Skip to main content

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

Sanjana Khandare
2 days ago
58 views
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

संजना खंडारे


  • महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते.


  • जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे.


  • या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.



आषाढातील पावसाची सर नुकतीच ओसरलेली असते. शेतात पिकं डोलू लागलेली असतात. गावाकडच्या घरांमध्ये अधिक मासाची चर्चा सुरू झालेली असते. कुणाच्या मुलीला माहेरी बोलवायचं असतं, कुणी जावयासाठी नवीन कपड्यांची खरेदी करत असतो, तर कुणाच्या घरात पुरणपोळी आणि पाच-पक्वान्नांच्या तयारीची लगबग सुरू असते. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखलं जातं. या महिन्यात मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही मोठ्या प्रमाणावर जपली जाते.


मात्र बदलत्या काळात या परंपरेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला आहे. एकीकडे या प्रथेला कौटुंबिक नातेसंबंध जपणारी, मुलीला माहेराशी जोडून ठेवणारी परंपरा मानलं जातं; तर दुसरीकडे अनेकांच्या मते ती मुलीच्या माहेरावर अतिरिक्त आर्थिक ओझं टाकणारी प्रथा बनली आहे. त्यामुळे धोंड्याच्या महिन्याबाबत ग्रामीण समाजात एक नवा संवाद सुरू झाला आहे.


बीड जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती सांगतात, "आमच्या गावात जावयाला धोंड्याच्या महिन्यात बोलावलं नाही, तर लोक विचारतात आणि  बोलावलं तर कपडे द्यावे लागतात, जेवण करावं लागतं. काही ठिकाणी सोन्याची अंगठीही देतात. ही परंपरा आहे म्हणून करावंच लागतं."


त्यांच्या बोलण्यातून परंपरेचा सन्मान आणि आर्थिक ताण या दोन्ही भावना एकाच वेळी जाणवतात. गेल्या काही वर्षांत शेतीवरील वाढलेला खर्च, अनिश्चित उत्पन्न आणि वाढती महागाई यामुळे ग्रामीण कुटुंबांचे अर्थकारण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. अशा परिस्थितीत लग्नानंतरही विविध सण-समारंभांच्या निमित्ताने होणारा खर्च अनेकांना जड जाऊ लागला आहे.


मराठवाड्यातील एका शेतकरी कुटुंबाचा अनुभव याच वास्तवाची साक्ष देतो. तीन वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज अद्याप पूर्ण फेडलेलं नाही. यंदा अधिक मास असल्यामुळे मुलगी आणि जावयाला बोलावण्याची तयारी सुरू आहे. घरात त्याबद्दल चर्चा सुरू असताना कुटुंबप्रमुख म्हणाले, "मनापासून करायचं आहे, पण खर्चाचाही विचार करावा लागतो. जावयाला काही दिलं नाही तर लोक बोलतात. दिलं तर पैशाची चिंता असते."


User Image


अधिक मास का येतो?


१७ मेपासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू झाला आहे. १५ जूनला हा अधिक महिना संपेल. मराठी महिने चंद्रावर आधारित असतात. या चांद्रमासाला सौर वर्षाशी जुळवून घेण्यासाठी आणि कालगणना एकसारखी होण्यासाठी पंचांगकर्त्यांनी अधिक महिन्याची योजना केली, असं जाणकार सांगतात. साधारण दर पावणेतीन वर्षांनी अधिक मास येतो. ग्रेगोरियन कालगणना म्हणजे इंग्रजी महिन्यांचा विचार केला तर ३६५ दिवसात एक वर्ष पूर्ण होतं. पण चांद्रमासाचा विचार केला तर ३५४ तिथींचं एक वर्ष असतं. हा ११ दिवसांचा अनुशेष तिसऱ्या वर्षात अधिक महिन्याच्या निमित्ताने भरून निघतो. हिंदू पंचांगाचे अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात, "जेव्हा एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो." 


