गेल्या महिन्यात राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनी हेमलता बैरवा या शिक्षिकेने कार्यक्रमादरम्यान हिंदू धर्मातील देवता सरस्वतीचे चित्र लावू दिले नाही. ‘सरस्वती नव्हे तर सावित्रीबाई फुले शिक्षणाची देवता आहे’ असे म्हणणाऱ्या हेमलता यांचा निषेध करत त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. बरानच्या किशनगंज भागातील एका सरकारी शाळेत ही घटना घडली, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
हेमलता बैरवा या दलित समाजाच्या आहेत. घटना घडल्यानंतर महिन्याभराने राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. शिक्षणमंत्र्यांच्या सूचना आणि तपास अहवालाच्या आधारे हेमलता बैरवा यांना निलंबित करण्यात आले आहे. आता हेमलता यांची बदली त्यांच्या घरापासून तब्बल 600 किमी लांब असलेल्या बिकानेर जिल्ह्यात करण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनानंतर अनेक दलित संघटनांनी राज्यभर निदर्शने सुरू केली असून पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीमारही करावा लागलाय. हेमलता बैरवा यांचे निलंबन तात्काळ रद्द करा आणि शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्या अशा मागण्या दलित संघटना करत आहेत.

26 जानेवारी रोजी घडली होती घटना
कोटा जिल्ह्यातील बारन जिल्ह्यातील किशनगंज भागातील लकडई गावात असलेल्या सरकारी उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान गावकरी आणि शाळेतील शिक्षक यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याठिकाणी लावण्यात आलेल्या चित्रांमध्ये हिंदू देवी सरस्वतीच्या चित्राचा समावेश नसल्यामुळे प्रकरण तापलं. काही शिक्षकांनी यास विरोध केला. ग्रामस्थांनी येऊन चित्र ठेवण्यास सांगितले, मात्र शिक्षिकेने कुणालाही करू तसे करू दिले नाही. ग्रामस्थांनी हेमलताला सांगितले की मुलांची देवी तर सरस्वती आहे, परंतू त्यावर हेमलता यांनी उत्तर दिलं की, नाही विद्येची देवी सरस्वती नाही, विद्येची देवी सावित्रीबाई फुले याच आहेत, त्यामुळे त्यांचे चित्र ठेवण्यात आले आहे. शिक्षिकेच्या या विधानाला जोरदार विरोध झाला होता. सरस्वतीचा फोटो न लावणाऱ्या हेमलता बैरवा यांना काही गावकऱ्यांनी हिंदू परंपरेची आठवण करून दिली. त्यावर त्या संतापल्या. हिंदू, हिंदू हा काय प्रकार आहे? इथं हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे समान आहेत. हा शाळेतला कार्यक्रम आहे, असं त्या म्हणाल्या.
शिक्षणमंत्री दिलावर म्हणाले की, मोठ्या चर्चेनंतर गावचे सरपंच आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तपासाबाबत वरिष्ठांना कळवले होते. हे प्रकरण वरिष्ठ विभागापर्यंत पोहोचले असता शिक्षणमंत्री दिलावर यांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्यता समोर येईल, सत्य असेल ते करू, असे सांगितले होते. त्यानंतर तपासात शिक्षकाची चूक असल्याचे निष्पन्न झाले आणि आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेसंबंधी दोन एफआयआर दाखल झाल्या आहेत. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ग्रामस्थांनी हेमलताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे तर दुसरीकडे हेमलता यांनीही त्यांना धमकावणाऱ्या ग्रामस्थाविरुद्ध तक्रार केली आहे. हेमलता बैरवा म्हणतात की, त्यांना फक्त त्यांच्या दलित असण्यामुळे त्रास दिला जातोय आणि त्या बिकानेरला जाणार नाही.
त्या म्हणाल्या, “त्यादिवशी प्रजासत्ताक दिन होता आणि मी संविधानानुसार माझे कर्तव्य बजावत होते. सुरुवातीला शाळेतील दोन शिक्षक हंसराज सैन आणि भूपेंद्र सैन यांनी माझ्यावर सरस्वतीची पूजा करण्यासाठी दबाव टाकला. नंतर ते निघून गेले आणि नंतर आणखी गावकऱ्यांसह परत आले ज्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली. आता, मला निलंबित करण्यात आले आहे आणि माझ्या घरापासून 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिकानेर येथे रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. हा अन्याय मला मान्य नसल्याने मी तिथे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी अनुसूचित जातीची असल्यामुळे केवळ जातीवादी मानसिकतेमुळे माझा छळ होत आहे,”
हेमलता बैरवा यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भारताच्या राज्यघटनेच्या कलम 28 मध्ये सरस्वती पूजेचा उल्लेख नाही. भारतीय राज्यघटनेनुसार 51(a) वैज्ञानिक दृष्टिकोनातून काल्पनिक गोष्टींना बंदी आहे…. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे सार्वजनिकरित्या उल्लंघन केले गेले आहे… स्त्रियांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन झाले आहे. भारतीय संविधानाचे जनक डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विरोधात समाजकंटक, असंवैधानिक तत्व, संविधान विरोधी तत्व, घटक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची माझी मागणी आहे. या घटनेनंतर अर्जदारांना असुरक्षित वाटत आहे,” बैरवा यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.






