परळीचे वैजनाथ मंदिर… त्या मंदिराच्या परिसरात ठेवलेली एक टोपली आणि त्या टोपलीत असलेलं एक नवजात अर्भक… लहानपणाच्या फक्त इतक्याच आठवणींचा आधार घेत नेहा आपल्या जन्मदातांच्या शोधात तब्बल 21 वर्षांनी फ्रान्समधून थेट परळीमध्ये पोहचली आहे…
नेहा असान्ते… फ्रान्सची एक 22 वर्षांची पदवीधर तरुणी! शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सध्या नेहा फ्रान्समध्ये स्थलांतरित झालेल्या मुलांना शिकवण्याचे काम करतेय. या नेहाला आता भारताची ओढ लागलीये. आपल्या गरीब आई-वडलांनी आपल्याला का फेकून दिलं हे तिला जाणून घ्यायचयं… कोणत्या मंदिर परिसराच्या एका टोपलीत आपल्याला ठेवलं होतं तो परिसर तिला डोळे भरून पाहायचाय… कोणत्या भल्या माणसाने टोपलीतून अलगद उचलून बालिका आश्रमाच्या सुपुर्द केले त्या भल्या माणसाला तिला भेटायचयं… तिचा आई-वडिलांवर जराही राग नाहीये, ओढवली असेल त्यांच्यावर तशी परिस्थिती, त्यामुळे त्यांना तिने कधीच माफ केलयं परंतू ते के दिसतात हेच फक्त तिला पाहायचयं… अन् त्याचसाठी नेहा परळीत दाखल झालीये.

जन्मदातीने नकोशी म्हणून 22 वर्षांपूर्वी तिला सोडले होते ईश्वराच्या दारी..
8 जून 2002 ची एक सकाळ… परळी वैजनाथ मंदिरात झाडू मारताना एका महिलेला
अचानक एका लहानग्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मंदिर परिसरात एका कोपऱ्यात ठेवलेल्या टोपलीतून तो आवाज येत होता. ती महिला त्या टोपलीच्या दिशेने चालू लागली आणि जवळ जाताच तिला आश्चर्याचा धक्काच बसला. टोपलीमध्ये अवघ्या महिन्याभराचे एक गोड लेकरू रडत होतं. धावत धावत ती महिला मंदिराचे कर्मचारी विनायक खिस्ते यांच्याकडे गेली आणि काय घडलं ते त्यांना सांगितलं. विनायक खिस्ते लगबगीने बाहेर आले आणि त्यांनीही टोपलीच्या दिशेने धाव घेतली. कोणीतरी एका महिन्याच्या त्या चिमुरडीला टोपलीत टाकून पळ काढला होता.
विनायकरावांनी लगेचच पोलिसांशी संपर्क केला, पोलीस आले आणि पोलिसांनी लगेचच त्या तान्ह्या लेकरूची पंढरपूर बालिका आश्रममध्ये रवानगी केली. आश्रम चालकांनी तिचं नाव स्नेहल ठेवलं. या बालिका आश्रमात मुल दत्तक घेण्यासाठी अनेक दाम्पत्य यायचे. फ्रान्सचे असान्ते दाम्पत्य हे मुल दत्तक घेण्यासाठी 29 जून 2002 रोजी या आश्रमात दाखल झाले आणि त्यांनी स्नेहलला कायदेशीररित्या दत्तक घेतले. आणि अशा रितीने स्नेहलची झाली नेहा असान्ते आणि तिचा प्रवास झाला परळीपासून थेट फ्रान्सच्या दिशेने…

