सविता प्रशांत
- वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाच्या सुशोभीकरणाच्या नादात थेट ऐतिहासिक ठेवाच नष्ट झाल्यावरून जोरदार रणकंदन सुरु झालं आहे.
- याच मणिकर्णिका घाटावरच्या चिता पेटवण्याचा अधिकार शेकडो वर्षांपासून ज्या डोम समाजाकडे आहे त्यांची ही कहाणी आहे.
- मणिकर्णिकेवर चिता पेटत राहतील. गंगा वाहत राहील. वाराणसी जगत राहील. पण जो डोम राडा इतरांना मोक्षाच्या दारापर्यंत पोहोचवतो, त्याला स्वतःच्या आयुष्यात मानवी सन्मान कधी मिळणार, हा प्रश्न अजूनही धुरातच विरून जातो.
उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या बुलडोझरची गुंडांमध्ये प्रचंड भीती. मात्र हाच बुलडोझर सध्या वाराणसीपासून महाराष्ट्रापर्यंतच्या संतापाचं कारण ठरलाय. त्याचं झालं असं की वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाच्या सुशोभीकरणाच्या नादात तिथं थेट ऐतिहासिक ठेवाच नष्ट झाल्याचा आरोप होत आहे. यावरून जोरदार रणकंदन सुरु झालंय. सोशल मीडियावरूनही सरकारच्या या कृतीवर टीका झाली आहे. राज्यात तर काँग्रेसनं थेट आंदोलनाचा इशारा दिलाय. वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर सध्या सुशोभीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी काही जुनी बांधकामं हटवताना पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या मढीलाच (मंदिर) धक्का लागल्याचा आरोप होत आहेत. खुद्द अहिल्याबाईंनी स्थापन केलेल्या मूर्ती, त्यांचीही मूर्ती यात उद्ध्वस्त झाल्या असंही सांगितलं जातंय. तर कोणतीही मूर्ती तोडण्यात आलेली नाही. सर्व मूर्ती सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आल्याचा दावा सरकारनं केलाय.
मात्र आजच्या या रिपोर्टचा विषय मणिकर्णिका घाटाचा नसून या ‘घाटाच्या राजा’चा आहे… साऱ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला मणिकर्णिका घाटाचा डोम राजा. वाराणसी कधी झोपत नाही, असं म्हणतात. पण मणिकर्णिका घाट कधी श्वासही घेत नाही. दिवस-रात्र, ऋतू, सण-उत्सव, राजकारण, विकास, कशाचाही फरक न पडता इथे चिता पेटतच राहतात. गंगेच्या प्रवाहावर राख मिसळते, हवेत मृत्यूचा धूर दरवळतो, आणि त्या धुरात एक माणूस सतत वावरत असतो, तो म्हणजे डोम राजा…
मणिकर्णिकेचा बिना मुकुटाचा राजा… डोम राजा!
डोम राजा हा कुठला मुकुट घातलेला राजा नाही. त्याचं राज्य म्हणजे अग्नी, त्याचं सिंहासन म्हणजे घाट, आणि त्याची सत्ता म्हणजे परंपरा. मणिकर्णिकेवर चिता पेटवण्याचा अधिकार शेकडो वर्षांपासून डोम समाजाकडे आहे. अंतिम संस्कारासाठी लागणारा पहिला अग्नी आजही डोम राजाकडूनच घेतला जातो. स्कंदपुराण आणि काशीखंडातील कथांनुसार हा अग्नी भगवान शंकरांनीच डोम समाजाला दिला, अशी धारणा आहे. मृत्यूच्या क्षणी शिव स्वतः इथे वास करतो आणि डोम राजा त्याचा प्रतिनिधी मानला जातो.
गंगेच्या काठीचे हिंदू तीर्थक्षेत्र आणि काशी विश्वनाथाचे मंदिर असणारे शहर अशी वाराणसीची ओळख आहे. याही व्यतिरिक्त मुक्ती देणारे स्मशानघाटाचे शहर अशीही वाराणसीची ओळख आहे. मणिकर्णिकेवर अहोरात्र जळणारा स्मशानघाट आहे. चोवीस तास बारोमास इथे चिता जळत असतात. काशीत शेवटचा श्वास घेतल्याने मोक्ष प्राप्त होतो, असं मानलं जाते. काशीमध्ये जिथे मृत्यू आणि मोक्षाचं नाव येतं, तिथ या नगरीच्या डोम राजाचे नाव अवश्य घेतलं जातं. असं म्हणतात की डोम राजाच्या हातून मृत शरीरातील आत्म्यांना मुक्ती आणि मोक्ष प्राप्त होतो.
