शालिनी कुमारी
- उष्णतेची झळ सगळ्यांनाच बसते, पण ती सगळ्यांना सारखी बसत नाही. दिल्लीच्या शाहबाद डेअरी वस्तीत राहणाऱ्या पूनम, ऋतिका आणि पाले राम यांच्या आयुष्यात उकाडा हा केवळ हवामानाचा प्रश्न नाही. तो त्यांच्या जातीशी, कामाशी आणि आर्थिक परिस्थितीशी जोडलेला आहे.
- भारतात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत असताना शरीराला आराम देणारे सुती कपडे अनेकांसाठी सहज उपलब्ध असतील; पण दलित स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी ते अजूनही चैनीची वस्तू आहेत.
- एका साध्या कपड्याच्या धाग्यांमधून दिसणारी ही कथा हवामान बदल आणि सामाजिक विषमतेच्या नात्याचा वेध घेते.
दुपारचं ऊन डोक्यावर आल्यानंतर दिल्लीच्या शाहबाद डेअरी वस्तीतील अरुंद गल्ल्या अक्षरशः तापलेल्या भट्टीसारख्या होतात. एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या काँक्रीटच्या घरांच्या या जाळ्यात झाडं जवळपास दिसतच नाहीत. हवा खेळती राहण्यासाठी जागाही नाही. वाऱ्याची एखादी झुळूकही या कोंदट गल्ल्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. जसजशी दुपार सरत जाते तसतशी उष्णता असह्य होत जाते.
याच वस्तीत शेजारी-शेजारी राहणारी पूनम आणि तिची जाऊ ऋतिका आपल्या मुलांना बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत. बाहेरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. पण घरात पाऊल टाकताच जाणवतं की खरी झळ तर इथेच आहे. पत्र्याची आणि काँक्रीटची छप्परं दिवसभर उन्हाची आग साठवून ठेवतात. घरात खिडक्या नाहीत, हवा येण्यासाठी कोणतीच सोय नाही. भिंतींच्या आत अडकलेली उष्णता संध्याकाळपर्यंत कमी होत नाही.
पूनम आणि ऋतिका जर पुरुष असत्या तर त्या सैलसर किंवा कमी कपडे घालून या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळवू शकल्या असत्या. पण प्रथा-परंपरा त्यांना तशी मुभा देत नाही. महिला म्हणून सलवार-कमीज, दुपट्टा आणि अंग झाकून ठेवणारे अनेक कपड्यांचे थर हे त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहेत.
पूनम आपल्या अंगावरील सिंथेटिक कापडाच्या सलवार-कमीजकडे पाहत म्हणते, “हा ड्रेस घातला की अजून घाम येतो, घाम शोषून घेतच नाही.” तिच्या आवाजात केवळ उष्णतेचा त्रास नाही, तर असहायतेची एक छटा आहे.
दिल्लीतील शाहबाद डेअरी भागातील अरुंद गल्ल्या आणि दाटीवाटीची घरे यामुळे हवेचा प्रवाह अडथळित होतो. त्यामुळे वाढत्या तीव्र उन्हाळ्यात अनेक कुटुंबांना उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. (Image: Shalinee Kumari / Dialogue Earth)
भारतामध्ये उष्णतेच्या लाटा आता अधिक तीव्र होत चालल्या आहेत. उष्णता वाढत असताना कॉटनआणि लिननसारखे कपडे शरीराला थंडावा देण्यासाठी आणि उकाड्यापासून काहीसा आराम मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात. पण पूनम आणि ऋतिकासारख्या अनेक महिलांना हे कपडे परवडत नाहीत. कारण कॉटनचे कपडे त्यांच्या वापरातील सिंथेटिक कपड्यांपेक्षा जवळपास दुप्पट महाग आहेत.
