Skip to main content

मुकी बिचारी कोणीही हाका…’, लाडक्या बहिणींच्या ‘केवायसी’ गोंधळाचा भार थेट अंगणवाडी ताईंवर!

Vitthal Sable
29 Jan 2026
5 min read
17 views
मुकी बिचारी कोणीही हाका…’, लाडक्या बहिणींच्या ‘केवायसी’ गोंधळाचा भार थेट अंगणवाडी ताईंवर!

 विठ्ठल साबळे




- लाडकी बहीण योजनेतील केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेचा थेट ताण अंगणवाडी सेविकांवर पडत आहे.

- सुमारे 2.5 कोटी अर्जांपैकी 26 लाख महिला केवळ केवायसीतील त्रुटींमुळे लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

- प्रशासनाच्या विस्कळीत अंमलबजावणीचा फटका थेट अंगणवाडीत येणाऱ्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना बसत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.


अंगणवाडी सेविकांचे मुख्य काम काय आहे तर, पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण आणि आरोग्य व आहार शिक्षण याची अंमलबजावणी. राज्यात सध्या एकूण 1,10,631 अंगणवाड्या आहेत. याचे लाभार्थी आहेत 66,59,650. म्हणजेच जवळपास साडेसहा लाख महिला, किशोरी मुली आणि सहा वर्षाखालच्या मुलांपर्यंत अंगणवाडी ताई पोहोचतात.


इतका कामाचा प्रचंड व्याप असतानाही शासनाच्या इतर अनेक योजना राबवण्याची जबाबदारी अंगणवाडी ताईंवर अलिकडच्या काळात पडत आहे. आता त्यात आणकी एा सरकारी योजनेची भर पडली आहे ती म्हणजे अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची छाननी करून त्यांना या योजनेसाठी पात्र ठरवणं. 


त्यामुळेच राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ई केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळाचा थेट परिणाम आता अंगणवाडी सेविकांच्या कामावर होत असून, आधीच कामाच्या ताणाखाली असलेल्या अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकण्यात आल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. योजना सुरू करताना योग्य छाननी न झाल्यामुळे निर्माण झालेला प्रश्न आता थेट अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर ढकलला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.


२६ लाख लाडक्या बहिणींची जबाबदारी आता अंगणवाडी ताईंवर


राज्यातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, लाखो महिलांनी अर्ज करून ई-केवायसी प्रक्रियाही पूर्ण केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून सुमारे 2.5 कोटी अर्ज भरले गेले. या अर्जांपैकी सुमारे 2.1 कोटी महिलांची ई केवायसी पूर्ण झाली असून उर्वरित 45 लाख महिलांना योजनेबाहेर ठेवण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 26 लाख महिला केवळ ई केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकीमुळे लाभापासून वंचित राहिल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. या 26 लाख महिलांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला असून ही जबाबदारी थेट अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे.


User Image

मात्र, ई-केवायसी करूनही अनेक पात्र महिलांच्या खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनुदान रखडण्यामागे तांत्रिक अडचणी, आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकातील विसंगती, तसेच काही अर्जामधील माहितीतील त्रुटी कारणीभूत असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात येत आहे. 


चुक सरकारची, दुरुस्त करण्याची जबाबदारी मात्र अंगणवाडी सेविकांवर


त्रूटी दुरूस्तीसाठी महिला व बालविकास विभागाने १८१ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. याशिवाय, ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रियाही राबवण्यात आली आहे. मात्र, इतके उपाय करूनही अनेक महिलांच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही. हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतरही ठोस उत्तर मिळत नसल्याच्या किंवा तिकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी महिलांकडून करण्यात येत आहेत. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दिलासा देण्याचा असताना, प्रत्यक्षात अनुदान न मिळाल्याने अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


ग्रामीण भागातील महिलांना या योजनेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही पैसे खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही ठिकाणी तर महिलांना अर्ज पुन्हा करावा लागल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.


योजनेच्या सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना मोठ्या प्रमाणावर मोकळीक देण्यात आली. कॅफे, कॉमन सर्व्हिस सेंटर, मोबाईल अ‍ॅप यामार्फत महिलांनी स्वतः अर्ज भरले. मात्र त्या टप्प्यावर कोणतीही ठोस मर्यादा, जबाबदारी किंवा फिल्ड स्तरावरील छाननी ठेवण्यात आली नाही. परिणामी अपात्र महिलांचे अर्ज मंजूर झाले आणि पात्र महिलांपैकी काहीजणी चुकीच्या नोंदीमुळे अपात्र ठरल्या. या सगळ्या प्रक्रियेची दुरुस्ती करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांची आठवण प्रशासनाला झाली आहे.


