शंतनू खुजे
- आदिवासी समाजात सोन्यापेक्षा चांदीला इतकं महत्व का?
- चांदीच्या दरवाढीचा थेट परिणाम आदिवासी समाजातील लग्नांवर आणि आदिवासींच्या चाली-रितींवर कसा होतोय ?
- चांदीच्या सततच्या दरवाढीमुळे गोटा चांदीचा वापर वाढतोय का ?
- चांदीच्या दरवाढीचा कारागिरांवर काय परिणाम होतोय…?
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा, सातपुड्याचे डोंगर आणि कोकणच्या किनारपट्टीचा भाग हा प्राचीन काळापासून विविध आदिवासी जमातींचे आश्रयस्थान राहिला आहे. वारली, भिल्ल, माडिया, गोंड, कोरकू, महादेव कोळी आणि अशा अनेक जमातींची स्वतःची एक स्वतंत्र ओळख, संस्कृती आणि परंपरा आहे. या आदिवायी समुदायांतील विवाह सोहळ्यांमध्ये अलंकारांना, विशेषतः चांदीच्या दागिन्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदिवासी समाजात चांदी ही केवळ सौंदर्याचे साधन नसून ती समृद्धी, संरक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जाते. इतर संस्कृतीत सोन्याला जे स्थान आहे, त्यापेक्षाही अधिकचे महत्व आदिवासी संस्कृतीत चांदीला प्राप्त झाले आहे.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून चांदीच्या दरात होत असलेल्या भरमसाठ दरवाढीमुळे, याचा थेट परिणाम आदिवासींच्या लग्नसमारंभांमधील चांदीच्या देवाणघेवाणीवर होतोय. परिणामी चांदीच्या दागिन्यांची मागणी घटली असून याचाच परिणाम आदिवासींच्या चाली-रितींवर आणि दागिने बनविणाऱ्या कारागिरांवर देखील होतोय.

“चांदीच्या ह्या दरवाढीमुळे आता आमची मेळघाटमधील लग्न परंपरा अडचणीत आली आहे. म्हणजे पंचायतीचा असा नियम आहे की मुलींना दहेज देताना किमान पाच चांदीचे दागिने तरी द्यावीत. तर मग आता चांदीचा भाव गगनाला भिडल्यामुळे हे दागिने देण्यात अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमच्या नात्यात एक लग्न झालं तेव्हा पाच दागिने तर दिले पण मग भाव वाढले होते, त्यामुळे त्याचं वजन कमी केलं. म्हणजे आधी एक दीड किलो चांदी द्यायचे तर आता पाच-सहाशे ग्रॅम मध्येच पाच दागिने बनवावे लागतात. त्यामुळे आता परिस्थिती जर जेमतेम असली तर मग लग्न कस करायचं म्हणजे आमच्या ह्या सर्व प्रथा कशा पार पाडायच्या हा मोठा प्रश्न आहे.” असं मेळघाट येथील कोरकू आदिवासी समाजाच्या सुशीला धांडे सांगतात.
आदिवासी अलंकार परंपरेचा आदिवासींचा इतिहास…
मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच शरीराला सजवण्याची ओढ मानवाला राहिली आहे. सुरुवातीच्या काळात ही सजावट निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून केली जात असे. प्राचीन काळी आदिवासी जमाती बिया, फुले, पक्ष्यांची पिसे, शंख, शिंपले, हाडे आणि लाकडाचा वापर करून दागिने बनवत असत. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात आढळलेले दागिने हे दर्शवतात की, भारतीय उपखंडात दागिन्यांचा वापर हजारो वर्षांपासून चालत आला आहे. काळाच्या ओघात, जेव्हा धातूकामाचे तंत्र विकसित झाले, तेव्हा तांबे, पितळ आणि शेवटी चांदीचा प्रवेश आदिवासी जीवनात झाला. चांदीचा वापर आदिवासी समाजात वाढण्यामागे काही महत्त्वाची सामाजिक आणि आर्थिक कारणे आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या, गोंड सारख्या जमातींचे स्वतःचे राज्य होते आणि त्यांच्याकडे सोन्याचे विपुल भांडार होते. परंतु, राजकीय सत्तांतर आणि आर्थिक परिस्थितीतील बदलांमुळे सोन्याची जागा हळूहळू चांदीने घेतली.
