पूर्वीच्या काळात व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा रोग/आजार नसणे म्हणजे आरोग्य मानले जाई. पण नंतर असे म्हणले जाऊ लागले, की आरोग्याची व्याख्या केवळ निरोगी असण्यासोबत निगडित नाही, तर नागरिकांच्या आरोग्याचा संबंध हा सामाजिक परिस्थिती, पिण्याचे स्वच्छ पाणी, सांडपाण्याचा निचरा, योग्य निवारा, आरोग्य सेवांची योग्यवेळी व माफक दरात उपलब्धता अशा अनेक घटकांचा विचार होणे गरजेचे आहे.
इतकेच नाही तर आरोग्य सेवांची वाटणी कशी होते, त्या सेवा सर्व सामाजिक समूहांना उपलब्ध होतात की नाही, सर्वांना त्याचा लाभ घेता येतो का हेसुद्धा पाहणे आवश्यक असते. या सर्व चर्चामधून आरोग्य म्हणजे काय याची पुढील सर्वसमावेशक व्याख्या तयार झाली. ही व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केली. ती अशी, आरोग्य म्हणजे केवळ आजार आणि विकलांगतेचा अभाव नाही, तर संपूर्ण शारीरिक-मानसिक- सामाजिक स्वास्थ्याची स्थिती.
या व्याख्येचा भटक्या विमुक्त महिलांच्या किंवा एकूणच भटक्या विमुक्त समाजाशी असलेला संबंध पाहिला तर असे दिसते की या समाजातले लोक, की जे अजूनही भटकंती करतच आयुष्य जगतात. त्यांच्या वाट्याला तर यातल्या काहीच गोष्टी येत नाहीत. कारण त्यांच्याकडे ना योग्य निवारा असतो, ना पिण्याचे स्वच्छ पाणी, ना आरोग्य सेवांची उपलब्धता, ना योग्य आहार. त्यामुळे या समूहातील लोकांचे आरोग्याचे प्रश्न विदारक होतात. ही बाब अधिक गंभीर याने होते की, या समूहांतील स्त्रियांच्या आरोग्यविषयक स्थितीची निश्चित अशी आकडेवारीच उपलब्ध नसते. त्यामुळे त्याचे मूल्यांकन करणे अवघड बनते. याची दखल समाज आरोग्य कर्मचारी आणि अभ्यासकांनी घेणे आवश्यक आहे.
स्त्रियांच्या आरोग्याविषयी विचार केला तर आपल्याला दिसते की भारतीय पितृसत्ताक समाजामध्ये स्त्रियांच्या माता या भूमिकेचाच विचार प्रथम केला जातो. त्यामुळे या समूहातील स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न त्यातूनच निर्माण होतात. स्त्रियांच्या आरोग्याविषयक धोरण आखताना किंवा योजना ठरवताना प्रजननाच्या किंवा पुनरुत्पादनकेंद्री दृष्टिकोनाचा विचार केला जातो. शासनाकडूनही स्त्रियांसाठी ज्या आरोग्य सुविधा दिल्या जातात, त्या पुनरुत्पादनासाठीच अधिक असतात.
लोकसंख्या नियंत्रणात आणण्याच्या कार्यक्रमांमध्ये स्त्रियांना लक्ष्य बनवले जाते. त्याचबरोबर कुटुंब नियोजनासाठी बाजारपेठेमध्ये किंवा विशेषतः शासनाकडून जी निरोधके स्त्रियांना उपलब्ध करून दिली जातात, ती चांगल्या प्रतीची नसल्याने स्त्रियांच्या आरोग्यावर त्याचे दूरगामी परिणाम होतात. यातही भटक्या विमुक्त महिलांची वेगळीच परिस्थिती दिसते. या समूहावर आजही रूढी परंपरा, अंधश्रद्धा यांचा पगडा असलेला दिसतो. लहान वयातच मुलींची लग्ने करून दिली जातात.

