- विजय विनीत
वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळ आहे लाटघाट. पहाटेची वेळ. एका दुकानातून भजन ऐकू येतं आहे, ”शिव शंकर को जिसने पूजा, उसका ही उद्धार हुआ…। भोले शंकर की पूजा करो, ध्यान चरणों में इसके धरो…। हर हर महादेव शिव शम्भू…।”
आज वाराणसीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये पूर्वीसारखी धावपळ नाही की तो माहौल नाही. इथं आहे तो ‘राम नाम सत्य है’ याचा गजर, पंडे-पुरोहीतांची टोळी आणि आकाशाकडे नजर लावून बसलेल्या हरवल्या डोळ्यांच्या विधवा.
वाराणसीत हजारोंनी विधवा आहेत. नक्की किती आहेत हे समजून घेण्याची इच्छा आजवर ना सरकारने दाखवली ना स्वयंसेवी संस्थांनी. मागील कित्येक वर्षांपासून या विधवा समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर एक हरलेलं आयुष्य जगत आहेत. २०११ मध्ये जनगणना झाली होती. तेव्हा वाराणसीत ३५ हजारांहून जास्त विधवा असल्याचं समजलं होतं. यात या बायकांना कोणतीही ओळख देण्यात आली नाही ज्यांच्याकडे राहण्यासाठी व जगण्यासाठी कायद्याचा कोणताही आधार नाही.
समाज कल्याण विभागाकडे फक्त त्याच विधवांची यादी आहे ज्यांनी पेंशनसाठी अर्ज केला आहे. राज्य सरकारने दुर्गाकुंड येथे या विधवांसाठी एक राजकीय वृद्धाश्रम उघडला आहे. त्याशिवाय राज्य महिला कल्याण निगमतर्फे एक वृद्धाश्रम सुरू आहे. लाटघाट जवळच्या श्रीमती रानी बिड़ला मारवाड़ी महिला निवास (वृद्धाश्रम) इथंही अनेक विधवा राहतात. मदर टेरेसा आश्रम शिवाला, नेपाली आश्रम ललिता घाट, लालमुनि आश्रम नई सड़क, मुमुक्षु भवन, अपना घर, आशा भवन, मां सर्वेश्वरी वृद्धाश्रम, रामकृष्ण मिशन इथेही अनेक विधवा आहेत. यातील कोणी आपल्या माणसांकडूनच फसवल्या गेल्या आहेत तर कोणाला इतरांनी फसवलं आहे. या सर्वांची कथा एकसारखीच आहे.
मुलाने मुलीला जाळले, जमीन बळकावली; 110 रुपये देत घराबाहेर काढले
‘’आमच्याकडे पाच एकर जमीन आणि पाच पक्क्या खोल्या होत्या. पतीने आमच्य मुलाच्या नावे साडेतीन एकर जमीन आणि धाकट्या मुलीला अर्धा एकरपेक्षा थोडी कमी जमीन दिली. तर एक एकर जमीन स्वत:च्या नावावर ठेवली. त्यांच्या मृत्यूनंतर मुलाने जमिनीच्या लालसेपोटी मुलीला जाळून टाकले. जबरदस्तीने माझी सर्व मालमत्ता लिहून घेतली आणि 110 रुपये देऊन मला घराबाहेर काढले.’’ असे सांगताना 70 वर्षीय इंद्रासन देवी रडायला लागल्या. बनारसमधील मणिकर्णिका घाट येथील एका विधवाच्या आश्रमात त्या राहतात. त्या सांगतात की, मी केवळ म्हणायला जगतेय, पण आमची अवस्था जिवंत प्रेतासारखी आहे. ना माझा हक्क मिळाला, ना कुटुंबाचा किंवा समाजाचा पाठिंबा मिळाला.
संबंधित लेख वाचा: 1) ‘इरावन’शी लग्न करून दुसऱ्याच दिवशी विधवा होणाऱ्या किन्नरांचा आगळावेगळा विवाह सोहळा…! |
‘’बायकोच्या सांगण्यावरून मुलगा मला रोज मारायचा’’
उत्तरेकडे वरुणा नदी आणि दक्षिणेकडे अस्सी नदी यांच्या मध्ये वसलेल्या वाराणसीत आणि तिथल्या शेकडो अरुंद गल्ल्यांमध्ये असंख्य विधवांचा इतिहास दबलेला आहे. ज्याला आवाज नाही. आपल्याच नातेवाईक आणि मुलांकडून इथं फेकण्यात आलेल्या या विधवा म्हणतात, “आता फक्त भोले बाबाचाच आसरा आहे.” गंगेच्या घाटांवर वसलेल्या शेकडो मंदिरांच्या बाहेर शेकडोंनी कपाळावर टिळा लावलेल्या या विधवा बायका दिसून येतात.
