आपल्या देशात करियर आणि अभ्यासाला जितकं महत्त्व आहे तितकं खेळांना नाही. बायकांच्या बाबतीत तर ही परिस्थिती अधिकच बिकट असते. मात्र, खेळांविषयी आता आपल्याकडे थोडी आवड वाढू लागली आहे. गल्ली-मैदानं यांत लहानं मुलं तसेच मोठी माणसंही क्रिकेट किंवा इतर खेळ खेळतांना दिसतात. पण यात मुलं-पुरुषांचाच सहभाग जास्त असतो. बायका-मुली कमीच दिसतात. बायकांवर लादल्या गेलेल्या रूढी-परंपरा, आणि लैंगिक भूमिका याला कारणीभूत आहेत.
खेळांना एक व्यावसायिक करियर म्हणून खेळणाऱ्या बायका सोडल्या तर केवळ आनंदासाठी, व्यायामासाठी, खेळणाऱ्या बायका कमीच दिसतात. सार्वजनिक स्थळी बायकांनी खेळणं अजूनही नवलाचं तसेच धोक्याचंही मानलं जातं. आपल्या पितृसत्ताक समाजात खेळांचीही सूटका झालेली नाही. गावातील शेतं, खाली मैदानं असो, शहरी बागा असो, सगळ्या सार्वजनिक ठिकाणी पुरुषांचाच कब्जा असतो. दिवस-रात्र इथं पुरुष जमलेले दिसतात पण बायका दिसत नाहीत.

स्वतंत्र खेळण्यात सुरक्षेचा धोका
बायकांचा संघर्ष त्यांच्या घरापासूनच सुरू होतो. यात समाजाचा दबाव असतोच. कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी, परंपरेनुसार समाजात वावरण्याची सक्ती, यामुळे बायका सार्वजनिक खेळांमध्ये क्वचितच सहभागी होतात. त्यांच्या सुरक्षेला असलेला धोका हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यामुळे इच्छा असूनही त्या खेळू शकत नाहीत. मोकळ्या मैदांनावर अनेकदा दारूडे, गुंड, यांची वस्ती असते, ज्यांच्यामुळे बायकांना तिथं जाता येत नाही. हे दुर्दैव आहे की स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षें उलटली असली तरी अजूनही सुरक्षेच्या नावावर बायकांना घरातच राहण्याची सक्ती केली जाते.
पितृसत्तेचा बालेकिल्लाः गाव
साहित्य आणि सिनेमातून गावांविषयी कितीही रोमँटीक कल्पना केली गेलेली असली तरी आजही गावात राहताना एका बाईला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. पितृसत्ता तर देशात सगळीकडेच आहे. गावात तर ती उघडपणे दिसून येते. माझ्या खासगी जगण्यात मीही याचा अनुभव अनेकदा घेतला आहे. गावात असताना मुलींना खेळण्यासाठी सुरक्षित जागा मिळू शकत नाही हे मी लहानपणापासूनच पाहिलं आहे. अजूनही परिस्थिती तशीच आहे. तसं पाहिलं तर लोकसंख्या कमी असल्यामुळे गावात खेळण्यासाठी मोकळ्या जागा जास्त असतात. पण हे अर्धसत्य आहे. कारण या मोकळ्या जागांवर पुरुषांचा ताबा असतो. गावात खेळांसाठी अधिकृत मैदानं किंवा बागा नसतात, आणि मोकळ्या शेतांमध्ये पुरुषांचाच वावर जास्त असतो.
अशात मुलींना बायकांना आपल्या इच्छा दाबून ठेवाव्या लागतात. आजही मोकळ्या मैदानांवर सैन्य-पोलिस भरतीची तयारी करणारी मुलंच जास्त दिसतात. पण मुलींची संख्या कमी दिसते. त्यामुळे एकट्या-दुकट्या मुलीला सरावासाठी जाणंही अवघड वाटतं. मग ज्यांना केवळ आनंदासाठी खेळायचं आहे त्या मुलींकडे कोण लक्ष देणार? त्यांच्यासाठी खेळाची मैदानं उपलब्ध करून देणं, खेळाची साधनं देणं यासाठी कोण प्रयत्न करणार? गावात जिथे आधीच बायका पुरुषांच्या सहवासात असहज असतात, दबावात कामं करतात, तिथं त्यांना सार्वजनिक स्थळी खेळण्याचा विचार मनातही आणता येऊ शकत नाही.
