- कृष्ण मुरारी
हरियाणातील एका खाप पंचायतीने शेकडो वर्षांची जुनी परंपरा मोडीत काढली आहे. आता गावातील तरुण मुलं-मुली शेजारच्या गावातही लग्न करू शकतील. दशकभरा पूर्वीच हा एक गुन्हा समजला जायचा आणि त्यासाठी ऑनर किलिंग व्हायच्या. हरियाणात ही घटना एका सामाजिक क्रांतीपेक्षा कमी नाही. आता झज्जर आणि बेरी गावातील ही लोकं खाप पंचायतीच्या या निर्णयानंतर पहिल्या लग्नाची वाट बघत आहेत जे हा निर्णय प्रत्यक्षात उतरवतील.
राजेंद्र सिंह सोलंकी यांच्या नेतृत्त्वात हा निर्णय घेण्यात आला. “सरपंचांची सहमती केवळ एक सही नव्हती. एका नव्या पर्वाची सुरूवात होती. जो आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी लिहीत आहोत,” ते सांगतात.
विज्ञान व रितीच्या नावाखाली चालत आलेली ही परंपरा बदलणं सोपं नव्हतं. गोधडी गावातील एका मुलीची कथा इथं गावच्या इज्जतीची बाब बनली होती. गोधडीचे सरपंच मनबीर बेनीवाल सांगतात, “शंभर वर्षांपूर्वी आमच्या पाच गावांमधून जेव्हा एक मुलगी झज्जरला जात होती तेव्हा कोणीतरी तिची छेड काढली. तेव्हा ग्वालिसन गावातील लोकांनी तिची रक्षा केली.” गोधडी गावाने या उपकाराची आठवण म्हणून नियम केला की ग्वालिसन व गोधडी गावातील लोक भाऊ-बहिण म्हणून राहतील. त्यांच्यात लग्न होणार नाहीत. मनबीर सांगतात, “ग्वालिसन गावातील लोकांनी आमच्या मुलीची इज्जत वाचवली होती त्यासाठी आम्ही आजही त्यांचे आभारी आहोत. पण आता वेळ आली आहे की आम्ही यापुढे जायला हवं.”
मालिकपूर, पहाडीपूर, गोधडी, साफीपूर, आछेज व ग्वालिसन गावातील दीडशेहून जास्त लोक पहाडीपूर गावातील आयटीआय मैदानात जमले होते. गावांमध्ये लग्नाची अनुमती देण्यावरून त्यांच्यात चारेक तास गहन चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी सामाजिक सौहार्दाला नातेसंबंधात बदलण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांच्यात गोत्र वेगळे असतात, सोलंकी सांगतात.
उपजातीमधील विवाह हरियाणात समाजमान्य आहेत. पण हा निर्णय रक्तरंजित रस्त्यावरून चालत आला आहे. स्थानिक खाप पंचायती समांतर न्यायालयाचं काम करतात व त्या तरुणांच्या नशिबाचा निर्णय करतात ज्यांनी सामाजिक नियम तोडण्याची हिम्मत केली आहे. 2000 सालच्या दशकात अशा हत्यांनी उत्तर भारतातील सामाजिक विवेकाला हलवून सोडलं आणि ही चर्चा परंपरा विरूद्ध प्रेम अशा रुपात समोर आली.
गावाची इज्जत म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. ज्यामुळे मुलांना शेजारच्या गावात किंवा आपल्याच जातीत प्रेम अथवा लग्न करण्यास बंदी होती. 2007 मध्ये मनोज व बबली यांच्या हत्या प्रकरणानंतर तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी ऑनर किलिंगला वेगळा गुन्हा म्हणून घोषित केला. “आधुनिक काळात खाप पंचायतीवर बदलण्याचा दबाव वाढत आहे. खापमध्ये नव्या पिढीतील लोक आल्याने त्यांनी जुन्या सामाजिक नियमांना सोडून पुढे जाणारे निर्णय घेतल्याची उदाहरणं दिसत आहेत. खाप पंचायती प्रासंगिकता व आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःला बदलत आहेत,” कुरुक्षेत्र विश्वविद्यालयाचे समाजशास्त्राचे प्राध्यापक विजेंद्र सिंह सांगतात.
