- जयमाला बागची
पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील चातरमहल या गावात 85 वर्षांच्या शकुंतला राजवार एका खाटेवर मलूलपणे पडलेल्या आहेत. त्यांच्या आजूबाजूला चिखलाच्या भिंतींच्या खोलीत मंद प्रकाश आहे. हवा शिळी आहे, सूर्यप्रकाश आत येत नाही पण शेजारच्या गोठ्यातून ओलसरपणा व दुर्गंधी मात्र येते. त्यांची दोन मुलं, राजेन (62) आणि कार्तिक (60), गेल्या दहा वर्षांपासून ओडिशात मजूर म्हणून काम करतात. ते फक्त भात कापणीच्या हंगामात घरी परततात.
त्यांच्या बायका शकुंतला बाईची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. “इथं खूप गरम वाटतं, पण माझ्याकडे पर्याय नाही,” त्या बसण्याचा प्रयत्न करत म्हणतात. त्यांचा मुलगा पहिल्यांदा घर सोडून गेला तो दिवस त्यांना अजूनही आठवतो. “मी त्याला कसं थांबवणार? सगळेच जात होते. आम्ही गरीब लोक, प्रत्येक पावलावर संघर्ष करतो. काय सांगणार? वाटलं किमान दुसरा मुलगा आणि सूनबाई तरी घरी राहतील.” तेव्हा त्या 73 वर्षांच्या होत्या.
गेल्या काही वर्षांत हवामानातील बदल आणि शेतीतील घटत्या उत्पन्नामुळे पुरुलियामध्ये स्थलांतर हे कायमस्वरूपी जीवनपद्धतीत रूपांतरित झाले आहे. या वर्षी, जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने ‘अमन’ तांदळाचे पीक उद्ध्वस्त केले, जे या भागाची जीवनरेषा आहे. ‘अमन’ भात जून ते ऑगस्टदरम्यान पेरला जातो आणि हिवाळ्यात कापला जातो. त्यासाठी सातत्याने पाऊस आवश्यक असतो. पण आता शेतकऱ्यांना दुष्काळ व अचानक आलेल्या पुराच्या चक्राने त्रस्त केले आहे. कधी रोपे कोरडी पडतात, कधी पूर वाहून नेतो. राजेन यांचे छोटे शेतही यात उद्ध्वस्त झाले.
पूर्वी त्याला पुरुलियामध्येच मजुरीचे काम मिळत असे, पण पीक नष्ट होत गेल्याने त्यांचे कामही आटले. “इथली शेती म्हणजे आता जुगार झालाय,” राजेन सांगतात. “गेल्या वर्षी पाऊस नाही म्हणून रोपे मेली, यंदा सगळं पाण्यात वाहून गेलं.” पण, वारंवार झालेल्या नुकसानीनंतर पुन्हा पीक घेण्याची आर्थिक ताकद फारच कमी लोकांकडे आहे. त्यामुळे राजवारांसारख्या कुटुंबांसाठी स्थलांतर हाच एकमेव पर्याय उरतो. मागे उरतात वृद्ध लोक. काही आपला परिचित परिसर सोडू इच्छित नाहीत, तर काही इच्छा असूनही जाऊ शकत नाहीत.
स्थलांतराचे चक्र
बहुतांश मजूर फक्त ऑक्टोबर–नोव्हेंबरमधील भात कापणीसाठी परत येतात. राजेन आणि कार्तिक तेव्हा स्वतःच्या शेतात काम करतात आणि इतरांच्या शेतावर मजुरी करून दररोज सुमारे 250 रुपये कमावतात. पण पीक नष्ट झालं तर त्या वर्षी तेही शक्य होत नाही. पाच किलोमीटर अंतरावरील केटलापूर गावात, मोनी बाध्याकर (50) राहतात. दोन मुलींचं लग्न करून त्या आता नवऱ्यासोबत राहतात. दोघेही रोजंदारी करून जगतात. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी खाणंही नसतं. हाडांचा सापळा झालेल्या, मानेला वाढती गाठ असलेल्या मोनी सांगतात, “मला हॉस्पिटलला कोण नेणार? दोन्ही मुली लग्न करून गेल्यात.”