पूनम आणि ऋतिका ह्या दलित समाजातील आहे. त्यांच्या घराची कहाणी ही केवळ एका कुटुंबाची कहाणी नाही तर ती पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या सामाजिक विषमतेची साक्ष आहे. त्यांचे सासरे पाले राम यांनी आपलं शिक्षण खूप कष्टाने पूर्ण केल. मात्र त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही. जात त्यांच्या वाटेत उभी राहिली. त्यांच्या वडिलांप्रमाणे आणि आजोबांप्रमाणेच त्यांनाही गटार साफ करण्याचं काम करावं लागलं. आज त्यांची मुलंही हेच काम करतात. पिढ्या बदलल्या, काळ बदलला, पण काम बदलले नाही. घरात येणारं उत्पन्न रोजच्या गरजा भागवण्यातच संपून जातं. घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि जगण्यासाठी लागणाऱ्या इतर खर्चांनंतर कपड्यांसाठी फारसे पैसे उरत नाही. आणि म्हणूनच या घरात कापसाचा एक साधा कपडादेखील केवळ कापड नसून आराम, आरोग्य आणि सन्मान यांच्याशी जोडलेला एक अपूर्ण राहिलेला स्वप्न असतं.
कॉटनचा कपडा परवडत नाही, सिंथेटिकचाच आधार
उष्णतेपासून काहीसा दिलासा देणारे कॉटनचे कपडे या कुटुंबांच्या आवाक्याबाहेर का आहेत? याचं उत्तर त्यांच्या रोजच्या आर्थिक संघर्षात दडलंय. पूनमचे सासरे पाले राम महिन्याला सुमारे ३५ हजार रुपये कमावतात. तर पूनमचा पती बस कंडक्टर म्हणून काम करण्याबरोबरच गटार साफ करण्याचेही काम करतो आणि त्यातून त्याला महिन्याला जवळपास ४० हजार रुपये मिळतात. वरकरणी हे उत्पन्न पुरेसं वाटत असलं, तरी सात जणांच्या कुटुंबाचा घरखर्च, मुलांचं शिक्षण, औषधोपचार, वीजबिल आणि इतर दैनंदिन गरजा भागवल्यानंतर हातात फारसं काही उरत नाही. अशा परिस्थितीत कपड्यांवर जास्त खर्च करणं त्यांच्यासाठी शक्य होत नाही.
शाहबाद डेअरीत राहणारी रिया सांगते, “कॉटनचा एक सलवार-सूट हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा असतो, तर सिंथेटिक किंवा मिश्रित कापडाचे कपडे अवघ्या तीनशे रुपयांत मिळतात.” रियाचा पती शहरातील गटारसाफ करण्याचं काम करतो आणि महिन्याला सुमारे १५ हजार रुपये कमावतो. पाच मुलांच्या शिक्षणासह घर सांभाळताना कॉटनचे कपडे खरेदी करणं त्यांच्या कुटुंबासाठी गरजेपेक्षा जास्त खर्च ठरतात. त्यामुळे उष्णतेत त्रास होत असला तरी स्वस्त आणि टिकाऊ सिंथेटिक कपड्यांवरच त्यांना समाधान मानावं लागतं.
उत्पन्न मर्यादित, उकाडा अमर्यादित
उष्णतेचा सर्वाधिक फटका बसतो तो अशा लोकांना, ज्यांची कामंच उन्हात आणि कठीण परिस्थितीत असतं. पूनमचे सासरे पाले राम यांच्यासाठी उष्णता ही केवळ ऋतूचा भाग नसून रोजच्या जगण्यातील एक कठोर वास्तव आहे. वयाच्या साठाव्या वर्षीही ते स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. उघड्या गटारांमधील कचरा फावड्याने काढणं, डांबरी रस्त्यांच्या कडेला तासन्तास उभं राहणं आणि प्रखर उन्हात कष्ट करणं हा त्यांच्या दिवसाचा अविभाज्य भाग आहे.