खाप पंचायतीने नवा इतिहास रचला
मनबीर आता धनखड खापचे प्रधान व ग्वालिसन गावाचे रहिवाशी युधवीर सिंह यांना भेटायला जाणार आहेत ज्यामुळे नव्या काळातील पहिलं लग्न लवकर व्हावं. “पहिलं उदाहरण लवकरच देण्याची गरज आहे. फक्त पंचायत बोलवून आणि निर्णय घेऊन काही होणार नाही. लग्न होईल तरच या निर्णयाचा प्रभाव दिसेल,” मनबीर सांगतात.
“आमच्यात सौहार्द होतं पण फक्त नावापुरतं. कोणी कोणाच्या सुख-दुःखात सहभागी होत नसे. त्यामुळे हे जुनं नातं तोडून नवा अध्याय लिहीणंच योग्य आहे. मुलं आजकाल एकत्र शिकतात-काम करतात. त्यांच्यात प्रेम होऊन त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर बदनामी होईल. त्यामुळे ग्वालिसन गावासोबत संभाव्य नात्यासाठी जागा तयार केली आहे.” 
गावात बहुतेक जाट वस्ती आहे. पण त्यांचे गोत्र वेगळे आहेत. विजेंद्र सिंह सांगतात, “हरियाणात गाव आणि गोत्रामध्ये विवाह केला जात नाही. जाती अंतर्गत विवाह केला जातो. हिंदू विवाह कायद्यात या गोष्टीकडे दूर्लक्ष झालं. तरुण मुलं जे प्रेमविवाह करतात ते कायद्याचं पालन करत होते पण समाजाने हा इज्जतीचा प्रश्न बनवला ज्यामुळे वादाची ठिणगी पडली.”
‘खानदान की इज्जत’ आणि ऑनर किलिंगचे लोण
यामुळे अनेक तरुण मुलांची-मुलींची हत्या करण्यात आली. कुटुंब बर्बाद झाली. पण मागील काही वर्षांत खाप पंचायतींमध्ये बदलाची लहर उठली आहे. 2019-23 मध्ये हरियाणात ऑनर किलिंगची 24 प्रकरणं होती तर 2014-21 मध्ये देशभरात अशी 559 प्रकरणं होती. गोत्रांमध्ये आता विवाह होण्याची संख्या वाढीस लागली आहे. याची काही कारणं आहेत.
शहरीकरणामुळे ग्रामीण मूल्ये व परंपरा बदलत आहेत. जनसांख्यिकी बदलत आहे. हरियाणातील लोक बाहेर कामाला जात आहे, व बाहेरचे लोक इथे येत आहेत. त्यामुळे नव्या जीवनशैली लोकांसमोर येत आहेत. सिंह सांगतात की हरियाणात बहु-गोत्रीय गावं आहेत. सौहार्दाच्या नावावर गोत्रांमध्ये लग्न करणं टाळलं तर मुलांची लग्न होणंच कठीण होईल.
झज्जर खापमध्ये हा बदल करण्यास एक माणूस कारणीभूत ठरला, ग्वालिसन गावचे खाप नेता युधवीर सिंह धनखड. जुनी परंपरा मोडण्याचा निर्णय घेण्यासाठी, मागच्या पिढीला त्यासाठी तयार करण्यासाठी त्यांना एक वर्ष लागलं. ग्वालिसनच्या काही लोकांनीच त्यांना याविषयी निर्णय घेण्यास सांगितलं होतं. त्याआधी असा प्रयत्न झाला नव्हता पण यावेळी लोकच अडून बसले. ही कठीण गोष्ट होती कारण ही परंपरा जुनी होती. पण मला वाटलं की यावर विचार करण्याची वेळ आली आहे, ते सांगतात. त्यांनी लवकरच पाच गावांच्या सरपंचांची बैठक बोलावली.
