विराज राजश्री
- बलात्काराच्या एका प्रकरणाभोवती फिरणारा अनुभव सिन्हांचा 'अस्सी' हा चित्रपट प्रथमदर्शनी स्त्रियांवरील हिंसेची कथा वाटतो. मात्र कथानक जसजसं उलगडत जातं, तसतसा हा चित्रपट हिंसेच्या मुळाशी असलेल्या पुरुषी भावविश्वाचा शोध घेऊ लागतो.
- आरोपींपासून ते पीडितेच्या पतीपर्यंत, न्यायव्यवस्थेपासून ते पोलीस यंत्रणेपर्यंत आणि एका सहा वर्षांच्या मुलापासून ते गुप्तहेरापर्यंत विविध पुरुष व्यक्तिरेखा या चित्रपटात समोर येतात. त्यांच्यामधून पुरुषत्वाची अनेक परस्परविरोधी रूपं उलगडत जातात.
- स्त्रियांवरील अत्याचार हा केवळ स्त्रियांचा प्रश्न नसून पुरुषत्वाची घडण, सत्ता, हिंसा, काळजी, जबाबदारी आणि न्याय यांच्या गुंतागुंतीच्या नात्यांशी जोडलेला सामाजिक प्रश्न आहे, हे 'अस्सी' ठामपणे अधोरेखित करतो.
लैंगिक अत्याचारांबाबत आणि एकूणच हिंसेबाबत भारतीय समाजमनाच्या जाणिवा एवढ्या बोथट झाल्या आहेत, की त्यातील उघडीनागडी क्रूरता प्रत्यक्ष दाखवल्याशिवाय समाजमन तरंगभरही हलू नये! अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अस्सी' हा सिनेमा ही क्रूरता दाखवताना अजिबात आडपडदा ठेवत नाही. जणू तुमच्या सोंग घेतलेल्या निद्रिस्त जाणिवांना आतूनच सुरुंग लावून उठवण्याचा चंगच या सिनेमाने बांधलेला आहे!
आपल्याकडे लैंगिक अत्याचार इतके घाऊक झाले आहेत, की कुठे बलात्कार झाला तरच आणि त्यातही पीडिता आपल्या जाती-धर्माची असेल तर आणि तरच आपल्या समाजमनात कुठेतरी क्षणभर टिकली टिचकून विरते. म्हणून मग एका बलात्कार प्रकरणाभोवतीच दिग्दर्शकाला या सिनेमाचं कथानक गुंफावं लागलं असावं. सिनेमातील बलात्काराची घटना तशी अगदीच सामान्य. म्हणजे अतिसामान्यच! किती सामान्य, तर सिनेमा आकडेवारी देऊन सांगतो की दररोज अशा ऐंशी (हिंदीत 'अस्सी') घटना देशभरात नोंदवल्या जातात. संपूर्ण सिनेमा पाहत असताना देशात कुठेतरी एक बलात्काराची घटना घडल्याची जाणीव करून देणारा रेड फ्लॅश दर वीस मिनिटांनी झळकतो. म्हणजे 133 मिनिटांच्या सिनेमाचा "आस्वाद" घेत असताना आपल्या आजूबाजूला सहा-सात बलात्कार झालेले सुद्धा असतात!
बलात्कारांचे प्रमाण कमी करण्यासाठी म्हणून देशभरातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश काही उपाय सुचवत असतात. नुकतंच छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या नरेंद्र कुमार व्यास या न्यायाधीशांनी म्हटलं की,
'बलात्कार करताना पुरुषाचं वीर्य जर स्त्रीच्या योनीमार्गात न जाता आजूबाजूला सांडलं तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. त्याला फार फार तर बलात्काराचा प्रयत्न म्हणता येईल'.
