नायका, तोडा, थोट्टी, पाणिया व ह्या सारखे इतर अनेक आदिवासी समाज वास्तव्य करतात. केरळचे ‘पाणिया’ आदिवासी वायनाडच्या जंगल परिसरात फक्त एक बारक्या लुंगीत उघड्याबंब शरीराने वावरतांना दिसतात.
‘
पाणिया’ ह्या शब्दाचा अर्थ समजावून सांगतांना म्हणतात, ‘पाणिया’ म्हणजे कामकरी. काम करणारी माणसे. जंगलातील प्रत्येक झाडाचे गुण अवगुण व त्याचे औषधी उपयोग पाणियांना ठाऊक असतात.
परंतु इंग्रजांनी ह्या देशातील अनेक आदिवासी समूहान सारखेच पाणिया ह्यांना देखील स्वतःचेच जंगल तोडण्याच्या कामास लावले.
जंगलाशी तादात्म्य साधलेले हे समूह आज उभे जंगल डोळ्या देखत तुटून पडतांना पाहून ‘किक्यारी’ नाही करणार तर आणखी काय करणार?
मुंबईच्या इको सिस्टमचा प्राण असलेल्या आरे जंगलात जेंव्हा सरकारने अमानुष झाडतोड सुरु केली तेंव्हा तिथे राहणाऱ्या वारली समाजाने शहरी माणसांना स्वतःचे दुक्ख व संताप समजावे म्हणून ‘वारली रिव्होल्ट’ ह्या नावाने आधुनिक RAP गाणी तयार करून यु ट्यूब वर ती प्रसारित केली, व अश्या तर्हेने स्वतःचे आंदोलन तीव्र करत नेले.
ह्यावरून पुन्हा एकदा आपल्या लक्षात येते कि ‘आदिवासी’ ही संकल्पना काळाच्या कुठल्याश्या कोपऱ्यात गोठलेली नसून अन्य सर्व मानवी समाजान प्रमाणेच जिवंत व गतिशील आहे व त्यामुळेच सातत्याने बऱ्या व वाईट दोन्ही प्रकारच्या बदलांना सामोरी जात आहे.
आदिवासीचे स्थळाशी असे घट्ट मैत्रीचे नाते असते हे आपण पाहिले, परंतु उघड आहे कि एका मर्यादित स्थळाशी ते असते. इथे महत्वाचे काय तर मर्यादित स्थळात राहून देखील आदिवासींना निसर्गाच्या अमर्याद शक्तींची नीट जाण असते.
उदा: राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश मिळून अंदाजे दोन कोटी भिल्ल आदिवासी आहेत आपल्या देशात, ह्या विशाल भिल्ल पट्ट्यात असंख्य निरनिराळे भिल्ल समाज निरनिराळ्या भू भागात राहतात व त्यांची एकमेकांशी ओळख असेलच अशी खात्री देता येत नाही.
राठवा भिल्ल ह्या पूर्व गुजरातमध्ये राहणाऱ्या आदिवासी समूहाचे हे गीत पहा – “बेनी ने सासरी, घणी दूर रे! वाटे दिवस उगसे!” त्यात बाप आपल्या विवाहित मुलीच्या आठवणीत गात आहे, कि मुली लग्न करून तू इतकी दूर गेली आहेस कि मी रात्रभर वणवण चाललो आणि दुसऱ्या दिवशी सूर्य माथ्यावर आला तरी मी तुझ्या गावी पोहचू शकणार नाही!
अधिकतर पायी चालणारा हा आदिवासी समाज त्याच्या स्थळाच्या, जगण्याच्या मर्यादा जाणतो! मग ह्या आदिवासीच्या खेळाचे अंगण ते कोणते?
तर असे दिसते कि स्थळाने निर्माण केलेली सगळी मर्यादा आदिवासी TIME अर्थातच ‘काळ’ ह्या संकल्पनेशी खेळ करत भरून काढतात! आदिवासी मिथके, उत्पत्ती गाथा इत्यादी पाहिले तर त्यात काळाची कधी सरळ, तर कधी चक्राकारी, त्याच बरोबर कधी जादुई मांडणी केलेली दिसते. ह्या गाथांचे पठन करतांना आदिवासी गुरु-मांत्रिक-तांत्रिक अचूक ट्रान्स मध्ये जातांना दिसतात.
इतर सर्व मानवी समाजान प्रमाणे आदिवासी समाज देखील “हे सर्व कोठून आले?” वा “आपण नक्की कोण?” अश्या स्थळ-काळाशी निगडीत, अस्तित्ववादी प्रश्नांनी पछाडलेले दिसतात. अनेक आदिवासी समाजाचा कुळ-देव एका कुमारिकेच्या पोटी जन्माला आल्याच्या कथा आढळतात.
