जगाला शांतीचा संदेश देणारे आणि मानवाला दुःख मुक्तीचा मार्ग सांगणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती अर्थात त्यांना प्राप्त झालेलं बुद्धत्व आणि त्यांचं महापरिनिर्वाण… बुद्धांच्या आयुष्यातील या तिन्ही महत्वाच्या घडामोडी आहेत ज्या वैशाख पौर्णिमेला घडल्या. ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखतो. याच बुद्धांनी संपूर्ण जगाला दिलेली एक अनमोल गोष्ट म्हणजे विपश्यना साधना.

विपश्यना ही साधना भारतातून का नष्ट झाली होती?
कलिंगाच्या युद्धात झालेली मनुष्यहानी पाहून प्रचलित वैदिक परंपरा झुगारून सम्राट अशोकाने हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बुद्ध धम्म हा कल्याणकारी आहे हे सम्राट अशोकास समजले. नालंदा आणि तक्षशिला सारखे विद्यापीठ भारतात सम्राट अशोकाने उभे केले. नालंदामध्ये देश-विदेशातून विद्यार्थी शिकण्यास येत असत. नालंद भारतातील बौद्ध धम्म आणि विपश्यनेचे प्रमुख केंद्र देखील होते. सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धम्माची शिकवण दिली. यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धम्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली.
त्यानंतरच्या काळात भारतावर बरीच आक्रमणे झाली. इ.स. 1193 साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने नालंदा नगरावर आक्रमण करून ही नगरी पूर्णपणे उध्वस्त केली आणि नालंदा विद्यापीठही जाळून टाकले. त्यानंतर बऱ्याच लोकांनी स्थलांतर केले आणि हळू हळू बुद्ध धम्माचा प्रसार कमी झाला आणि त्याचसोबत विपश्यना साधना ही पूर्णपणे भारतातून नष्ट झाली. तशीच ती इतर देशातून ही नामशेष झाली. पण बर्माच्या लोकांनी म्हणजेच आताच्या म्यानमार मधल्या लोकांनी ती गुरु-शिष्य परंपरेने कायम टिकून ठेवली.
दोन हजार वर्षानंतर विपश्यना मायदेशी परतली..
एस. एन. गोएंका हे बर्मा देशात एका भारतीय व्यापारी कुटुंबात जन्माला आले. मारवाडी वंशाचे सत्यनारायण गोयंका लहानपणापासून एका रूढिवादी हिंदू कुटुंबात वाढले. ते एक यशस्वी व्यापारी देखील होते. 1955 साली सत्यनारायण गोएंकांना मायग्रेन (अर्धशिशी) सारख्या आजाराने ग्रासले. त्यांनी बरेच उपचार करून बघितले, देश-विदेशातील दवाखान्यात ही त्यांनी उपचार घेतले, पण काहीही फरक जाणवला नाही.
त्यांच्या मित्राने त्यांना सुचवले की, ‘बर्मा देशामध्ये सयागी उ बा खिन हे विपश्यना साधना शिकवतात, तू तिकडे जा. तो एक उपाय करून बघ फरक नक्की पडेल असं मला वाटतं.’ सुरवातीला एस. एन. गोएंका ला वाटले की विपश्यना साधना शिकायची म्हणजे बुद्ध धम्म ही शिकवा लागेल आणि मी तर हिंदू धर्माचा आहे, त्यामुळे त्यांनी नकार दिला. त्यांच्या मित्राने त्यांना पुन्हा विनवणी केली आणि शेवटी एस. एन. गोएंका यांनी मनाची तयारी केली.

एस. एन. गोएंका हे म्यानमार मध्ये सयागी उ बा खिन यांच्या विपश्यना केंद्रात गेले. ‘मला मायग्रेनचा त्रास आहे. त्या त्रासापासून मला मुक्त व्हायचे आहे म्हणून मला तुमच्या विपश्यना साधना शिबिरात सहभागी व्हायचे आहे’, असे सांगितले. दहा दिवस विपश्यना शिबीर केल्यानंतर एस. एन. गोएंका यांना आणखी शिबिर करावे अशी इच्छा झाली. विपश्यना साधना शिकतांना एस.एन. गोएंका यांना समजले की मी एवढ्या दिवसापासून ज्या सुखाचा शोध करत होतो ते सुख माझ्या आतच आहे. पैशाने सुख मिळत नाही, आत्मसमाधानाने सुख मिळतं आणि हे सुख मला मिळालं आहे असे त्यांना मनोमन वाटले. त्यानंतर एस. एन. गोएंका भारतातून म्यानमारमध्ये कधी 20 दिवसांच्या शिबिरासाठी तर कधी 30 दिवसांच्या शिबिरासाठी येऊ लागले. विपश्यनेचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायला लागले.