पण अशी कुठलीही संदिग्धता 'अस्सी'मध्ये ठेवलेली नाही. खरं म्हणजे, दिल्लीमध्ये चालत्या कारमध्ये घडलेली ही बलात्काराची घटना म्हणजे चौघा बलात्काऱ्यांपैकी कोण पीडितेच्या योनीमार्गात अधिक वेळा आपले लिंग घुसवू शकतो यासाठीची शर्यतच आहे! दीड-दोन तासांच्या शर्यतीनंतर पीडितेला रेल्वे ट्रॅकवर फेकून देऊन आरोपी पुरावे नष्ट करण्याच्या कामासाठी रवाना होतात. यानंतर कोर्टात आणि कोर्टातबाहेर जे घडते, ते म्हणजे अशा घटनांबाबतच्या सार्वत्रिक अनुभवांचा लसावि. त्याइतकेच - किंबहुना त्यापेक्षा महत्त्वाचे - आहे ते म्हणजे चित्रपटातील सर्व पात्रांचे केलेले भावांकन. लैंगिक ओळखीच्या पलीकडे जात हा चित्रपट 'पुरुषी' भावविश्व आपल्यापुढे उलगडवून दाखवतो.

काळजीवाहू पुरुषत्व…
स्त्रियांशी निगडित समस्यांवरील चित्रपट साधारणपणे बायकांच्या बिचारीकरणाकडे झुकण्याची शक्यता अधिक असते. परंतु त्यापुढे जात 'अस्सी' अशा बिचारीकरणातून येणाऱ्या द्वंद्वात्मक भूमिकांना वेळोवेळी छेद देत जातो. मल्याळी परिमा (कानी कुसरुती) आणि हरियाणवी विनय (मोहम्मद झीशान अय्युब) या मध्यमवर्गीय जोडप्याला ध्रुव (अद्विक जैस्वाल) नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे. दोघेही नोकरीनिमित्त दिल्लीत राहत असले, तरी त्यांचं आंतर-सांस्कृतिक प्रेम विनयच्या कुटुंबाला मान्य नसतं हे पुढे कथानकातून उलगडते. अशा रुढीवादी घरातून येऊनही विनयची व्यक्तिरेखा खूप संयत दाखवली आहे.
इतकी की, एरवी बॉलीवूड चित्रपटांमध्ये बलात्काराच्या अशा घटनांनंतर सुडाने पेटून उठणाऱ्या नायकी छाप पुरुष व्यक्तिरेखांची सवय झालेल्या मेंदूंना विनयची व्यक्तिरेखा लक्षात ठेवण्यासाठी विशेष कष्टच घ्यावे लागतात. चित्रपटभर त्याचा वावर परिमाभोवती फिरत राहतो, पण तो तिच्या व्यक्तिरेखेला एका क्षणासाठीही झाकोळत नाही. बलात्काराच्या घटनेनंतरची परिमाची अवस्था पाहून तो हादरून जातो, पण अशा परिस्थितीत शांत राहून परिमाला तिचा वेळ आणि अवकाश घेऊ देणं किती गरजेचं आहे हे तो जाणतो. परिमावर बालंट लावणाऱ्या घरच्यांवर तो डाफरतो, पण तेही परिमाची साथ देण्यासाठीच.
‘मुलगा ते पुरुष’: जबाबदार पालकत्वाची भूमिका
आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या घटना लहान मुलांच्या कानावर पडू नयेत म्हणून सुशिक्षित पालक आटापिटा करताना दिसतात. तसे करून आपण त्यांचे भावनिक संरक्षण करत आहोत, असेच त्यांना वाटत असते. पण त्यातून योग्य मार्गदर्शनाअभावी लहान मुले समष्टीपासून अनभिज्ञ तर राहतातच, परंतु ती असंवेदनशीलसुद्धा बनण्याची शक्यता असते. लहान मुलांपासून कितीही लपवले तरी आज ना उद्या त्यांना सामाजिक वास्तवाला तोंड द्यावेच लागणार असते, याकडे पालक सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. दुःख काय असते हे बाल्यावस्थेतील आणि पौगंडावस्थेतील गोतमाला माहिती पडू नये आणि त्याने दुःख निवारणाच्या उपायांचा शोध घेण्यासाठी गृहत्याग करू नये, अशी बाष्कळ अपेक्षा ठेवणारे सुद्धोदन हे आजच्या सुसंस्कृत पालकांचे सांस्कृतिक पूर्वज. गोतम बुद्धाच्या गृहत्यागाचे मूळ हे दुःखाच्या वैयक्तिक साक्षात्कारात नसून सामाजिक दुःख आणि समस्यांवर जालीम उपाय शोधण्याच्या तळमळीत होते, हे आंबेडकर अधोरेखित करतात.