आदिवासी लग्नातील 'देज' पद्धत…
आदिवासी समाजात लग्नामध्ये 'देज' ही एक महत्त्वाची परंपरा आहे. हिंदू धर्मातील हुंडा पद्धतीच्या अगदी उलट… येथे वराच्या पित्याला वधूच्या पित्याला ठराविक रक्कम किंवा वस्तू द्याव्या लागतात. या देजमध्ये चांदीच्या दागिन्यांना विशेष स्थान असते. हे दागिने म्हणजे वधूची वैयक्तिक मालमत्ता असते, जी तिला संकटाच्या काळात आर्थिक सुरक्षा प्रदान करते. महादेव कोळी आणि भिल्ल जमातींमध्ये चांदीचे दागिने हे कुटुंबाची प्रतिष्ठा ठरवतात. लग्नामध्ये वधूला किती वजनाचे चांदीचे दागिने दिले गेले, यावरून त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जोखली जाते.
मुळात, देज पद्धत ही केवळ एक रीत नसून ती स्त्रीच्या सन्मानाचे प्रतीक ठरते. इतर समाजात जिथे हुंडा पद्धतीमुळे मुलीचा जन्म ओझे मानले जाते, तिथे आदिवासी समाजात मात्र देज पद्धतीमुळे स्त्रीला ‘मोलाचे’ स्थान मिळते. देज हे केवळ दागिन्यांचे प्रदर्शन नसून ते त्यांच्या हक्काचे स्त्रीधन आहे. ही प्रथा महिलांना एक प्रकारचा आत्मसन्मान मिळवून देते. शहरी संस्कृतीत मुलीच्या वडिलांना हुंडा देण्यासाठी कर्ज काढावे लागते, पण येथे परिस्थिती उलट आहे. वराच्या कुटुंबाने मुलीचे मूल्य ओळखून तिला सन्मानाने घरी नेण्याची ही पद्धत आहे.मिळालेले चांदीचे दागिने हे केवळ सौंदर्यप्रसाधन नसून, ते तिच्या कष्टाचे आणि भविष्यातील सुरक्षिततेचे साधन असतात.
चांदीच्या दरात अभूतपूर्व वाढ…
गेल्या एका वर्षात म्हणजेच फेब्रुवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चांदीच्या भावात अभूतपूर्व आणि ऐतिहासिक वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चांदीचे भाव सुमारे १ लाख रुपये प्रति किलो होते, जे औद्योगिक मागणी आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे सतत वाढत गेले. विशेषतः २०२५ च्या उत्तरार्धात आणि २०२६ च्या सुरुवातीला चांदीने ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला, नंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये दरात मोठी घसरण होऊन भाव पुन्हा २.८० लाख ते ३ लाखांच्या घरात आले आहेत. याचा थेट परिणाम आता चांदीच्या खरेदीवर आणि विशेषतः आदिवासी बांधवांकडून केल्या जाणाऱ्या खरेदीवर होतोय.

परंतु गेल्या काही महिन्यांपासून चांदीच्या दरात होत असलेल्या सततच्या दरवाढीमुळे आता आदिवासी समुदायाला चांदी खरेदी करतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. आदिवायी समुदायामध्ये आणि विशेषतः विवाह सोहळ्यांमध्ये अलंकारांना आणि त्यातही चांदीच्या दागिन्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण आता या भाववाढीमुळे परंपरागत पद्धतीने होत असलेल्या चांदीच्या वापरावर परिणाम होतांना दिसतोय.
दरवाढीमुळे आदिवासींना करावा लागतोय ‘गोटा चांदी’चा वापर…
मेळघाटच्या आदिवासी भागातील ‘बाईमाणूस’च्या पत्रकार सुशीला धांडे म्हणतात, “आमच्याकडे सध्या यावर्षी लग्न सुरु झाले नाही, पण होळीनंतर जेव्हा लग्न सुरु होतील तेव्हा चांदीच्या दरवाढीचा परिणाम नक्की दिसेल, म्हणजे आधी भाव कमी होते तेव्हा लग्नात किलोने चांदी दिली घेतली जायची पण आता तस काही होईल असं वाटत नाही.”