"मुलगी सासरी खुश राहावी म्हणून..." - पार्वती शेळके


जालना जिल्ह्यातील भोकरदन मधील २३ वर्षीय मंगेश शेळके हा शेतात हवं तसं उत्पन्न येत नाही म्हणून पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये  काम करतो. बाईमाणूसशी बोलतांना तो सांगतो, "गेल्या वर्षीच माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं, साडे तीन लाख रुपये हुंडा आणि दोन तोळे सोनं दिलं. या वर्षी तिचा पहिला धोंडा होता तर जावयाला ५० हजारांची अंगठी आणि दोघांनाही कपडे केले. धोंडा आहे म्हणून गेली सहा महिने झाले आम्ही पैशाची जोडाजोड केली. प्रथा आहे म्हणल्यावर करावं तर लागणारच ना. तसं ही बहीण खुश आहे ना सासरी मग काही वाटत नाही खर्च झाला तरी." 


मंगेश ची आई पार्वती शेळके सांगते, "दोनच एकर शेती आहे. त्यात पण कधी चांगलं पीक येतं कधी नाही येत म्हणूनच तर पोरगं पुण्याला जाऊन जॉब करतं. धोंड्याचं म्हणलं तर पोरगी सासरी तेव्हाच आनंदाने राहील न जेव्हा आपण माहेरातून तिला काही ना काही देत राहू. ज्यांच्या घरी पोरगी आहे त्यांना हे चुकलं थोडीये. आई-बापाला पोरगी सासरी  फक्त खुश पाहिजे, त्याच्यासाठी शेतात कितीही राबराब राबणं का व्हईना. माझी सोनी सासरी खुश आहे तिला मारहाण होत नाय. यातच माय-बाप म्हणून आम्ही धन्य झालो."   


"परंपरा पाळली, पण खिशाला झळ बसली" - राजू साबळे 


राजू साबळे यांना तीन मुली आहेत, तिन्ही मुलींचे लग्न झाले आहे आणि तिघीही त्यांच्या नवर्यांसह माहेरी आल्या. का तर धोंड्याचा महिना सुरु आहे. राजू साबळेंशी बाईमाणूसने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले,  "मुलीचं लग्न झाल्यानंतरही जावयाच्या मानपानाच्या, भेटवस्तूंच्या आणि विविध प्रथांच्या नावाखाली मुलीच्या कुटुंबावर सतत आर्थिक ताण टाकला जातो. मलाही परंपरेच्या नावाखाली धोंड्यात जवायाचा मानसन्मान करावा लागला. फक्त कपडे नाही तर प्रत्येक जावयाला अंगठी करावी लागली माझी जास्त ऐपत नाही म्हणून मी चांदीची अंगठी केली आणि तिन्ही मुलींना आणि जावयाला कपडे केले. मला वाटतं ज्या परंपरा मुलीच्या आई-वडिलांच्या त्यागाकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर आर्थिक भार वाढवतात, त्या परंपरांचा समाजाने गांभीर्याने पुनर्विचार करण्याची गरज आहे." 


User Image


धोंड्याचा महिन्यात जावयाचे लाड का केले जातात?


धोंड्याचा महिना हा महाराष्ट्रातील काही भागांत अधिक मास (पुरुषोत्तम मास) यासाठी वापरला जाणारा लोकप्रचलित शब्द आहे. मात्र हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात सारख्याच अर्थाने वापरला जात नाही. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि काही ग्रामीण भागांत अधिक मासाशी निगडित जावयाच्या सन्मानाच्या प्रथांमुळे "धोंड्याचा महिना" ही संज्ञा रूढ झाली आहे.