पूनमच्या घरात पत्राच्या छताखाली एक पंखा लटकलेला आहे. दिवसभर उन्हाची उष्णता शोषून घेणाऱ्या या पत्राच्या छतामुळे घरातील तापमान बाहेरील तापमानापेक्षाही अधिक जाणवते. (Image: Shalinee Kumari / Dialogue Earth)
या कामासाठी त्यांना सिंथेटिक कापडाचा गणवेश घालावा लागतो. अंगावर चढवलेली हा साधी बनियनसुद्धा उष्णतेत त्रासदायक ठरतो. “ही बनियन घातला की कधी-कधी गुदमरल्यासारखं वाटतं. मऊ आणि सुती कपडे घातले की काम करताना बरं वाटतं,” असं पाले राम सांगतात.
यंदाच्या उन्हाळ्यात ते दोनदा बेशुद्ध झाले होते. वारंवार चक्कर येणं, डोळ्यांची जळजळ होणं आणि जुलाबाचा त्रास होणं अशा समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं. उष्णतेमुळे होणाऱ्या थकव्याची ही सामान्य लक्षणं मानली जातात. मात्र रोजच्या कामापासून सुट्टी घेणं त्यांना परवडणारं नाही. त्यांच्या कपाटात आजही फक्त दोन जुने सुती कुर्ता-पायजमे आहेत. तेच आळीपाळीने वापरत ते कामावर जातात. “नवीन कपडे कधी घेता येतील, माहिती नाही,” ते हसत म्हणतात. मात्र त्या हसऱ्या चेहऱ्यामागे वाढत्या उष्णतेची आणि आर्थिक विवंचनेची चिंता स्पष्ट दिसून येते.
जन्माने दलित, कामाने स्वच्छता कर्मचारी आणि उष्णतेचे पहिले बळी
पाले राम यांची कहाणी ही केवळ एका व्यक्तीची व्यथा नाही. भारतातील हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वास्तव यापेक्षा फारसे वेगळे नाही. दिल्लीसारख्या शहरांमध्ये अत्यंत उष्णतेचा सामना करणाऱ्या कामगारांमध्ये स्वच्छता कर्मचारी, बांधकाम मजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचा मोठा वाटा आहे. यापैकी अनेक जण ऐतिहासिकदृष्ट्या वंचित आणि दडपलेल्या जातीय समुदायांमधून आलेले आहेत. २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका विश्लेषणानुसार, भारतातील जवळपास ७० टक्के सीवर आणि सेप्टिक टँक साफ करणारे कामगार दलित समाजातील आहेत. त्यामुळे उष्णतेचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या कामांमध्ये आजही दलित समाजाचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात दिसून येते.
कापडनिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ अफरोज फरीद यांच्या मते, "उष्णतेत दीर्घकाळ शारीरिक श्रम करणाऱ्या कामगारांसाठी कपड्यांची निवड अत्यंत महत्त्वाची असते. मात्र मर्यादित उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी अन्न, निवारा आणि शिक्षण या गरजा प्रथम येतात. आरामदायी कपडे ही त्यांच्यासाठी दुय्यम बाब ठरते."
सफाई कर्मचारी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बेझवाडा विल्सन यांच्या मते, "आरामदायी कपड्यांपर्यंत पोहोच नसणे हा केवळ गरिबीचा प्रश्न नाही. ही जातीय विषमतेचीही समस्या आहे. भारतात वर्ग आणि जात यांना वेगळं करता येत नाही,”
"दलित समाजाला आजही दुहेरी भेदभावाचा सामना करावा लागतो. एकीकडे आर्थिक अभाव तर दुसरीकडे जातीय भेदभाव. या दोन्ही गोष्टींचा परिणाम त्यांच्या राहणीमानावर, आरोग्यावर आणि कामाच्या परिस्थितीवर होतो. अनेक दलित कुटुंबे वापरलेले कपडे किंवा कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी असलेल्या बाजारांवर अवलंबून असतात. आमच्या वस्त्यांजवळ कापसाचे कपडे मिळतच नाहीत. दुकानदारांना माहिती असतं की आम्ही ते घेऊ शकत नाही,” असं विल्सन सांगतात.