आदिवासी संस्कृतीवरही शहरी प्रभाव पडू लागला आहे. चांदीच्या वाढत्या किमतींमुळे अनेक आदिवासी तरुण-तरुणी आता चांदीऐवजी गिलट किंवा सोन्याचा मुलामा चढवलेल्या दागिन्यांकडे वळत आहेत. सततच्या दरवाढीमुळे अनेकांनी आता चांदीऐवजी गोटा चांदी वापरायला सुरुवात केली आहे असं सुशीला सांगतात. “सोन्याला जसा बेन्टेक्सच्या दागिन्यांचा पर्याय आहे तसंच आम्ही आता चांदीचं करतोय. म्हणजे चांदी सारखाच दिसणारी गोटा चांदी आम्ही वापरतोय, कारण इतके भाव वाढले त्यामुळे चांदीचे दागिने खरेदी करायला परवडत नाही. परंपरा तर जपायची आहे त्यामुळे मग काहीतरी करायचं म्हणून ही गोटा चांदी वापरावी लागते.”
सुशीला धांडे (बाईमाणूस रिपोर्टर, मेळघाट)
“एकतर ह्या दरवाढीमुळे असं झालंय की, आमच्या भागातील लोकांनी होलमार्क असलेले दागिने खरेदी करणे बंद केलंय. 100% शुद्ध चांदी त्यांना परवडत नाही त्यामुळे स्थानिक लोकांकडूनच चांदी खरेदी करतात. पण ते चांदी पूर्ण शुद्ध नसते. आता होळी नंतर जेव्हा लग्न वगैरे होतील तेव्हा सर्वजण असंच स्थानिकांकडून चांदी खरेदी करतील” असं सुशीला धांडे सांगतात.
असंच काहीसं मत ‘बाईमाणूस’च्या नंदुरबारच्या सुमित्रा वसावे यांचं आहे. त्या म्हणतात, आमच्या सातपुड्यात चांदीचे भाव आभाळाला टेकल्यामुळे आता दागिने खरेदी करणं कठीण झालंय. याचा परिणाम असा होतोय की यामुळे पावरा समाजाचा पारंपरिक पोशाखही लोप पावतोय. म्हणजे आजकाल कुणी चांदीचे दागिनेही घालत नाही आणि मग तो पोशाखही परिधान करणं पसंत करत नाही. सध्या थोडी सधन परिस्थिती असणारे कुटुंबच फक्त चांदी खरेदी करत आहे पण त्याचंही प्रमाण कमीच आहे.
कारागिरांवर देखील होतोय दरवाढीचा परिणाम
चांदीच्या या दरवाढीचा कारागिरांवर काय परिणाम होतोय हे जाणून घेण्यासाठी ‘बाईमाणूस’ने गडचिरोली येथील कारागिर सुरेश मोंगाटे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणतात, “गेल्या काही महिन्यांमध्ये चांदीचे भाव वाढल्यामुळे लोकं आता आमच्याकडे फिरकत सुद्धा नाही. म्हणजे सध्या पर्यंत अजून कोणीही लग्नासाठी दागिने बनवून घ्यायला आलेलं नाही. तसं तर आमच्या भागामध्ये धान विक्री व्हायची आहे त्यामुळे सुद्धा लोकांनी चांदी खरेदी करायला सुरुवात केली नसेल. पण तरीही या भाव वाढीमुळे चांदी खरेदी करताना लोक संकोच नक्कीच करतील.”
“आधी लग्नसराई मध्ये सरासरी 800 ग्रॅम चांदीची दागिने आम्ही एका लग्नासाठी बनवून द्यायचो, पण आताची परिस्थिती बघून असं वाटतंय की जास्तीत जास्त 200 ग्रॅम चे दागिने लोक आमच्याकडून बनवून घेतील कारण ही दरवाढच इतकी झाली आहे की त्यामुळे सर्व बजेट कोलमडलय.” असेही मोंगाटे सांगतात.
आदिवासींच्या प्रमुख जमाती आणि चांदीची उपयोगिता
वारली - वारली समाज आपल्या साध्या राहणीमानासाठी आणि अप्रतिम चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. वारली लग्नामध्ये चांदीच्या दागिन्यांचा वापर अत्यंत संवेदनशीलतेने केला जातो. वारली लग्नात गरसोळी दागिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा चांदीच्या किंवा काळ्या मण्यांचा हार वधूला वराकडून घातला जातो आणि तो तिच्या सौभाग्यवती असण्याचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. वारली स्त्रिया हातामध्ये चांदीचे जाड तोडे आणि पायात साखळ्या घालतात. त्यांच्या दागिन्यांवरील नक्षीकाम हे बहुधा त्यांच्या भिंतीचित्रांप्रमाणेच त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस या भूमितीय आकारांत असते, जे सूर्य, चंद्र आणि निसर्गाचे प्रतिनिधित्व करते.
