- ज्योती यादव
मुकेश कुमारने कित्येक दिवस त्या बाईची वाट पाहिली जिला तो गर्भवती करणार होता व ज्यासाठी त्याला 15 लाख रुपये मिळणार होते. पण बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील हा 27 वर्षीय मजूर ‘ऑल इंडिया प्रेगनेंट जॉब सर्विस’ या सायबर फसवणूकीचा बळी ठरला होता. हे सर्व धोकेबाज बिहारच्या नवादा जिल्ह्यातील आहेत.
“माझ्या बायकोची प्रसूती तीन महिन्यांवरच होती आणि मला वाटलं की मी त्यासाठी या पैशांचा उपयोग करू शकतो,” मुकेश सांगतो. पण बदल्यात तो आपले सारे पैसे गमावून बसला.
बाईला गर्भवती करा आणि 15 लाख रुपये मिळवा…
मुकेश त्या अनेक तरुणांपैकी एक आहे ज्यांनी फेसबुकवरील एका जाहिरातीवर क्लिक केलं. त्यात एका बाईचा चेहरा होता व लिहीलं होतं की मला कॉल करा... एका बाईला गर्भवती करण्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये मिळतील. तुम्ही अपयशी ठरला तरी तुम्हाला काही लाख रुपये मिळतील. या फसवेगिरी करणाऱ्या टोळीत टेक्नोसॅव्ही मुलं आहेत जे आपल्या झोपड्यांमधून, शेतातून, बागेतून फोनकॉल्स करतात. चकवाई, सिमरी, समै गावात हे तरुण आढळतात. 
पोलिसांना अजूनही त्यांचा माग लागलेला नाही. नवादा सायबर क्राईम पोलिस स्टेशन प्रमुख डीएसपी प्रिया ज्योती यांनी यात तीन आरोपींना अटक केली आहे. हा घोटाळा सगळीकडे गाजला पण ही फक्त सुरूवात होती. त्या सांगतात, “तुम्ही अशा प्रकरणांत शंभर लोकांना अटक केली तरीही 101 वा माणूस हाच प्रकार करून तुमची फसवणूक करेल व पैसे उकळेल.”
जामताडालाही लाजवेल असा बिहारचा नवादा जिल्हा
नवादा जिल्हा फसवणूकीचा बालेकिल्ला समजला जातो. 2000 च्या सुरूवातीस पेपरमध्ये कँसरच्या औषधाच्या नावावर कणिक भरलेल्या कॅप्सूल्स विकल्या जायच्या. जेव्हा बिहारमध्ये टीव्ही पसरला तेव्हा या लोकांनी ‘पहचान कौन?’ सारखी योजना आणली. यात अमिताभ बच्चन किंवा आमिर खान यांचे धुसर छायाचित्र दाखवले जायचे. त्यांची ओळख केल्यावर लाखो रुपयांचे बक्षिस मिळेल असा वादा केला जायचा.
लोक त्याला प्रतिसाद द्यायचे पण त्यातून या ठगांकडे त्यांचे बँक डिटेल्स, फोन नंबर्स, कार्ड नंबर जमा व्हायचे. टेलिग्राम, फेसबुक व व्हॉट्सएप मुळे ही फसवेगिरी वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. नवादाचे ठग आता फसवणूकीत झारखंडचे जामताडा, हरियाणाचे मेवात व राजस्थानचे भरतपूर यांना टक्कर देत आहेत.
“आधी भारतात जामताडा हेच एक सायबर क्राईमचं ठिकाण होतं पण आता नवादासारख्या अनेक भागात स्थानिक सायबर गुंडे जन्माला आले आहेत. प्रत्येक स्कॅम या नवादाच्या ठगांनी आजमावलेला आहे. त्यात प्रगतीही होत आहे. इथले काही लोक जामताडाला जाऊन या गोष्टी शिकून आले आहेत,” बिहार सायबर क्राईमचे काम केलेले आयपीएस अधिकारी सुशील कुमार सांगतात.
नवादामध्ये 2019-20 मध्ये 18 एफआयआर दाखल झाले होते या फसवणूकीसाठी. 2024-25 मध्ये त्यांची संख्या 81 वर पोहोचली आहे. पण पोलिस सांगतात की प्रत्यक्ष आकडे याहून जास्त आहेत. डीएसपी प्रिया ज्योति सांगतात की या भागात गुन्हेगारी करणं स्टेटस सिंबॉल बनलं आहे.
5 जानेवारीला यादव यांच्या टीमचे सहा अधिकारी पीएसआय निलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वात नवादा मधल्या कहुआरा गावात पोहोचले. तिथं काही लोक फसवणूक करत असल्याचं समजलं होतं. 8 हजार वस्तीच्या या गावात पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा 4 तरुण शेतांकडे धावले. पोलिसांनी त्यातल्या तिघांना अटक केली. त्यात एक 17 वर्षांचाच होता. पोलिसांनी त्यांच्याकडून काही स्वस्त चिनी स्मार्टफोन व बायकांची छायाचित्रं जप्त केली. 
