हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील गोपालपूरा गावातील अंगणवाडीत, बायका आपला उजवा हात समोर करून एका रांगेत उभ्या आहेत. स्त्री-भ्रूण हत्या न करण्याची शपथ घेत आहेत त्या. “आमच्या समोर स्त्री-भ्रूण हत्येचं प्रकरण आलं तर आम्ही अंगणवाडीत त्याची माहिती देऊ.” मागील दोन वर्षांपासून गावांतील आशा कार्यकर्त्या स्त्री-पुरुषांना ही शपथ घेण्यासाठी प्रेरीत करत आहेत. हरियाणा सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ योजनेअंतर्गत हे अभियान सुरू झालं होतं.
रोज सकाळी ही शपथ म्हटली जाते. पण लोकांना आता समाज सुधारणेसाठी प्रेरीत केलं जात नाही. कारण गावातील लिंग गुणोत्तरावर याचा काही परिणाम झाला नाही, जो आता 916 आहे आणि याचं उत्तर कोणाजवळच नाही. हरियाणात पूर्वी तब्बल तीन दशकं हे गुणोत्तर सुधारण्यासाठी प्रयत्न झाले. त्याचा थोडा परिणामही दिसून आला. पण पुन्हा सारं ‘जैसे थे’च झालं. आता हा केवळ एक सरकारी नारा आहे, एक प्रशासकीय औपचारिकता आहे. हरियाणातील 22 पैकी 9 जिल्ह्यांतील लिंग गुणोत्तर खालावलं आहे. 57 वर्षीय बिमला देवी सांगतात, “आम्ही शपथ घेतली आहे, प्रत्येक घरी जातोय, लोकांशी बोलतोय. आम्ही सारं काही करतोय, पण लिंग गुणोत्तर सुधारत नाहीये.”

‘मुलगी नाही वाचवाल, तर सून कुठून आणाल?’
हरियाणातील ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ अभियानाचे समन्वयक गिरधारी लाल सिंघल सांगतात, “एके काळी लिंग गुणोत्तर 800 च्या खाली होतं. पण आता आम्ही रेड झोनमधून बाहेर आलोय. अजून सुधारणा बाकी आहेत. यात कमी-जास्त होतंच राहतं. पण सरकार प्रयत्न करत आहे. मोबाईल अल्ट्रासाऊंड मशिन्समुळे आमच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकांनी हा नवीनच धंदा सुरू केलाय. पण तरीही आमची अवस्था दिल्ली किंवा पंजाबसारखी नाही.” हरियाणात खरंतर हे सारं आधीच झालेलं आहे. त्याची कारणंही लोकांना माहिती आहेत. मुलाची हौस भागवण्यासाठी लोक काहीही करतात.
परिणामी मुली कमी झाल्या आणि आता विकत आणलेल्या नवऱ्यांपासून पळवून आणलेल्या नवऱ्यांचा काळही त्यांनी पाहिला आहे. पण तज्ज्ञांना वाटतंय की परिस्थिती नियंत्रणात आहे. दिपिका सैनी या रोहतकच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत. लिंग गुणोत्तरात वाढ का होत नाहीये हे समजून घेण्यासाठी त्या गावांमध्ये जाऊन माहिती घेत आहेत. त्या तीन गोष्टी सांगतात, लोक अजूनही मुलाला महत्त्व देतात, सरकारी अभियान ठप्प झालंय आणि मुलगा झाल्यानंतर लोकांना आणखी मुलं नको असतात. सैनी यांनी हे बदलण्यासाठी नव्यानं प्रयत्न केले, पूर्वीचे काही उपाय राबवले जे तेव्हा प्रभावी ठरले होते.
रोहतकमध्ये त्यांनी 10 होर्डिंग्स लावले आहेत स्त्री-भ्रूण हत्येच्या विरोधातील आणि गावांमध्ये शंभराहून जास्त भिंती याने रंगवल्या आहेत. तरीही रोहतकमध्ये 2023 मध्ये सर्वांत कमी 883 गुणोत्तर आलंय. त्यामुळे अधिकारी कामाला भिडले आहेत. सैनी यांनी आपल्या अधिकारी व कार्यकर्त्यांसाठी एक नाराही दिलाय, ‘मुलगी नाही वाचवाल, तर सून कुठून आणाल?’ जो एक धोक्याचा इशारा देतो. हरियाणातील प्रत्येक गावात हा नारा गेलाय. मुली शाळेत, शहरात ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’चे नारे देत फिरत आहेत. पण याचा काही उपयोग होत नाहीये. सैनीप्रमाणे बाकी अधिकारीही यामुळे नाराज आहेत. ते दोन मुद्दे सांगतात, एक नवकल्पनांची उणीव व दुसरा सरकारचा यातल संपलेला रस. एक अधिकारी म्हणाला की पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या अभियानावर नजर ठेवली जायची. आता नियमीत बैठकही होत नाही. पूर्वी मुख्यमंत्री आणि जिल्हा आयुक्त यांच्यात या संबंधी बोलणं व्हायचं, जे आता बंद झालंय. एका आयएएस अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आता कोणी नजर ठेवत नाही, मिटिंग्स बंद झाल्या आहेत. हे अभियान आता केवळ इवेंट मॅनेजमेंट राहिलं आहे.”