बनारसच्या 80 घाटांपैकी दोन घाटांवर अंत्यसंस्कार केले जातात. मणिकर्णिका घाट आणि राजा हरिश्चंद्र घाट. या दोन्ही घाटांवर डोम राजाचं कुटुंब राहत. डोम राजाचं कुटुंब जळत्या मृतदेहांच्या सानिध्यात राहतात आणि या जळत्या मृतदेहांच्या चितेच्या आगीने त्यांच्या घराची चूल जळते. या दोन्ही घाटांवर डोम जातीचे लोकंच मृतदेहांचे अंतिम संस्कार करतात. या जातीचे लोकं समाजात अस्पृश्य मानले जातात पण त्यांच्या हातून मेलेल्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात. डोम राजाला पृथ्वीचा यमराज देखील म्हणतात जो मृत शरीरांवर अंत्यसंस्कार करतो आणि त्यांना मोक्ष प्राप्त करण्यास मदत करतो. त्यांची जीवनशैली सामान्य लोकांपेक्षा काहीशी वेगळी आहे. त्यांच्या घरातील स्टोव्हची आग जळत्या चितेतून घेतली जाते ज्यावर त्यांचे कुटुंबीय अन्न शिजवतात आणि खातात.
वाराणसीचं भयावह, भीषण, दाहक वेगळं जग प्रत्यक्षात आहे तरी कसं...?
पहाटेची थंडी अजूनही बोचरी असताना ५५ वर्षांचे महेश चौधरी गंगेच्या पाण्यात उतरतात. काशीच्या डोम राजा परिवाराशी संबंधित असलेले महेश चिता थंड होण्याची वाट पाहतात. त्यानंतर जळालेल्या लाकडांची उरलेली राख, मानवी अस्थींचे तुकडे आणि कोळसे एका मोठ्या पातेल्यात भरून ते पाण्यात उभे राहतात. हाताने, पायाने राख चाळत ते त्यात दडलेली सोन्या-चांदीची कणं शोधतात. भीषण थंडी असो वा कडक ऊन, हीच त्यांची रोजची दिनचर्या.
ही गोष्ट फक्त महेशची नाही. ही बनारसच्या प्रत्येक त्या डोम राजा कुटुंबाची आहे, जे २१व्या शतकात, मोबाइल-लॅपटॉपच्या युगात, अजूनही जळालेल्या चितांच्या राखेतून आपलं आयुष्य शोधत आहेत. एकीकडे ‘डिजिटल इंडिया’ची भाषा, तर दुसरीकडे राखेवर उभं असलेलं जगणं, या दोन टोकांमधली दरी मणिकर्णिकेवर ठळकपणे दिसते.
काय आख्यायिका आहे या डोम राजाची?
या डोम राजाबद्दल पसरलेली एक आख्यायिका वाराणसीचे वरिष्ठ पत्रकार उत्पल पाठक सांगतात. प्रचलित आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शिव माता पार्वतीसोबत काशीला भेट देण्यासाठी आले. दरम्यान, मणिकर्णिका घाटावर स्नान करताना माता पार्वतीची एक अंगठी पडली, जी डोम नावाच्या राजाने स्वतःजवळ ठेवली होती. खूप शोधाशोध करूनही अंगठी सापडली नाही, त्यानंतर महादेव रागावले आणि त्यांनी अंगठी चोरणाऱ्याला नष्ट करण्याचा शाप दिला. या शापाच्या भीतीने डोमने भोलेनाथ शंकर आणि माता पार्वतीची माफी मागितली, त्यानंतर भगवान शिवाने राजा डोमला शापातून मुक्त केले आणि त्याला स्मशानभूमीचा राजा घोषित केले. असे म्हणतात की तेव्हापासून डोम राजा आणि त्यांचे वंशज स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम करू लागले. मान्यतेनुसार, डोम राजाच्या वंशाला डोम राजा म्हणतात.