पूनम सांगते की, तिच्या आवाक्यात असलेले कृत्रिम (सिंथेटिक) कापडाचे कपडे तीव्र उष्णतेच्या दिवसांत खूपच अस्वस्थ वाटतात आणि उकाडा अधिक जाणवतो. (Image: Shalinee Kumari / Dialogue Earth)
त्यामुळे उष्णतेपासून बचाव करणारे कपडे केवळ महागच नाहीत, तर अनेकदा या समुदायांच्या सहज उपलब्धतेबाहेरही असतात. परिणामी उष्णतेचा वाढता धोका आणि सामाजिक विषमता यांचं ओझं त्यांनाच अधिक सहन करावं लागतं.
कापूस पिकवणाऱ्या देशात सुती कपडेच महाग
भारत हा जगातील सर्वात मोठ्या कापूस उत्पादक देशांपैकी एक आहे. देशातील लाखो शेतकरी आणि सुमारे पाच कोटी लोक थेट किंवा अप्रत्यक्षपणे कापूस उद्योगावर अवलंबून आहेत. मात्र विरोधाभास असा की, ज्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात कापूस पिकवला जातो, त्याच देशात अनेक गरीब कुटुंबांना सुती कपडे परवडत नाहीत.
सामाजिक कार्यकर्ते आणि डिझायनर जय सगाथिया यांनी गुजरातमधील विविध हस्तकला आणि वस्त्रनिर्मिती करणाऱ्या समुदायांना भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान त्यांना अनेक असे कारागीर भेटले, जे सुंदर आणि महागडे कपडे तयार करतात; पण ते स्वतः ते कपडे खरेदी करू शकत नाहीत. “जे लोक हे कपडे तयार करतात, त्यांनाच ते घालता येत नाहीत,” असं सगाथिया सांगतात.
त्यांच्या मते, भारतात आर्थिक विषमता आणि जातीय विषमता एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा लाभ अनेकदा त्या वस्तू तयार करणाऱ्या लोकांपर्यंतच पोहोचत नाही. वाढत्या उष्णतेच्या काळात ही दरी आणखी स्पष्टपणे दिसून येते. एका बाजूला आरामदायी आणि हवेशीर कपड्यांची गरज वाढतेय, तर दुसऱ्या बाजूला त्यांची किंमत अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
स्वस्त म्हणून निवड, आवड म्हणून नव्हे...
मात्र सिंथेटिक कपड्यांचा वाढता वापर हा लोकांची आवड असल्यामुळे होत नाही, तर त्यामागे आर्थिक वास्तव दडलंय. विल्सन यांच्या मते, पॉलिस्टर आणि नायलॉनचे कपडे उष्णतेमध्ये त्रासदायक ठरत असले तरी अनेक गरीब कुटुंबांसाठी तेच पर्याय आहेत. कारण हे कपडे अधिक टिकाऊ असतात. वारंवार धुवूनही ते कित्येक वर्ष वापरता येतात. त्यामुळे लोकांना पुन्हा पुन्हा कपडे खरेदी करावे लागत नाहीत.
ऋतिकाचा चार महिन्यांचा मुलगा झोपताना आजीने पाठवलेले सूती कपडे घालतो. आर्थिक अडचणी असूनही, मुलांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी हे कुटुंब सूती आणि हवेशीर कपड्यांनाच प्राधान्य देते. (Image: Shalinee Kumari / Dialogue Earth)
“लोक पॉलिस्टरचे कपडे आवड म्हणून निवडत नाहीत. ते जास्त काळ टिकतात म्हणून ते या कपड्यांकडे वळतात,” असे विल्सन सांगतात.
सुती कपडे शरीराला आराम देतात, पण वारंवार वापर आणि धुण्यामुळे ते तुलनेने लवकर झिजतात. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी टिकाऊपणा हा आरामापेक्षा महत्त्वाचा ठरतो.
बाजार संशोधन संस्थांच्या अहवालानुसार, भारतातील कपड्यांच्या मागणीत पॉलिस्टरचा वाटा जवळपास ६२ टक्के आहे. कमी किंमत, टिकाऊपणा आणि विविध प्रकारे वापरता येण्याची क्षमता यामुळे या कपड्यांची मागणी सातत्याने वाढतेय.