त्यांनी लगेच यावर सहमती दिली. सिंह म्हणतात की, मला असं वाटलं नव्हतं की मला कठीण वाटलेलं काम इतक्या सोप्या पद्धतीने होईल म्हणून. पण 12 हजार लोकवस्तीच्या या गावांमध्ये लग्न ही एक समस्या बनली होती. आई-वडिलांना आपल्या मुलींची लग्नं दुरच्या गावांमध्ये करावी लागत होती. आमच्या जवळच जाट वस्तीची गावं होती पण आमच्याकडे पर्याय नव्हता. पण आधुनिक काळात, जेव्हा गावातील गोत्रं वेगळी आहेत तेव्हा लग्नावर बंदी घालण्याचं काही उचित कारण नव्हतं. आम्ही लोकांशी चर्चा केली आणि हा मुद्दा सोडवला, धनखड सांगतात.
एकाच गोत्रात लग्न करण्यासाठी भरली महा खापपंचायत
पन्नाशीचे धनखड हायस्कूल पर्यंतच शिकले आहेत. पण सामाजिक मुद्द्यांवर त्यांची समज व विचार यामुळे ते इथल्या भागात लोकप्रिय आहेत. एक प्रगतीशील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते आव्हानांना घाबरत नाही. जेव्हा हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्यावर यौन शोषणाचे आरोप झाले तेव्हा धनखड यांनी त्यांना पदावरून घालवण्याची मागणी केली होती. आछेज गावचे सरपंच सोलंकी सांगतात की, ग्वालिसन गावासोबत लग्नाचं नात जोडण्याआधी पूर्ण गावाला तयार करावं लागणार होतं. ही दीर्घ प्रक्रिया होती. पण सर्वांनी आपापल्या गावातील लोकांना समजवण्याचं काम केलं. त्यात वर्ष गेलं. त्यानंतर महापंचायत भरवण्यात आली ज्यात या निर्णयाला औपचारिक मंजूरी देण्यात आली.
सोलंकी सांगतात की महापंचायत नेहमीच भरत नाही. मागे 2007 मध्ये ती भरली होती जेव्हा गावात डीजेवर प्रतिबंध घालण्याचा मुद्दा होता. सोलंकी यावेळेच्या महापंचायतीचे अध्यक्ष होते आणि हा त्यांच्या आजवरच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण होता. कोणीही या निर्णयाला विरोध केला नाही आणि त्याला मान्यता मिळाली. भविष्यात कोणत्याही नात्यात कोणताही अडथळा येणार नाही, असं प्रस्तावात लिहिलं गेलं.
या सर्व गावांना याची प्रेरणा झज्जर भागातील दिग्गल व इस्माइला गावांमुळे मिळाली. या दोन्ही गावांत 200 वर्षांपासून कोणतेही लग्नसंबंध नव्हते. 2023 मध्ये त्यांनी हे अंतर दूर केलं. दिग्गलचे रहिवाशी व अहलावत खापचे प्रमुख जय सिंह अहलावत म्हणतात, “पूर्वजांचं काम असतं येणाऱ्या पिढींसाठी एक चांगला रस्ता तयार करण्याचं. आमच्या निर्णयानंतर दोन्ही गावांत अनेक लग्न झाली आहेत.” या निर्णयामुळे बाकी गावांना प्रेरणा लाभली.
धनखड सांगतात की आम्हालाही वाटलं की आम्ही देखील हे करू शकतो. ही काळाची गरज आहे. या गावांचा हा निर्णय इथल्या स्त्रियांना प्रभावित करणार आहे पण त्यात त्यांचा सहभाग नव्हता. त्यांच्या घरातील पुरुषांनी त्यांना याची माहिती दिली. “पंचायतीच्या निर्णयात स्त्रियांची भूमिका नव्हती पण आम्ही यामुळे आनंदी आहोत. हे आधीच व्हायला हवं होतं. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांची मुलींचं लग्न जवळच्या गावातच व्हावं,” मलिकपूर गावच्या सरपंच बलकेश सांगतात. पंचायतीत त्यांच्या जागी त्यांचा नवरा व सासरा उपस्थित होते.