दुसरी कथा महाराजा हरिश्चंद्रांच्या काळाशी जोडलेली असल्याची माहिती उत्पल पाठक देतात. वाराणसीच्या याच घाटावर म्हणे सत्यवचनी हरिश्चंद्र हा डोम राजाच्या नोकरीला होता. त्याची पत्नी तारामती जेव्हा सर्पदंशाने मृत झालेल्या आपल्या मुलाचे, रोहितचे शव घेऊन या घाटावर आली, तेव्हा हरिश्चंद्र राजाने तारामतीकडूनही कर मागितला होता आणि तो कर भरण्यासाठी पैसे नसल्याने तारामतीने आपल्या मुलाच्या शवासह चितेत उडी टाकली होती. शेवटी स्वर्गातून देवलोक प्रकटले आणि त्यांनी राजा हरिश्चंद्राला आशीर्वाद देऊन पत्नी-मुलासह त्याचे सगळे गतवैभव परत केले... आणि म्हणूनच इथला डोम समाज आपण राजा हरिश्चंद्राचे वंशज असल्याचे सांगत असतो.
संबंधित लेख वाचा:
असे असतानाही जिथे जीवनाचा शेवट होतो तिथे डोम राजाच्या जगण्याचा प्रारंभ होतो. जोपर्यंत कुणी मरत नाही तोपर्यंत त्यांच्या पोटाचा मार्ग मोकळा होत नाही. मयताच्या अंगावरचे कपडे, दागिने आणि मयताला जाळल्यानंतर मिळणारी दक्षिणा हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन... वाराणसीच्या मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाटावरची ही पिढ्यान््पिढ्या सुरू असलेली विदारक परिस्थिती आणि या ज्वाळांच्या दाहकतेत होरपळून निघत असलेला इथला डोम समाज…
नावाचेच राजे असलेल्या डोम समाजाला कुठल्याच मंदिरात प्रवेश नाही
धर्म, कर्म आणि मोक्ष नगरी म्हणून सबंध जगभरात डंका पिटणाऱ्या या वाराणसी नगरीत आजही डोम समाज अस्पृश्यच...
‘’मुझे अगर बाजार में एक गिलास पानी भी पीना होता है तो मै उस गिलास को छू नही सकता हूं, जिससे मै पानी पी रहा होता हूँ, पिलानेवाला मुझे उपर से पानी पिला देता है... स्थानीय लोग यहां तक की मेरे पडोसी मुझे घर के अंदर नही आने देते है और न ही मेरे घर में कोई आता है…’’
हरिश्चंद्र घाटाच्या परिसरात राहणाऱ्या संजीत डोमची ही कैफियतच डोम लोकांचे समाजातील स्थान स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. ज्या डोम राजाशिवाय वाराणसीच्या घाटांवरचे अंत्यसंस्कार पूर्ण होऊच शकत नाहीत, त्या फक्त नावाचेच राजे असलेल्या डोम समाजाला कुठल्याच मंदिरात प्रवेश दिला जात नाही, यापेक्षा अधिक लाजिरवाणी बाब काय असू शकेल?
डोम राजा परिवार केवळ राख चाळत नाही; ते मृतदेहांचे अंतिम संस्कारही पार पाडतात. अशी मान्यता आहे की, त्यांच्या हातूनच देहाला मोक्ष मिळतो. पण हे राजेपण फक्त मृत्यूपर्यंतच. घाटाबाहेर पडताच डोम राजाची ओळख बदलते. “मृतदेह असताना सगळे समान. पण माणूस जिवंत असेल, तर फरक पडतो,” महेश चौधरी शांतपणे सांगतात. समाज अजूनही त्यांना अस्पृश्यतेच्या छायेत पाहतो. मोक्षासाठी येणारे उच्चवर्णीय मृतदेह त्यांच्या हातून अग्नी घेतात, पण जिवंतपणी त्याच हाताला सन्मान मिळत नाही.
या घाटांवरची चितेची आग आजतागायत कधीही विझलेली नाही…
काशीच्या मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर अहोरात्र चिता जळत असतात. मोक्षप्राप्तीसाठी इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून अंत्यसंस्कारासाठी किंवा अस्थि विसर्जनासाठी लोक येत असतात. असे म्हणतात की, या घाटांवरची चितेची आग आजतागायत कधीही विझलेली नाही. नवीन चिता पेटवण्यासाठी आगकाडीचा इथे कधीच वापर केला जात नाही, कारण तशी वेळच येत नाही... दिवसरात्र जळणाऱ्या प्रेतांच्या वासाने या घाटांना कायम वेढलेलं... हा वास धुसरसाही नाकात शिरला तर आपण अस्वस्थ होतो, तर डोम समाजाला या वासाची इतकी सवय झाली आहे की, त्याचं अस्तित्वही त्यांना जाणवत नाही.
