सुकेशनी नाईकवाडे, बीड
- पोलिस वर्दीचं स्वप्न घेऊन मैदानावर उतरलेल्या 26 वर्षीय दीपक वाव्हळेचा बीडमधील भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना मृत्यू
- वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसादाबाबत कुटुंब व ग्रामस्थांचे गंभीर प्रश्न
- “जबाबदारी नेमकी कोणाची?” या प्रश्नाचं उत्तरं शोधण्यासाठी बाईमाणूस मांडेखेल गावात
बीड जिल्ह्यातील मांडेखेल गावावर शोककळा पसरली आहे. पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीत 1600 मीटर धावत असताना 26 वर्षीय दीपक वाव्हळे अचानक कोसळला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.11 फेब्रुवारीला मैदानावर नेमकं काय घडलं? पुरेशी वैद्यकीय मदत तिथे उपलब्ध होती का? उन्हात धावणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक काळजी घेतली गेली होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एका तरुणाचा जीव गेल्यानंतर जबाबदारी नेमकी कोणाची? हे सर्व प्रश्न घेऊन बाईमाणूस मांडखेल गावातील दीपक वाव्हळेच्या घरी पोहचलं.
दीपक वाव्हळेच्या अंगणात लोकांची गर्दी होती, पण शांतता होती. भिंतीवर दीपकचा फोटो लावलेला, समोर तेवत असलेला दिवा… आणि आतून येणारे त्याच्या आईचे हुंदके. कालपर्यंत पोलिस वर्दीचं स्वप्न पाहणारा 26 वर्षांचा तरुण आज फक्त फोटोमध्ये जिवंत आहे. 26 वर्षांचा दीपक वाव्हळे रोज सकाळी लवकर उठून धावायला जात असे. पोलिस वर्दी घालून आईसमोर उभं राहण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण पोलिस भरतीच्या मैदानावर धावताना आलेल्या एका भोवळने त्याची धाव कायमची थांबली. बीड येथील पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीत 1600 मीटर धावत असताना दीपक अचानक कोसळला. उपस्थितांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचं हृदय थांबलं आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मयत (दीपक वाव्हळे))
दीपकची आई अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की तिचा मुलगा परत येणार नाही. बाईमाणूसशी बोलतांना त्यांनी सांगितलं
“माझं मोठं बाळ गेलं… बारकं हाय. मह्या लेकराला सरकारी नोकरी करायची व्हती. माझं लेकरू म्हणलं होतं मोठं व्हायचंय. तुला जग दाखवायचयं..पण त्याचं स्वप्नं पुरं व्हण्याआधीच माझं बाळ गेलं. रोज सकाळी पाळायला जायचा आल्यावर दिवस भर अभ्यास करायचा..लय हुशार होतं. सरकारने माझ्या बारक्याला चपरासी म्हणून तरी घ्या… मोठ्या भावाचं तो स्वप्न तरी पूर्ण करीन.” दिपकच्या आईच्या प्रत्येक शब्दात मुलाला वर्दीत पाहण्याची अपुरी आस आहे.
दीपक आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातून पुढे येण्यासाठी झटत होता. दलित समाजातील या तरुणाने घरच्या परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केलं आणि पोलिस भरतीसाठी तयारी केली. कुटुंबाला त्याचा अभिमान वाटेल असं काहीतरी करण्याचं त्याचं स्वप्न होतं. ज्या ठिकाणी बसून तो अभ्यास करायचा त्याच ठिकाणी त्याच्या फोटोसमोर बसून नातेवाईक हंबरडा फोडत आहेत.
मैदानावर नेमकं काय घडलं?
११ फेब्रुवारीला बीड जिल्हा पोलीस दलाच्या 174 पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेत पहाटे 5 वाजेपासून बीड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी सुरु होती. दीपक या प्रक्रियेत सहभागी झाला होता. भरती प्रक्रियेसाठी उमेदवार सकाळपासून मैदानावर उपस्थित होते. कडक ऊन आणि त्यात धावायचं या सगळ्यात अनेक तरुण शारीरिक कसोटी देत होते. यामध्ये दीपकने 1600 मीटरची धाव पूर्ण केली.