200 वर्षांपासून दोन गावांत लग्नसंबंध नव्हते
सामाजिक सुधारणेचं हे एक लहानसं पाऊल त्या लोकांसाठी मोठी झेप आहे ज्यांच्या जगण्यावर याचा प्रभाव पडणार आहे. मागच्या पिढ्यांना ही संधी लाभली नव्हती. “असे सामाजिक निर्णय घेतले गेले नाहीत तर येणाऱ्या पिढ्या आमचा सन्मान करणार नाहीत. जग वेगानं बदलत आहे. आम्हालाही आमच्या प्रथा मोडून आमच्या मुलांचं जगणं आनंदी करण्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज आहे,” मनबीर सांगतात.
झज्जर मध्ये अनेक तरुणांची सन्मानासाठी हत्या करण्यात आली आहे. 2024 मध्येच जींद, सिरसा व हिसार मध्ये अशा हत्या घडल्या आहेत. सिरसा मध्ये 27 वर्षीय सर्वजीत कौरची तिच्या वडिलांनी हत्या केली. ती शेजारच्या गावातील तरुणाच्या प्रेमात होती. दोघेही एकाच जातीचे असले तरीही कौर कुटुंबियांना हे नातं मान्य नव्हतं. त्यांनी सर्वजीत ह्रद्य रोगानं मेल्याचं सांगितलं पण पोलिस तपासात सत्य बाहेर आलं. हिसार मध्ये तेजबीर व मीनाची हत्या करण्यात आली. त्यांनी लग्न केलं होतं. दोघेही जाट समाजातील होते. पण मीनाच्या घरचे या लग्नानं आनंदी नव्हते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार मीनाचा भावानं तिला तेजबीरला एका ठिकाणी बोलावलं गोळ्या घालून हत्या केली. पण या हत्यांची अजूनही तरफदारी केली जाते. याच कुटुंबातील एकाने सांगितलं, “एकाच गावात व शेजारच्या गावात राहणारे मुलं-मुली भाऊ-बहिणी असतात. त्यांच्यात लग्न होऊ शकत नाही. प्रथेच्या विरोधात आहे ही गोष्ट. ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विरोध होईलच.” कैथल, सोनीपत, जींद, झज्जर मध्ये अशा अनेक हत्या झालेल्या आहेत. जेव्हा कोणी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करतात तर त्यांच्या घरचे लोकच त्यांना ठार करतात. विजेंद्र सिंह म्हणतात, “लोक अशा गोष्टीला सामाजिक अपमानाशी जोडतात. त्यातून ते आपल्याच मुलांवर अन्याय करतात.”
समाजात बदल सहजपणे स्विकारले जात नाहीत. प्रथांचा पगडा बदलांवर भारी पडतो. गाववाले सांगतात की जेव्हा पूर्वी लोक आपल्या गावातून झज्जरला जायचे तेव्हा प्रवासाने थकायचे. त्यावेळी ग्वालिसन गावातील लोक त्यांना चहा, पाणी, हुक्का देऊन त्यांचं स्वागत करायचे. यातून त्यांच्यात बंधुभाव विकसीत झाला. हे प्रेम व काळजी लोकांच्या मनात रुतली गेली. पण आता काळ बदलला आहे. झज्जरची यात्रा आता सोपी झाली आहे. लोक आपल्या गाडीने जाणं-येणं करतात. थकवा जाणवत नाही. ग्वालिसन आता काही विश्रांती स्थळ राहिलेलं नाही.
त्यामुळे जुन्या काळची आठवण म्हणून आता लग्नबंदी करण्यात काही अर्थ नव्हता. बदल पुढच्या वळणावरच होता. पण अजूनही संपूर्ण हरियाणातील बदलाची ही नांदी नाही. सन्मान-हत्येची चौकशी करणारे पोलिस अधिकारी सांगतात की लोकांच्या विचारात फार बदल झालेला नाही. एक पोलिस अधिकारी म्हणतो, “झज्जरची गोष्ट अपवाद आहे. ही क्रांति असली तरीही मर्यादित आहे. वेगवेगळ्या ठिकाणी विखूरलेली आहे. याचा व्यापक प्रभाव पडण्याची गरज आहे. पण तसं होतांना अजून तरी दिसून येत नाही.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