अधिक मासाला महाराष्ट्रातील अनेक भागांत धार्मिक महत्त्व असलं, तरी ग्रामीण समाजात त्याची ओळख केवळ पंचांगातील एका अतिरिक्त महिन्यापुरती मर्यादित नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील काही इतर भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणूनही ओळखलं जातं. या नावामागे कोणताही स्पष्ट शास्त्रीय किंवा धार्मिक संदर्भ आढळत नसला, तरी लोकपरंपरेतून त्याचा वापर रूढ झालेला दिसतो. विशेषतः या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची प्रथा असल्याने "धोंड्याचा महिना" ही संज्ञा अधिक लोकप्रिय झाली असावी, असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक मानतात. धार्मिक दृष्ट्या हा महिना दानधर्म, जप, तप, व्रत आणि भक्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मात्र ग्रामीण महाराष्ट्रात या धार्मिक अंगाबरोबरच त्याला सामाजिक आणि कौटुंबिक परंपरांचाही मजबूत आधार लाभलेला आहे.


याच महिन्यात मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. जावयासाठी विशेष जेवणावळ, नवीन कपडे, भेटवस्तू आणि काही भागांत सोन्याचे अलंकार देण्याची प्रथा आजही टिकून आहे. वरकरणी ही प्रथा जावयाच्या सन्मानाशी जोडलेली दिसत असली, तरी तिच्यामागील मूळ उद्देश अधिक व्यापक असल्याचे अभ्यासक सांगतात. विवाहानंतर मुलगी आपल्या सासरी स्थायिक होत असताना तिचे माहेराशी असलेले संबंध जिवंत राहावेत, तिला काही दिवस माहेरी राहण्याची संधी मिळावी आणि दोन्ही कुटुंबांमधील नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी अशा परंपरा निर्माण झाल्या असाव्यात, असे त्यांचे मत आहे.


पूर्वीच्या काळात संपर्काची साधने मर्यादित होती. दूरवर लग्न होऊन गेलेल्या मुलीची नियमित विचारपूस करणे किंवा तिची भेट घेणे प्रत्येक कुटुंबाला शक्य होत नसे. अशा परिस्थितीत अधिक मासासारख्या धार्मिक निमित्तांचा उपयोग कौटुंबिक भेटीगाठींसाठी केला जात असे. त्यामुळे धोंड्याचा महिना हा केवळ जावयाच्या आदरातिथ्याचा प्रसंग नसून, मुलीच्या माहेराशी असलेल्या भावनिक नात्याची पुनर्भेट घडवून आणणारा सामाजिक सोहळा म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.


मात्र काळानुसार या परंपरेचे स्वरूप बदलत गेले. अनेक ठिकाणी साध्या कौटुंबिक भेटींचे रूपांतर प्रतिष्ठेच्या आणि आर्थिक क्षमतेच्या प्रदर्शनात झाल्याची टीका केली जाते. त्यामुळे आज धोंड्याचा महिना हा परंपरा आणि आर्थिक वास्तव यांच्या केद्रबिंदूवर उभा असलेला एक सामाजिक विषय बनला आहे. एका बाजूला नातेसंबंध जपण्याची भावना आहे, तर दुसऱ्या बाजूला वाढत्या खर्चामुळे निर्माण होणारा आर्थिक ताण. त्यामुळेच या परंपरेकडे केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे, तर ग्रामीण समाजाच्या बदलत्या वास्तवाचा आरसा म्हणून पाहण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात. 


जावयाचा मानपान : परंपरा की अपेक्षांचे ओझे? 


स्त्री आणि लिंग अभ्यासाच्या प्रा. मंजुश्री लांडगे यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले, "कोणतीही रुढी, परंपरा किंवा रीतीरिवाज का आणि कोणासाठी निर्माण झाले, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्थेचा विचार केला असता अनेक परंपरांमध्ये स्त्री केंद्रस्थानी दिसते, मात्र त्याचबरोबर मुलीकडील कुटुंबावर विविध सामाजिक जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचे ओझेही टाकले जाते. लग्नानंतरची परतवणी, मानपान, पायधुणी यांसारख्या प्रथा सासरच्या मंडळींना सन्मान देण्याच्या नावाखाली रूढ झाल्या. धोंड्याचा महिना किंवा इतर अनेक सणांचे मूळ कृषी संस्कृती आणि भौगोलिक परिस्थितीत असले, तरी कालांतराने त्यांना धर्म, पाप-पुण्य आणि सामाजिक प्रतिष्ठेशी जोडले गेले.


