परमिंदर कौर यांच्या गहन दुःखाची सर्व उत्तरं रशियन लष्कराच्या सोशल सेंटरमधील खोली क्रमांक ४१२ मधील संगणकात एका संगणक फाइलमध्ये होती. त्या आपल्या पती तेजपाल यांचे अवशेष शोधण्याच्या मोहिमेवर होत्या. त्यांना सांगण्यात आले होते की, युक्रेनविरुद्ध युद्ध लढताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
पण रडण्यासाठी कोणताही मृतदेह नव्हता, पाहण्यासाठी कोणतेही मृत्यू प्रमाणपत्र नव्हते, आठवण्यासाठी कोणताही अंतिम संदेश नव्हता. मृत्यूचा पुरावा शोधण्यासाठी त्यांनी अमृतसर ते मॉस्को असा प्रवास केला होता आणि कदाचित तिथेच सर्व काही थांबले होते.
तेजपाल यांच्या मृत्यूची बातमी एप्रिल 2024 मध्येच परमिंदरपर्यंत पोहोचली होती. मात्र, मृत्यू प्रमाणपत्र नसल्याने परमिंदर आपल्या पतीचा मृत्यू स्वीकारण्यास तयार नव्हत्या. भारत सरकारकडेही कोणतेच उत्तर नव्हते. महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगाना, हरियाणा, पंजाब अशी देशभरातील 27 कुटुबं रशियन दूतावासासमोर निदर्शने करत आहेत.
या दुःखात परमिंदर एकट्या नाहीत. रशिया लढत असलेल्या युद्धामध्ये किमान ४४ भारतीयांची भरती करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये युद्ध लढण्यासाठी रशियन लष्करात भरती झाल्यानंतर भारतीय वंशाचे सुमारे 16 जण बेपत्ता झाल्याचे मानले जाते, तर 12 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.
आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी त्यांची कुटुंबे आता एकटेच लढाई लढत आहेत. भारतात माहिती उपलब्ध नसल्याने ते आपल्या नातेवाइकांच्या शोधासाठी रशियाला जाण्यासाठी कर्ज घेत आहेत. एकमेकांना मदत करण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअॅपवर एक सहायता गट तयार केला आहे.
रशियात युद्ध लढताना भारतीयांची जी पहिली तुकडी तयार करण्यात आली होती त्यात तेजपाल यांचा समावेश बोता. त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली असली तरी, त्यांचा मृतदेह कधीच परत आला नाही. त्यामुळे सर्व माहिती समोर असूनही परमिंदर आपल्या पतीचा मृत्यू पूर्णपणे स्वीकारण्यास नकार देतात. इतर अनेक कुटुंबेही असेच करत आहेत. नातेवाईकांना शोध पत्रकारांसारखे धागेदोरे शोधावे लागतात.
पुढे काय करायचे याची कल्पना नसताना ते थेट मॉस्कोला पोहोचतात आणि मग एका पुराव्यापासून दुसऱ्या पुराव्याकडे जातात. त्यांचा शोध त्यांना मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमधील भरती कार्यालये आणि लष्करी आयोगांपर्यंत घेऊन जातो. ते गुगल लेन्सने रशियन कागदपत्रे स्कॅन करतात आणि भाषांतर अॅप्सचा वापर करतात.
आता रशियन अधिकारीही त्यांच्या ओळखीचे झाले आहेत, रशियन आकडे समजू लागले आहेत आणि रशियन लष्करी न्यायालयांच्या प्रणालीची ओळख झाली आहे. भारतीय कुटुंबांचे म्हणणे आहे की, भारत सरकारने त्यांना एकटे सोडले आहे आणि योग्य मदत मिळालेली नाही.
मॉस्कोमध्ये आपल्या बेपत्ता नातेवाइकांचा शोध घेत असलेल्यांपैकी एक, जगदीप कुमार, म्हणाले, “आम्ही परराष्ट्र मंत्रालयात अनेक बैठका घेतल्या आहेत आणि आम्हाला आश्वासन देण्यात आले आहे, पण ते आमच्याशी संपर्क करत नाहीत किंवा त्यानंतर काहीच करत नाहीत. इथेही, सेंट पीटर्सबर्ग किंवा मॉस्कोमधील दूतावास मदत करत नाहीत. दूतावासांचे दरवाजे आमच्यासाठी बंद आहेत.”
