आपल्या समाजानं स्त्रियांवर कायम तिची स्वप्नं, इच्छा, आकांक्षा दाबून एका आदर्श स्त्रीचं उदाहरण म्हणून जगण्यासाठी दबाव टाकलेला आहे. अशी आदर्श स्त्री जिच्या आदर्शसीमा देखील हा पितृसत्ताक समाजच आखून देत असतो. या आदर्श स्त्रिच्या जबाबदाऱ्यांची यादी हा समाजच तयार करतो. या आदर्श स्त्रिला तिची स्वप्नं चुलीत जाळून कुटुंबासाठी स्वयंपाक करण्यातच तिच्या आयुष्याचं सार्थक आहे असं सांगितलं जातं. या आदर्श स्त्रीला नवऱ्याची सावली होऊन जगणं शिकवलं जातं.
एक आदर्श स्त्री होण्याच्या नादात तिचं आयुष्य आणि स्त्रीत्वं कधीच संपून जातं. जेव्हा एखादी स्त्री समाजाचे हे नियम डावलून, स्वतःविषयी आधी विचार करू लागते, नवऱ्याच्या मागे न जाता, त्याच्यासोबतीनं आयुष्य जगू बघते, तेव्हा समाजाकडून तिला, स्वार्थी, वाईट चालीची, घर तोडणारी बाई अशी दूषणं मिळतात. तरीही काही स्त्रिया या सर्व बंधनांना तोडण्यात यशस्वी होतात. अशा बायका सामाजिक दबावाला बळी न पडता, आपला स्वतंत्र रस्ता बांधून काढतात. असाच एक स्वतंत्र रस्ता तयार केला आहे, ‘नारीगुंजन सरगम बँड’च्या बायकांनी. हा बिहारमधील पहिला असा बँड आहे ज्यानं पितृसत्तेला आव्हान देत एक नवा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.
लग्न आणि अन्य उत्सवी समारंभात आपण अनेकदा पुरुषांच्या बँड पार्टी पाहिल्या आहेतच. पण याला छेद देण्याचं काम ‘नारीगुंजन सरगम बँड’च्या बायकांनी केलं आहे. यात दहा महिला आहेत आणि त्या सर्व दलित समाजातील आहेत. यात लालती देवी, मालती देवी, डोमनी देवी, सोना देवी, वीजान्ती देवी, अनीता देवी, सावित्री देवी, पंचम देवी, सविता देवी आणि छठिया देवी यांचा समावेश आहे. या बायकांनी अनेक कार्यक्रमांमध्ये आपलं वाद्यवादन कौशल्य दाखवलं आहेच पण सोबतच आपली कला सादर करतांना बिहार राज्याचाही गौरव वाढवण्याचं काम त्या करत आहेत.
मोठ्या शहरांमध्ये बायकांना स्वतःचं अस्तित्व शोधणं तसं कठीण जात नाही. मात्र एका लहान गावातील आणि त्यांतही दलित समाजातील बायकांना काही नवं काम करणं किती कठीण गेलं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
इतकं सोपं नव्हतं महिलांनी बँडमध्ये वाजवणं…
या बँडमध्ये असलेल्या बायका या बिहारमधील ढिबरा-मुबारकपूर गावातल्या आहेत. दलित समाजातील गरीब कुटुंबांना ज्या अडचणीत जगावं लागतं त्याला याही अपवाद नव्हत्याच. नंतर त्यांनी पद्मश्री सुधा वर्गीस यांच्या ‘नारीगुंजन’ या एनजीओसोबत काम करायला सुरूवात केली. तिथं त्या दर आठवड्याला ५ ते १० रुपये जमा करायच्या. त्याच्यावर त्यांना एनजीओकडून काही कर्ज दिलं गेलं. त्यांतून त्यांनी शेतीचं काम सुरू केलं. पण दिवसभर खपूनही त्यांना फारच कमी उत्पन्न मिळायचं.