रोहटकमध्ये सर्वांत कमी 883 गुणोत्तर
‘दि प्रिंट’सोबत बोलताना अनेक अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या शर्तीवर म्हटलं की, “अधिकाऱ्यांना असं वाटतंय की सरकार त्यांच्या कामाची दखल घेत नाहीये. त्यामुळे अधिकाऱ्यांनी काम करणं बंद केलंय. सीएमओचे लोक अधिकाऱ्यांना अभियानाच्या अपयशासाठी जबाबदार धरतात. दुसरीकडे ते असंही म्हणतात की, त्यांनी फक्त नोंदी ठेवाव्यात, प्रत्यक्ष गावात दौरे करण्यात वेळ वाया घालवू नये.” आणखी एकानं सांगितलं की, “जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली जाते तेव्हा तिथलं काम समजून घेण्यासाठी त्याला काही महिने तरी लागतातच. त्यानंतर तो काम सुरू करतो आणि तोवर त्याची बदली केली जाते.
त्यामुळेही अधिकारी निराश आहेत, अनुत्साही आहेत.” पण सैनी मात्र रोहतकमध्ये बदल घडवून आणण्यावर ठाम आहेत. त्या म्हणतात, “मीही मुलाला महत्त्व देण्याची संस्कृती जवळून अनुभवली आहे. माझ्या आईला मला लस द्यायची होती पण घरातले पुरुष याच्या विरोधात होते. मोठेपणी मला याचा त्रास झाला आणि मी आता अपंग झालीय. मला चालताना त्रास होतो.” सैनी आता त्यांच्या कामात सोशल इन्फ्लुएंसर्सची मदत घेत आहेत. त्याची एक यादीच त्यांनी तयार केली आहे. यात त्या कॉमेडियन राखी लोहचब आणि हिमांशी जांगडा यांनाही सोबत घेण्याचा विचार करत आहेत पण त्यासाठी त्या तयार होतील की नाही याची त्यांना कल्पना नाही.

मुलांसाठी केलं जाणारं ‘कुआँ पूजन’ आता मुलींसाठीही
यादव-गुर्जर बहुसंख्य महेंद्रगढ जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 887 आहे. इथल्या उपायुक्त मोनिका गुप्ता नवजात बाळांना दिल्या जाणाऱ्या गिफ्ट हँपर्सवर सह्या करत आहेत. सात कुटुंबांनी मुलीला जन्म दिला आहे. त्यांना यासाठी अभिनंदन प्रमाणपत्र आणि लहान मुलांसाठी गरजेच्या काही भेटवस्तूही दिल्या जातात. गुप्ता ‘माझी लाडकी, माझा अभिमान’ हे अभियान चालवत आहेत. रितीप्रमाणे मुलांसाठी केलं जाणारं कुआं पूजन आता मुलींसाठीही करण्यास त्या लोकांना प्रोत्साहन देत आहेत.
मुलांना महत्त्व देणाऱ्या जुन्या रिती बदलण्यासाठीचं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. आपले विचार सांगण्यासाठी त्या पथनाट्याचाही उपयोग करतात. ते विनोदी असतात. स्वप्नाची हकीकत या नाटकात एक माणूस आपल्या स्वप्नांत गर्भवती होतो आणि गर्भपात करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला कल्पना येते की आपल्या पत्नीला अशाच गोष्टीसाठी किती त्रास झाला असेल. झोपेतून उठल्यावर तो गर्भपात न करण्याचं ठरवतो आणि इतरांनाही त्यासाठी समजावू लागतो. हरियाणातील महिला अधिकारी व्यक्तिगत पातळीवरच लिंग गुणोत्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकांसोबत त्या आपले स्वतःचे अनुभव सांगत आहेत.
