टीम बाईमाणूस
- चंद्रपूर जिल्ह्यातील घोडनकप्पी गावात खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने प्रसूतीनंतर 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
- या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या गप्पा आपण मारतो, राज्यकर्ते 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या आणि गडचिरोली, चंद्रपूरसारख्या आदिवासी भागांचा चेहरामोहरा बदलत असल्याचे सांगतात. मात्र, आजही चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात खराब रस्त्यामुळे नागरिकांना वेळेत सुविधा न मिळाल्याने जीव गमावण्यापर्यंतची मन हेलावणारी घटना घडत आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्यामुळे प्रसूतीनंतर एका 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आहे. संगीता गेडाम असं या महिलेचे नाव आहे, या घटनेमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य सुविधेच प्रश्न उपस्थित झाला आहे.
निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून विकासाचे मोठ- मोठे दावे केले जातात, परंतू आदिवासी आणि दुर्गम भागात जमीनी स्तरावर या उलट चित्र आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव दिसून आला. खराब रस्त्यामुळे घोडनकप्पी गावात वेळेत वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे एका महिलेची प्रसूती झाली. तिने बाळाला जन्म दिला, मात्र महिलेला आपला जीव गमवावा लागला. संगीता गेडाम असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गावकर्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

बाळ जन्मलं अन् महिलेचा गेला जीव…
जिवती तालुक्यातील घोडनकप्पी हे गाव तेलंगाणा सीमेवर असून अतिशय दुर्गम असलेल्या या गावात पक्का रस्ता नाही. रविवारी पहाटे संगीता यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने रुग्णवाहिका मुख्य रस्त्यापर्यंतच येऊ शकली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिला डोंगर उतरवून रस्त्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला; मात्र, वेदना असह्य झाल्याने त्यांना पुन्हा घरी आणावे लागले.
घरातच झालेल्या प्रसूतीत संगीताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र संगीता यांना प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव सुरू झाला. माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने गावात पोहोचून उपचार सुरू केले. प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना खाजगी मालवाहू वाहनातून शंकरपठार येथे उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, संबंधित घटनेबाबत जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करण्यात येत होती. सोबतच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घोडनकप्पी गावात रस्ता नसल्यामुळे संबंधित महिलेला आधीच माहेरी जाण्याची किंवा पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या महिलेची पूर्ण व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, महिलेनेच माहेरी जाण्यास किंवा आरोग्य केंद्रात राहण्यास नकार दिला होता. आठव्या महिन्यातच त्या महिलेची प्रसूती झाली असून ही दुर्दैवी घटना घडली आहे. सोबतच जिल्हा आरोग्य प्रशासनाने अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचं पालन करण्याचे देखील आवाहन नागरिकांना केलं आहे.