नेहापासून तिचे पालकत्व स्वीकारलेल्या आई-वडिलांनी एकही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. नेहा हळूहळू मोठी होत गेली, तिने तिचे पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवीधर झाल्यानंतर नेहा फ्रान्समध्ये असलेल्या विस्थापित मुलांना शिकवू लागली. हे सगळं एकाबाजूला होत असताना दुसरीकडे मात्र नेहाची सतत चलबिचल होत होती. तिच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे तिला सापड नव्हती आणि अखेर या प्रश्नांची उत्तरे सोडण्यासाठी नेहा दाखल झाली थेट बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये…
नेहाची परळी भेट आणि जन्मदात्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न हे सगळं जुळवून आणलयं पुण्याच्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली पवार यांनी. नेहाने या कामासाठी नेदरलँडच्या ‘अगेन्स्ट चाईल्ड ट्राफिकिंग’ या संस्थेची मदत मागितली. या संस्थेच्या अरूण ढोले यांनी संपर्क साधला पुण्याच्या त्यांच्या सहकारी “ॲड़प्टी राईट्स काऊन्सिल’च्या अंजली पवार यांच्याशी. अंजली पवार यांनी 2020 पासून या शोधकार्यास सुरुवात केली. अंबाजोगाईचे सामजिक कार्यकर्ते दगडू दादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीने अंजली पवार यांनी वैजनाथ मंदिराचे कर्मचारी विनायक खास्ते यांचा शोध घेतला, तसेच परळी पोलीस ठाण्यातील त्यावेळचे काही रेकॉर्डही शोधले.
एक महिन्याच्या चिमुरडीला खिस्ते यांनी दिले होते जीवनदान!
दोनच दिवसांपूर्वी परळीत आलेल्या नेहा असान्तेने याच विनायक खास्ते यांची भेट घेतली. सत्तरी पार केलेले विनायक खास्ते नेहाला पाहून अक्षरश: रडायलाच लागले. त्यांना आजही ती घटना लख्ख आठवत होती. ‘बाईमाणूस’ शी बोलताना विनायक खास्ते म्हणाले, ‘’ती 8 जून 2002 ची सकाळ होती. नेहमीप्रमाणे मंदिरात साफसफाई करणाऱ्या बाई आल्या आणि त्यांना झाडू मारतांना एका टोपलीमध्ये बाळ दिसलं. तिने मला येऊन सांगितलं मी गेल्यावर बघितलं तर ते रडत होतं. माझ्या तोंडातून आपोआप निघालं ‘रडू नको तान्ह्या बाळा जन्म आपला हसण्यासाठी’ आणि ती खुदकन हसली. तिचं रडणं थांबलं. आमच्या मंदिराच्या सेक्रेटरीने लागलीच पोलिसांना फोन केला. मंदिरात पोलीस आले आणि कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी मलाही पोलीस स्टेशनला त्यावेळेस जावं लागलं. एका महिन्याचं लेकरू होतं आज आलंय 21 वर्षांचं होऊन’’. हे सांगतांना विनायक खिस्ते यांना अश्रू अनावर झाले.

‘आता मला माझ्या खऱ्या आई वडिलांना शोधायचे आहे’
नेहा असान्ते त्या क्षणी एका वेगळ्याच अनुभवाला सामोरे जात होती. ती म्हणाली,’’ ज्यांनी मला वाचवले त्यांना मी आता 21 वर्षानंतर भेटले आहे. त्यामुळे मी आता खूप आनंदी आणि भावनिक झालीये. मला याठिकाणी येऊन खूप बरं वाटलं. मी ती जागा बघितली जिथे मला माझ्या जन्मदात्यांनी सोडलं होतं. आता मला माझ्या खऱ्या आई वडिलांना शोधायचे आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे.’’
नेहाच्या जन्मदात्यांना शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंजली पवार यांनी ‘बाईमाणूस’ला सांगितले की, 2020 साली नेहाची केस आमच्याकडे आली. या प्रकरणात जी माहिती समोर आली ती अशी की 8 जून 2002 रोजी ही मुलगी परळी-वैजनाथ मंदिरात सापडली आणि त्या मंदिराचे कर्मचारी विनायक खिस्ते यांनी त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले. कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. त्यानंतर नेहाला पंढरपूरच्या बालिकाश्रमात दाखल करण्यात आले आणि काही दिवसानंतर पुण्याच्या प्रीत मंदिर संस्थेमध्ये तिला दाखल करण्यात आलं. पुढे 2003 ला फ्रान्सच्या एका जोडप्याने तिला दत्तक घेतले. दत्तक घेतल्यानंतर त्या मुलांना माहिती असतं की आपल्याला दत्तक घेतलं आहे आणि त्यामुळे नेहाला ही माहिती होतं. त्यानंतर माझे पालक कोण आहे? माझा जन्म कुठे झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नेहाला हवी होती. आणि तिला तिच्या खऱ्या आईवडिलांना देखील भेटायचं होतं. ही केस 2020 ला आमच्याकडे आली पण तेव्हा कोरोनामुळे नेहा भारतात येऊ शकली नाही. जेव्हा आम्ही या केस वर काम करायला सुरवात केली तेव्हा विनायक खिस्ते सापडले. ज्या पोलीस स्टेशन मध्ये ही केस दाखल झाली होती ते कागदपत्र मिळाले. मग नेहाला सांगितलं की तू एकदा इकडे ये… हे सगळं बघ. आज नेहा भारतात आलीये. तिला तिची खरी ओळख हवी आहे तिचे आई बाबा हवे आहेत.

नेहा असान्तेचे आई-वडिल कोण आहेत हे ज्यांना माहित आहे त्यांनी अंजली पवार (9822206485) यांच्याशी संपर्क करावा, नेहाची तिच्या आई-वडिलांशी भेट घडवून आणता येईल हा यामागचा उद्देश आहे. या संदर्भातील माहिती गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहान नेहा असान्ते आणि तिच्या दत्तक आई वडिलांच्या वतीने अंजली पवार यांनी केले आहे.