User Image


कन्यादान पुण्याचे मानले गेले आणि त्याचसोबत जावयाचा मानपान करण्याची जबाबदारी मुलीच्या कुटुंबावर टाकण्यात आली, ज्यामुळे आर्थिक ताण वाढत गेला. या परंपरांमागे अर्थकारण आणि पितृसत्ताक व्यवस्था कार्यरत असल्याचे दिसून येते. पूर्वी साधेपणाने साजरे होणारे सण आज बाजारपेठ, माध्यमे आणि वाढत्या उपभोगवादामुळे अधिक खर्चिक आणि दिखाऊ झाले आहेत. मात्र कोणतेही नाते टिकवण्यासाठी खर्चिक सोहळे किंवा भेटवस्तू नव्हे, तर भावनिक जिव्हाळा, विश्वास आणि परस्पर सन्मान महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा परंपरा आणि सणांकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे, त्यामागील सामाजिक वास्तव समजून घेणे आणि बदलत्या काळानुसार त्यांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे."  


‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’


सामाजिक विश्लेषक आनंद शितोळे या प्रथेवर टीका करतात. ते म्हणतात की, धोंड्याचा महिना म्हणजे ‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’ अशी सध्या परिस्थिती झाली आहे. ‘’अधिक महिना येऊन जायचा, जावयाला बोलावून जेऊखाऊ घालून फारतर पोशाख देऊन विषय संपवला जायचा, सण हे केवळ निमित्त होतं. मात्र टीव्हीवरच्या रटाळ मालिकांनी याला अधिक खतपाणी घातलं. दुसऱ्या बाजूला ज्या मुलीच्या वडिलांकडे पैसाअडका आहे त्यांनी धोंड्याच्या महिन्यात सासरच्या पाचपन्नास माणसांना बोलावून हॉटेल बुक करणं, कॅटरिंगची व्यवस्था करणं, रांगोळ्या. जावयाला चांदीचे ताट, पैठणी साड्या, फुलांची सजावट, जावयाला जागिने, असे सगळे प्रकार सुरू केले. यासोबतच फोटोशूट, इन्स्टा रील्स, स्टेटस स्टोरी हे तर सोबत असतचं…यामुळे ज्यांची ऐपत नसते तेदेखील या व्यवस्थेचे आपसुक बळी ठरतात. कर्ज काढून लग्न करून दिलेल्या सगळ्याच मुलींना बापाची फाटलेली बनियन आणि आईची तुटकी चप्पल दिसत नाही. ऋण काढून सण साजरे करण्याची हौस कुणालाच नसते पण परिस्थिती समोर माणसं हतबल होऊन जातात.


लोकपरंपरेच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांना या अधिक महिन्याच्या परंपरेविषयी आणि त्याच्याशी जोडलेल्या जावयाला वाण द्यायच्या पद्धतीविषयी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "कालगणनेचा फरक नोंदवण्यासाठी योजलेल्या गणितीय आणि भौगोलिक गोष्टीचा विनाकारण धार्मिकतेशी संबंध जोडण्यात आला आहे. जावयाला द्यायचं सोन्या-चांदीचं वाण हे तर अजिबात परंपरेतून वगैरे आलेलं नाही. माझ्या लहानपणी पुण्यासारख्या सनातनी शहरातसुद्धा केळीच्या पानावर किंवा पत्रावळीत ३३ अनारशांचं वाण यशाशक्ती दिलेलं मी पाहिलं आहे. दीपदान ही प्रथा होती आणि अगदी वातसुद्धा वाणावर ठेवून दान दिलेली पाहिलेली आहे. मुलीला चोळीचा खण दिला जायचा."