उदा: राठवा भिल्लांचा बाबा पिठोरा हा काळी कोयल ह्या कुमारिकेच्या पोटी तर मध्य भारतातील गोंड आदिवासींचा पूर्व-पुरुष बडा देव हा काली कन्काली ह्या कुमारिकेच्या पोटी जन्माला आला हे सांगणाऱ्या उत्पत्ती गाथा दिसतात.
मानवी जन्माच्या, अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या ह्या संदिग्धते भोवती नित्शे किंवा फुको सारखे आधुनिक अभ्यासक देखील दीर्घ काळ रेंगाळलेले दिसतात. परंतु गम्मत अशी कि आदिवासी समाज जशी स्थळ-मर्यादा अनुभवायचे, तशी टेक्नोलॉजीच्या बाहुपाशात विसावलेले मानवी समाज आज काळ-मर्यादा अनुभवतात.
म्हणजे काय ते कोविड-काळात अडकून पडलेले आपण सर्व नीटच जाणतो! आपल्याला भूत-वर्तमान-भविष्य हे सर्व काळ विरघळून गेल्यासारखे भासतात.
अजून उकल करून सांगायचे झाले तर आपल्यासारखे विकसनशील समाज व देश तरी अजून काळाच्या थोड्या गतीविधींचा अनुभव घेऊ शकत आहोत, परंतु पूर्ण विकसित समजल्या जाणाऱ्या, बह्वांशी यंत्रांवरच अवलंबून जगणाऱ्या देशांसाठी काळ आता फक्त एक मेंदू बधीर करणारं कोडं बनून शिल्लक राहिलेला दिसतो.
परिणामतः ‘आधुनिक’ समाज सुखी आणि समाधानी होण्या ऐवजी अधिक अस्वस्थ आणि हिंसक झालेला आढळतो.
कोण म्हणतं, आदिवासी समाज हिंसक असतो?
हिंसा आणि आदिवासी ह्या संदर्भातील एक प्रचलित मिथक म्हणजे, “आदिवासी समाज हिंसक असतात”. परंतु वस्तुस्थिती ह्या मिथकाहून अगदीच निराळी दिसते. उदाहरणच द्यायचे झाले तर, गेल्या एक तपाच्या प्रदीर्घ सहवासात मी एकदाही त्यांच्या घरातील लहान मुलांवर आदिवासींनी हात उगारलेला पाहिलेला नाही.
तर ह्या उलट लहान मुलांना ‘शिकवून सोडण्याच्या’ अट्टहासा ऐवजी मुलांना सामुहिक रीत्त्या अनेक गोष्टी आपल्या आपण शिकू देणे, आत्मसात करू देणे असे दिसते. त्याच बरोबर स्त्री-पुरुष भेद अगदीच नगण्य असणे, नवरा गेल्या वर स्त्री कडे जमीनजुमला व संपत्तीचे संपूर्ण हक्क असणे व त्या स्त्रीला कोणताही सवाल जवाब न करता पुनर्विवाह करण्याची मुभा असणे, किंवा स्वतःच्या आवडीच्या सोबत्या बरोबर राहण्याचे हक्क असणे अशी अनेक ‘आधुनिक’ उदाहरणं आजही आदिवासी समाजान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.
मग हिंसा व प्रेम ह्या प्राकृत भावनांचा अर्थ नक्की कसा लावतात आदिवासी? आदिवासी कथा, गीते व काही विशेष सण-परंपरांमध्ये ह्याचे नेमके उत्तर सापडते.
गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर राहणाऱ्या गावित/गामित, मावची ह्या भिल्ल समाजात काही अंशी होळीच्या सुमारास अजूनही एक प्रथा पाळली जाते कि समजा एखाद्या मुलीने एका मुलाला ‘नांदायला’ स्वतःकडे बोलावले आणि न करो जर तो नाही म्हणाला, तर त्या मुलीच्या मैत्रिणी मुली समवेत त्या मुलाच्या गावी जाऊन त्याला रीतसर उचलून आणतात, व त्याला जो पर्यंत ती मुलगी संतुष्ट होत नाही तो पर्यंत तिच्या सोबत नांदावेच लागते. व पूर्ण गाव ह्या प्रथेचा पुरस्कार करत असल्यामुळे कुणीही मुलींना अडवत नाही.