विनयलासुद्धा बलात्काराच्या घटनेचा आणि त्यानंतरच्या वेदनादायक वैद्यकीय-कायदेशीर प्रक्रियेचा ध्रुववर काय परिणाम होईल, याची बाप म्हणून काळजी वाटत असणारच. पण त्याबाबत अनावश्यक अतिसंरक्षित होणं तो टाळतो. ध्रुवला न्यायालयात घेऊन येण्यावरून कोणीतरी हटकल्यावर तो उत्तर देतो, 'तो लहान कुठे राहिला आता. मोठा झाला ना!' पण म्हणून अशा बिकट परिस्थितीला तोंड देण्यासाठी ध्रुवला एकटं सोडण्याचा बेदरकारपणा तो करत नाही. तो कायम ध्रुवसोबत असतो आणि ध्रुवच्या बालमनाला पडलेल्या प्रश्नांची आपल्यापरीने उत्तरे देण्याचा तो प्रयत्न करत राहतो. ध्रुवला तो बरोबरीने वागवतो आणि नकळत जबाबदारी घेण्यासाठी प्रोत्साहनही देतो. 'तुम्हाला भीती वाटली तर तुम्ही काय करता?', या ध्रुवाच्या प्रश्नाला त्याचा हात पकडत विनय उत्तर देतो की, 'मला भीती वाटते तेव्हा मी तुझा हात पकडतो'. एखादी मोठी व्यक्ती अशा कठीण प्रसंगात आपल्याकडे आश्वासकतेने पाहते ही भावना त्या बालमनासाठी किती मानसिक बळ देणारी असू शकते!
आज एकविसाव्या शतकात सामाजिक वास्तवापासून आयुष्यभर सुरक्षित राहण्याचा दावा कोणीही करू शकत नाही. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ते तुम्हाला गाठतंच. सुखवस्तू कुटुंबातल्या ध्रुवला वयाच्या सहाव्या वर्षीच या सामाजिक वास्तवाला लागतं. आईसोबत घडलेला प्रसंग, आजूबाजूला घडणारी हिंसा या सगळ्या गोष्टी त्याचं भांबवलेलं बालमन समजून घेण्याचा प्रयत्न करतंय; त्यातून आपल्यापरीने अर्थ काढून काही समज तयार करू पाहतंय. बलात्काराच्या आरोपींपैकी दोघांना मारून टाकणाऱ्या 'अम्ब्रेला मॅन'ला मिळणारी लोकप्रियता पाहून तो काय विचार करत असेल? आईसोबत ज्यांनी वाईट कृत्य केलं त्या नराधमांना मारून बदला घ्यावा, असाही विचार त्याच्या मनात आला असावा का? त्याने वडिलांकडे खेळणं म्हणून बंदूकच का मागितली असेल?
बलात्काराच्या घटनेदरम्यान डोळ्यांना आणि मेंदूच्या नसांना झालेली दुखापत, त्यातून बसलेला मानसिक धक्का, आरोपींचे डीएनए नमुने न जुळणे, बलात्काराच्या प्रकरणाशी आरोपींना जोडणारा कोणताही पुरावा न्यायालयापुढे न येणे या सर्वांतून गोंधळलेली परिमा दोन आरोपींच्या हत्येनंतर म्हणते की, 'बलात्कार त्यांनीच केला का हे मला माहिती नाही. पण त्यांची हत्या झाल्याचं ऐकून बरं वाटलं'.