‘’अगोदरच  मातृ वंदना योजनेचे काम आहे, आता लाडक्या बहिणींचे’’


या संदर्भात ‘बाईमाणूस’ शी बोलताना अंगणवाडी सेविका संगीता खामिटकर सांगतात की, फॉर्म भरताना सुरुवातीलाच मर्यादा अंगणवाडी सेविकांकडे ठेवायला हव्या होत्या. ऑनलाईन पद्धतीने स्वतः फॉर्म भरता येत असताना तेव्हा कोणतीही अट नव्हती. मात्र केवायसी, पडताळणी आणि सर्वेक्षणाचा टप्पा आला की सर्व जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकली जाते, असे त्या सांगतात.


त्या पुढे सांगतात की, सध्या फक्त लाडकी बहीण योजनेचेच काम नाही तर मातृ वंदना योजनेचे कामसुद्धा अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आले आहे. एकीकडे मातृ वंदनेचे फॉर्म, नोंदी, यांचा पाठपुरावा करायचा आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतील  महिलांची पडताळणी करायची अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम अंगणवाडीत येणाऱ्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांवर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.


User Image

संगीता खामिटकर यांनी सरकारकडे थेट विनंती केली आहे की, लाडकी बहीण योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीने मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवलेला आहे. अशा परिस्थितीत महिलांना पुन्हा छाननी आणि पडताळणीच्या प्रक्रियेत अडकवण्याऐवजी त्यांना सरसकट लाभ द्यावा. योजना जाहीर करताना दिलेली आश्वासने पूर्ण करताना कागदोपत्री अडथळे वाढवू नयेत आणि महिलांवर अतिरिक्त भार टाकू नये अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.


राज्यभरात हजारो अंगणवाड्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. अंगणवाडी सेविकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरोघरी जाऊन माहिती गोळा करावी लागत आहे. कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे का, उत्पन्नाची स्थिती काय आहे, पूर्वी लाभ मिळाला आहे का अशा बाबींची चौकशी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असून कोणतीही अतिरिक्त यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.


‘’लाडक्या बहिणी आमच्यावरच राग काढतात’’


लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरवलेल्या पण प्रत्यक्षात पात्र असलेल्या महिलांची नावे शासनाला सुचवण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आले आहे. या 26 लाख महिलांची जिल्हानिहाय आकडेवारी यादी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणताही स्वतंत्र फॉर्म किंवा नवीन अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आलेला नाही. शासनाच्या सूचनेनुसार अंगणवाडी सेविकांनी अशा महिलांची नावे संकलित करून पुढे पाठवायची आहेत. म्हणजेच पात्र महिला ओळखण्याची आणि त्यांची नावे शासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्यक्ष फिल्ड स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे.


गडचिरोलीच्या भामरागड येथील अंगणवाडी सेविका राजेश्री लेखामी यांना सध्या यासंबंधी खुप त्रास सहन करावा लागतोय. ‘बाईमाणूस’शी बोलताना लेखामी म्हणतात की, लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला नसल्यामुळे महिलांचा सगला राग आम्हा अंगणवाडी सेविकांवर निघतो. लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांचं सर्वेक्षण झाल्यावर नाव वगळलं गेलं तर आम्हालाच जबाबदार धरतात.खूप महिला ओरडतात, शिव्या देतात, त्यांचं नाव अपात्र यादीत आलं की. म्हणतात, 'बाई, आमचं नाव नाही आलं, आम्हांला पैसे नाही मिळाले.' मग ते आम्हांलाच बडबड करतात, शिव्या देतात."


मुकी बिचारी कोणीही हाका…


अंगणवाडी सेविका या बालविकास व्यवस्थेचा कणा आहेत. पोषण आहार, आरोग्य तपासणी, पूर्व प्राथमिक शिक्षण, गर्भवती महिलांचा पाठपुरावा अशी अनेक कामे त्यांच्या माध्यमातून केली जातात. मात्र सातत्याने नवीन योजना, सर्वेक्षण आणि पडताळणीची कामे वाढत गेल्याने त्यांच्या मूळ कामावर परिणाम होत आहे. याचा दीर्घकालीन फटका बालकांच्या शिक्षण आणि आरोग्यावर बसण्याची भीती व्यक्त होत आहे.


User Image

एकीकडे शासन महिला सक्षमीकरणाचा दावा करत असताना दुसरीकडे महिलाच असलेल्या अंगणवाडी सेविकांवर प्रशासकीय अपयशाचा भार टाकला जात असल्याचे चित्र आहे. लाडकी बहीण योजनेतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याऐवजी थेट तळागाळातील सेविकांवर जबाबदारी सोपवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. योजना यशस्वी करायची असेल तर अंगणवाडी सेविकांच्या कामाच्या मर्यादा, क्षमतेचा आणि त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांचा विचार करणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...