इथे प्रेम व हिंसा ह्यातल्या सीमारेषा पुसट झालेल्या दिसत असल्या तरी अश्या उन्मुक्त लैंगिकतेच्या भोवती घट्ट विणलेली अशी ही स्त्री-सत्ताक आदिवासी प्रथा आपल्यासारख्या ‘शहरी’ लोकांना नक्कीच रोचक वाटते.
स्त्रीच्या मुक्त लैंगिकतेचा पुरस्कार करणारी जमात
स्त्रीच्या मुक्त लैंगिकतेचा पुरस्कार करणारी अजून एक अत्यंत महत्वाची कथा डुंगरी भिल्ल ह्या राजस्थान - गुजरातच्या सीमेवर राहणाऱ्या समूहाच्या मौखिक महाभारतात सापडते. ज्यात नाग वासुकी व द्रौपदीची उत्कट प्रेम कहाणी गायली जाते.
महाकाय वासुकी नागा समोर अर्जुन अगदीच किरकोळ योद्धा ठरतो आणि वासुकी स्वतःच्या मिशीच्या फक्त एक केसाने अर्जुनाला घट्ट बांधून खुंटीवर टांगून ठेवतो असे विनोदी पण मार्मिक वर्णन ‘धोफा अने वासंग’ ह्या भिल्ल कथेत सापडते. इथे लक्षात घ्यायला हवे कि हा तोच नाग वासुकी आहे ज्याचे व ज्याच्या बांधवांचे खांडव वन कृष्ण व अर्जुनाने मिळून जाळून टाकले होते. (यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग, असुर हे सर्व निरनिराळे आदिम समाज होते हे वेगळे सांगायला नकोच.)
परंतु आज ह्या आदिवासी कथांचा अर्थ लावतांना बुचकळ्यात पडायला होते कि अश्या असंख्य महाभारतान पैकीचे नक्की कोणते महाभारत आधी रचले गेले असावे? मौखिक परंपरांमध्ये नेमकी तारीख शोधून काढता येत नसल्यामुळे इतिहास व मिथके एकमेकांमध्ये मिसळून जात स्वतः भोवती एक संदिग्ध वलय तयार करतांना दिसतात.
पण जेंव्हा तुम्ही डुंगरी भिल्ल समाजातील वडील माणसांना ‘धोफा अने वासंग’ ह्या कथेचा तर्क काय असे विचारता तेंव्हा ते सांगतात, “आमचा भिल्ल समाज असे मानतो कि प्रत्येक स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती असून तिच्या आवडीच्या कोणत्याही जोडीदाराशी संग करू शकतेच, स्त्री म्हणजे काही तिच्या नवऱ्याची खाजगी मालमत्ता नव्हे!” हिमाचलच्या लाहुल जिल्ह्यातही काही ठिकाणी ‘polyandry’ अर्थात बहु-पतित्व प्रथा आढळतात.
मुक्त लैंगिकतेचा पुरस्कार करणाऱ्या अन्य आदिवासी प्रथा सुद्धा आढळतात, जसे कि भिलाला हा मध्यभारतातील आदिवासी समाज ‘भगोरिया मेला’ नावाची दर होळीला एक जत्रा भरवतो.
त्यात तरूण तरुणी आपल्या आवडीच्या जोडीदाराचा हात हातात घेऊन राजरोस पळून जातात, ही प्रथाच तशी आहे. काही काळ आपापल्या गावांपासून लांब राहून मजुरी करून ही जोडपी थोडे पैसे जमवतात, कधी कधी त्यांना मुले देखील होतात, मग हे दोघे ठरवतात कि आपले नीट जमले आता व काही पैसे देखील गाठी बांधले आहे, तर चला आता गावी परत जाऊन गाव जेवण घालुयात – लग्न करूयात.
आजही आदिवासी पाड्यावरच्या शाळांमध्ये “माझ्या आई बापाचे लग्न आहे आज, सुट्टी द्या!” असे सांगणारी छोटी मुले आवर्जून दिसतात. अश्या चालीरीती पाहिल्यात कि आदिवासी विश्वात प्रेम ही संकल्पना जास्त मोकळी, कोणत्याही प्रकारचे लैंगिक दमन नाकारणारी अशी दिसून येते.
गोटुल आणि बालीफूल… आदिवासींच्या विलक्षण प्रथा
बस्तर मधील गोंड आदिवासींची ‘गोटूल’ ही व्यवस्था देखील अशीच ज्यात पौगंडावस्थेतील मुल मुली एकत्र येऊन आपल्या लैंगिकतेचा शोध घेतात, ती समजून घेतात इतकेच नव्हे तर ह्या गोटुलमध्ये राहून गोंड समाजाच्या अन्य चालीरीती व संस्कार ग्रहण करतात, कला क्रीडा इत्यादीत कौशल्य प्राप्त करतात.