दरम्यान, पॉलिस्टर, नायलॉन आणि इतर मानवनिर्मित कापडांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने २०२१ मध्ये मोठी योजना सुरू केली. या उत्पादनासाठी दहा हजार कोटी रुपयांहून अधिक प्रोत्साहन देण्यात आले. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनांमुळे भविष्यात बाजारात सिंथेटिक कपड्यांचे वर्चस्व आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महिलांच्या वाट्याला उष्णतेचा अतिरिक्त भार
वाढत्या उष्णतेचा फटका सर्वांनाच बसतो, मात्र महिलांसाठी हा संघर्ष आणखी कठीण ठरतो. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये राहणाऱ्या महिलांना सामाजिक आणि सांस्कृतिक अपेक्षांमुळे अनेक थरांचे कपडे परिधान करावे लागतात. साडी, सलवार-कमीज, दुपट्टा किंवा कामाच्या ठिकाणचे गणवेश यामुळे त्यांच्या अंगावर कपड्यांचे अतिरिक्त ओझं येतं. पूनम आणि ऋतिकासाठी ही परिस्थिती वेगळी नाही. घरातील पुरुष उष्णता वाढली की कपड्यांमध्ये काहीसा बदल करू शकतात. मात्र महिलांना तशी मुभा नसते. समाजाच्या अपेक्षा आणि परंपरांच्या चौकटीत राहूनच त्यांना उकाड्याचा सामना करावा लागतो.
कापड आणि वस्त्र क्षेत्रातील तज्ज्ञ अफरोज फरीद यांच्या मते, अशा परिस्थितीत महिलांना उष्णतेचा अधिक त्रास सहन करावा लागतो. “अशा वातावरणात महिलांच्या अंगावर कपड्यांचे थर अधिक असतात. त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो,” त्या सांगतात.
उष्णतेपासून दिलासा मिळवतानाच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिया सूती कपड्यांसोबत स्वस्त सिंथेटिक कपड्यांचाही वापर करते. (Image: Shalinee Kumari / Dialogue Earth)
उष्णतेचा सामना करत असतानाही पूनम आपल्या मुलांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाही. “आम्ही स्वतः काहीही घालू, पण मुलांना शक्यतो सुती कपडेच घालण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं शरीर जास्त नाजूक असतं,” ती सांगते.
मात्र हा प्रयत्नही नेहमीच यशस्वी होतो असे नाही. घरातील मर्यादित उत्पन्न आणि वाढत्या खर्चामुळे अनेकदा मुलांसाठीही स्वस्त कपड्यांवर त्यांना समाधान मानावे लागते.
उकाडा, पाण्याची टंचाई आणि दमट घरं
घराच्या बाहेर उष्णतेचा तडाखा असला, तरी घराच्या आतही परिस्थिती फारशी वेगळी नाही. अनेक महिने पैसे साठवल्यानंतर पूनमच्या कुटुंबाने एक जुना एअर कूलर विकत घेतला. मात्र त्यातून अपेक्षित दिलासा मिळाला नाही. “कूलरमुळे हवा थंड होण्याऐवजी आणखी दमट होते,” पूनम सांगते.
याशिवाय त्यांच्या कुटुंबाला पाण्याच्या टंचाईचाही सामना करावा लागतो. दिवसाला मिळणारं पाणी त्यांच्या गरजेच्या निम्मंसुद्धा नसतं. उपलब्ध पाण्याचा मोठा भाग पिण्यासाठी राखून ठेवावा लागतो. त्यामुळे कपडे वारंवार धुणे हा त्यांच्या दृष्टीने प्राधान्याचा विषय राहात नाही. सुती कपडे अनेकदा धुतल्यानंतर अधिक मऊ आणि आरामदायी होतात. मात्र त्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्यामुळे उष्णतेपासून आराम देणाऱ्या कपड्यांचाही पूर्ण फायदा अनेक कुटुंबांना मिळत नाही.