(दीपक ची आई (जयश्री वाव्हळे))
मात्र धावत असतानाच त्याला भोवळ आली आणि तो अचानक जमिनीवर पडला. घटनेनंतर काही काळ मैदानावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने मदत केली. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. या घटनेनंतर इतर उमेदवारांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली. काहींनी व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले, तर काही जण स्तब्ध झाले होते.
“तो घराचा आधार होता…”
दीपकचे घर मांडेखेलमध्ये आहे. घरात आई-वडील, एक लहान भाऊ आणि विवाहित बहिण. वडील ऊसतोड मजूर. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. तरीही मुलांनी शिकावं, पुढे जावं यासाठी त्याच्या आई-वडिलांनी आयुष्य झिजवलं.
(दीपक चे वडील (भास्कर वाव्हळे))
दिपकचे वडील भास्कर वाव्हळे डोळ्यातील अश्रू आवरत सांगतात,
"दीपक शिक्षणात हुशार होता. त्याचं एकच ध्येय होतं पोलिस दलात भरती होणं. मी चार गावात काम करायला जातो. कधीच घरी राहत नाही. ऊसतोडीला जातो पण पोरांच्या पैसे पुरवतो. पण आता काय कोनास्ताही कष्ट करू. माझं लेकरू तर गेलं. माझ्या लेकराला दवाखान्यातून घरी आणण्यासाठी पण ऍम्ब्युलन्स चा खर्च आम्हालाच द्यावा लागला. माझा आधारच गेला आता सरकारने काही तरी मदत करावी."
“अशा घटना वारंवार होत आहेत…”
या घटनेवर मांडेखेल गावचे सामाजिक कार्यकर्ते अजय बुरांडे म्हणाले, "अशा प्रकारचे प्रकार वारंवार पोलीस आणि पोलीस भरतीच्या ग्राउंडवर होत आहेत.
भूमिहीन, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलं मोठ्या आशेने भरतीमध्ये सहभागी होतात. पण अशी घटना घडल्यावर ते कुटुंब पूर्णपणे उघड्यावर येतं. सरकारने अशा प्रकरणांमध्ये किमान दहा लाखांची मदत द्यावी. तसेच भरतीच्या ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करावी. जेणेकरून कष्टकऱ्यांची मुलं मागे हटणार नाहीत.”
दीपक वाव्हळे मृत्यूप्रकरणी पोलिसांचे अधिकृत स्पष्टीकरण
दीपक वाव्हळेच्या मृत्यूप्रकरणी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, दुपारी १२.५५ वाजता दीपकने १६०० मीटर धाव पूर्ण केली आणि त्यानंतर काही वेळ विश्रांती घेतली. पुढे तो फिनिशिंग पॉईंटलगत असलेल्या मेडिकल रूमकडे चालत गेला. त्या वेळी वैद्यकीय पथक त्याच्यासोबत उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मेडिकल कॅम्पमध्ये डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. त्याला आयव्ही देण्यात आले. त्वरित रुग्णवाहिका बोलावण्यात आली. दुपारी १.१४ वाजता त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. तसेच या दुर्दैवी घटनेबाबत सर्व संबंधित बाबींची चौकशी सुरू असल्याचेही पोलीस अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
मृत्यूनंतर नवे प्रश्न: कुटुंबाचे गंभीर आरोप
दीपकच्या मृत्यूनंतर केवळ शोकच नाही तर अनेक गंभीर प्रश्नही पुढे आले आहेत. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह गावात आणण्यासाठी सरकारी ॲम्ब्युलन्स न देता खाजगी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आणि त्यासाठी सुमारे दहा हजार रुपये मागितल्याचा आरोप करण्यात येतो. आधीच मुलाच्या निधनाने खचलेल्या कुटुंबावर हा आर्थिक आणि मानसिक ताण का आला, असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत. भरती मैदानावर पुरेशी वैद्यकीय सुविधा होत्या का? उमेदवारांना पुरेसं पाणी आणि विश्रांती देण्यात आली होती का? आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद तातडीने देण्यात आला का? या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मांडेखेलमध्ये सध्या शोककळा असून प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, तसेच लहान भावाला शासकीय नोकरी देऊन कुटुंबाला आधार द्यावा, ही दिपकच्याआईची आर्त विनंती आहे.