ह्याच बस्तर मध्ये ‘बालीफूल’ नावाची एक प्रथा आहे, ज्यात दोन व्यक्ती जर एकमेकांवर प्रेम करत असतील व एकत्र राहू इच्छित असतील तर दसरा होळी सारख्या सणाच्या दिवशी गावासमोर एकमेकांच्या कानात फुल (बाली) घालतात, ज्या द्वारे गावाला समजते कि ही दोघे येथून पुढे एक जोडपं म्हणून राहणार आहेत, त्या दोघांना एकत्र नंद्तांना कोणताही त्रास होणार नाही ह्याची काळजी पूर्ण गाव घेते.
मात्र रोटी बेटी व्यवहार नसलेल्या दोन गावांमधील तरुण तरुणी जर ‘भगोरिया’ सारख्या जत्रे मधून पळून गेलेत तर दोन्ही गावातील मुखीयांना ह्यासाठी दोषी धरून दंड दिला जातो, म्हणजेच आपल्या गावातील तरुणांवर झालेल्या संस्कारांची जवाबदारी मोठ्यांनी उचलायची असते व त्यात चूक झाली तर लहानांना दंडित करायचे नसते अशी धारणा बाळगून असतात हे आदिवासी समाज.
त्याच प्रमाणे विभक्त कुटुंब ही एक आधुनिक व शहरी संकल्पना आहे असे आपल्याला वाटते परंतु महाराष्ट्रातील कातकरी समाजाकडे पाहिले तर पोरा पोरीचे लग्न करायचे ठरल्यावर दोन्हीकडचे आई बाप मिळून गावात अन्य ठिकाणी ह्या तरुण जोडप्यासाठी एक निराळी झोपडी बांधून देतात, ज्यात ह्या जोडप्यानी स्वता:चा स्वतंत्र संसार थाटायचा असतो.
वरील सर्व उदाहरणे पाहिलीत कि आदिवासी समूहांच्या तुलनेत स्वतःला ‘प्रगत’ म्हणवणारे आपले नागरी समाज खरंतर किती बुरसटलेले आणि पुरुष सत्तेच्या आहारी गेलेले आहेत हे उघड होते. परंतु सध्या ह्या प्रगतीचा विळखा आदिवासी विश्वाभोवती देखील घट्ट झालेला दिसतो व ‘आदिवासी’ आणि ‘नागरी’ अशी द्विती हळूहळू गळून पडतांना दिसते.
ह्याचा एक चांगला परिणाम असा कि बहुतेक आदिवासी समाज आता त्यांच्या बालविवाह, पशुबली इत्यादी सारख्या कुप्रथा सोडून एका अधिक विस्तृत विश्वाचे वाटेकरी बनू लागले आहेत.
ह्या सगळ्या संक्रमणाचा सर्वाधिक परिणाम जर कुणा आदिवासी समूहांवर झाला असेल तर ते भटके विमुक्त. बंजारा, मदारी, मीणा, छारा, ठग, पारधी, लम्बाडी, देव्हार असे अनेक घुमंतू समूह पाहिले कि लक्षात येते ह्या समूहांच्या सतत बदलत राहणाऱ्या ठिकाणांमुळे ह्यांच्या स्थळ-काळाच्या जाणीवा एका ठिकाणी स्थिर राहणाऱ्या समूहांपेक्षा खूप वेगळ्या असतात.
ह्या पैकी अनेक समूह भारतीय स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीकारींचे हेर म्हणून काम करत, ह्यांच्या भाषा सांकेतिक ‘कोड’ म्हणून वापरल्या जाऊन क्रांती संदेश पोहोचवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाई, ह्यावर सूड म्हणून इंग्रजांनी ह्या सर्व समूहांना ‘गुन्हेगार समाज’ म्हणून घोषित केले व त्यांना मुख्य नगरांच्या बाहेर फेकून दिले.
स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित नेहरूंनी ह्या समूहांना ‘विमुक्त’ म्हणून जाहीर केल्यानंतर देखील ‘गुन्हेगार’ हा काळिमा मात्र पुसला गेला नाही व तथाकथित सभ्य समाजाने ह्यांना कधीही आपलेसे केले नाही, आजही विमुक्तांचा स्व-हक्कांसाठीचा संघर्ष सुरु आहे.