लष्करात जाण्याचं स्वप्न भारतात पूर्ण झालं नाही म्हणून मग रशियात गेले
जेव्हा परमिंदर कौर यांनी आपल्या पती तेजपाल सिंह यांचे मृत्यू प्रमाणपत्र वाचले, तेव्हा ‘शव बाहेर काढणे शक्य नाही’ या ओळीवर त्यांची नजर स्थिरावली. हा मृत्यूचा पहिला पुरावा होता. तो शोधण्यासाठी रशियाला जाण्यासाठी परमिंदर यांनी वर्षभरात तीन लाख रुपये बचत केली.
परमिंदर यांना सप्टेंबर 2024 मध्ये रशियाला गेलेला काळ आठवतो. त्यांच्या मनात फक्त उत्तरं मिळवण्याचीच इच्छा होती. सुरुवातीला त्या भटकत राहिल्या. त्या लष्कराच्या भरती केंद्रांमध्ये आणि भारतीय दूतावासात गेल्या, पण कोणतेही उत्तर मिळाले नाही, समोर होता फक्त एक विशाल, थंड आणि रिकामा देश. आपल्या पतीच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी थेट मॉक्सोला गेलेल्या परमिंदर कौर.
मॉस्कोमध्ये अखेर परमिंदरला खोली क्रमांक 412 मध्ये पाठवण्यात आले. त्या वारंवार या खोलीत जात असत. पहिल्यांदाच इथे त्यांना असा कोणी भेटला, जो तेजपालला ओळखत होता.
तेजपाल 2024 मध्ये युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी स्वेच्छेने रशियाला गेले होते. लष्करात भरती होणे हे तेजपाल यांचे आयुष्यभराचे स्वप्न होते, जे भारतात अपूर्ण राहिले होते. रशियात त्यांनी ते स्वप्न जगण्याचा मार्ग शोधला खरा पण तो अल्पकालीन ठरला.
भाषा येत नसतांनाही परदेशी कायदेशीर व्यवस्थेशी झुंज देण्याचा परमिंदर यांचा निर्धार होता. परमिंदर म्हणाल्या की, खोली क्रमांक 412 कोणत्याही भारतीय सरकारी कार्यालयापेक्षा वेगळी नाही. फरक इतकाच की तिथे लोक खरोखर काम करतात. त्या आत गेल्या आणि एका महिलेसमोर बसल्या, जी परमिंदर यांना काय हवे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होती.
गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने जेव्हा परमिंदर यांनी आपले येण्याचे कारण सांगितले व त्या रडू लागल्या तेव्हा खोलीतील इतर महिलांनी परमिंदर यांना धीर दिला. रशियन अधिकाऱ्यांनी सहानुभूती दाखवली आणि कामाला गती दिली. तेजपालची फाइल काढल्यावर महिलांनी सांगितले की त्यांना तेजपाल आठवत होते.
परमिंदर सांगतात, “तेजपाल खूप बोलके होते. मी त्यांचा फोटो दाखवला तेव्हा महिलांनी त्यांचे हसू ओळखले. त्यांनी मला धीर दिला, पाणी दिले आणि संगणकावरच मला तेजपाल, त्यांचा बटालियन नंबर आणि नामांकन क्रमांकाची माहिती दिली. याच कागदपत्रांच्या आधारे मी पुढे जाऊ शकले.”
‘’किमान त्यांचा मृतदेह तरी द्या’’
मॉस्कोमध्ये परमिंदर यांना समजले की हे प्रकरण सुटायला कित्येक महिने लागणार आहेत. त्यांनी रशियन लष्कराच्या सामाजिक केंद्रात अर्ज केला आणि एका वकिलाला पॉवर ऑफ अटर्नी दिली. त्या म्हणाल्या, “मला तेजपाल यांच्या मृत्यूची खात्री हवी होती. मी अजूनही आशा करत होते की ते जिवंत असतील, किंवा मी त्यांचा मृतदेह घेऊन घरी परत येईन. पुढे जाण्यासाठी आम्हाला हा ‘क्लोजर’ हवा होता.”
