समाज कितीही बदलला वा कितीही पुढारला तरी अनादी कालापासूनची काही बाबतीतील समाजाची मानसिकता दुर्दैवाने आजही कायम आहे. पुरुष नसबंदीला अजूनही दुर्लक्षितही मानले जात आहे. पूर्वीपासूनचे याबाबतचे गैरसमज आजही कायम आहेत व ते दूर करण्यासाठी पुरुष मंडळी स्वतःहून जसे प्रयत्न करीत नाहीत, तशी शासन यंत्रणा वा आरोग्य विभागही जनजागृतीचा जास्त त्रास घेत नाही. परिणामी, आजही महिलांसाठीच नसबंदी वा गर्भनिरोधक साधनांचा अवलंब आला आहे.
नसबंदीने वंध्यत्व, नपुंसकता येते हा त्यामागचा एक मोठा गैरसमज आणि त्यामुळेच स्त्रियांकडूनही पुरुष नसंबदीला विरोध केला जातो. अनेक समाजात पुरुष नसबंदीबाबत अंधश्रध्दा आहेत, तर स्त्रियांनीच नसबदी करावी ही पारपंरिक मानसिकता समाजात खोलवर पसरली आहे. मात्र या विषयीच्या सर्व समजुतींना फाटा देत स्वत: नसबंदी केलेल्या आणि ही कृती सर्वांसोबत शेअर करण्याची परिपक्वता दाखवणाऱ्या दोन पुरुषांचे अनुभवकथन ‘बाईमाणूस’च्या वाचकांसाठी आम्ही इथे देत आहोत…
माझी पुरुष नसबंदी : सगळं कसं ठरल्याप्रमाणे !
निशांत सुनंदा विश्वास हे कोल्हापूरमध्ये राहणारे एक सामाजिक कार्यकर्ते. आपल्या नसबंदीचा अनुभव त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’मध्ये कथन केला आहे. ते लिहितात,
मुक्ता आणि मी लग्नाअगोदर जेव्हा एकमेकांना चोरून भेटत होतो त्यावेळी संसार आणि मुले या विषयांवर चर्चा व्हायची. त्यावेळी दोघांचे याबाबत एकमत होते की, एकच अपत्य आणि ते अपत्य आमचे जैविक असणे शक्य नसेल तर आम्ही दत्तक घ्यायचे, असे ठरवले होते. म्हणजे लग्नाच्या काही दिवसांनंतर आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर आपण एक बाळ दत्तक घ्यायचे आणि ती मुलगी असेल, तिचे नांव पण आम्ही ठरवून बसलो होतो. लग्नानंतर काही दिवसांनी आम्हाला समजले की, बाळ दत्तक घेणे सोपी गोष्ट नाही म्हणजे खूप मोठी प्रक्रिया आहे आणि त्यातील सगळ्यात मोठी पात्रता ही आहे की आपले आर्थिक उत्पन्न जेमतेम असून चालत नाही. मग आम्ही थोडे नाराज झालो.
संबंधित लेख वाचा: 1) चांगला मुलगा आणि समंजस पुरुष कसं व्हायचं? |
विचार बदलल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मग आम्ही ठरवलं की, एकच अपत्य जे काय असेल ते. पण आता लगेच नको. अजून आपण सक्षम नाही. पण होम टेस्टवर कधी दोन लाईन आल्या त्या आम्हाला समजलंच नाही. डॉक्टरांचा सल्ला आणि आम्हीपण अगदी मुळातच या विषयात सतत असल्याने आम्हाला जाणवले की अगोदरच आपण खूप उशिरा लग्न केलं आहे.
त्यात जर मुलासाठी आपण अजून वेळ घेतला तर मुक्तासाठी अडचणीचं होऊ शकतं. हा निर्णय घेण्यासाठी आम्ही व्यवस्थित वेळ काढून विचार केला. मध्यरात्री आमचं फायनल ठरलं आणि मी आणि मुक्ताने माझ्या आईला उठवून नमस्कार केला. ती म्हणाली, "आता का नमस्कार?" आम्ही सांगितले की, "मुक्ताला दिवस गेलेत आणि हे बाळ आम्ही स्वीकारणार आहोत." आईला खूप आनंद झाला.