शहरात सोसायट्यांमध्ये रहिवाशांसाठी जिम, फिटनेस सेंटर, पार्क, स्विमिंग पूल इत्यादी सोयी अनेक ठिकाणी असतात. इतर स्थळांच्या तुलनेत या जागा महिलांसाठी अधिक सुरक्षितही असतात. तरीही इथं देखील बायकांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमीच असते. इथंही पुन्हा पितृसत्तेमुळे त्यांच्यावर ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत त्यातून त्यांना खेळासाठी, व्यायामासाठी मोकळा वेळ सहसा मिळत नाही. मिळाला तर घरच्यांचे टोमणे खावे लागतात. गाव असो शहर असो स्वयंपाकाची जबाबदारी बायकांवरच असते. घरातली बाकीची कामं तर असतातच.
मुलांचं-म्हाताऱ्यांचं आजारपण काढणं हेही त्यांचंच काम असतं. पाहुण्यांचा सरबराईही त्यांनाच करावी लागते. घरातली सफाई, बाहेरचा खरेदी, मुलांचं शिक्षण अशा अनेक गोष्टी त्यांना रोजच बघाव्या लागतात. यात त्यांना वेळ मिळत नाही. मिळाला तरी तो खेळासाठी द्यावा असंही तिला वाटत नाही कारण तशीच तिची मानसिकता करण्यात आलेली असते.

आकडे काय म्हणतात?
‘इंडिया टुडे’च्या एका अहवालानुसार, बायकांच्या कामाच्या एका तासातील 84 टक्के वेळ घरगुती कामांवर खर्च होतो. ज्याचा त्यांना मोबदलाही मिळत नाही. पुरुष 80 टक्के वेळ घालवतात पण त्याचा त्यांना मोबदला मिळतो. फक्त 10 टक्के भारतीय पुरुष घरातील विनामोबदला कामं करणं त्यांची जबाबदारी समजतात. यातून हेच दिसतं की लैंगिक भेदभाव, पूर्वग्रह यातून बायकांना स्वतःकडे वेळ देता येत नाही, आवडत्या गोष्टी करता येत नाहीत. त्याऐवजी त्यांना घरकाम करावं लागतं. घरातल्यांचा सांभाळ करावा लागतो. त्यामुळे खेळ किंवा अन्य गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ किंवा इच्छाही उरत नाही. पुरुष कोणत्याही वयात कोणताही खेळ खेळले तरीही त्यांच्या सामाजिक प्रतिमेवर कोणी शिंतोडे उडवत नाहीत. बायकांनी असं केलं तर लगेच लोकांच्या नजरा उंचावतात, त्यावरून घरी भांडणंही होतात. सामाजिक मानदंडांच्या विरोधात या गोष्टी समजल्या जातात.
सामाजिक वाढवणूकीचा परिणाम
आपल्या समाजात लहानपणापासूनच मुलांना आणि मुलींना त्यांच्या लिंगानुसार वेगवेगळी वागणूक दिली जाते. लहान वयातच मुलींना घरकामाला जुंपलं जातं. तर मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यावर त्यांचा विशेषाधिकार मान्य केला जातो. अशा परिस्थितीत मुली जेव्हा घरकामाऐवजी मैदानात खेळायला जातात तेव्हा लोकांच्या नजरा आक्रसतात. त्यांचे प्रश्न सुरू होतात. मुलींनाही याची जाणीव होते आणि त्याही शरीरानं आणि मनानं खेळांपासून दूर होऊ लागतात. लहानपणापासून खेळणी असो, कपडे असो, मुलामुलींमधला हा लैंगिक भेदभाव सहजपणे दिसून येतो. आम्ही स्वतःला कितीही आधुनिक समजत असू पण खरं हेच आहे की, अजूनही मुलींना लहानवयापासूनच लग्नासाठी आणि घरगुती कामांसाठीच तयार केलं जातं. अशात तिच्या इच्छा, तिची स्वप्नं यांना कोणतंही स्थान नसतं. तिनं त्या प्रदर्शित केल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, किंवा त्या दाबल्या जातात. ज्यांना घरातच मोकळेपणानं वावरता येत नाही, त्यांना सार्वजनिक स्थळी निःसंकोच खेळू दिलं जाईल हे भारतीय समाजातील मुलींसाठी अजूनही एक दिवास्वप्न आहे, आपल्या समाजासाठी एक आव्हान आहे.






