(भागा वरखडे)
प्रख्यात नाटककार शेक्सपियर यांनी ‘नावात काय आहे’, असे म्हटले होते; परंतु त्यांना भारतातील लोकांच्या स्वभावाची, त्यांच्या वेडेपणाची कदाचित माहिती नसेल. इथले लोक मूलभूत प्रश्नांवर भावनांचा उतारा शोधतात. मतांच्या राजकारणासाठी पित्याचे नाव बदलायलाही इथले राजकारणी आणि लोक कमी करीत नाहीत. दोन अपत्यापेक्षा जादा अपत्य असतील, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे राहता येत नाही. असे असताना काहींनी तिसरे अपत्य असतानाही निवडणूक लढवली.
तक्रारीनंतर जेव्हा सुनावणी झाली, तेव्हा अनेकांनी हे अपत्य आपले असल्याचे नाकारले. या महाभागांना पद वाचवण्यासाठी आपण पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आहोत, हे ही समजले नाही. काहींनी तर कागदोपत्री पत्नीला पूर्वलक्ष्यी प्रभावाने घटस्फोट दिल्याचे दाखवले. मतांच्या राजकारणासाठी शहरांची नावे बदलताना ज्यांनी त्या शहराची स्थापना केली, शहर वसवले, चांगला कारभार केला, त्यांचे नावच पुसण्याचा प्रयत्न केला.
इथवर ठीक होतं परंतू पहलगाम हल्ल्यानंतर नावांच्या बाबतीत असे काही प्रकार घडले की काय मुर्खांचा बाजार आहे हा, असे म्हणण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.
पहलगामध्ये 26 पर्यटकांची केलेली हत्या निषेधार्हच आहे. भारताने त्याचा बदलाही घेतला आहे. पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांना धडाही शिकवला आहे. भारताने पाणी, आयात-निर्यात, आर्थिक कोंडीच्या माध्यमातून पाकिस्तानला अद्दल घडवली आहे. पाकिस्तान, तुर्कस्तानसह अन्य देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची कृतीही समर्थनीय आहे; परंतु देशभक्तीच्या नावाखाली मूळच्या भारतीय असलेल्या, हिंदू राजाच्या हिंदू स्वयंपाक्याची पाककृती असलेल्या वस्तूंत ‘पाक’ हा शब्द आहे, म्हणून तो शब्दच काढून टाकायचा याला शुद्ध वेडेपणा म्हणतात. 
म्हैसूर श्री, मोती श्री… निव्वळ मुर्खपणा
मराठीत खाद्यपदार्थ तयार करण्याच्या कृतीला पाककृती म्हणतात. त्यातूनही ‘पाक’ हा शब्द वगळायचा का, असा प्रश्न पडतो. जयपूरमधील मिठाई व्यापाऱ्यांनी म्हैसूर पाकमधून ‘पाक’ हा शब्द वगळून या मिठाईला ‘म्हैसूर श्री’ म्हटले. त्यामुळे या मिठाईची चव बदलणार आहे का, हे त्यांनाच माहीत. काहींनी याला देशभक्तीचे सांस्कृतिक प्रदर्शन मानले, तर काहींनी ते अज्ञानाचे उदाहरण म्हटले. अंधभक्त अशा कृतीचे समर्थन करतीलही; परंतु अज्ञानातून आपण आपल्या प्राचीन भाषेतील शब्दालाही कसे अव्हेरतो आणि त्याला वगळतो, हे यातून दिसले.
संबंधित लेख वाचा: 1) ‘तिरुपती लाडू’ प्रकरणात ‘या’ प्रश्नांची उत्तरे कोणीच का देत नाही? |
‘पाक’ हा शब्द संस्कृत शब्द ‘पकवा’ पासून आला आहे. त्याचा अर्थ शिजवलेला किंवा तयार केलेला आहे. त्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. म्हैसूर पाक पहिल्यांदा कृष्णराज वोडेयार चतुर्थाच्या कारकिर्दीत काकासूर मडप्पा नावाच्या स्वयंपाक्याने म्हैसूर पॅलेसच्या शाही स्वयंपाकघरात बनवला होता. कोणतीही माहिती न घेता केवळ त्यात पाक आहे आणि तो दक्षिण भारतीय पदार्थ आहे, म्हणून त्यातील पाक हा शब्दच काढायचा आणि त्याचे भांडवल करायचे, याला मूर्खपणा नाही, तर काय म्हणायचे?