छापा मारण्याआधी सिंह यांनी प्रतिबिंब या ऐपवर लॉग-इन केलं होतं. गृहखात्यानं सुरू केलेल्या या ऐपमध्ये जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिम वापरण्यात येते. यातून पोलिसांना देशातील सायबर क्राईमचे नेटवर्क व ठगांचे लाईव्ह लोकेशन समजू शकते. यातून सिंह यांना या लोकांची माहिती समजली होती.
मजूर, शेतकरी, स्थलांतरीत मजूर अशा फसवणूकीचे बळी
“हा एक अविश्वसनिय घोटाळा आहे. एका बाईला गरोदर करण्यासाठी तुम्हाला एक कोटी रुपये मिळत असतील तर कोणता मुलगा ही ऑफर नाकारेल?”, सिंह विचारतात. या फसवणूकीला मजूर, शेतकरी, स्थलांतरीत मजूर जास्त बळी पडतात. त्यांचे काही हजार रुपयेच लुटले जातात पण ही त्यांची आयुष्यभराची कमाई असते. शेकडो लोकांकडून ठगांना मात्र लाखो रुपये मिळतात. अनेक लोक लाज आणि बायकोची भिती यामुळे पोलिसांकडे तक्रार करत नाहीत.
ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब सर्विस फसवणूकीची सुरूवात नवादामधील गुरमह गावातील एका झोपडीतून झाली होती. मुन्ना कुमार याने हा फसवणूकीचा धंदा सुरू केला असं पोलिस सांगतात. राजस्थानात जाऊन काम केल्यावर मुन्ना गुरमह गावात परतला आणि त्यानं मत्स्य पालनाचा धंदा सुरू केला. यात त्याने 25 मुलांना भरती केलं. पण पाण्यातील मासे पकडण्याऐवजी त्यांना जमिनीवर मासे पकडण्याचं काम त्यानं दिलं. गावाचे सरपंच नरेश साव सांगतात की आम्हाला कधी वाटलंच नाही की ते लोकांना फसवत असतील म्हणून. मुन्ना आणि त्यांची मुलं कित्येक महिने हे काम करत राहिले. जानेवारी 2024 मध्ये पोलिसांना त्यांचा तपास लागला. 8 जणांना अटक झाली ज्यांना नंतर जामिन मिळाला पण 18 मुलं अजून फरार आहेत.
आम्ही पहिल्यांदा या घोटाळ्याविषयी ऐकलं तेव्हा हसून हसून आम्हीच बेजार झालो, सिंह सांगतात. पण लवकरच याची व्याप्ती इतकी वाढली की पोलिसांवर रडायची पाळी आली. नवादा सायबर पोलिस स्टेशन अगदी लहान आहे. कर्मचारी फार नाहीत. कॉम्प्युटर्स नाहीत. बिहार मध्ये 2023 मध्ये 44 सायबर पोलिस स्टेशन्स उघडण्यात आले पण त्यांच्यात पुरेशी भरती झालेली नाही. “हैदराबाद मध्ये सायबर पोलिस ठाण्यात चार इन्स्पेक्टर, सहा पीएसआय व 18 कॉन्स्टेबल्स होते. इथं एक पीएसआय व 6 कॉन्स्टेबल्स आहेत फक्त,” यादव सांगतात. हैदराबाद मध्ये एका प्रकरणाच्या तपासनीला गेल्यावरचा अनुभव त्या सांगतात.
एका वर्षात बिहारमध्ये तब्बल 6.3 लॉख फ्रॉड कॉल्स
सायबर फसवणूकीची त्सुनामी वाढतच आहे. 2024 मध्ये बिहार मध्ये 6.3 लॉख फ्रॉड कॉल्स नोंदवण्यात आले होते. यातील 1.2 लाख पिडितांनी चक्षू ऐपच्या माध्यमातून तक्रार नोंदवली. आता लोक कोणत्याही ठाण्यात तक्रार दाखल करू शकतात.
2022 मध्ये भारतात 65,893 प्रकरणांची नोंद झाली होती. सरकारने लोकांसाठी हेल्पलाईन, चक्षू ऐप व पोलिसांसाठी डिजीटल हाईजिन ट्रेनिंग सुरू केले आहे. सायबर क्राईममध्ये पोलिस आणि गुन्हेगार यांच्याकडे एकच तंत्र, इंटरनेट व माहिती असते त्यामुळे त्यांचा तपास लावणं कठीण जातं असं सुशील कुमार सांगतात. अपुरा कर्मचारी वर्ग ही आणखी एक समस्या आहे.
बिहार सायबर क्राईमचे आयजी राकेश राठी सांगतात, “आमचे अधिकारी जनरलिस्ट रुपाने प्रशिक्षित असतात. ते विविध प्रकारचे गुन्हे, कायदे-व्यवस्था सांभाळतात. पण सायबर क्राईममध्ये स्पेशॅलिटी लागते कारण अपराधीपण त्यात पारंगत असतात. आता आम्ही ज्या अधिकाऱ्यांना सायबर क्राईममध्ये रस आहे व त्याची तांत्रिक माहितीही आहे त्यांना निवडून विशेष प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या केसेस त्यांना सोडवण्यासाठी मदत होईल.” 22 ते 27 फेब्रुवारी दरम्यान बिहार पोलिसांनी सायबर क्राईम विरोधात विशेष जागरुकता मोहिम राबवली होती. पण या प्रकरणात तपास कमी लागतात व शिक्षेचं प्रमाण त्याहून कमी असतं.