देशाच्या कानाकोपऱ्यातून त्या इथं आल्या आहेत. प्रत्येकीची आपली एक कथा आहे. व्यथा आहे. आपल्या कुटुंबापासून दूर वेगळं आणि वैराण आयुष्य. एखाद्या आश्रमात किंवा भाड्याच्या घरात त्या जगतात. यातील बहुतांश नेपाळी किंवा पश्चिम बंगाली आहेत ज्या आता इथल्याच झाल्या आहेत. यातील अनेकांच्या मागे आता कोणी नाही. पण अनेकींची कुटुंबं आहेत आणि तरीही त्या इथं आहेत.
श्रीमती रानी बिड़ला मारवाड़ी महिला निवासात राहणाऱ्या 92 वर्षांच्या शांती शर्मा राजस्थानातून आल्या आहेत. मागील 18 वर्षांपासून वाराणसीत आहेत. त्या सांगतात, “1985 मध्ये माझे पती वारले. एकुलत्या एका मुलानं मला सांभाळण्यास नकार दिला. तो त्याच्या सासरी निघून गेला. मला त्याच्यामुळे स्वतःचं घर सोडावं लागलं. आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून तो मला मारायचा. मुलगा आहे म्हणून त्याला आईला मारायचा अधिकार थोडीच मिळतो. एखाद्या वांझेपेक्षाही माझं जगणं वाईट आहे. असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. बाबा विश्वनाथाकडे रोज प्रार्थना करते की त्यानं मला त्याच्या पायाशी जागा द्यावी. एकटी आहे आणि एकटीच मरायची इच्छा आहे. मला म्हातारपणाची पेंशन मिळते तसंच सुलभ इंटरनॅशनलकडून दोन हजार रुपये मिळतात. मोफत सरकारी धान्यही मिळतं. त्यामुळे जगत आहे कशीतरी.”
‘’आता फार नाही जगणार, कोणावर ओझं होऊन जगण्याआधीच मरण यावं’’
झुरळं आणि पालींनी भरलेल्या एका लहानशा खोलीत खाटेवर झोपलेल्या 88 वर्षांच्या रचनाबाई नेपाळच्या आहेत. सात वर्ष त्या नेपाळी वृद्धाश्रमात होत्या आणि आता बिडला निवासात आहेत. ही लहानशी खोली हेच त्यांचं जग आहे. सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे. असं वाटतंय की इथली प्रत्येक वस्तू त्यांच्या मरणाची वाट बघत आहे. रचनाबाईंना त्यांच्या मुलांनी वाराणसीत सोडलं होतं. त्या सांगतात, “गावात रोज होणाऱ्या भांडणांनी कंटाळले होते. इथं मंदिरात दर्शन-भजन करत आयुष्य कसंतरी सुरू आहे. सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांकडून पैशांची मदत होते ज्यात त्यांचं खाणंपिणं होतं. काही लोक दान देतात. आता फार काळ नाही जगणार. कोणावर ओझं होऊन जगण्याआधीच मरण यावं इतकीच इच्छा आहे.”
बिहारच्या ७० वर्षीय इंद्रासन देवी ज्या खोलीत राहतात तिथं देवांची वस्तीच आहे. जिथं त्या स्वयंपाक करतात तिथंच झोपतात. आपली कथा-व्यथा सांगताना त्या म्हणतात, “नवरा गेल्यानंतर मुलानं मारहाण करणं सुरू केलं. निराश होऊन घर सोडलं. श्वास घेताना मला त्रास होतो. वाढतं वय आणि एकटेपणा खायला उठतो. आयुष्यभर ज्यांचं केलं त्यांनीच शेवटी घराबाहेर काढलं. असलं आयुष्य नको होतं. आठ वर्ष एका आश्रमात काम केलं साफसफाईचं. आता वयानुसार होत नाही. मी कोणाला काही मागत नाही. कोणी दिलं तर घेते. असहाय आहे पण तरीही परत घरी जायची इच्छा नाही.”
वाराणसीच्या अनेक विधवांची एकच कथा…
वाराणसीच्या अनेक विधवांची एकच कथा आहे. यांच्यातल्या अनेकींना आधी मोठं अंगण असलेलं घर होतं. आता वृद्धाश्रमातल्या एका लहानशा खोलीत त्यांना जगावं लागतंय. घरच्यांनीच सोडल्यामुळे त्यांना आता इथल्या गल्ल्यांमध्ये फिरावं लागतंय. काहींना मोक्षाची इच्छा आहे तर अनेकींचा संसार अजून सुटलेला नाही. त्यांना तक्रारी भरपूर आहेत. मागून खायचं आणि लोकांच्या दयेवर जगायचं हेच त्यांचं जगणं आहे. वाराणसीच्या असंख्य विधवांचं पोट या दानावर, दयेवरच भरतंय. काहींच्याकडे कमाईची अन्य साधनं आहेत. काहींना पेंशन आहे. काहींना काही संस्थांनी दत्तक घेतलंय. ज्या भीक मागतात त्यांच्याकडे आधार किंवा इतर ओळखपत्र नाही. त्यामुळे त्यांना सरकारी पेंशन मिळत नाही.