कारण मी सतत 'लग्न करणार नाही. मुलं, बाळं, संसार यात मी काय राहाणार नाही, मी थोडे वेगळे आयुष्य जगणार', असे आईला सांगत आलो होतो. त्यामुळे तिला खूप आनंद झाला. त्यानंतर अगदी तुटपुंज्या पगारातदेखील मुक्ताचा आहार काळजीपूर्वक जपत राहिलो. निर्मिक जन्मला त्यावेळी मुक्ताचे सिझर झाले.
आता ठरल्याप्रमाणे आपण एकाच मुलावर थांबायचे होते. याकाळात खूप नवीन विचार आले होते की, दोन मुले असणे गरजेचे आहे. एकमेकांना आधार असायला हवेत. त्याला हक्काचे कोणीतरी असायला हवे इत्यादी इत्यादी. पण या सगळ्या प्रश्नांना आम्ही उत्तर शोधत राहिलो. आपले वय जास्त आहे याला आपण पूर्ण बालपण देत आहोत काय? हा त्याच्या स्वभावाने जिवाभावाची नाती तयार करू शकेल किंवा त्याने करावीत.
दोघांनी मिळून एकासाठी तन-मन-धन द्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा होता की, मी आणि मुक्ता दोघेही काटेकोर स्वभावाचे आहोत. आमचे दोघांचे केंद्रीकरण एकाच ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला एकच मूल असेल तर आपले प्रेम अधिकच मजबूत राहील, असा एक माझा तर्क आहे. आता या 5-6 वर्षांत मला काही याचे चांगले अनुभवही आलेत. त्यामुळे एकच मूल हा अगदी परफेक्ट निर्णय आहे असे मला वाटते. 
(कोल्हापूरचे निशांत सुनंदा विश्वास आणि त्यांचे कुटुंब…)
आता ठरल्याप्रमाणे पार्ट दूसरा चालू झाला होता. मला माझी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करायची होती. मी हा विचार माझ्या आईला सांगितला. आई शॉक झाली होती. तिला याबाबतची संपूर्ण माहिती दिली. त्याबद्दलच्या गैरसमजुती तिच्या डोक्यातून काढायला मला आठ दिवस लागले. त्यानंतर मात्र तिने स्वतःहून 'मला चांगला निर्णय आहे, घे करून' असे अगदी आनंदाने सांगितले. कपिल मुळे सर हे आमचे दोघांचे मित्र.
एच. आय. व्ही. निर्मूलनासंदर्भात समुपदेशक म्हणून काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाने दोन वेळा प्रयत्न केला. पण माझ्या कामामुळे मला सलग वेळ काढायला जमेना. मुक्ता फलटणमध्ये नोकरी करू लागली. माझा व्यवसाय आणि काही अडचणीमुळे मला लगेच कोल्हापूरमधून तिकडे शिफ्ट होणे अवघड होत आहे. पण निर्मिकला सोबत घेऊन वाऱ्या होत आहेत. मुक्ताची पण धावपळ होत आहे. त्यामुळे आम्ही फलटणला गेल्यावर अगदी निवांत असतो. मग तिकडचा निवांत वेळ आपण या सत्कर्मी लावू या असे ठरवले.
फलटण उप-जिल्हा रुग्णालयात मी स्वतः जाऊन मला माझी पुरुष नसबंदी करायची आहे असे सांगत तो विभाग शोधत होतो. ज्याला विचारेन तो भुवया उंचावून माझ्याकडे बघत होता. विभागात गेल्यानंतर तिथल्या आरोग्यसेवकांना भेटलो. त्यांनी माझं खूप कौतुक केलं. 'स्वतः हून आलेले पहिले पेशंट आहात तुम्ही', असे ते म्हणाले तेव्हा मला 'लय भारी' वाटायला लागले. याचे शिबिर असतात, काही नियोजन असतात, तेव्हा मी तुम्हाला फोन करतो. त्यावेळी तुम्ही या, असे त्यांनी सांगितले. फलटणपासूनजवळ असलेल्या तरडगावमध्ये मला ते घेऊन गेले आणि माझी ठरल्याप्रमाणे शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
त्या सरकारी रुग्णालयात काही स्त्रियांना फरशीवर इंजेक्शन देवून झोपवले होते. खूप भांबावलेल्या दिसल्या मला. मी विचारलं की, "यांना बेड का दिला नाही?" तर उत्तर मिळाले की, "त्यांचे ऑपरेशन आहे. एवढे बेड्स नाहीत आपल्याकडे." त्या हॉस्पिटलमध्ये 2024 साली किती शस्त्रक्रिया अपेक्षित आहेत, किती झाल्यात असे दर्शवणारा एक बोर्ड लावला होता. त्यामध्ये स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया वर्षाला 202 अपेक्षित होत्या. झाल्या होता 225 आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया अपेक्षित होत्या 13 आणि झाली होती फक्त एक. माझे ऑपरेशन 15 मिनिटांचे होते. तरीपण अर्धे कर्मचारी माझ्याभोवती होते आणि त्या स्त्रिया जवळजवळ सहाजणी असूनही एकच नर्स त्यांच्याजवळ होती.