अपार हाल-अपेष्टा व अपमान सोसलेल्या ह्या भटक्या समूहांकडे जीवनाकडे अलिप्तपणे पहायची एक खास दृष्टी असते. छत्तीसगडच्या देव्हार ह्या विमुक्त समाजाचे एक गाणे आहे;

“माते रहिबे, माते रहिबे, माते रहिबे गा.. गठीया गांजाला पी के माते रहिबे.. पानेलां खाएं मुहुला करे लाल .. माया झन करबे हो जाही जी के काल!” अर्थात, “मस्त रहा माणसा.. मस्त राहा.. गांजा व भांग लावून मस्त रहा.. लक्षात ठेव, जसे पान खाल्ले कि जीभ रंगतेच रंगते, तसेच प्रपंचाच्या मायेत अडकलास तर जीवाला घोर लागणे आलेच!” ढोल-मांदल अशी पारंपारिक वाद्य वाजवत समूहाने अद्भूत गायन करणारा हा देव्हार समाज भलताच संमोहक आहे.
आदिवासींशी आपला तथाकथित ‘मुख्य प्रवाह’ मात्र कसा वागतो?
खरंतर इतके अद्भूत वैविध्य असलेल्या ह्या निरनिराळ्या समाजांना एकच ‘आदिवासी’ ह्या संकल्पनेत कोंबणे हे देखील क्रूरच नाही का? तरी देखील, एकूणच ‘आदिवासी’ प्रज्ञेचा आवाका काय हे ह्या सर्व समूहांच्या दैनंदिन सहवासात राहिले कि समजते एवढे मात्र खरे.
“मनुष्य हा ब्रह्मांडाच्या केंद्र स्थानी नसून या अखिल सृष्टीत एक पुसटश्या ठिपक्या सारखा आहे फक्त!” असे आपल्या हाकेतून वारंवार सांगणाऱ्या आदिवासींशी आपला तथाकथित ‘मुख्य प्रवाह’ मात्र कसा वागतो? तर एकी कडे आदिवासी समूहांनी त्यांच्या परंपरा, त्यांचे ‘आदिम’ जगणे, त्यांचे संचित जपले पाहिजे असा स्वप्नील आग्रह धरतो, तर दुसरीकडे विकासाच्या अट्टाहासापायी त्यांच्या भोवती असलेल्या सर्व नैसर्गिक संपदा लुबाडून त्यांना विस्थापित करतो.
हा धागा वेधकपणे उलगडून दाखवणारे “आदिवासी नहीं नाचेंगे!” हे पुस्तक सध्या खूप गाजतेय. मुख्य प्रवाहाच्या ह्या दुटप्पीपणाचे आणि आपण चालवलेल्या निर्दयी लुटीचे भयंकर परिणाम तर आता उघड उघड दिसू लागलेलेच आहेत.
हे परिणाम आपणही आदिवासींइतक्या तीव्रतेने नसेल, पण भोगतच असतो - तरी देखील प्रगतीच्या रेट्यात आपण ओढले गेल्यामुळे आपल्याला ही मांडणी एकांगी व मानव-विकास-विरोधी आहे असे वाटू शकते. असा प्रश्नही पडू शकतो कि जेंव्हा ‘आदिवासी’ स्वतः देखील आता ‘आदिवासी’ राहिलेले नाहीत तेंव्हा काय आपण सर्वांनी ‘आदिवासी’ बनून जगायचे कि काय?
मुळीच नाही. नीट विचार केल्यास लक्षात येते कि मूळ प्रश्न विकासाच्या नावाखाली चाललेल्या फक्त आदिवासीच नव्हे, तर संपूर्ण जीवसृष्टीच्या होत चाललेल्या विस्थापनाचा आहे. त्यात आपणही आलोच ना, व हे विस्थापन केवळ भौतिक नसून मानसिक, बौद्धिक व अध्यात्मिक देखील आहे.
खरंतर आपल्या आदिम प्रज्ञेशी आधुनिक विज्ञानाची सांगड घालून एक सम्यक विकास साधणे माणसाला शक्य असूनही तो पर्याय आपण निवडलेला नाही. आणि हे तर आपण जाणतोच कि जशी एक नदी मागे वळून बघू शकत नाही तशीच मानवी ‘उत्क्रांतीत’ परत फिरायची सोय नसते.
मग पुढे काय? आदिवासींची आपण आत्ता पर्यंत कधीही न ऐकलेली हाक, त्यांची ‘किक्यारी’ निदान आता तरी ऐकणार आहोत काय?
हाच प्रश्न ‘वारली रिव्होल्ट’ ह्या आदिवासी गाण्याची एक ओळ देखील विचारते, “पहा तर तुमचे ढोंग, एवढे पैसे छापतय कोण.. झाडे आमची कापतय कोण नि जंगलात मेट्रो मागतय कोण?”
(पूर्व प्रकाशित "सजग" २०२३)