रशियात असताना, परमिंदर यांनी तेजपालच्या पावलावर पाऊल ठेवले. त्या क्रेमलिन स्वतः पाहायला गेल्या. त्या इमारतीबद्दल तेजपाल खूप चांगल्या गोष्टी सांगत असे. त्या काही अशा लोकांनाही भेटल्या, ज्यांनी त्यांच्या मृत पतीसोबत लष्करात काम केले होते; त्यात घानाचा एक नागरिकही होता. परमिंदर अनेक कमांडोंना भेटल्या. काही कठोर, तर काही सौम्य. तेजपाल यांच्या शोधात त्या मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमधील भरती केंद्रांमध्ये गेल्या आणि त्याच प्रकारचे दुःख सहन करणाऱ्या इतर कुटुंबीयांनाही भेटल्या.
परमिंदर आठवण काढत सांगतात, “त्याने [घानाच्या नागरिकाने] मला सांगितले की त्याला माहीत आहे की तेजपाल वाचला नाही. तेजपालच्या शेवटच्या दिवसांत तो त्याचा मित्र होता आणि त्याने मला त्याच्या शौर्याच्या कथा सांगितल्या. त्याने मला आपल्या कुटुंबाचे फोटो दाखवले आणि एक दिवस पंजाबमध्ये आमच्याशी भेटण्याचे वचन दिले.” दिल्लीच्या जंतर-मंतर परिसरात न्याय मागण्यासाठी जमलेले भारतीय कुटुंब.
त्यांचा शोध जसा त्यांना नको होता तसाच संपला: रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले तेजपालचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांना मिळाले. त्यांनी ही बाब कधीही कुटुंबाला सांगितली नाही. त्या म्हणाल्या, “त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले होते. मी हे माझ्या मुलांना आणि त्यांच्या आई-वडिलांना कसे सांगू? सर्व काही समोर असूनही माझा एक भाग अजूनही हे मान्य करायला तयार नाही की तेजपाल खरोखरच गेले आहेत.”
कुटुंबाला अजूनही वाटते की तेजपाल एक दिवस घरी दारातून आत येतील. परमिंदर आता आपल्या दोन मुलांचे पालनपोषण करत आहेत. 2024 च्या उन्हाळ्यात ज्या लष्करी चौकीवर तेजपाल शेवटचे तैनात होते, तिथे भेट देण्याची त्यांची योजना आहे. त्या म्हणाल्या, “मी त्यांना विचारू इच्छिते की ते असे कसे करू शकतात. इतक्या काळासाठी मृत्यूला गूढ कसे ठेवू शकतात.” मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कुटुंब आता पेन्शन आणि रशियात कायमस्वरूपी निवासासाठी पात्र आहे. मात्र, परमिंदर यांना त्यामुळे दिलासा मिळालेला नाही. “तेजपालचे आई-वडील अजूनही मानतात की तो परत येईल. मी त्यांची ही आशा संपवू शकत नाही. कदाचित तेजपाल खरंच परत येईल.”
एका भावाच्या शोधात, हरयाणापासून रशियापर्यंत…
जगदीप कुमार आता मॉस्कोतील लष्करी सामाजिक केंद्रांमध्ये एक ओळखीचा चेहरा झाले आहेत. ते नियमितपणे या केंद्रांना भेट देतात आणि बेपत्ता भारतीयांच्या ठिकाणाबाबत चौकशी करतात. 12 कुटुंबांच्या पॉवर ऑफ अटर्नीसह, जगदीप त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी शेवटची आशा बनले आहेत. गेल्या दोन वर्षांत जगदीपसाठी आयुष्य एखाद्या भयानक स्वप्नासारखे झाले आहे. त्यांना नीट झोप लागत नाही आणि नियमितपणे कामही करता येत नाही. एकच प्रश्न त्यांना सतत छळत आहे, त्यांचा भाऊ मनदीप कुठे आहे? हे वैयक्तिक दुःख त्यांना इतरांच्या वेदना समजून घेण्याची आणि त्याच प्रकारच्या शोकातून जात असलेल्या लोकांना मदत करण्याची ताकद देते.