गुप्ता आपल्या भाषणात सांगतात, “मी एक मुलगी आहे आणि आज डेप्युटी कलेक्टर आहे. उद्या तुमची मुलगीही डेप्युटी कलेक्टर होऊ शकते.” त्या सांगतात की, “मी फक्त त्यांची आशा वाढवत आहे. हे दोन पद्धतीने होऊ शकतं. नियामक पद्धतीनं सरकारी नियमानुसार किंवा प्रेरक पद्धतीनं जो सामाजिक व्यवहार बदलतो. सामाजिक विचार बदलण्यासाठी वेळ लागतो.” त्या देत असलेल्या भेटी सरकारी नाहीत. काही सामाजिक संस्था यासाठी त्यांना मदत करतात.
अवैध लिंग तपासणीसाठी अत्याधुनिक मशिन्स
हरियाणात लग्नासाठी बायका मिळत नसल्यामुळे लोक दुसऱ्या राज्यातून बायका विकत आणतात. काही वेळा चोरूनही. ज्यांच्या मुली चोरल्या जातात ते लाजेमुळे त्याची पोलिसात तक्रारही करत नाहीत. दुसरीकडे लिंग तपासणी करून देणारं रॅकेट सक्रिय आहे जी सरकारची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे सरकारने आता आरोग्य विभाग आणि पोलिसांद्वारे गर्भवती महिला, ज्या सहाव्या महिन्यात आहेत, जेव्हा भ्रूण ओळखला जाऊ शकतो त्यांची मदत घेण्याचं ठरवलं.
त्यांच्या मदतीनं हे रॅकेट पकडण्याचा त्यांचा विचार होता. पण त्यासाठी कोणी तयार झालं नाही. सरकारने यासाठी एक लाख रुपयाचं बक्षिसही जाहिर केलं तरीही कोणी पुढे आलं नाही. मोनिका गुप्ता तरीही यासाठी प्रयत्न करत आहेत. राजस्थान आणि पंजाबच्या सीमेवर अनेक लोक अवैध लिंग तपासणी करत असतात. त्यासाठी अत्याधुनिक मशिन्स वापरतात. दुसरीकडे गुप्ताही नवनवीन प्रयोग करत आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी एक सेमिनार भरवलं होत. त्यात 374 गावांमधील सरपंच, पंच, आशा कार्यकर्त्या, आंगनवाडी सेविका यांना बोलावलं होतं. त्यात त्यांनी सर्वांना लिंग परिक्षण करणारे क्लिनिक्सची नावं आणि लोकांची नावं लिहायला सांगितलं होतं. कोणाचंही नाव उघड केलं जाणार नाही असं आश्वासन गुप्तांनी या सर्वांना दिलं होतं. त्यांना पाचशे चिठ्ठ्या मिळाल्या. त्यावर काही नावं वारंवार आली होती. त्यानंतर त्यांच्यावर छापे पडणं सुरू झालं. पण अनेकदा अशा डॉक्टर्सना आधीच छाप्याची माहिती होते किंवा संशय येतो आणि ते पळून जातात. असे प्रसंग अनेकदा घडतात.
हरियाणाचे आरोग्य मंत्री कमी लिगं गुणोत्तरासाठी अवैध लिंग तपासणी सुविधांना जबाबदार ठरवतात. अनिल विज म्हणतात, “शेजारी राज्यांत अवैध लिंग तपासनी केंद्रांची संख्या वाढल्यामुळे मुलगी वाचवा अभियान फेल झालं. हरियाणातील लोक आता शेजारी राज्यांत लिंग तपासणीसाठी जातात.”
2023 मध्ये हरियाणा आरोग्य विभागाने 36 आंतरराज्यीय छापे घातले, तेवढेच गुन्हे दाखल केले. राज्यात 85 गुन्हे दाखल केले. 2022 मध्ये प्री-नेटल डायग्नोस्टिक तंत्रज्ञान आणि मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनेंन्सी कायद्याअंतर्गत 105 गुन्हे दाखल केले.