सयागी उ बा खिन यांना भारताचे कर्ज फेडायचे होते. ज्या साधनेमुळे बर्मा देशातील लोक इतके सुखी आणि समाधानी आहेत ती विपश्यना साधना भारताला परत करायची होती. पण, काही कारणांमुळे सयागी उ बा खिन यांना भारतात येता आले नाही आणि त्यांनी निर्णय घेतला की ही परंपरा पुन्हा गुरु शिष्य परंपरेनेच भारतात जाईल आणि तो दिवस आला 20 जून 1969… जेव्हा सयागी उ बा खिन यांनी एस. एन. गोएंका यांना विपश्यना शिक्षक म्हणून नियुक्त केले आणि एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
गोएंका हे दुसऱ्याच दिवशी जन्मस्थान म्यानमार (बर्मा) सोडून त्यांच्या पूर्वजांची भूमी असलेल्या भारताकडे निघाले. विपश्यना सुमारे 2,500 वर्षांपूर्वी भारतातून म्यानमार मध्ये आली होती. म्यानमारमध्ये गुरु-शिष्य परंपरेच्या अखंड साखळीने या साधनेचे जतन केले होते ते सयागी उ बा खिंपर्यंत. भारतात मात्र विपश्यनेचे नावही लोकं विसरले होते. ही अमूल्य अध्यात्मिक शिकवण केवळ भारतातच न परतता, तिथे प्रस्थापित झाल्यानंतर अनेकांच्या कल्याणासाठी जगभर पसरली पाहिजे, अशी सयागी उ बा खिन यांची उदात्त इच्छा होती. सयागी उ बा खिन यांना ठाम विश्वास होता की भारत त्यांचा हरवलेला मौल्यवान खजिना सहज स्वीकारेल.
काय आहे विपश्यना साधना?
विपश्यना ही भारताची एक अत्यंत प्राचीन ध्यान-विधि आहे. आजपासून जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी गौतम बुध्दाने शोधून काढली होती. विपश्यना शब्दाचा अर्थ असा की, जी वस्तू खरोखरच जशी आहे, ती त्याच प्रकारे जाणून घेणे. स्व-निरिक्षणाद्वारे आत्मशुद्धी करण्याची ही प्रक्रिया (साधना) आहे. या साधनेचे कोणत्याही संघटित धर्म किंवा संप्रदायाशी देणे घेणे नाही. त्यामुळे कोणीही,कोणत्याही वेळी, ह्या साधनेचा अभ्यास करु शकतो. ही दुःखमुक्तिची साधना आहे.
ही मनाला निर्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांतिपूर्वक तसेच संतुलित राहून करु शकेल. ही जीवन जगण्याची कला आहे. सर्व शिबीरार्थीना विपश्यना शिबीरादरम्यान पांच शीलांचे पालन करणे अनिवार्य आहे- कोणत्याही प्राण्याची हत्या न करणे, चोरी न करणे, अब्रह्मचर्य (मैथुन) पासून दूर राहणे, खोटे बोलण्यापासून दूर राहणे, नशा करणाऱ्या वस्तूपासून दूर राहणे.

मुंबईच्या धर्मशाळेत पहिले विपश्यनेचे शिबीर भरवण्यात आले
म्यानमारमधून भारतात परतल्यावर एस. एन. गोएंका यांना अनेक प्रश्न पडायचे की कोण माझ्यासोबत घर-दार सोडून दहा दिवस राहणार आहे. ज्या भारतामध्ये आता विपश्यनेचे नामोनिशाणदेखील नाही तिथे कोण या साधनेवर विश्वास ठेवणार आहे. पण त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना याबद्दल विचारणा केल्यावर त्यांच्या ज्या मित्रांना याबद्दल थोडीफार माहिती होती ते या शिबरासाठी तयार झाले. गोएंकाजींच्या घरातील लोकं देखील तयार झाले.
एकेदिवशी म्यानमारमधील समाजसेवेतील सहकारी मंगलचंदजी अडुकिया यांचे नातू विजय अडुकिया एस. एन. गोएंका यांच्याकडे आले आणि म्हणाले “तुम्हाला विपश्यना शिबीर सूरू करायचं असेल तर मी जागा देऊ शकतो. पंचायतीवाडी धर्मशाळेचा काही भाग उपलब्ध करून देता येईल. मी व्यवस्थापनाशी आधीच बोललो आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही येऊन पाहणी करू शकता.”