मोनी आणि त्यांचा नवरा वय आणि आरोग्यामुळे स्थलांतर करू शकत नाहीत. “आम्ही तरुण असतो तर प्रयत्न केला असता. पण आता जायचं नाही. आणि कुठे जायचं? आयुष्यात कधीच गावाबाहेर गेले नाही. इथे स्वतःचं घर आहे, गावात लोक ओळखीचे आहेत, वाईट काळात थोडंफार जमवता येतं. दुसरीकडे कोण काम देणार? मी आता जास्त वेळ काम करू शकत नाही,” त्या सांगतात.
पुरुलियात अशा कथा सर्वसामान्य आहेत. दुष्काळग्रस्त हा जिल्हा अत्यंत उष्ण उन्हाळा, अनियमित पाऊस, तीव्र हिवाळा आणि पाण्याच्या टंचाईने त्रस्त आहे. स्विचऑन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, 2019 ते 2023 दरम्यान पुरुलियामध्ये दरवर्षी 30–44 दिवस तापमान 40°C पेक्षा जास्त नोंदले गेले. 1969 ते 2019 दरम्यान एकूण 117 दिवस तीव्र उष्णतेचे नोंदवले गेले. मे 2024 मध्ये बांकुरा आणि पुरुलियामध्ये तापमान 45°C पेक्षा जास्त होते. 2011 ते 2016 दरम्यान कृषी उत्पादनात 27% घट झाली. 2017 मध्ये दुष्काळानंतर 2.8 लाख हेक्टर शेती वांझ झाली. जिल्ह्याच्या 83 % क्षेत्रात फक्त खरीप भात घेतला जातो, तर फक्त 15% क्षेत्र बहुपिकासाठी वापरले जाते. त्यामुळे अविश्वसनीय पाऊस, कमी सिंचन आणि खतांचा मर्यादित वापर यामुळे सतत घटतं उत्पन्न आणि वाढतं ग्रामीण संकट यांचा फटका बसत आहे. पुरुलियाची 87% लोकसंख्या हवामानाच्या ताणाखाली पिचलेल्या ग्रामीण भागात राहते.
गेल्या दोन दशकांपासून पुरुलियामध्ये मजुरांचे स्थलांतर सुरू आहे, पण गेल्या सहा-सात वर्षांत त्यात मोठी वाढ झाली आहे. पारंपारिकपणे घरातील पुरुषच बाहेर कामासाठी जात असत; पण आता संपूर्ण कुटुंबे, महिलांसह, स्थलांतर करत आहेत. परिणामी, वृद्ध पालक एकटे राहतात. अधिकृत आकडेवारीनुसार, “मुख्य कामगारांचे प्रमाण 2001 मध्ये 25.43% वरून 2011मध्ये 20.93% वर आले, तर गौण कामगारांचे प्रमाण 19.03% वरून 21.71% वर गेले. शेतकरी इतर क्षेत्रांत गेले आहेत.” सदर पत्रकाराने पुरुलियातील आठ गावांतील (उका, अल्लादिह, डांडुआ, श्वेतपालस, सालटोरा, रतनपूर, केटलापूर आणि चातरमहुल) 18–20 घरांना भेट दिली. त्यापैकी 17 घरांत फक्त वृद्ध लोकच राहात होते.
रिकाम्या गावात उरलेले वृद्ध
बालिका राजवार (70) सांगतात, की त्या 1000 रुपयांची पेन्शन आणि शेणाच्या गोवऱ्या विकून मिळणारे पैसे यावर जगतात. त्यांचं जेवण म्हणजे उकडलेला भात आणि बटाटे. “मी एकटी राहते. आजारी पडले तर गावकरी काळजी घेतात,” त्या सांगतात. त्यांचा मुलगाही इतरांसारखाच पर्यायी काम नसल्यामुळे बाहेरगावी गेला आहे. उका गावातील शंभू (59) विधुर असून, तेही एकटेच राहतात. त्यांचा अविवाहित मुलगा सहा वर्षांपूर्वी हैदराबादला राहतोय. तो आता फक्त पुरुलियाच्या प्रसिद्ध छाऊ नाच सणात येतो. “दोन वर्षांपूर्वी त्याने विचारलं, माझ्यासोबत राहशील का? मी नकार दिला,” शंभू म्हणतो. “मी का जाऊ अपरिचित ठिकाणी? तिथं गेलो तर गरिबी जाणार का? गरीब माणूस सगळीकडे गरीबच असतो.”