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर तेलंगणात कराची बेकरीविरुद्ध निदर्शने झाली. काही गटांनी नाव बदलण्याची मागणी केली. कराची, मुंबई, बिकानेर अशा नावांच्या दुकानांचे काही बँड तयार झाले आहेत. त्यातील काहींचा शहराशी काही संबंधही नसतो. कराची बेकरी 1953 मध्ये हैदराबादमध्ये सुरू झाली होती आणि ती एक भारतीय ब्रँड आहे, तरीही त्याला अज्ञानातून विरोध केला जात आहे.
भारतात सर्वाधिक वस्तू चीनमधून आयात होतात. खरे देशप्रेम दाखवायचे, तर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा होता. ‘कैट’ सारख्या व्यापाऱ्यांच्या संघटना वेगवेगळी आकडेवारी तोंडावर फेकून आमच्या बहिष्काराने चीनला किती धक्का पोचला, हे सांगत असतात. परंतु, प्रत्यक्षात आयात-निर्यातीचे आकडे पाहता भारतात चीनी मालावरच्या बहिष्काराचे शस्त्र निष्प्रभ झाले आहे, असेच म्हणावे लागते. 
‘म्हैसूर पाक’चा गौरवशाली इतिहास कशाला पुसता?
भारतात पाकिस्तानविरोधी रोष समजण्यासारखा आहे. तो असलाही पाहिजे. पाकिस्तान म्हणजे पाक नव्हे. आपण सोईसाठी पाक म्हणतो. त्याला ‘ना’पाक ठरवतो. ते योग्यच आहे. परंतु, ‘आम पाक’ आता ‘आम श्री’ करणे, ‘गुंड पाक’ आता ‘गुंड श्री’ करणे ही वेडेपणाची लक्षणे आहेत. देशातील सर्वंच प्रश्न संपले आणि आता फक्त पाक नाव काढले, की पाकव्याप्त काश्मीर आपल्याला मिळाले, पाक नाव वगळल्याने जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नष्ट झाला, असे समजण्याचा दुधखुळेपणा काही करीत आहेत.
ज्यांनी म्हैसूर पाक बनवला, त्यांचे पणतू नटराज यांनी म्हैसूर पाकचे नाव बदलू नये, अशी केलेली मागणी वावगी नाही. त्यांच्या पूर्वजांनी वाडियार राजांसाठी बनवलेल्या मिठाईला हे नाव दिले होते. काकासूर मडप्पा हा म्हैसूरचा राजा कृष्णराज वाडियार चतुर्थाचा मुख्य स्वयंपाकी होता. या गोड पदार्थाच्या नावावरून मडप्पा ओळखले जातात.
त्यांनी सांगितले, की म्हैसूर पाकमध्ये पाकचा अर्थ पाकिस्तान नाही, तर कन्नडमध्ये सरबताला पाक म्हणतात. या गोड पदार्थाचा शोध म्हैसूरमध्ये लागला होता, म्हणून त्याचे नाव म्हैसूर पाक आहे. म्हैसूर पाक हा साखरेचा पाक, बेसन आणि तूपापासून बनवलेला एक स्वादिष्ट गोड पदार्थ आहे. प्रत्येक स्मारक आणि परंपरेचे स्वतःचे नाव असते, त्याचप्रमाणे म्हैसूर पाकलादेखील स्वतःचे नाव आहे. ते वगळू नका, ही त्यांची मागणी अंधभक्तांपर्यंत पोचणार नाही.