गोएंका पाहणी करून आल्यावर विजय स्वतः मोठ्या उत्साहाने म्हणाले, “मी विद्यार्थ्यांपैकी एक होईन. मला शिबिराची व्यवस्था करण्याची जबाबदारी घ्यायची होती पण माझे वडील ते करू शकतात. त्याऐवजी मी शिबिरार्थी होईल.” 3 ते 13 जुलै 1969 ला पहिले विपश्यना शिबीर 14 शिबिरार्थींसोबत पार पडले. त्यानंतर लगेचच, ज्या शिबिरार्थींनी भाग घेतला होता आणि ज्यांनी विपश्यना साधनेचे फायदे अनुभवले त्यांनी एकामागून एक शिबीरे आयोजित करण्यात आणि सेवा देण्यास मदत केली. अशा प्रकारे, 2,000 वर्षांनंतर, धम्माचा शुद्ध प्रवाह भारतात पुन्हा वाहू लागला. ज्यामुळे आज भारतातील आणि जगभरातील लोकांना आनंद मिळत आहे. अनेकांसाठी दुःख मुक्तीची दारे उघडली गेली, ज्यामुळे त्यांना खरा आनंद मिळू शकला.
भारतातील विपश्येनेचे केंद्र
1) धम्मगिरी म्हणून ओळखले जाणारे जगातील सर्वात मोठे विपश्यना ध्यान केंद्र, महाराष्ट्रातील इगतपुरी येथील विपश्यना संशोधन संस्थेत आहे. जे गोएंका यांनी सुरु केले. या धम्मगिरी मध्ये 1976 मध्ये लोकांसाठी पहिला विपश्यना अभ्यासक्रम सुरु झाला आणि आता दरवर्षी हजारो लोक तेथे अभ्यास करतात.
2) इगतपुरीतील धम्मगिरी नंतर धम्म थालीची क्षमता सर्वात जास्त आहे आणि त्यात 200 विद्यार्थी बसू शकतात. हे केंद्र भारतातील सर्वात जुन्या केंद्रांपैकी एक आहे. त्याचा विस्तीर्ण परिसर 1977 मध्ये, जयपूरच्या बाहेरील बाजूस गाल्टा माकड मंदिराजवळ टेकड्यांमध्ये बांधला गेला.
3) धम्म पट्टण विपश्यना ध्यान केंद्र हे भव्य ग्लोबल पॅगोडा कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे जे 2009 मध्ये मुंबईच्या बाहेरील उत्तर उपनगरात समुद्रकिनारी गोराईजवळ उघडले गेले .

4) हिमाचल प्रदेशातील धर्मशाळाजवळील सिखारा धम्म विपश्यना ध्यान केंद्र आहे. जे तीन एकर जंगलात वसलेले आहे. हे भारतातील सर्वात नयनरम्य केंद्रांपैकी एक आहे. या केंद्राने 1994 मध्ये पहिला 10-दिवसीय अभ्यासक्रम आयोजित केला होता. हे केंद्र मॅक्लिओडगंजच्या जवळ असल्यामुळे परदेशी लोकांमध्ये लोकप्रिय आहे.
5) धम्म पाफुल्ला हे बेंगळुरूच्या अलूर गावात 10 एकर जमिनीवर वसलेले आहे. या केंद्राची स्थापना 2004 मध्ये झाली होती परंतु त्यानंतरच्या अनेक वर्षांत बांधकाम झाले. मुख्य मेडिटेशन हॉल 2008 मध्ये बांधण्यात आला, त्यानंतर नवीन राहण्याची सोय मुख्य हॉलमध्ये 100 विद्यार्थ्यांसाठी आणि प्रत्येक लहान हॉलमध्ये 30 विद्यार्थ्यांसाठी जागा आहे.
6) दक्षिण भारतातील चेन्नईच्या सीमेवर भातशेती आणि शेतजमिनीमध्ये वसलेले धम्म सेतू हे एक विपश्यना केंद्र आहे. हे नवीन केंद्र आहे, 2005 मध्ये पहिल्यांदा इथे 10-दिवसीय अभ्यासक्रम सुरू झाला होता.
7) ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले त्या ठिकाणी बिहारमधील बोधगया येथे धम्म बोधी विपश्यना ध्यान केंद्र आहे. 18 एकर जमिनीवर, मगध विद्यापीठाजवळील कृषी क्षेत्रांनी वेढलेले हे विपश्यना केंद्र आहे. 10-दिवसीय अभ्यासक्रम साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि 16 तारखेला सुरू होतात. एका वेळी सुमारे 80 विद्यार्थ्यांसाठी जागा आहे.
आणखी बरीच म्हणजे एकूण 20 विपश्यना केंद्र भारतात आहेत आणि जगभरात 160 विपश्यना केंद्र आहेत. आज शेकडो सहाय्यक शिक्षक आहेत जे सुमारे 1,50,000 लोकांसाठी, 150 हून अधिक केंद्रांवर तसेच तात्पुरत्या सुविधांमध्ये दरवर्षी अंदाजे 2,500 अभ्यासक्रम चालवतात. 1994 पासून, गोयंकाजींनी सर्वात अनुभवी सहाय्यकांना पूर्ण शिक्षक म्हणून नियुक्त केले; त्यापैकी 300 हून अधिक शिक्षक जगभरात आहेत.