भिल्ल - भिल्ल ही भारतातील आणि महाराष्ट्रातील एक मोठी जमात आहे. भिल्लांच्या लग्नाचे विधी हे अत्यंत रंगतदार असतात. लग्नापूर्वी होणाऱ्या 'भगोरिया' यात्रेत तरुण-तरुणी आपले जोडीदार निवडतात. एकदा जोडीदार निश्चित झाला की, वधू आपल्या मैत्रिणींसह चांदीच्या कारागिराकडे जाऊन स्वतःचे दागिने निवडून घेते. भिल्ल स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये तागली नावाचा गळ्यातील दागिना अत्यंत महत्त्वाचा असतो. हा दागिना वजनाला जड असून तो वधूच्या गळ्याला संरक्षण देतो, अशी त्यांची धारणा आहे. याशिवाय बस्ता कडा म्हणजेच दंडात घालायचे कडे आणि पेजनिया म्हणजेच पायातील जड वाळे हे भिल्ल वधूच्या अलंकारांचे अविभाज्य भाग आहेत. भिल्ल पुरुषांमध्येही चांदीची कडी आणि अंगठ्या घालण्याची मोठी आवड दिसून येते.
सुमित्रा वसावे (बाईमाणूस रिपोर्टर, नंदुरबार)
महादेव कोळी - महादेव कोळी समाज हा प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर राहणारा आणि समुद्रावर उपजीविका करणारा समाज आहे. त्यांच्या दागिन्यांवर त्यांच्या व्यवसायाचा आणि समुद्राचा मोठा प्रभाव जाणवतो. कोळी वधू लग्नात जेव्हा चांदीचे दागिने परिधान करते, तेव्हा त्या दागिन्यांवर माशांचे किंवा लाटांचे नक्षीकाम असते. कोळी महिलांचा करगोटा हा चांदीचा कंबरपट्टा लग्नात महत्त्वाचा मानला जातो. तसेच, त्यांच्या केसांच्या अंबाड्यावर लावण्याचे केतक हे चांदीचे फूल वधूला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करते. कोळी पुरुषांमध्ये लग्नाच्या वेळी चांदीचे कडे घालणे हे त्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते, जे त्यांना समुद्रात होडी वल्हवण्यासाठी शक्ती देते, अशी त्यांची श्रद्धा आहे.
गोंड - गोंड जमातीचा इतिहास राजेशाही राहिलेला असल्याने त्यांच्या दागिन्यांमध्ये एक प्रकारचा भव्यपणा असतो. गोंड वधू लग्नाच्या वेळी अंगावर २ किलोपर्यंत वजनाचे चांदीचे दागिने परिधान करू शकते. साक्री नावाचा गळ्यातील जड हार आणि कंबर पट्टा हे त्यांचे पारंपारिक वैभव दर्शवतात. गोंड संस्कृतीत दागिने हे पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केले जातात, ज्यामुळे त्या दागिन्यांसोबत पूर्वजांच्या आठवणी आणि आशीर्वादही वधूला मिळतात.
चांदीच्या दागिन्यांवरील नक्षीकाम
आदिवासी चांदीच्या दागिन्यांची रचना ही केवळ कलेसाठी नसते, तर त्यामागे एक खोलवरचा अर्थ दडलेला असतो. या दागिन्यांवर कोरलेली चित्रे ही निसर्गातील विविध घटकांशी निगडित असतात.
- वाघाचा चेहरा - भिल्ल आणि गोंड समाजात वाघाच्या चेहऱ्याचे कडे घालण्याची परंपरा आहे. हे कडे परिधान केल्याने माणसाला वाघासारखे शौर्य प्राप्त होते आणि हिंस्र पशूंपासून त्याचे रक्षण होते, अशी त्यांची धारणा आहे.