2023 मध्ये मनदीप आनंदी मनाने घरातून निघाला होता. तो कामाच्या शोधात इटलीला जात होता. जगदीपचे लग्न अवघ्या एक वर्षापूर्वीच झाले होते आणि धाकटा भाऊ कुटुंबाचे नशीब बदलण्याच्या आशेने निघाला होता. डिसेंबर 2023 मध्ये भारत सोडताना मनदीपला इटलीचा व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कुटुंबाने एका एजंटला 31.40 लाख रुपये दिले. आईने खीर भरवून त्याला नव्या आयुष्यासाठी निरोप दिला. पण मनदीप मॉस्कोमध्ये उतरला आणि त्याला रशियन लष्करात भरती करण्यात आले. मॉक्सोमधील सामाजिक सुरक्षा केंद्र.
जगदीप आणि त्यांच्या आई-वडिलांनी शेवटची वेळ 3 मार्च 2024 रोजी मनदीपशी बोलले होते. स्नायपरचे प्रशिक्षण झाल्यानंतर त्याला डोनेत्स्कच्या आघाडी मोर्चावर पाठवण्यात आले. मनदीपसोबत तस्करी करून आणले गेलेले काही लोक नंतर वाचवण्यात आले आणि भारतात परतले. मात्र, त्यांच्यापैकी कुणाकडेही मनदीप कुठे होता आणि तो काय करत होता, याचे उत्तर नव्हते. 2024 मध्ये जगदीप यांनी रशियात बेपत्ता झालेल्या नातेवाइकांच्या कुटुंबांशी संपर्क साधला. त्यांनी एक व्हॉट्सअॅप गट तयार केला आणि भारतीय दूतावासाशी सामूहिकपणे संपर्क साधण्यास सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांत जगदीप परराष्ट्र मंत्रालयात अनेक बैठका घेऊ शकले. पण कुटुंबांना भारतीय दूतावासाकडून आवश्यक माहिती मिळू शकली नाही.
जगदीप यांनी परमिंदर यांच्याशी संवाद साधला; त्या तोपर्यंत रशियन न्यायालयांत खटले दाखल करून बसल्या होत्या. उत्तर मिळवण्यासाठी कुटुंबांनी मॉस्कोला जावे, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांचे म्हणणे होते की ते पूर्णपणे एकटे आहेत. यानंतर जगदीप यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली. त्यांनी खासदार, आमदार अशा स्थानिक नेत्यांकडे मदतीची मागणी केली. काही आर्थिक मदत उभी केल्यानंतर, ऑक्टोबर २०२४ मध्ये ते आणखी तीन जणांसह मॉस्कोला पोहोचले, ज्यांचे नातेवाईक बेपत्ता होते. त्यांचा पहिला थांबा लष्करी सामाजिक केंद्रे होती.
मृत सैनिकांशी संबंधित माहिती गोपनीय
ही लष्करी सामाजिक केंद्रे रशियात लष्करी आयोगाच्या अंतर्गत काम करतात आणि ‘डिफेंडर्स ऑफ द फादरलँड फाउंडेशन’द्वारे चालवली जातात. 2023 मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या आदेशाने ही केंद्रे स्थापन करण्यात आली होती. जखमी किंवा मृत सैनिकांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई आणि आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यात ही केंद्रे मदत करतात. हीच कागदपत्रे दिवाणी न्यायालयांत एखाद्या बेपत्ता सैनिकाला कायदेशीररित्या मृत घोषित करण्यासाठी आवश्यक असतात. याच आदेशामुळे सरकारी देयकांचा मार्ग मोकळा होतो. मार्च 2025 नंतर युक्रेन युद्धात मरण पावलेल्यांची संख्या रशियाने अद्ययावत केलेली नाही. मृत सैनिकांशी संबंधित माहिती गोपनीय ठेवली जात असल्याने रशियन नागरिकही उत्तरांसाठी भटकत आहेत.