त्यामुळे लहान वयात गरोदरपण येते. तसेच कोणत्याही वैद्यकीय सेवासुविधांचा लाभ मिळत नाही, कुटुंब नियोजन विषयक साधने माहीत नसणे आणि वापरास बंदी, गर्भपात करण्यास मनाई कारण रूढी परंपरांचा पगडा. त्यामुळे त्या स्त्रीला जेवढी मुलं होतील तेवढी होऊ दिली जातात. याच्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे जेवढी मुलं जास्त, तेवढे श्रम करणारे हात जास्त. या समाजातील स्त्रियांच्या पुनरुत्पादनाच्या बाबतीत असे दिसते की, हा समाज भटकंती करत जगणारा समाज आहे. त्यामुळे या समाजातील स्त्रियांची प्रसूती ही ते लोक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणीच होते.
त्यामुळे त्या काळात तेथे कोणतेही डॉक्टर, नर्स उपलब्ध नसतात. बाळ बाहेर आल्यानंतर हाताला मिळेल त्या आयुधाने नाळ कापली जाते, बाळ आणि बाळंतीण यांच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ पाणीही उपलब्ध नसते. मिळेल तिथले पाणी वापरले जाते. त्यामुळे अशा गोष्टींमधून संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या समाजातील स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीत वेगळा विचार होणे आवश्यक आहे. एकूणात स्त्रियांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर लोकसंख्या नियंत्रण आणि परंपरा अशा दोन्ही बाजूंनी शोषण होते.
स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करत असताना 'स्त्रियांचे आरोग्य' असा सरसकट विचार करून चालणार नाही. कारण 'स्त्री' म्हटल्यानंतर एकच एक स्त्री असे म्हणून चालणार नाही. कारण स्त्रियास्त्रियांमध्ये भिन्नत्व असते. ज्याप्रमाणे स्त्रीवादी म्हणतात की, स्त्रिया या एकजिनसी कोटिक्रम नाही म्हणजेच सर्वच स्त्रिया या सारख्या नसतात, त्यांची जात, वर्ग, सामाजिक स्थान यानुसार समस्या, प्रश्न हे वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाविषयी विचार करत असताना त्याविषयक धोरणे, योजना तयार करत असताना त्यांच्यातील भिन्नत्व लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे.
आरोग्याच्या प्रश्नाचा विचार करत असताना फक्त 'आरोग्य' असा सुटा विचार करून चालणार नाही, तर तो इतर प्रश्नांशी जोडून बघणे गरजेचे आहे किंवा त्याचा इतर प्रश्नांशी असलेला संबंधही बघणं तितकंच गरजेचे आहे. कारण तुम्ही कोणत्या जात, वर्गातून येता, तुम्ही कोठे राहता, तुमचं राहणीमान कशा प्रकारचे आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता, याच्याशीही आरोग्याचा संबंध असलेला दिसतो. त्यामुळे भटक्या विमुक्त महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात व्यापक आणि वेगळा विचार होणे गरजेचे आहे.
भटके विमुक्त मुळातच दुर्लक्षित असा गट आहे. शासकीय धोरणांमध्येही या समूहाविषयक फारशा अशा विशेष तरतुदी नाहीत आणि त्यातूनही या समाजातील स्त्रिया अजूनच दुर्लक्षित गट आहेत. तसेच या एकूणच या समाजाचे स्वरूप बघता हा समाज एका ठिकाणी स्थिर नाही. उदरनिर्वाहासाठी भटकंती करणारा समाज, शिक्षणाचे प्रमाण कमी, अजूनही जाचक अशा रूढी परंपरांचा, अंधश्रद्धा यांचा पगडा असलेला असा समाज आहे त्यामुळे या समाजातील स्त्रियांचे प्रश्नही नक्कीच वेगळे आहेत.
हे लोक अजूनही पारंपरिक व्यवसाय करूनच आपला उदरनिर्वाह करतात. त्यातूनही त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर डोंबारी समाज, की ज्याबद्दल विमल मोरेंच्या पुस्तकामधूनही येतं. लोकांसमोर वेगवेगळे खेळ करून लोकांचे मनोरंजन करून हा समाज आपला उदरनिर्वाह करतो. त्यात अनेक जीवघेणे खेळ खेळले जातात. त्यात महिला उंच बांधलेल्या दोरीवरून चालतात. दोरीवरून चालून चालून पायाला होणाऱ्या जखमा, वरून खाली पडलं तर शरीराच्या एखाद्या अवयवाला दुखापत होऊन आलेलं अपंगत्व. विशेषतः लहान मुलांना तर लहानपणापासूनच याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात होते.