- मासा - कोळी आणि इतर जलसंबंधित जमातींमध्ये मासा हा प्रजननक्षमतेचे प्रतीक मानला जातो. लग्नाच्या दागिन्यांवर माशाचे चित्र असणे म्हणजे वधूचे कुटुंब उत्तरोत्तर वाढावे, असा आशिर्वाद असतो.

- पानाचा आकार - अनेक गळ्यातील हारांमध्ये पानाचे किंवा पिंपळाच्या पानाचे नक्षीकाम असते. हे निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचे आणि आयुष्यात येणाऱ्या हिरवळीचे प्रतीक आहे.
- सूर्य आणि चंद्र - हे विश्वाचे साक्षीदार मानले जातात. लग्नासारख्या पवित्र विधीमध्ये सूर्य-चंद्राच्या प्रतिमा असलेले दागिने घालणे म्हणजे विश्वाच्या नियमांशी बांधील राहणे होय.
लग्नातील विविध विधी आणि चांदीचा वापर
- साखरपुडा - लग्नाच्या पहिल्या टप्प्यात वराला आणि वधूला चांदीची अंगठी भेट दिली जाते. हे विधीपूर्वक नाते जोडण्याचे पहिले पाऊल असते. काही जमातींमध्ये वधूच्या घरी जाऊन तिला चांदीचे नाणे देण्याची प्रथा आहे, ज्याला पोरगी पाहणे किंवा नारळ देणे असेही म्हणतात.
- हळद समारंभ - हळदीच्या वेळी वधूला चांदीचे जोडवे आणि पायात चांदीच्या साखळ्या घातल्या जातात. असे मानले जाते की हळद आणि चांदी वधूची त्वचा उजळवतो आणि तिला संसर्गापासून दूर ठेवतो.
- मुख्य लग्न विधी - लग्नाच्या वेळी वधू-वरांचे हात एकमेकांच्या हातात दिले जातात. यावेळी त्यांच्या हातातील चांदीचे कडे एकमेकांना स्पर्श करतात, जे दोन आत्म्यांच्या ऊर्जेच्या मीलनाचे प्रतीक मानले जाते. मंगळसूत्र बांधण्याचा विधी हा लग्नाचा कळस असतो, जिथे चांदीचा पदक किंवा मणी महत्त्वाचा असतो.
- गृहप्रवेश - वधू जेव्हा पहिल्यांदा सासरी येते, तेव्हा तिला सासूकडून चांदीचा एखादा दागिना भेट दिला जातो. हे तिच्या नवीन कुटुंबातील स्वागताचे आणि तिच्या अधिकाराचे प्रतीक असते.
आदिवासी संस्कृतीत चांदीचे महत्त्व केवळ अलंकारापुरते मर्यादित नाही, ते त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. लग्नसमारंभ, आणि इतर धार्मिक विधींमध्ये चांदीचे दागिने हे समृद्धीचे प्रतीक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात चांदीच्या दरात झालेली अभूतपूर्व वाढ या परंपरेवर सावट टाकत आहे.
चांदीचे दर सध्या प्रति किलो अडीच लाखांच्या वर पोहोचल्याने आदिवासी समाजातील सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, देज सारख्या महत्त्वाच्या प्रथा पाळताना कुटुंबांना तडजोड करावी लागत आहे. शुद्ध चांदीच्या जागी गोटा चांदीचा वापर वाढला आहे आणि दागिन्यांचे वजन कमी करण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. याचा थेट फटका स्थानिक कारागिरांनाही बसला असून, त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.
सध्याची दरवाढ जरी जागतिक आर्थिक घडामोडींचा परिणाम असली, तरी त्याचा स्थानिक पातळीवर होणारा हा सांस्कृतिक बदल लक्षणीय आहे. परंपरा आणि आर्थिक वास्तविकता यांच्यातील ही रस्सीखेच आदिवासी समाजाला नव्या पर्यायांचा शोध घेण्यास भाग पाडत आहे. भविष्यात चांदीचे दर स्थिर झाले तरच हा पारंपरिक वारसा आपल्या मूळ स्वरूपात टिकून राहू शकेल, अन्यथा काळाच्या ओघात यात आणखी मोठे बदल अपरिहार्य आहेत. आदिवासी समाजाची लवचिकता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता हीच या बदलाच्या काळात त्यांच्या संस्कृतीला तग धरून ठेवण्यास मदत करेल.