रशियाच्या गुंतागुंतीच्या नोकरशाहीशी झुंज देण्यास जगदीप तयार होते. त्यांनी मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गच्या चकरा मारल्या आणि स्वस्त हॉस्टेल्स व हॉटेल्समध्ये राहून दिवस काढले. त्यांच्या जवळ परराष्ट्र मंत्रालयाचे एक पत्र आणि १२ कुटुंबांच्या पॉवर ऑफ अटर्नी आहेत. ते हरियाणातील आई-वडिलांना धीर देतात. दुःखी पत्नींसाठी भाऊ बनतात आणि आशेने वाट पाहणाऱ्या मुलांसाठी आशेचा किरण ठरतात. या काळात त्यांना रशियन पोलिसांकडून वंशवाद, गैरवर्तन आणि छळालाही सामोरे जावे लागले.
जगदीप यांनी फोनवर सांगितले, “रशियन लोक अजिबात स्वागतशील नाहीत. ते भारतीयांचा तिरस्कार करतात. अनेकदा मला हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधून बाहेर काढण्यात आले, कारण त्यांना तिथे कुठलाही काळसर रंगाचा माणूस नको असतो.” मनदीप सिंह, ज्याला तस्करीमार्फत जबरदस्तीने रशियन सैन्यात सहभागी केले होते.
गेल्या दोन वर्षांत जगदीप आपल्या भावाच्या शोधात तीन वेळा रशियाला जाऊन आले आहेत. आता त्यांना मॉस्कोची मेट्रो चांगली ओळखीची झाली आहे, इन्स्टंट नूडल्सवर दिवस काढतात आणि शहरातील जवळजवळ प्रत्येक हॉस्टेलमध्ये ते राहिले आहेत. पंजाबमधील गुरायामध्ये, जगदीप यांचे वडील अवतार आपल्या धाकट्या मुलाबद्दल रडल्याशिवाय बोलू शकत नाहीत. ते स्थानिक बाजारात मोबाईल सिमचे दुकान चालवतात आणि रविदास नगरमधील एका छोट्याशा घरात राहतात.
अवतार म्हणाले, “मला एवढंच माहीत आहे की तो जिवंत आहे. कदाचित युक्रेनमध्ये त्याला युद्धकैदी बनवले गेले असावे.” ते जगदीपच्या लग्नाचा अल्बम पाहतात, ज्यात मनदीप नाचताना आणि हसताना दिसतो. ते पुढे म्हणाले, “त्याला तिथे लष्करात तस्करी करून नेण्यात आले. त्याच्यासोबत नेमके काय झाले, हे फक्त देवालाच माहीत.”
अवतार यांची पहिली आणि शेवटची परदेशवारी रशियाला झाली. भाषा न कळल्यामुळे ते फक्त भाषांतर अॅपच्या मदतीने लोकांशी संवाद साधू शकले. तिथे ते इतर लोकांच्या आई-वडिलांना भेटले, आपल्या मुलांच्या कहाण्या सांगितल्या आणि एकमेकांसोबत रडले. या सामायिक संघर्षामुळे कुटुंबांमध्ये एक खोल नातेसंबंध तयार झाला. जगदीप यांची सर्वात मोठी आशा म्हणजे त्यांचा भाऊ मनदीप युक्रेनमध्ये युद्धकैदी असावा. मात्र, ‘द प्रिंट’ने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या ताब्यात भारतीय वंशाचा केवळ एकच युद्धकैदी आहे. आता जगदीप अशा ठिकाणीही जात आहेत, जिथे ते कधीच जाऊ इच्छित नव्हते,मृतगृह. ते ‘द प्रिंट’ला म्हणाले, “रशियनांनी काही भारतीय मृतदेह रोस्तोवमधील मृतगृहांमध्ये ठेवले आहेत. मी तिथे जात आहे; तिथे मला माझे उत्तर सापडू नये, अशीच माझी आशा आहे.”