त्यात कोवळ्या शरीराला दुखापती होतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे काही स्त्रिया जरी पारंपरिक व्यवसायात नसल्या, तरी शिक्षणाचा अभाव असल्याकारणाने या स्त्रिया असंघटित क्षेत्रात काम करताना दिसतात. या क्षेत्रातील कामांना कायद्याचे संरक्षण नाही. त्यामुळे अत्यंत असुरक्षित वातावरणामध्ये, हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्या काम करतात. तसेच घराबाहेर काम करत असल्या तरी घरच्या कामांचीही जबाबदारी त्यांच्याच वर असते. त्यामुळे कामाचा दुहेरी बोजा सहन करावा लागतो. त्यामुळे दृष्टीवर परिणाम, सतत डोकेदुखी, कंबरदुखी अशा अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
आरोग्याचा संबंध हा तुम्ही काय प्रकारचे काम करता याच्याशी असलेला दिसतो त्यामुळे या समाजाची उदरनिर्वाहासाठी होत असणारी भटकंती थांबवून स्थिरता येणे आवश्यक आहे. त्याच रीतीने पारंपरिक व्यवसाय सोडून स्थिर असे चांगले रोजगार मिळणेही आवश्यक आहे.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा भटक्या विमुक्त समाजाच्या बाबतीत लक्षात घेणं गरजेचे आहे. तो म्हणजे या जमाती-जमातींमध्येही असलेलं भिन्नत्व. उदा. कोल्हाटी-डोंबारी दोन्हीही समाज लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करतात परंतु कोल्हाटी स्त्रीचे आरोग्याचे प्रश्न आणि डोंबारी स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न निश्चितच वेगळे असतील. एखाद्या गावात किंवा शहरात गोंधळी समाजातील व्यक्तीला जी वागणूक मिळेल, तशी पारधी समाजातील व्यक्तीला मिळणार नाही. कारण अशा अनेक भटक्या विमुक्त जमाती आहेत.
ज्यांच्यावर ब्रिटिश काळापासून गुन्हेगार जमातीचा ठपका लावला आहे तो अजूनही पूर्णपणे पुसला गेलेला नाही. ज्या समूहाला गावामध्ये प्रवेशच नाकारला जातो त्याला गावात असणाऱ्या आरोग्य सुविधा मिळणं तर दूरचीच बाब. आणि हा जो ठपका आजही त्याच्यावर आहे त्यामुळे या जमातीतील लोक मुख्य प्रवाहात मिसळताना दिसत नाहीत. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याविषयी विचार करताना भटक्या विमुक्त जमातींमधील अंतर्गत भिन्नत्व बघणंदेखील महत्त्वाचं आहे.
भटक्या विमुक्त स्त्रियांचा आरोग्याविषयक विचार करताना हिंसा आणि आरोग्य याचाही संबंध असलेला दिसतो. पितृसत्ताक व्यवस्था या समाजातही दिसून येते आणि त्यातून स्त्रियांवर होणारा कौटुंबिक हिंसाचार. या प्रकारच्या हिंसाचारात स्त्रियांना अतिशय जीवघेणी मारहाण केली जाते. त्यातूनही स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्याचप्रमाणे या समाजावर असलेले जातपंचायतीचे वर्चस्व.
अनेकदा स्त्रियांना जीवघेण्या परीक्षांना सामोरे जावे लागते. जसे की, गरम तेलात हात घालून त्यात असलेलं नाणं बाहेर काढणे, जळत्या विस्तवावरून चालत जाणे अशा अनेक वाईट जाचक शिक्षांद्वारे जातपंचायतीमधून स्त्रियांवर होणारा अत्याचार यातूनही स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे पितृसत्ताक वृत्ती आणि जातपंचायत हातमिळवणी करतात तेव्हा त्याचे विपरीत परिणाम हे स्त्रियांना भोगावे लागतात.
आज आपण विकासाचा विचार करत असताना अन्नसुरक्षेविषयी बोलतो. चांगले आरोग्य टिकवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न मिळणेही आवश्यक असते. परंतु भटक्या विमुक्त जमातीतील बरेचसे लोक भीक मागून आणलेले शिळे अन्न खातात आणि त्यातही घरातील सदस्यांमध्ये वाटप होऊन जे उरेल, ते घरातील स्त्रिया खातात. त्यातून काय प्रकारची पोषण मूल्ये मिळत असतील याचा अंदाज तर आपण करूच शकतो.