कैथलमध्ये राहणारी आशा गरोदर आहे तीन महिन्यांची. तिला आधीच्या दोन मुली आहेत. आता तिला मुलगा हवा आहे. ती एका पंडिताकडे गेली होती. ज्यानं तिला सूर्योदयापूर्वी पाण्यात मिसळून राख प्यायला सांगितलं आहे. त्या म्हणतात, “पंडित म्हणाले की पोटात मुलगी असली तरीही तिचं लिंग बदलेल म्हणून.” पण आशाला विश्वास नाही. ती आणि तिचा नवरा राकेश, उत्तर प्रदेशातील एखाद्या स्वस्त लिंग परीक्षक डॉक्टरच्या शोधात आहेत. त्यांना व्हॉट्सएपवर पंजाब आणि राजस्थानच्या डॉक्टरांची यादी मिळाली पण ते खूप महागडे आहेत. डॉक्टरांनी आधीच तिच्या ढासळत्या तब्येतीमुळे तिसऱ्या मुलाचा विचार करू नको असं सांगितलं होतं. “समाज तुम्हाला जगू देत नाही.
मुलगा नसेल तर कुटुंबात तुमची किंमत होत नाही. एका बाईला खूप टोमणे सहन करावे लागतात, टीका सोसावी लागते. मलाही वाटतं की मुलगा नसेल तर म्हातारपणी आम्ही कोणाच्या आधारावर जगू.” आशा म्हणतात. जज्जरच्या बादली गावातील आशा कार्यकर्त्या, रीता देवी रोज लोकांना लिंग गुणोत्तर आणि मुलींच्या महत्त्वाविषयी सांगत असतात. पण त्यांना यासाठी खूप टीका सहन करावी लागते. लोक त्यांच्याकडे रागाने बघतात. त्यांचं कोणी ऐकायला तयार नसतं.
देवी म्हणतात की “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियानात आता काही राम उरला नाही. गावातले लोक माझं काही ऐकत नाहीत. ते म्हणतात, सरकारला आमच्या पोरींची इतकीच चिंता होती तर त्यांनी आमच्या कुश्तिपटू मुलींचं समर्थन का केलं नाही. संदीप सिंह आणि बृजभूषण शरण सिंह याच्यावर सरकारनं कारवाई का केली नाही?” देवीकडे याची उत्तरं नाहीत. त्या म्हणतात, “मी त्यांना म्हणते की तुम्ही हे प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. त्यांची उत्तरं मी कशी देऊ शकते?”
आरोग्य विभागाच्या एका बैठकीत देवींनी हे प्रश्न विचारले. पण अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरं देणं टाळलं. त्यांनी आम्हाला हे प्रश्न त्यांच्या वरिष्ठांनी विचारायला सांगितलं आणि आम्हाला आमचं काम करत राहण्याचा सल्ला दिला. असं त्या सांगतात. आणखी एक आशा कार्यकर्त्या बंटी सांगतात की “मुलगी वाचवा अभियानाला आता काही अर्थ उरलेला नाही. कोणाला ते काम करण्यात रस राहिला नाही. आम्ही तेच काम रोज रोज करतोय. शपथा घेतोय, नारे लावतोय, महिलांना सांगतोय, पण यात नवीन काहीच घडत नाहीये. कोणावर याचा परिणाम होत नाहीये.” बंटीच्या घरी अजूनही बायका या विषयावर बोलण्यासाठी जमत असतात. त्यांना अजूनही आशा आहे. पण उमरेश निराश आहेत.
ते म्हणतात की गावातील बायका कमी झाल्यामुळे पुरुष आता परराज्यातील बायका विकत घेत आहेत पण त्यांच्या कुटुंबांना, गावातल्या लोकांना याचं गांभीर्य समजत नाहीये. दहा वर्षांपूर्वी याहून खराब स्थिती होती. उमरेशच्या गावातील सर्व लोकांनी महिला कुश्तीपटूंना फोनवर विरोध करताना, रडताना पाहिलं होतं. लोक तेव्हा म्हणायचे की सरकारनं आमच्या मुलींना एकटं सोडलंय. उमरेश विचारतात, “सरकारची इच्छा आहे की आम्हाला मुली झाल्या पाहिजेत. पण ते त्यांचं रक्षण करायला मात्र तयार नाहीत. आमच्या पैलवान मुलींना विरोध करून आणि त्यांना राजीनामे द्यायला भाग पाडून सरकारने स्वतःच मुलींच्या जागी पुरुषांची निवड केली आहे. मग यातून ते लोकांना काय संदेश देत आहेत की तुम्ही मुलींना जन्म द्या, आणि जेव्हा त्या संकटात सापडतील तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडून द्या?”
यावर कोणी काही बोलत नाही. बोलायला काही उरत नाही.
अनुवाद – प्रतिक पुरी
(सौजन्य – द प्रिंट)