यातून आपण, आपला समाज आणि आपले सरकार स्त्रीकडे माणूस म्हणून बघतो काय, असा प्रश्न पडतो. जिथे सोपी आणि त्रास कमी होणारी पुरुषाची शस्त्रक्रिया असूनही सरकारला फक्त 13 शस्त्रक्रिया अपेक्षित आहेत. तिथे स्त्रियांच्या शस्त्रक्रियांचा आकडा 202 वर नेला आहे. जर 225 स्त्रियांवर शस्त्रक्रिया केली जाते तर तिथे किमान पाच-सहा बेड्स तरी सरकार पुरवू शकत नसेल तर सरकार स्त्रीला समान दर्जा देते काय ? मग समाज किंवा कोणी एक तरी कसा देणार?
या हताश भावनेने मी रुग्णालयातून माझी नसबंदी करून बाहेर आलो. अतिशय आनंदाने मी निर्मिकला जवळ घेतले आणि मुक्ताला मी व्यवस्थित असल्याचे सांगितले. त्यावेळी ती माझ्या हातावर हात ठेवून कुरवाळत राहिली. हे सगळं ठरल्याप्रमाणे झाले होते. एकमेकांनी ठरवून केल्याच्या समाधानातून आमच्या प्रेमाने जणू कातच टाकली होती.
'हो, मी पुरुष आहे आणि 2 मुलींच्या जन्मानंतर मी नसबंदी केली, कारण...'
भारतामध्ये कुटुंब नियोजनात पुरुषांच्या नसबंदीचं प्रमाण केवळ 0.3 टक्के इतकं आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे पुरुष नसबंदी करण्यासाठी तयार होत नाहीत. तरीही या विषयीच्या सर्व समजुतींना फाटा देत स्वत: नसबंदी केलेल्या आणि ही कृती सर्वांसोबत शेअर करण्याची परिपक्वता दाखवणाऱ्या परभणीचे डॉक्टर पवन चांडक यांचा हा अनुभव…
मी पुरुष नसबंदी (Vasectomy) शस्त्रक्रिया करून घेतली, तीही सरकारी दवाखान्यात. कुटुंब नियोजन हा लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम. इथेही कुटुंब नियोजनाचा सारा भार आपण स्त्रीवर टाकला आहे. बिनटाक्याची पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सुरू होऊनही ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषांचे प्रमाण नगण्य, एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. आश्चर्य म्हणजे, नवऱ्याच्या नसबंदीला विरोध करून स्वत:ची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या स्त्रियांची संख्याही कमी नाही.
(परभणीचे डॉक्टर पवन चांडक आणि त्यांच्या दोन मुली)
नवऱ्याच्या नसबंदीला स्त्रीने विरोध करताना हेही एक कारण तिच्या अबोध मनात दडलेले असावे. ग्रामीण भागात पुरुषांना शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात, त्यामुळे नवऱ्याला ‘अधू’ करू नका, असाही एक सूर बायकांचा आढळतो. कारण कोणतेही असो, पण गर्भप्रतिबंधक उपायांच्या बाबतीत ग्रामीण महाराष्ट्रात 57% स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया होतात तर अवघ्या 3% पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया.