संजीत डोम म्हणतो, इथे अनेकदा शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह आणले जातात, प्रचंड दुर्गंधी येते. ती जाणवू नये, यासाठी आम्ही दररोज किमान आठ बाटल्या दारू पिऊनच ही कामं करत असतो.
बालपण हरवून बसलेली डोम समाजाची लहान मुलं…
बालपण हरवून बसलेली डोम समाजाची लहान मुलं हे या घाटांवरचे आणखी एक विदारक सत्य… भटजींचे मंत्रोच्चार, नातेवाइकांचा आक्रोश, अंत्यसंस्काराची लगबग आणि अशा परिस्थितीचा अचूक फायदा उचलत गिधाडाप्रमाणे सावजावर तीक्ष्ण नजर ठेवून असलेली ५ ते १५ वर्षे वयोगटातली ही मुलं... प्रेताच्या अंगावरचे कफन हे त्यांचे सावज... प्रेतयात्रा जेव्हा घाटावर पोहोचते, तेव्हा ही मुलं त्याच्या आजूबाजूलाच फिरकत असतात आणि ज्या क्षणी खांद्यांवरचे प्रेत खाली जमिनीवर ठेवले जाते, त्याच क्षणी विजेच्या चपळाईने ही मुलं प्रेताच्या अंगावरचे कफन घेऊन असा काही पळ काढतात, की कुणाच्या लक्षात येण्या अगोदरच ते गायब झालेले असतात. ज्या दुकानातून नातेवाइकांनी कफन विकत घेतलेले असते, त्याच दुकानात ते कफन विकून चार पैसे मिळाले की पुन्हा दुसरे कफन चोरण्यासाठी पुढची व्यूहरचना आखण्यास घाटावर हजर... आणि पकडले गेल्यास लाथा-बुक्क्यांनी मार खाण्यासही तयार…
डोम समाजातला प्रत्येक जण घाटावर चिता जाळण्याचेच काम करत असल्याने इथे त्यांनी आपापसातच कामाची वाटणी केली आहे. म्हणजे, आज जर एखाद्या डोमाचा नंबर लागला तर त्या दिवशी घाटावर जितक्या चिता जळतील त्या सगळ्यांचे उत्पन्न त्याचेच. मात्र असा दिवस पुन्हा उगवतो तो मात्र थेट वर्ष-दोन वर्षानंतरच... अशा वेळी पोटाची आग विझवण्यासाठी मग ही मुलं चितेच्या आगीशी खेळत हा कफन चोरण्याचा धंदा करतात.
अत्यंत गाजलेल्या ‘मसान’ चित्रपटामध्ये लहान मुलं गंगेच्या पात्रात उड्या मारतात आणि पाण्याखालून कोण किती नाणी शोधून काढतो यावर जुगार खेळला जातो, असे एक दृश्य आहे. पडद्यावर वरकरणी हा फक्त खेळ वाटत असला तरी प्रत्यक्षात त्यामागचा खेळ खूपच भयंकर आहे. ज्या क्षणी चितेची किंवा अस्थिविसर्जनाची राख पाण्यात सोडली जाते, त्याच क्षणी मुलांचे घोळके पाण्यात उड्या टाकतात. पाण्याखालची वाळू हाडांच्या अणकुचीदार तुकड्यांनी भरलेली... पाण्यातल्या वनस्पतींना कुजलेले कपडे अडकलेले... पायाखाली वळवळणारे असंख्य कीटक... सतत पाण्यात अस्थी सोडल्यामुळे एक प्रकारची दुर्गंधी... आणि अशा घाण पाण्यात उड्या टाकणारे लहानगे जीव... कशासाठी, तर जो इतरांपेक्षा लवकर पाण्याच्या बुडाशी पोहोचेल, त्याच्याच हाती काहीतरी ‘घबाड’ लागेल.