या समूहातील जवळ जवळ 90% स्त्रिया आणि बालके अस्वच्छ परिसरात राहतात आणि त्याचबरोबर कुपोषितही असतात. बऱ्याचदा शिळे अन्न खाल्ल्यामुळे आतड्यांच्या आजारांचे प्रमाण अधिक आढळते. (मानेः 1997)
आनंद पवार यांची 'सम्यक' ही संस्था स्त्रीवादी दृष्टिकोनातून महिला आरोग्याचे प्रश्न मांडण्याचे कार्य करते. भटक्या विमुक्त समाजासोबत या संस्थेने काही संवाद साधले. त्यात त्यांना असे आढळून आले, की आपल्याला काही आजार आहे याची जाणीवही या महिलांना नव्हती. शासकीय आरोग्य यंत्रणा योजना राबवताना आकडेवारीला महत्त्व देते. त्यानुसार औषधे, लसी उपलब्ध केल्या जातात.
तसेच शासकीय यंत्रणा या महिलांच्या बाबतीत काहीच करताना दिसत नाहीत. या समूहांच्या वस्त्या गावाच्या हद्दीबाहेर असल्याने सरकारी नर्स सेवा द्यायला नकार देतात. त्यामुळे भटक्या विमुक्त महिलांच्या आरोग्याविषयक विचार करताना 'आरोग्य' असाच केवळ विचार न करता त्यांच्यातील भिन्नत्व, त्यांचे राहणीमान, त्यांचा रोजगार, त्यांच्यावर होणारा हिंसाचार याच्याशी जोडूनच तो करावा लागेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांना त्यांच्या आरोग्याविषयक जाणीवा निर्माण करून देणे हेही तितकंच गरजेचे आहे; किंवा त्यांचा तो हक्क आहे याबद्दलही त्यांच्यात जाणीव निर्माण करून देणे महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच स्त्रीवाद्यांनी जेव्हा आरोग्याविषयक चळवळ निर्माण केली, तेव्हा ती 'माझ्या शरीरावर माझा हक्क' या ब्रीदवाक्याने केली होती. हे करण्यासाठीचे प्रभावी माध्यम शिक्षण हेच असू शकते.
भटक्या विमुक्त समूहाच्या बाबतीत महत्त्वाचा अडसर म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांचा असलेला पगडा. त्यामुळे भटक्या विमुक्त स्त्रियांना त्यांच्या 'स्व'ची जाणीव आणि हक्कांविषयकची जाणीव करून देण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे आणि ते त्यांच्यापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे असे मला वाटते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पितृसत्ताक समाजात स्त्रीच्या शरीराविषयक ठेवलेली गुप्तता. त्यामुळेही बऱ्याचदा स्त्रिया त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल बोलतच नाहीत.
स्त्रियांच्या आरोग्यविषयक बोलताना जोपर्यंत खुलेपणाने चर्चा होणार नाहीत, तोपर्यंत स्त्रियांच्या आरोग्यविषयक खरे प्रश्नच सामोर येणार नाहीत. आणि त्यासाठी आपल्याला पुनरुत्पादकता एवढेच नव्हे, तर केवळ शारीरिक आरोग्याचाच विचार करणे याहून पुढे जावे लागेल. हे मुळात स्त्रियांची आरोग्यविषयक धोरणे आखताना होत नाही आणि त्यामुळे स्त्रीयांच्या आरोग्यविषयक धोरणे मर्यादित ठरतात.
म्हणूनच मनिषा गुप्ते त्यांच्या लेखात म्हणतात, 'स्त्रीच्या आरोग्याचे पैलू केवळ तिच्या मातृत्वावर अवलंबून नसून समाजातल्या विषमतांवर, अन्यायांवर, वर्ग आणि जातीच्या उतरंडीतील तिच्या स्थानावर अवलंबून आहेत, याचं भान ठेवायला हवं. तसेच स्त्रियांच्या आरोग्याबाबत बोलताना आपण सर्व स्त्रियांचा समावेश केला आहे ना हेही बघणं तितकंच गरजेचे आहे.'
(साभार - विमुक्तांचे स्वातंत्र्य, परिवर्तनाचा वाटसरू)