"एवढ्या वर्षांत महाराष्ट्राच्या अनेक भागात राहिले, संस्कृतीचा जवळून अभ्यास केला तरी ही अधिक महिन्याच्या वाणाची प्रथा मात्र कुठे रुजून वर आलेली दिसली नाही. हा मला सध्याच्या भाषेत निव्वळ सेलिब्रेशनचा फंडा वाटतो. आर्थिक परिस्थिती बदलली तसे वाणाचे संदर्भ बदलले. अधिक महिना यंदा फारच मोठ्या प्रमाणावर प्रस्थ म्हणून वाढलेला दिसतोय. रोकडकेंद्री अर्थव्यवस्थेचं हे लक्षण आहे.  मार्केटिंगमुळे याचं लोण पसरतं आहे. धोंड्याच्या महिन्याचं वाण अकारण प्रतिष्ठेचं व्हायला लागलं ते त्याच्या जाहिराबाजीमुळे, अशी टीका तारा ‌भवळकर करतात.


दुसऱ्या बाजूला या परंपरेची दुसरी बाजू महिलांच्या अनुभवांतून समोर येते. सातारा जिल्ह्यातील एका विवाहित महिला सांगतात, "लग्नानंतर मुलीला माहेरी जाण्याच्या संधी कमी होतात. धोंड्याचा महिना म्हणजे आम्हाला काही दिवस माहेरी राहण्याची, आई-वडिलांशी गप्पा मारण्याची, जुन्या मैत्रिणींना भेटण्याची संधी असते. त्यामुळे ही प्रथा फक्त जावयाभोवती फिरते असं नाही."


स्त्री-अभ्यासकांच्या मते या प्रथेकडे स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. त्यांच्या मते, "लग्नानंतरही मुलीच्या आयुष्यातील केंद्रस्थानी तिच्या भावना आणि तिचं नातं असायला हवं. अनेकदा परंपरेचा केंद्रबिंदू जावई बनतो आणि मुलगी दुय्यम ठरते. त्यामुळे परंपरा टिकवायची असेल तर तिचं पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे."


मात्र याचा अर्थ परंपरा मोडून टाकावी असा नाही. अनेक कुटुंबांनी यासाठी मध्यममार्ग शोधायला सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांमध्ये जावयाला महागड्या भेटवस्तू देण्याऐवजी प्रतीकात्मक भेट दिली जाते. काही कुटुंबं मुलगी आणि जावई दोघांनाही समान सन्मान देतात. काही ठिकाणी एकत्र जेवण आणि कौटुंबिक भेट एवढ्यावरच कार्यक्रम मर्यादित ठेवला जातो.


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable
मोबाईलच्या नेटवर्कमध्येही आता गरीब-श्रीमंत भेदभाव… टेलकॉम कंपन्यांची मनमानी!
ताज्या घडामोडी

मोबाईलच्या नेटवर्कमध्येही आता गरीब-श्रीमंत भेदभाव… टेलकॉम कंपन्यांची मनमानी!

गर्दीच्या रेल्वे स्थानकांपासून स्टेडियमपर्यंत मोबाईल नेटवर्क जाण्याचा अनुभव सर्वसामान्य वापरकर्त्यांना नेहमी येत असतो. अशा पार्श्वभूमीवर एअरटेलने ‘प्रायोरिटी पोस्टपेड प्लॅन’ सादर करून चांगल्या नेटवर्कचा दावा केला आहे. कंपनीचा युक्तिवाद असा की, यामुळे नेटवर्क कार्यक्षमता वाढेल आणि ग्राहकांना स्थिर सेवा मिळेल. मात्र या मॉडेलमुळे इंटरनेटमध्ये ‘क्लास-बेस्ड’ विभागणी निर्माण होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा केवळ नवीन टेलिकॉम प्लॅन नसून भविष्यातील ‘डिजिटल डिव्हाईड’चा संकेत आहे का, अशी चर्चा तीव्र झाली आहे.

6 min read
S
Shekar Patil

Comments

Comments are currently disabled or loading...