प्रत्येक न्यायपिपासून व्यक्तीच्या मनातलं ते वाक्य परिमा जेव्हा बोलते, तेव्हा तिथेच बंदुकीशी खेळत असणाऱ्या ध्रुवच्या मन:पटलावर कोणते तरंग उमटले असतील? ज्या कार्तिकने (कुमुद मिश्रा) दोन आरोपींना मारले, त्यालाच एका आरोपीच्या बापाने गोळ्या घालताना पाहून 'या जगात वाईटाला शिक्षा होतेच' ही त्याची समजूत पक्की होण्याआधीच उखडली गेली असेल काय? किंवा कदाचित त्या गोळीबाराच्या दाहाने त्याच्या मनात उगवू पाहणारे सुडाचे अंकुर करपूनही गेले असतील! ज्या रावीने (तापसी पन्नू) न्यायालयात चिवटपणे आणि धैर्याने आपल्या आईची बाजू मांडली, त्याच रावीला कार्तिकवर झालेल्या हत्येच्या प्रयत्नानंतर न्यायालयाबाहेर पायऱ्यांवर हताशपणे बसलेलं पाहताना ध्रुवच्या मनात विचारांचा कोणता कल्लोळ उसळला असेल? इथून पुढे 'पुरुष' म्हणून ध्रुवची घडण कशी होईल? ध्रुवला पडद्यावर पाहताना अशा कित्येक प्रश्नाचं मोहोळ डोक्यात घोंगावत राहतं. एकीकडे मुलाच्या वयाच्या विद्यार्थ्यांनी बलात्कारानंतर परिमावर केलेली शेरेबाजी पाहून शाळेच्या प्राचार्यांना (सीमा पाहवा) आलेली उद्विग्नता आणि दुसरीकडे वसुधाने न्यायालयात बसलेली मुलं उद्या आपल्यापेक्षा चांगला समाज घडवतील हा व्यक्त केलेला आशावाद या दोहोंमध्ये प्रेक्षकांचं मन हेलकावे खात राहतं.
पुरुषत्व: अन्यायकारी की अन्यायाविरुद्ध लढणारे
भारतीय समाज हा पूर्वापार व्यक्तिपूजा करणारा समाज राहिला आहे. पाऊण शतकापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विभूतिपूजेविरोधात चेतावणी दिली होती, पण एखाद्या नायकावर आपलं आयुष्य सोपवून निश्चिंतपणे जगण्याची कैफ दिवसेंदिवस उतरण्याऐवजी चढतच आहे. असा नायक आपल्याला विनाअपवाद पुरुषच हवा असतो. आणि त्यातून त्याचं आयुष्य गुढ असेल, तर गुळाहून गोड! गुढपणा, अपारदर्शकता, अदृश्य गोष्टींचं आणि अतिजलद न्यायाच्या संकल्पनेचं भारतीय मनाला कोण आकर्षण!
मागे हैदराबादमध्ये बलात्काराच्या चार आरोपींचा 'एन्काऊंटर' करून पोलीस असेच नायक बनले होते. त्यामुळे 'अस्सी'मध्ये सुद्धा गुप्तहेर असणारा कार्तिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपींना आपली ओळख लपवून मारतो, तेव्हा अनपेक्षितपणे 'अम्ब्रेला मॅन' म्हणून सर्वांसाठी नायक बनून जातो. पुरुषाने सत्ता निर्माण केली. ती सत्ता राखण्यासाठी राष्ट्र, धर्म, जाती निर्माण केल्या. राष्ट्राची सत्ता राखण्यासाठी सैन्य, गुप्तहेरखाते उभे केले. भीती आणि व्यवहाराच्या दोरखंडांनी जखडलेल्या त्या 'नायकी' जगात 'बायकी' भावनिकतेला, प्रेम-समानुभूतीच्या धाग्यांना कवडीचीही किंमत नाही. 'कर्तव्या'वर असल्यामुळे अपघातानंतर मृत्यूशय्येवर असलेली त्याची बायको कावेरीला शेवटच्या दिवसांमध्ये कार्तिक भेटूही शकला नाही. पण पुरुषी जगाची ही वास्तविकता त्याला डाचत राहते.
कावेरीच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिच्यासोबत असलेली रावी कार्तिकला त्याच्या बेजबाबदारपणाची जाणीव करून देते, तेव्हा त्याच्यातला गोंधळलेला पुरुष नकळतपणे भूतकाळातल्या वैयक्तिक बेजाबाबदारपणाचा उतारा आरोपींना मारण्यामध्ये शोधतो. नायकी थाटाच्या अशा वैयक्तिक सुडाच्या घटनांमुळे परिमाच्या न्यायप्रक्रियेत उलट कसे अडथळे निर्माण झाले आणि त्याने व्यापक अशा संरचनात्मक बदलांवरून सर्वांचे लक्ष कसे हटवले, याची जाणीव रावी कार्तिकला करून देते. 'आज बलात्कारावर खून हा उपाय वाटतोय, पण उद्या बलात्काराला बलात्कार हाच उपाय म्हणून कोणी मागणी केली तर काय?' हा रावीने कार्तिकला केलेला प्रश्न अंगावर काटा आणणारा आहे. झटपट न्यायाच्या पुरुषी संकल्पनेमधला फोलपणा कार्तिकला आकळून येतो आणि शेवटी तो पोलिसांसमोर आत्मसर्पण करतो.