ही शस्त्रक्रिया म्हणजे एक सर्वसामान्य, केवळ 10 मिनिटांची प्रक्रिया असून दुसऱ्या दिवसापासून आपण आपल्या रोजच्या कामधंद्याला जाऊ शकतो. केवळ काही दिवस जड ओझे उचलायचे नाही फक्त. मी सायकलिंग करतो, एक महिन्यानंतर पुन्हा सायकलिंग सुरू केलं आहे. सर्वसामान्य पुरुषांचे सोडा, परंतु स्वतःला उच्चशिक्षित मानणारी किती डॉक्टर मंडळी ही शस्त्रक्रिया करून घ्यायला पुढे येतात? उत्तर अत्यंत कमी अर्थात अर्धा टक्क्यांपेक्षाही कमी.
कारणांविषयी अभ्यास केला तर पुढील कारणे लक्षात येतात. पुरुषी अहंकार, पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल असलेले गैरसमज, अाणि पुढील लैंगिक आयुष्याबद्दलची अकारण भीती. मला दोन मुली आहेत. पहिली मुलगी तीन वर्षांची झाल्यानंतरच मी ही शस्त्रक्रिया करून घेणार होतो, परंतु ती थोडी पुढे ढकलावी लागली. हा निर्णय घेण्यापूर्वी मी घरच्या सगळ्यांना विश्वासात घेतले. माझ्या आईने तर पाठिंबाच दिला.
आपल्याकडे स्त्रियांच्या नशिबी नेहमीच परिश्रम. लग्नानंतर बाळंतपण व आई होण्यासाठी स्त्रीला नऊ महिने घ्यावे लागणारे परिश्रम व प्रसूतीनंतर घ्यायची काळजी काय कमी असते का? इथे तर मी पहिली मुलगी झाल्यानंतर लगेच आठ दिवसानंतर बायकोचे सिझरियन होऊनसुद्धा रात्री जागून बाळाची काळजी घायचं सोडून सायकल रेसच्या तयारीसाठी पहाटे उठून पळायच्या घाईत. त्यातही आम्ही पुरुष लोक आमचा स्वार्थ पाहतो.
सातव्या महिन्यात बाळ जन्मल्यावर दोन महिने नवजात अतिदक्षता केंद्रात बाळाची घेतलेली काळजी व माझ्या दोन्ही मुलींचे संगोपन इतके परिश्रम घेत असताना आपण साधा व सोपा पुरुष नसबंदीचा निर्णय घेऊ शकत नाही का? या निर्णयावरदेखील काही मित्रांचा आक्षेप आपला मारवाडी समाज अल्पसंख्याक समाज आहे, असा होता. तुला दोन मुली आहेत, अमुक अमुक डॉक्टर आयुर्वेदिक गोळ्या देतो म्हणे मुलगा होईल वगैरे कुलदीपकच्या गप्पा. तेव्हाच त्यांना खडे बोल सुनावले. काही जणांचं म्हणणं होतं की, तिसरा चान्स घेणे अवघड होईल वगैरे.
आम्ही आमच्या दोन मुलींसोबत समाधानी व पूर्ण असून आता कुटुंब नियोजनास काहीही हरकत नाही, तर पत्नीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याऐवजी मी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणे मला अधिक सोयीचे, सोपी व सुलभ वाटले. मी डॉक्टर असूनदेखील सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया केली म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये मेडिकल ऑफिसर चांगले पारंगत असून त्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण, नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरे यामुळे त्यांना मिळणारा अनुभव, या सर्व तांत्रिक बाबींमुळे मी सरकारी दवाखान्याला प्राधान्य दिलं.
5 मे रोजी शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. आदल्या दिवशीपासून उद्या शस्त्रक्रिया होणार म्हणून कोणतीही विशेष भीती नव्हती, केवळ लोकल पद्धतीने भूल देणार म्हणून विचार की, काही त्रास होईल का, वगैरे. सकाळी नऊ वाजता सरकारी दवाखान्यात आल्यावर फॉर्म वगैरे भरून कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केली. पहिल्यांदाच सर्जिकल ड्रेस घातला. मग टीटी, अॅट्रॉपिन वगैरे इंजेक्शन झालं. ऑपरेशन थिएटरमध्ये आल्यावर डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्याशी बोलत बोलत शस्त्रक्रियेचा सुरुवात केली. केवळ लोकल झायलोकेन देताना सुई टोचते इतकाच त्रास, मग काहीतरी वृषणामध्ये हालचाल जाणवत होती.