हे घबाड म्हणजे नाण्यांची चिल्लर किंवा एखादा सोन्या-चांदीचा किरकोळ दागिना. कुणी पाटीची चाळण पाण्यात बुडवून राख वर काढतंय, तर कुणी हातातल्या लोहचुंबकाला पैसा चिकटतो का ते पाहतोय... अस्थींबरोबर सोडलेले पैसे, सोन्या-चांदीचे कण शोधण्यासाठी मग या घाटावर मुलामुलांमध्ये सुरू होतं युद्ध...
सगळ्या प्रकारच्या मानवी मूल्यांच्या नरडीला नख लावून चालतं राहावं असं हे चित्र... शिक्षणाचा पत्ता नाही... बापाचा चिता जाळण्यासाठी नंबर येईलच याची शाश्वती नाही... मग घरची चूल पेटणार तरी कशी? आठ-दहा तास सतत घाणेरड्या पाण्यात राहून त्वचेची काय अवस्था होत असेल या पोरांची... अनेकांच्या उघड्या शरीरावर भाजले गेल्याचे डाग दिसतात. कोवळ्या वयातच अनेकांच्या हातापायांना भेगा पडलेल्या दिसतात..
‘’नोकरी मिळाली नाही, तर ही परंपराच शेवटचा आधार आहे’’
हिंदू परंपरेनुसार मृत्यूनंतर शरीरावरील सोन्या-चांदीचे दागिने काढले जात नाहीत. विशेषतः पतीच्या आधी मृत्यू पावलेल्या स्त्रीला सोळा शृंगारासह दागिन्यांसकट अग्नी दिला जातो. अंतिम क्षणी शरीरावर असलेल्या या वस्तूंवर हक्क राखेतून सापडल्यानंतर डोम समाजाचाच मानला जातो, ही त्यांची धारणा आहे. नव्या पिढीतील देवराज चौधरी आणि सूजल चौधरी या परंपरेत अडकलेले आहेत. “आम्हालाही चांगलं आयुष्य हवंय, नोकरी हवीय,” सूजल सांगतो. तो पदवी शिक्षण घेतोय. पण नोकरी मिळाली नाही, तर ही परंपराच शेवटचा आधार आहे, हे त्यालाही माहीत आहे.
डोम कुटुंबातील स्त्रिया मात्र अस्वस्थ आहेत. “निवडणुकीच्या वेळी सन्मान मिळतो, पण नंतर कुणी विचारतही नाही,” त्या सांगतात. मुलांनी मोठ्या शाळांत शिकावं, चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात, ही इच्छा आहे, पण मार्ग नाही.
काशी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक रवि प्रकाश सांगतात की, ही परंपरा अतिशय जुनी आहे. डोम समाज आपल्या वारशाला जपतो आहे. बदलत्या समाजात या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात असलं, तरी ही परंपरा जिवंत ठेवणं हाही सामाजिक सत्याचा भाग आहे.
अलीकडे मणिकर्णिकेच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली बुलडोझर चालले. दगडी पायऱ्या बदलल्या, घाट सुंदर झाला. पण विकासाच्या आराखड्यात चिता आहे, गंगा आहे, पर्यटक आहेत, अग्नी पेटवणारा माणूस मात्र अदृश्यच आहे. मणिकर्णिकेवर चिता पेटत राहतील. गंगा वाहत राहील. वाराणसी जगत राहील. पण जो माणूस इतरांना मोक्षाच्या दारापर्यंत पोहोचवतो, त्याला स्वतःच्या आयुष्यात मानवी सन्मान कधी मिळणार, हा प्रश्न अजूनही धुरातच विरून जातो.
विकिपीडियावर बनारस घाटाचे रसभरीत वर्णन आढळते. रोज संध्याकाळी या घाटावर होणारी गंगा आरती पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. परंतु मेलेल्या माणसाच्या राखेवर जिवंत माणसाचं आयुष्य तरंगत राहणार नाही, याची काळजी कोण घेणार…? जगण्याच्या संघर्षात मेलेल्यांच्या जगात धावण्याची ही मॅरेथॉन कोण थांबवणार…? महासत्ता होण्यासाठी प्रचंड वेगाने निघालेल्या समाजाचा विकासाचा मार्ग पडद्यामागच्या ‘मसान’पर्यंत कधी पोहोचणार...?
(सविता प्रशांत या चिता जाळणाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित ‘मसणवाटा’ या डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्या-दिग्दर्शिका आहेत.)