जगातल्या सर्वच संस्कृतींमध्ये अपमानाचा बदला म्हणून शत्रुपक्षाच्या महिलांवर बलात्काराची नीती प्रचलित राहिली आहे. आजही महिलांच्या लैंगिकतेला कुटुंबाच्या जातीच्या धर्माच्या इभ्रतीशी जोडले जाते. आजूबाजूला रोज घडणाऱ्या इभ्रतहत्या त्याची साक्ष देत असतात. 'अस्सी'मध्ये विनय परिमावरील बलात्काराच्या दुर्घटनेला वैयक्तिक किंवा कुटुंबाच्या इज्जतीवरील घाला समजत नाही. पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये महिलांना एकूणच मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीचा तो सामाजिक परिपाक आहे, याची जाणीव त्याला असल्यामुळे बलात्काराच्या घटनेनंतरही पूर्वीप्रमाणेच शांतपणे तरीही ठामपणे तो परिमासोबत उभा ठाकतो. येथे विनय आणि कार्तिक यांच्या पुरुषत्वामधला फरक स्पष्ट होतो.
स्त्रियांचे पुरुषत्व: उद्धारक आणि मारक दोन्हीही
वैयक्तिक किंवा घरगुती स्वरूपाचा लिंगअसमभाव सामाजिक रूप कसे धारण करतो, हे या चित्रपटात जागोजागी पाहायला मिळते. दीपराज (मनोज पाहवा) पैशाचा वापर करून त्याचा मुलगा निक्का (अभिषांत राणा) याला बलात्काराच्या प्रकरणातून वाचवण्याचा येनकेनप्रकारे प्रयत्न करतो. जेव्हा निक्काला जामीन मिळतो, त्यावेळी त्याच्या घरी बहिणीच्या लग्नाची तयारी चालू असते. निक्काचा बलात्कार प्रकरणातील सहभाग माहिती झाल्यावरही त्याची आई (सुप्रिया पाठक) मुलीच्या लग्नात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून निक्का आणि दीपराज यांच्यामध्ये चालू असलेलं भांडण थांबवते. ती एकोणीस वर्षांची असताना तिच्या इच्छेविरुद्ध तिचं दीपराजसोबत जबरदस्तीने लग्न लावून दिलं जातं. मुलं मोठी होईपर्यंतची सर्व उमेदीची वर्ष ती कुढत कुढत, आपल्या इच्छा मारत जगते.

भारतातल्या बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबातील मध्यमवयीन बाईची ही प्रातिनिधिक कहाणी. वयाच्या पन्नाशीच्या आसपास तिच्या शब्दाला थोडं वजन मिळू लागतं. एक तर, त्यागाच्या किमान दोन तपांची अग्निपरीक्षा या वेळेपर्यंत तिने पार पाडलेली असते. त्यामुळे 'तुला व्यवहारातलं काय कळतं?' या पुरुषी प्रश्नाला ती तिच्या आयुष्यभराच्या त्यागाचे दाखले देऊन एव्हाना गप्प बसवू शकत असते. आणि दुसरे म्हणजे तोपर्यंत लेकरं आपापल्या मार्गाला लागलेली असतात आणि घरातल्या मुख्य पुरुषाला उतारवयात बायकोवर असणाऱ्या परावलंबित्वाची जाणीव झालेली असते. या सर्वांतून आलेली थोडीफार हुकुमत ती बाई पन्नाशीनंतर अधिकारवाणीने वापरू लागते.
पण 'अस्सी' दाखवतो, तसं ही हुकुमत क्वचितच वैयक्तिक लाभाच्या आणि सुखाच्या कल्पनांच्या पलीकडे जाऊन सामाजिक वास्तवाला भिडते. किटी पार्ट्या, समवयीन बायकांसोबत छोट्यामोठ्या ट्रिपा, सोसायटीमधील फंक्शन्स, नातेवाईकांचे कार्यक्रम यामध्ये नव्याने मिळालेली मोकळीक मिरवण्याचा परिघापलीकडे जाऊन मुळातच असलेल्या महिलांच्या दुय्यम दर्जाला प्रश्न विचारण्यासाठी ही मर्यादित हुकुमत क्वचितच कामी येते.