मोजून 10 मिनिटांनी शस्त्रक्रिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मग ड्रेसिंग करून मला दोन तास रिकव्हरी रूममध्ये आराम करायला सांगितले. पुन्हा डॉक्टरांनी एकदा तपासले. काही रक्तस्राव तर होत नाही ना, याची खात्री करून पाच दिवसांची औषधं देऊन सुट्टी दिली. म्हणजे केवळ दोन तासांत सुट्टी मिळाली. मी वडिलांसोबत गाडीवर बसून घरी गेलो. घरच्यांना काळजी होती, पण घरी आल्यावर माझा प्रसन्न चेहरा पाहताच त्यांची काळजी दूर झाली.
शस्त्रक्रियेच्या दिवशी आराम करून दुसऱ्या दिवसापासून नियमितपणे क्लिनिकला स्कुटी चालवत जाऊ लागलो. तेव्हापासून ते आज शस्त्रक्रिया होऊन दोन महिने उलटून गेले, मला कोणताही त्रास झाला नाही. 15 दिवसांनंतर मी रोज पाच किमी चालणं, 5 जूनपासून नियमितपणे सायकलिंग अर्थात आठवड्यातून 150 किमी सायकलिंग व १२ किमी धावणं नियमितपणे चालू आहे.
सांगण्याचा उद्देश हा की, अनेक वेळा अशा चुकीच्या समजुती असतात, शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना श्रमाची कामे करण्यावर कायम मर्यादा येतात, वगैरे. तर असे नाही. केवळ 8-10 दिवस तुम्हाला जड वजन उचलणे, धावणे, सायकलिंग, ओझे उचलणे यावर मर्यादा असतात, नंतर तुम्ही हळूहळू नियमितपणे रोजची कामे करू शकता.
हे कोणतेही क्रांतिकारक पाऊल नसून केवळ आपल्याला आपली विचार करण्याची पद्धत बदलायची आहे. बदल आपोआप घडेल, यावर माझा विश्वास आहे.
(डॉ. पवन चांडक यांचं कुटुंब)
नसबंदीचे आकडे काय सांगतात?
आकड्यांचा विचार केला तर आजही भारतातल्या बहुतांश कुटुंबांमध्ये कुटुंब नियोजनाचा भार हा प्रामुख्याने महिलांच्या खांद्यावरच टाकला जातो. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2008 ते 2022 दरम्यान 5.16 कोटी लोकांची नसबंदी करण्यात आली. यामध्ये पुरुषांची नसबंदी करण्याचे प्रमाण फक्त तीन टक्के होते. पुरुषांची नसबंदी ही संकल्पना विकसित देशांमध्ये राहणाऱ्या पुरुषांनी तर स्वीकारली आहे पण विकसनशील देश मात्र याबाबतीत खूपच मागास राहिल्याचं दिसतंय. संयुक्त राष्ट्रांच्या 2015 च्या अहवालानुसार, कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये नसबंदीचा दर अनुक्रमे 21.7%, 21% आणि 10.8% इतका होता.
नसबंदीबाबत काही महत्त्वाचे प्रश्न
मागील अनेक वर्षांपासून पुरुषांना नसबंदी केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल अशी भीती वाटत आलेली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की, "पुरुष नसबंदीचा आणि हृदयरोग, प्रोस्टेट कॅन्सर, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आजाराशी संबंध नाही. या ऑपरेशनचा कोणताही संबंध किंवा कोणताही प्रतिकूल परिणाम अशा रोगांवर होत नाही."
नसबंदी केल्यानं लैंगिक संक्रमणातून होणारे आजार (Sexually Transmitted Disease) ही होत नाहीत का? भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालात असं स्पष्टपणे लिहिलं आहे की पुरुष नसबंदी केल्याने लैंगिक संक्रमित रोग (STI) दुसऱ्याच्या शरीरात जाण्यापासून रोखले जाऊ शकत नाहीत. त्यासाठी कंडोमचा वापर हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे.