वाराणसीच्या असंख्य विधवा घाटांवर आणि मंदिरापाशी लोकांकडे हात पसरत भीक मागतात आणि त्यावरच जगतात. त्यांचा प्रत्येक दिवस जगण्याच्या या संघर्षाने सुरू होतो आणि या संघर्षातच मावळतो. काही विधवा भजन गाऊन पैसे कमावतात. इथल्या अनेक मंदिरांमध्ये दिवसरात्र भजन-किर्तन सुरू असतं. तिथं या विधवांना जेवणही मिळतं. भजन-किर्तन करून काही धान्यही मिळवतात. वाराणसीचे एक व्यापारी रमेश चंदानी सांगतात, “भजन-किर्तन करणाऱ्या विधवांना अनेक ठिकाणी टोकन मिळतात. ज्याची किंमत पाचशे रुपयांपर्यंत असते. त्यावरून त्या आपल्या गरजेच्या गोष्टी विकत घेतात. स्थानिक दुकानदार टोकनवाल्यांकडून मग पैसे घेऊन येतात.”
७३ वर्षीय शकुंतला देवी वाराणसीच्याच आहेत पण त्यांच्या घरच्यांनी त्यांना सोडलंय. सुलभ इंटरनॅशनलकडून त्यांना काही पैसे मिळतात. काही भजन-किर्तन करून. त्या सांगतात, “मी एकटीच राहते. पण आजारी पडले की खूप त्रास होतो. तरीही घरच्या नरकापेक्षा हा वृद्धाश्रम बरा आहे. दान-दक्षिणेवर माझं भागतं.” 75 वर्षांच्या विद्यावती पश्चिम बंगालच्या आहेत.
त्या भरल्या गळ्याने सांगतात, “आता माझं कोणी नाही. नवऱ्यानं खूप आधी सोडलं होतं. मग आईकडे राहायला गेले. ती मेल्यावर शेजाऱ्यानं आमच्या घरावर कब्जा केला. शेवटी इकडे निघून आले. मुलगी कधीतरी भेटायला येते. संकटं काही मला सोडायला तयार नाहीत. आता काशी विश्वेश्वराचाच आधार आहे.” विद्यावती यांच्या प्रमाणेच अनेक विधवा इथल्या मणिकर्णिका, ललिता घाट, काशी विश्वनाथ मंदिराजवळ भीक मागताना दिसून येतात. 
पंतप्रधान मोदी आणि वाराणसीच्यावि धवांचा आक्रोश
वाराणसीचे ख्यातनाम कार्यकर्ता आणि मिर्झापूरच्या विंध्याचल येथे विधवा महिलांसाठी आश्रम चालवणारे शकल नारायण मौर्य सांगतात, “वाराणसीतच नाही तर देशात सगळीकडेच विधवांचं जगणं खूप कठीण आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीचे खासदार आहेत पण त्यांना आजवर या विधवांच्या जगण्याविषयी विचार केला नाही.
लोक देवाच्या नावावर त्यांच्या घरातल्या बायकांना इथं आणून सोडून देतात. काहींना उघडपणे घरातून हाकललं जातं. खायला काहीच मिळत नाही तेव्हा यांना भीक मागण्याशिवाय पर्याय उरत नाही. आता तर सरकारने एनजीओद्वारा संचालित वृद्धाश्रम बंद करण्याचा नवा आदेश काढला आहे. त्यामुळे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
वाराणसीत अशा अनेक घटना आहेत की सरकारी वृद्धाश्रमांतील विधवांना मिळणारी पेंशन तिथल्या लोकांनी हडप केली आहे. सर्वांत वाईट म्हणजे या बायका मरतात तेव्हा त्यांचे अंतिम संस्कार करायलाही कोणी भेटत नाही. त्यांचं प्रेत सरळ गंगेत फेकलं जातं. या विधवांच्या आयुष्यात कोणताही रंग नाही. त्यांच्या या रंगहीन जगण्यात काही बदल होईल अशी चिन्हंही दिसत नाहीत. या विधवांना राजकारणाशी काही देणंघेणं नाही. त्यांना माहिती आहे की सरकार कोणाचंही आलं तरी त्यांचं जगणं सुधारणार नाही. त्यांना राजकारण समजतही नाही. त्यांच्याकडे ना वोटर कार्ड आहे ना आधार कार्ड. ज्यांच्याकडे आहे त्याही निवडणूकांपासून दूरच राहतात.” पूनम श्रीवास्तव आणि अन्नपूर्णा शर्मा म्हणतात, “आमच्याकडे भोले बाबाची भक्ती आहे. बाकी काहीही नाही.”