स्वतःच्या मुलाने केलेल्या बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत त्याला जाब विचारून त्याला त्याच्या कृत्याची जबाबदारी घ्यायला भाग पाडण्यासाठी तिची ही अधिकारवाणी खर्च पडावी की नाही, असा प्रश्न प्रेक्षकांसमोर हा चित्रपट उभा करतो. स्वतःला जी मोकळीक आयुष्यभर भेटली नाही, ती आपल्या मुलींना किंवा सुनांना देण्यासाठी ही नवाधिकारित बाई काही करू शकेल का, असा प्रश्न क्षणभर का होईना प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहत नाही. त्या प्रश्नाचं काळं किंवा पांढरं असं कोणतंही उत्तर देणं हा चित्रपट टाळतो आणि त्याबाबत प्रेक्षकांनाच विचार करायला भाग पाडतो.
बायकांचे बाळीकरण हा पुरुषसत्तेचा पाया!
दुसरीकडे बलात्कार प्रकरणातील मुख्य सूत्रधार समीर (साहिल सेठी) याची बायको सविता (तृप्ती ठाकूर) आणि किशोरवयीन मुलगी विद्या (अक्षरा पडवाल) समीरच्या विरोधात न्यायालयात साक्ष देत धाडसी भूमिका घेताना दिसतात. कित्येक वर्षांपूर्वी किशोरवयात असलेल्या सवितावर समीरने बलात्कार केलेला असतो. शेवटी जातपंचायतीच्या तोडग्यानंतर सविताचे समीरशी लग्न लावून दिले जाते. स्वतःच्याच बलात्काऱ्यासोबत आयुष्य काढणे आणि त्याच्याबरोबर मूलही जन्माला घालणे हे आपल्याकडे लैंगिक गुन्ह्याचे किती सामान्यीकरण झाले आहे हे दर्शवतं.
लहान मुलांपर्यंत योग्य माहिती पोहोचवून त्यांना संवेदनशील आणि जबाबदार बनवण्याऐवजी त्यांचं बाळीकरण (इन्फंटलायझेशन) करण्याकडे एकूणच समाज म्हणून आपला कल असतो. लहान मुलांच्या ग्रहणक्षमतेला नेहमीच आपण कमी लेखतो. पण लहान मुले निरीक्षणातून, भवतालातून शिकत असतात. बचाव पक्षाचा वकील नवरतन (सत्यजित शर्मा) हा विद्याची साक्ष घेत असताना उलटसुलट प्रश्न विचारून तिला भांबावून सोडण्याचा जो प्रयत्न करतो, तो वकील म्हणून केल्या जाणाऱ्या व्यूहनीतीपेक्षा किशोरवयीन विद्याच्या चारित्र्यावर संशय निर्माण करून तिची साक्षीदार म्हणून असणारी विश्वासार्हता कमी करणारा असतो. पण 'तुझ्या वडिलांना याआधी बलात्कार करताना कधी तू पाहिले आहे का?', अशा असंवेदनशील प्रश्नाला विद्यासुद्धा न घाबरता 'मी वडिलांना आईवर बलात्कार करताना कित्येकदा पाहिलंय', असं उत्तर देऊन संपूर्ण न्यायालयाचं लग्नांतर्गत (मेरिटल) बलात्कारांकडे लक्ष वेधते. त्यातून संमती (कन्सेंट) चा प्रश्न ऐराणीवर येतो.