तस्करीच्या माध्यमातून रशियन सैन्यात जबरदस्तीने सामील केले
रबाब खान यांनी आपल्या बालपणीच्या मित्राला, जहूर अहमदला डोक्यात गोळी लागताना पाहिले. शोक व्यक्त करण्याचीही उसंत मिळाली नाही. डोनेत्स्कमध्ये जखमी झाल्यानंतर त्यांनी कसाबसा रुग्णालय, मग भारतीय दूतावास आणि अखेरीस उत्तर प्रदेशातील कासगंज येथे पोहोचण्याचा मार्ग काढला. जसे जगदीप हरियाणा आणि पंजाबमधील कुटुंबांसाठी आशेचा आधार आहेत, तसेच खान उत्तर प्रदेशातील विशेषतः आझमगढमधील कुटुंबांसाठी आधार बनले आहेत. भारतात परतल्यानंतर खान सर्वप्रथम काश्मीरला गेले, जिथे जहूरचे घर आहे. त्यांना त्याच्या वृद्ध आई-वडिलांना ही बातमी द्यावी लागली, जे दोन वर्षांनंतरही ती स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे खान वारंवार मॉस्कोला जात राहतात, किमान काहीतरी ‘क्लोजर’ मिळावे म्हणून.
खान यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले, “मला सत्य माहीत असतानाही ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. कुठलाही मृतदेह नाही. इतक्या दूर देशात मुलाचा मृत्यू स्वीकारणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. किमान त्याची एखादी वस्तू तरी सापडावी, अशी माझी आशा आहे.”
गेल्या तीन वर्षांपासून रशियन युद्ध आणि त्यासोबतचा आघात खान यांच्या आयुष्यावर छाया टाकून आहे. त्यातून ते बाहेर पडू शकलेले नाहीत. दर दुसऱ्या दिवशी कुणीतरी मदतीसाठी फोन करतो. प्रश्न तोच असतो, आमचा मुलगा कुठे आहे आणि त्याला कधी परत आणले जाईल? बहुतेक तरुण उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणामधील आहेत. तेजपाल वगळता, बहुतेक प्रकरणे एजंटांच्या माध्यमातून तस्करीची असल्याचे दिसते. मागील वर्षी पंतप्रधान मोदी यांनी रशिया दौऱ्यात हा मुद्दा उपस्थित केला होता आणि मॉस्कोने पुढे कोणतीही भरती होणार नाही, असे आश्वासन दिले होते. तरीही, रशियन लष्करात कार्यरत भारतीयांची संख्या सप्टेंबरमध्ये 27 वरून ऑक्टोबरमध्ये 44 वर गेली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे आहे.
मोजकीच कुटुंबे आपल्या नातेवाइकांचे अवशेष परत आणू शकली आहेत. उदाहरणार्थ, आझमगढचे अजय. अजय यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले, “मागील वर्षी माझ्या वडिलांच्या मृत्यूची पुष्टी झाल्यावर, मी रशियन वाणिज्य दूतावास, भारतीय दूतावास आणि स्थानिक नेत्यांना अनेकदा फोन केले. कोणत्याही परिस्थितीत मला त्यांचा मृतदेह परत हवा होता, जेणेकरून त्यांना सन्मानाने अखेरचा निरोप देता येईल.”
अजय आपल्या वडील कन्हैयाचा मृतदेह परत आणू शकले, तरी ते त्यांचे 39 वर्षीय काका, विनोद यादव यांचा शोध लावू शकले नाहीत; ते अजूनही बेपत्ता आहेत. ते म्हणाले, “मी दोनदा रशियाला गेलो आहे. त्यांच्या पार्थिव देहाला घरी आणणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या वाचण्याची कोणतीही आशा नाही. ते 99.99 टक्के गेले आहेत. पण भारतात बसून हे मान्य करणे खूप कठीण आहे की एखादी व्यक्ती अशा प्रदेशात मारली गेली, ज्याचे नावसुद्धा आपल्याला नीट उच्चारता येत नाही.” जोपर्यंत मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत काकांच्या मुलांना आपल्या वडिलांची वाट पाहावीच लागेल.
(सौजन्य - द प्रिंट, अनुवाद - प्रतिक पुरी)
मूळ लेखाची लिंक : https://hindi.theprint.in/feature/no-bodies-no-death-certificates-families-search-moscow-for-missing-indians-in-russias-war/906935/