पाच पिढ्यांपासून म्हैसूर पाक बनवणाऱ्या नटराज यांचे आजही म्हैसूरमध्ये दसरा जम्बो सवारी मार्गावर ‘गुरू स्वीटस्’ नावाचे प्रसिद्ध दुकान आहे. त्याची सुरुवात नटराजाच्या पणजोबांनी केली होती. राजदरबाराव्यतिरिक्त सामान्य लोकांनाही हा गोड पदार्थ मिळावा, हा त्यांचा हेतू होता. म्हैसूर पाक हा केवळ एक गोड पदार्थ नाही, तर ते एक सांस्कृतिक प्रतीक आहे. कोणत्याही गैरसमजामुळे त्याचे नाव बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही.
आणखी एक गोड पदार्थ ‘मोती पाक’ बद्दलही वाद सुरू झाला. असा दावा करण्यात आला की या गोड पदार्थाचे नावही ‘मोती श्री’ असे बदलण्यात आले आहे. या सर्व लोकांच्या विरोधाचे कारण ‘पाक’ हा शब्द आहे. तो पाकिस्तानसाठी संक्षेप म्हणून वापरला जातो. 
एखाद्या देशासोबत वाढत्या तणावामुळे वस्तूंचा निषेध होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 च्या सुरुवातीला, गलवानमध्ये भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकींमुळे तणाव लक्षणीयरीत्या वाढला होता. याचा परिणाम असा झाला, की भारतात चीनी वस्तूंना तीव्र विरोध झाला आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. याशिवाय, अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे एखाद्या देशासोबत वाढत्या तणावाच्या बाबतीत, त्याच्या विशिष्ट वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. तणाव असलेल्या देशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात गैर काहीही नाही. परंतु, मूळच्या भारतीय असलेल्या, एका हिंदू राजासाठी बनवलेल्या आणि तणाव असलेल्या देशाशी सूतराम संबंध नसलेल्या पदार्थाच्या नावातून विशिष्ट शब्द वगळणे चुकीचे आहे.
‘म्हैसूर पाक’ या गोड पदार्थाच्या नावावरूनच त्याचा इतिहास म्हैसूरशी जोडलेला असल्याचे सूचित होते. 1902 ते 1940 दरम्यान म्हैसूरवर राज्य करणारे महाराजा नलवाडी कृष्णराज वोडेयार हे अन्नाचे जाणकार होते. ते अनेकदा स्वयंपाक्यांना वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या घटकांवर प्रयोग करण्यास सांगायचे. एके दिवशी दुपारी त्याचा स्वयंपाकी काकासूर मडप्पा मिठाई बनवायला विसरला. त्याला लगेच काहीतरी बनवायचे होते, म्हणून त्याने घाईघाईने एक गोड पदार्थ तयार केला आणि त्याचे नाव ‘म्हैसूर पाक’ ठेवले.
मडप्पा यांनी बेसन आणि तूप साखरेच्या पाकात मिसळून गोड पदार्थ बनवला. महाराजांनी त्याला त्याचे नाव काय आहे असे विचारले तेव्हा मडप्पाने ते पका असे सांगितले. ते म्हैसूरमध्ये बनवले जात असल्याने त्याने लगेच महाराजांना सांगितले, की तो ‘म्हैसूर पाक’ आहे. कन्नड भाषेत, बेसन आणि साखरेच्या पाकाच्या मिश्रणाला पाका म्हणतात; पण जेव्हा ते इंग्रजीत बोलले जाते किंवा लिहिले जाते, तेव्हा पाकामधील ‘अ’ उच्चारला जात नाही आणि त्याला फक्त पाक म्हणतात.
‘म्हैसूर पाक’ ची ही कहाणी कर्नाटकातील रामनगर जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवरदेखील नोंदवली गेली आहे. रामनगर जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ही मिठाई पारंपारिकपणे दक्षिण भारतातील लग्न आणि इतर उत्सवांमध्ये दिली जाते. याशिवाय, गोदभराईसारख्या विधींमध्येदेखील ती लोकप्रिय आहे. जिलेबी आणि बदाम पुरी सारख्या भारतातील इतर गोड पदार्थांमध्येही साखरेचा पाक वापरला जातो. आता साखरेच्या पाकालाही ‘साखर श्री’ म्हणायचे का?