रोजच्या जेवणाची तेवढी सोय व्हायची. त्यांची दशा बघून, सुधा वर्गीस यांनी त्यांना सरगम बँड शिकण्याचा सल्ला दिला. त्यांचं ऐकून त्या पाटनामधील ‘आदित्य गुंजन’ बँडकडून वाद्यवादन करण्यास शिकू लागल्या. वर्षभर मेहनत घेतल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे बँड वाजवण्याचा आत्मविश्वास आला.
‘नारीगुंजन सरगम बँड’च्या सविता देवी सांगतात, “सुरूवातीला 16 बायका बँड शिकायला येत होत्या. पण घरातला दबाव, आणि लोकांचे टोमणे ऐकून त्यांना हे काम सोडावं लागलं. पण आम्ही दहा जणींनी मात्र काहीही करून हे काम शिकायचंच असं ठरवलं. वर्षभर चांगली कसून मेहनत केल्यावर आता आम्ही यात तयार झालो आहोत.” एका मुलाखतीत, सुधा वर्गीस यांनी सांगितलं की, “पेपरमधून नारीगुंजन सरगम बँडची माहिती वाचल्यानंतर, बिहार-शरीफ येथील एका मुलाचा आम्हाला फोन आला की त्याला त्याच्या लग्नाच्या वरातीत हा बँड वाजवायचा आहे. त्यानं तसा आग्रहच धरला.”
तेव्हा पहिल्यांदाच या बायकांनी लग्न समारंभात बँड वाजवण्याचा प्रयोग केला. इथूनच त्यांच्या सुरेल प्रवासाची सुरूवात झाली. एका वर्षांतच त्यांनी पाटणा शहरात खळबळ उडवून दिली. सुधा वर्गीस सांगतात की या बायकांमध्ये आता कमालीचा आत्मविश्वास संचारला आहे. त्या कुठेही आता निर्भयपणे जातात, आपले कार्यक्रम सादर करतात.
…आता बँड वाजवायाला विमानानेही प्रवास करतात
नारीगुंजनच्या या बायकांचं म्हणणं होतं की त्यांचा नवरा, घरातील मंडळी यांचा, त्यांच्या या वाद्यवादनाला विरोध होता. ते म्हणायचे, बँड वाजवून, गाऊन कमाई किती होणार आहे? हे पुरुषांचं काम आहे. हेच काम करणं बाकी राहिलं होतं का? आज त्या ज्या मुक्कामावर आहेत तिथवर पोहोचायला त्यांना पितृसत्ताक समाजाच्या अशा अनेक टोमण्यांना सामोरं जावं लागलं असेल. पण आता जेव्हा त्या बँड वाजवण्यासाठी दिल्ली, मुंबई इथे विमानानं जातात तेव्हा हेच लोक म्हणतात की यांनी खरंच मोठं काम करून दाखवलं आहे.
त्या खूप पुढे गेल्या आहेत. मुलांनाही त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्यापाशी आता पैसे असतात त्यामुळे मुलांना त्या हव्या त्या गोष्टी विकत घेऊन देऊ शकतात. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थाही करता येत आहे. घरातले, शेजारीपाजारी देखील त्यांना आता मान देतात. या बायकांनी अमिताभ बच्चन यांच्या, ”कौन बनेगा करोड़पति” या शोमध्येही सहभाग घेतला आहे. महिला दिनानिमित्त सुषमा स्वराज यांनी त्यांचा सन्मान केला होता. 
ज्या डोळ्यांना स्वप्नं पडतात ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं स्वाभाविकच आहे. पण ज्या डोळ्यांना स्वप्नच पडत नव्हती त्यांना स्वप्नं बघण्यास शिकवणं ही मोठी गोष्ट आहे. सुधा वर्गीस यांनी हीच कमाल गोष्ट केली आहे. त्यांनी या बायकांना केवळ पैसे कमावण्याचा एक नवा मार्ग दाखवलेला नाही तर त्यांचं जगणं सुधारलं आहे. एखाद्याचं आयुष्य बदलणं, ते प्रगतीपथावर नेणं ही नेहमीच मोठी गोष्ट असते.






