अप्सरा आगा
- २२ वर्षीय सई थोपटे महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेविका.
- शिक्षण सुरू असतानाच पुण्यात मिळवला दणदणीत विजय.
- तरुण चेहरा म्हणून भाजपने दिली होती संधी
पुणे शहरात नुकतीच महापालिकेची निवडणूक झाली या निवडणुकीत बावीस वर्षाच्या एका मुलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचं नाव सई प्रशांत थोपटे.भाजप पक्षाने तिला तिकीट दिलं आणि तिने प्रभाग क्रमांक ३६ (क) मधून मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता ती महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेविका झाली आहे. हा विजय फक्त सईचा नाही, तर सर्व तरुण मुला-मुलींसाठी एक मोठी प्रेरणा आहे.
सई पुण्यातल्या एका साधारण कुटुंबातील आहे. ती सध्या पुण्यातील प्रसिद्ध सिम्बायोसिस कॉलेजमध्ये बीबीएच्या (Bachelor of Computer Applications) शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. कॉलेजमध्ये लेक्चर, अभ्यास, असाइनमेंट असतानाच ती राजकारणात उतरली. बहुतेक विद्यार्थी या वयात नोकरी किंवा पुढच्या अभ्यासाची तयारी करतात, पण सईने थेट निवडणूक लढवली आणि जिंकलीही!
अनुभवी उमेदवारांना मागे टाकत मिळवला विजय
सईला भारतीय जनता पक्षाने संधी दिली. प्रभाग ३६ (क) मध्ये सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी सारखे भाग येतात. हा भाग मध्यमवर्गीय लोकांचा आहे. इथे रस्ते, पाणी, कचरा, शाळा अशा रोजच्या समस्या आहेत. भाजपला इथे तरुण चेहरा हवा होता. सईने अगोदर पक्षात काम केलं होतं, म्हणून त्यांना तिकीट मिळालं. प्रचारात त्या स्वतः फिरल्या, लोकांना भेटल्या, त्यांच्या समस्या ऐकल्या. अनुभवी उमेदवारांना मागे टाकत त्यांनी विजय मिळवला. लोकांना तरुण नेतृत्व आवडलं.

सईने प्रचारात सोपे आणि गरजेचे मुद्दे घेतले. त्यांनी सांगितलं की, प्रभागात चांगले रस्ते हवे आहेत, कारण खड्ड्यांमुळे लोकांना त्रास होतो. पाण्याची समस्या सोडवायची आहे. रोज पाणी यावं, टंचाई पडू नये. कचरा नीट उचलला जावा, स्वच्छता राहावी. शाळा आणि कॉलेजसाठी चांगल्या सुविधा हव्या आहेत, जेणेकरून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल.
सई म्हणते, आता खरं काम सुरु होईल
महिला आणि मुलींसाठी विशेष योजना हव्या आहेत. उदाहरणार्थ, मुलींसाठी सुरक्षित वातावरण, खेळाची मैदानं, आणि स्वयंरोजगाराच्या संधी. तरुणांसाठी रोजगाराच्या योजना हव्या आहेत. सई म्हणते, "मी स्वतः तरुण आहे, म्हणून तरुणांच्या समस्या चांगल्या समजतात."प्रचारात ती कॉलेजच्या मित्रांसोबत फिरली, सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या, आणि लोकांना विश्वास दिला की ती खरंच काम करणार.'विजयी झाल्यानंतर सईने सर्वांना धन्यवाद दिले. तिने सांगितलं की, आता खरं काम सुरू होईल. प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी ती प्रयत्न करणार. ती कॉलेजचा अभ्यासही पूर्ण करेल आणि नगरसेविकेची जबाबदारीही नीट सांभाळेल. तिचा विश्वास आहे की, तरुण पिढी राजकारणात आली तर शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगत होईल.
हा विजय म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात….
सईचा हा प्रवास का खास आहे? कारण याआधी फार कमी तरुण मुली राजकारणात आल्यात. बहुतेक वेळा मोठ्या नेत्यांचेच चेहरे दिसतात. पण सईने दाखवून दिलं की, वय कमी असलं तरी मेहनत आणि चांगले विचार असतील तर यश मिळतं. पुण्यासारख्या मोठ्या शहरात अशा तरुण नेत्यांची गरज आहे. ते नव्या कल्पना आणतील, डिजिटल युग समजतील आणि लोकांच्या जवळ राहतील.शेवटी, सई थोपटे हिचा विजय हा एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. तरुण मुला-मुलींनी राजकारणाकडे गांभीर्याने पाहावं. राजकारण हे फक्त पैसा किंवा पॉवर नाही, तर लोकांची सेवा आहे. सईंनी हे दाखवून दिलं.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सईचा झालेला हा विजय शहराच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा आहे. दीर्घकाळ प्रस्थापित नेतृत्वाच्या प्रभावाखाली राहिलेल्या महापालिकेच्या राजकारणात यावेळी तरुण उमेदवार, महिला प्रतिनिधित्व आणि नव्या विचारसरणीचा ठसा स्पष्टपणे उमटलेला दिसून आला. प्रचार, मतदान आणि निकाल या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढलेला दिसत असून, शहराच्या विकासाबाबत मतदार अधिक जागरूक झाल्याचं चित्र या निवडणुकीतून समोर आलं.