पाले राम कामावर जाण्यापूर्वी आपले फ्लुरोसंट सुरक्षा जॅकेट घालतात. दिल्लीच्या कडक उन्हाळ्यात सूती कपड्यांवर हे कृत्रिम (सिंथेटिक) जॅकेट परिधान करणे अत्यंत अस्वस्थ आणि उकाडा वाढवणारे ठरते, असे ते सांगतात. (Image: Shalinee Kumari / Dialogue Earth)
उष्णतेपासून संरक्षणात कपड्यांकडे दुर्लक्ष
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाकडून पंखे, कूलर, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांवर भर दिला जातो. मात्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कपड्यांची भूमिका फारशी चर्चेत येत नाही. विशेषतः मैदानी भागात काम करणाऱ्या कामगारांसाठी कपडे हे उष्णतेविरुद्धचे पहिले संरक्षण असते. विल्सन आणि अफरोज फरीद यांच्या मते, उघड्यावर काम करणारे शेतमजूर, स्वच्छता कर्मचारी, बांधकाम मजूर आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगार यांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसतो. मात्र त्यांच्या गरजा धोरणांच्या केंद्रस्थानी क्वचितच दिसतात.
“अत्यंत उष्ण वातावरणात काम करणाऱ्या लोकांसाठी खास कपड्यांची गरज आहे. हवामान बदलामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी उष्णतेचा धोका आणखी वाढणार आहे,” असे फरीद सांगतात.
त्यांच्या मते, शुद्ध कापूस किंवा लिननचे कपडे आरामदायी असले तरी दीर्घकाळ उष्णतेत काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याही मर्यादा आहेत. घाम शोषल्यानंतर हे कपडे जड होतात आणि सुकण्यासाठी वेळ लागतो.
“लोकांना आराम मिळेल आणि किंमतही जास्त वाढणार नाही, अशा प्रकारचे मिश्रित कापडाचे कपडे तयार करण्याची गरज आहे,” त्या सांगतात.
शाहबाद डेअरीतील रहिवाशांना पिण्यासाठी थोडेसे पाणी मिळवण्यासाठीही अनेक तास खर्च करावे लागतात. त्यामुळे कपडे धुण्यासारख्या दैनंदिन गरजांसाठी पाणी वाचवणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरते. (Image: Shalinee Kumari / Dialogue Earth)
उष्णतेच्या झळा अजूनही कायम...
शाहबाद डेअरीमध्ये संध्याकाळ सरत आलीये. सूर्य मावळतीकडे झुकला असला तरी घरांमध्ये साचलेली उष्णता अजूनही कमी झालेली नाही. ऋतिकाचं चार महिन्यांचं बाळ पुन्हा एकदा रडायला लागतं. ती त्याला कूलरसमोर घेऊन बसते. पण दमट हवेमुळे त्याला काहीसा दिलासाही मिळत नाही.
दर काही महिन्यांनी ऋतिकाची आई गावाहून मुलांसाठी सुती कपडे पाठवते. “मुलांना सिंथेटिक कपडे घातले की ते चिडचिड करतात. अंगावरून काढून टाकतात. त्यांना नीट झोपही लागत नाही,” ती सांगते.
दिल्लीच्या या अरुंद गल्ल्यांमध्ये वाढती उष्णता केवळ हवामान बदलाची कहाणी सांगत नाही. ती गरिबी, जातीय विषमता आणि जगण्यासाठीच्या रोजच्या संघर्षाची कहाणीही सांगते. ज्यांच्यावर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच आयुष्यात साध्या सुती कपड्यांचाही आराम अजूनही दुर्मिळ आहे.
उष्णतेच्या वाढत्या लाटांमध्ये हा प्रश्न केवळ कपड्यांचा राहिलेला नाही. तो आरोग्य, सन्मान आणि समानतेच्या हक्काशी जोडलेला प्रश्न बनलाय. आणि शाहबाद डेअरीतील पूनम, ऋतिका आणि पाले राम यांच्यासारख्या हजारो कुटुंबांसाठी हा संघर्ष अजूनही सुरूच आहे.
अनुवाद - संजना खंडारे
(सौजन्य - dialogue.earth संकेतस्थळावरून)