जेव्हा आरोपींपैकी एकजण म्हणतो की, 'पीडित महिलेच्या सहभागाशिवाय आणि तिला आवडल्याशिवाय प्रत्यक्ष संभोग शक्य आहे का?', तेव्हा तो केवळ त्याचं वैयक्तिक मत मांडत नसतो, तर आपल्या घरांत, आजूबाजूला समाज माध्यमांवर सर्रास व्यक्त केला जाणारा एक समज उद्धृत करत असतो. हा समज बलात्काराची जबाबदारी बलात्काऱ्यांवर टाकण्याऐवजी पीडित व्यक्तीवरच टाकत असतो. मुळात एखादा लैंगिक गुन्हा ही पीडित व्यक्तीची चूक नसून आपल्या सर्वांचा समाज म्हणून पराभव असतो, हे आपण कधी मान्य करणार आहोत? न्यायालयातील सुनावणीवेळी एका टप्प्यावर पीडित म्हणून समाजाने तिच्यावर लावलेलं बालंट आणि टाकलेलं दडपण परिमा झुगारून देते. पीडिता म्हणून तोंड लपवण्याचं ती नाकारते.
दुसरीकडे, ज्यांच्यावर बलात्काराची जबाबदारी असली पाहिजे त्या आरोपींपैकी एकजण न्यायालयात हजर राहण्यापूर्वी तोंडावर गुंडाळण्यासाठीचं कापड त्याच्या पेहरावाला मॅचिंग असावं, अशी अपेक्षा ठेवतो; अजून एकजण बलात्काराच्या घटनेला "पार्टी" संबोधतो. अशा प्रकारची बेफिकीर मानसिकता केवळ सामाजिक मान्यतेतून येत नसते, तर तिला कायदेशीर प्रक्रियेचही पाठबळ असतं. पोलीस पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींना पूर्ण मदत करतात. विशेष म्हणजे, कविमनाचा पोलीस निरीक्षक संजय (जतिन गोस्वामी) पोलीस प्रशासनातील संवेदनशील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करताना दाखवला आहे.

रावीने त्याच्या नैतिक नेणिवेला वारंवार हात घालण्याचा प्रयत्न करूनही तो एकीकडे तपासाबाबत संवेदनशील असल्याचे भासवून दुसरीकडे आपल्या कौटुंबिक आणि व्यवसायिक हितसंबंधांना धक्का लागू नये यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतो. पुरुष आणि पोलीस अधिकारी म्हणून असणारे त्याचे विशेषाधिकार (प्रिविलेजेस) शक्यतोवर वापरायचं टाळूनसुद्धा शेवटी तो स्वतःला वाचवू शकतच नाही. वैचारिकदृष्ट्या कायम कुंपणावर बागडणाऱ्यांसाठी संजय मोठा धडा देऊन जातो. याउलट, सगळं काही गमावण्याची शक्यता असतानासुद्धा स्वतःचा नवरा-बापाविरुद्ध साक्ष देणाऱ्या सविता-विद्याचं धैर्य प्रेक्षकांना प्रेरणा देऊन जातं.
स्त्री विरुद्ध पुरुष असं द्वंद्व जरी हा सिनेमा उभं करत नसला, तरी नवरतनचे असंवेदनशील प्रश्न चीड आणतात आणि त्याच्यासमोर न्यायाधीश म्हणून वसुधा (रेवती) ऐवजी एखादा पुरुष न्यायाधीश असता तर पीडीतेला आणि स्त्री साक्षीदारांना अजून किती मानखंडना सहन करावी लागली असती, हा विचार प्रेक्षकांच्या मनात चमकून जातोच. 'तुमच्यावर कधी बलात्कार झालाय का?' हा रावीने नवरतनला केलेला सवाल केवळ भावनिक म्हणून बाद करता येणार नाही. तो सामाजिक अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींना समानुभूती आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. समाजस्वास्थ्याचे कारण पुढे करत वेश्याव्यवसायाचे समर्थन करणाऱ्या दुर्गा भागवतांना राजा ढाले यांनी असाच प्रश्न विचारला होता - 'मग तुम्ही स्वतःच वेश्याव्यवसायात का उतरत नाही?' पुरुषसत्ता, जातिव्यवस्थेसोबतच इतर शोषणकारी व्यवस्थांच्या लाभार्थ्यांना असे टोकदार प्रश्न विचारत राहण्यासाठी 'अस्सी' नक्कीच प्रेरणा देत राहील, यात शंका नाही.
(लेखक दिल्लीच्या आंबेडकर विश्वविद्यालयाच्या मानवाभ्यास विभागात ‘शक्तिभाव अभ्यास’ (Masculinity Studies) या विषयात पीएचडी संशोधन करत आहेत.)
Email – [email protected]