संबंधित लेख वाचा : हत्ती, माकडं, रानडुक्करांमुळे दर वर्षी 10 ते 40 कोटींचे पीक उद्धवस्त! |
दारिद्र्यग्रस्त पुरुलियामध्ये वृद्ध लोक एकटेच जगण्यासाठी झगडत आहेत. हातपाय अशक्त, उत्पन्न अनिश्चित. ते आपल्या मुलांच्या थोड्याफार पैशांवर, शासकीय पेन्शनवर आणि शेजाऱ्यांच्या मदतीवर जगतात. पौष्टिक अन्न त्यांच्यासाठी एक लक्झरी आहे. उपासमारीचा त्रास, एकटेपणाची वेदना — हेच वास्तव आहे. तरुण मंडळी मजुरीसाठी बाहेर पडल्याने पाणी भरणे, स्वयंपाक, रोजची कामे हे सगळं त्यांना स्वतः करावं लागतं.
केटलापूरचे गोपाल बाध्याकर (60) या परिस्थितीतील सर्वाधिक असुरक्षितांपैकी एक आहेत. तीन वर्षांपासून अपंग झाल्याने त्यांना हात हलवणे, चालणे, बोलणे कठीण झाले आहे. त्यांचे दोन्ही मुलगे स्थलांतरित झाले — एक झारखंडमध्ये सासरच्या घरी स्थायिक झाला, दुसरा बेंगळुरूला गेला. मोठा मुलगा अधूनमधून पैसे पाठवतो, तर पुतण्या दुपारी एक वेळचं जेवण देतो. रात्री तो प्रामुख्याने बिस्किटांवर जगतो.
“मला आता खूप एकटं वाटतं,” गोपाल सांगतात. “मी काम करू शकत नाही. भाची थोडा भात देते, तेच माझं जेवण. मला मुलांसोबत राहायचं आहे, पण ते ठेवू इच्छित नाहीत. कदाचित खर्चामुळे असेल. ते कधीमधी येतात, पण मी एकटाच राहतो. आता फक्त पोटभर जेवण हवं असं वाटतं.” स्थलांतरित झालेल्या मुलांनाही आपल्या वृद्ध पालकांची काळजी आहे. पंजाबमध्ये काम करणारा एक मजूर सांगतो, “माझे आईवडील एकटे राहतात. त्यांच्याकडे फोन नाही, ऑनलाइन पैसे घेता येत नाहीत. प्रवाशांकडून पैसे पाठवावे लागतात, पण आता बरेच लोक नगदी पैसे घ्यायला नकार देतात. ऑनलाइन व्यवहार सुरक्षित आहेत, पण आमच्यासारख्यांसाठी ते शक्य नाही.”
“सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे”
लोकांचा हा संघर्ष वेगवेगळा नाही, तर एकमेकांशी निगडित आहे. हवामानातील बदल, शेतीतील संकट आणि स्थलांतर हे पुरुलियात परस्पर संबंधित आहेत. पर्यावरण कार्यकर्ते सुपेन हेमब्राम सांगतात, “हवामान बदलतंय आणि लोकांच्या जगण्याच्या पद्धतीही. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे.” सिधो कान्हो बिर्सा विद्यापीठातील स्थलांतर अभ्यासाचे प्राध्यापक गौतम मुखर्जी सांगतात, “मान्सून उशिरा येतोय, उद्योग घटत आहेत, त्यामुळे संकट वाढतंय. वार्षिक पर्जन्यमान हळूहळू कमी होतंय. आता मान्सून ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो आणि त्यामुळे एकपीक शेतीही बाधित होते. परिणामी, जास्त लोक मजुरीसाठी बाहेर जातात. त्याच वेळी पश्चिम बंगालमधील उद्योग कमी होत आहेत. अनेक तरुण कमाईसाठी जात आहेत आणि त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेणारे कोणी उरत नाही. काही वेळा ते एकटेच मरण पावतात,” मुखर्जी सांगतात.
तज्ज्ञ म्हणतात की, योग्य सामाजिक सुरक्षा आणि हवामान-प्रतिरोधक उपजीविकेच्या संधी निर्माण केल्या नाहीत, तर पुरुलियातील स्थलांतर सुरूच राहील — आणि अधिकाधिक वृद्ध लोकांना स्वतःच्या बळावर जगावे लागेल. ते आनंदाचं जगणं असणार नाही हे वेगळं सांगायला नको.
(This story was originally published by 101Reporters)
|
मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी क्लिक करा…