2023 मध्ये नवादा मध्ये 68 पैकी 3 प्रकरणंच मार्गी लागली होती. पोलिस आरोपींना पकडतात, ते जामिनावर सुटतात आणि शिक्षा देण्याच्या वेळी कायद्यातील पळवाटांमुळे त्यांना कमी शिक्षा मिळते. सुशील कुमार सांगतात, “सध्या सायबर क्राईममध्ये आयटी एक्ट अंतर्गत कारवाई होते. त्यात जामिन सहज मिळतो. अल्पवयीन आरोपींना सुधारगृहात पाठवलं जातं. तिथूनही ते लवकरच सुटतात. या प्रकरणांत शिक्षा देणं कठीणच आहे.”
शिंपीकाम करणारा विरेंद्र असा फसला जाळ्यात…
मुकेशची फसवणूक झाली त्याच दिवशी पाटना जिल्हयातील शिंपीकाम करणाऱ्या विरेंद्र ठाकूरने याच फसवणूकीत 4,470 रुपये गमावले. त्यानं सांगितलं, “मी निरक्षर आहे. जेव्हा मला फेसबुकवर एका मुलीचा फोटो आणि जाहिरात दिसली तेव्हा मी कॉल केला. आधी रजिस्ट्रेशनचे 500 रुपये दिले. त्यानंतर सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून 5500 रुपये द्यायला सांगितलं.
माझ्याकडे इतके पैसे नव्हते तेव्हा समोरच्या माणसानं सांगितलं की माझ्याकडे जितके असतील तितके पैसे त्यानं दिले तरी काम भागेल.” ठाकूरने पैसे दिले. नंतर कॉल यायचे बंद झाले. त्या लोकांशी संपर्कही होऊ शकला नाही. नवादा पोलिसांना त्याला सांगितलं की हा एक घोटाळा आहे. त्यानंतर ठाकूरने अनोळखी नंबरचे कॉल उचलणं बंद केलं.
तो म्हणतो, “मी त्यांना शिव्या घालतो. त्यांनी माझ्यासारख्या एका गरीब माणसाची फसवणूक केली. मी घरी कोणाला काही सांगितलं नाही. माझं लग्न झालंय. सांगितलं तर घरात हंगामा होईल.” ठाकूर सांगतो की बायकांचे फोटो हाय-प्रोफाईलचे नव्हते, साधारण होते. त्यामुळे त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला होता.
मुकेशच्या प्रकरणात ठगांनी पोलिस असल्याचं नाटक केलं होतं. मुकेश एका सेक्स स्कँडल मध्ये सहभागी आहे व अटकेपासून वाचण्यासाठी त्याला 25 हजार रुपये द्यावे लागतील असं त्यांनी सांगितलं. मुकेशनं सरळ स्थानिक पोलिसांशी संपर्क केला व त्याला समजलं की त्याची फसवणूक होत आहे. तोवर त्याने आपले 6 हजार रुपये गमावले होते. 
पोलिसांच्या उणीवा
पोलिसांची निराशा यामुळे आहे की अजूनही ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्विसचे फेसबुक पेज २ हजार सदस्यांसहीत सक्रिय आहे. ज्योति सांगतात, “आम्ही मेटाला याविषयी सांगितलं, पण त्यांनी यावर काही कारवाई केलेली नाही. आता तर हा ग्रुप टेलिग्राम व व्हॉट्सऐपमध्येही घुसला आहे.” कहुआरा गावातील लोक या छाप्याविषयी बोलायला तयार नाहीत. यात अटक झालेल्या एका 17 वर्षीय मुलाची आई घौलीदेवी म्हणते की तिच्या मुलानं काही चुकीचं केलं नाही.
मी त्याला गायी चारायला शेतात पाठवलं होतं. तिचा नवरा मुंबईत मजूरी करतो. घौलीदेवीचा मुलगा या टोळीतील फक्त पायदळ शिपाई आहेत. त्यांच्यामार्फत पैसा गोळा केला जातो. एका ‘सुधारलेल्या’ ठगानुसार मोठे खेळाडू यातून करोडो रुपये कमावतात आणि मग पोल्ट्री फार्म, रियल इस्टेट, विटभट्टी अशा व्यवसायात हा पैसा गुंतवला जातो. मुलांना दिवसाला हजार रुपये मिळतात. पण त्यांनाच जास्तकरून अटक केली जाते.
आता कहुआराचे सरपंच दिनेश कुमार सिंह गावात सर्वांना भेटून सांगत आहेत की त्यांची मुलं या घोटाळ्यात अडकू शकतात. त्यांच्यावर लक्ष ठेवा. बाकी गावातही अशीच खबरदारी घेतली जात आहे. दिनेश कुमार सांगतात, “एखादा मुलगा आपल्या फोनमध्ये नक्की काय करतोय हे कोणाला कसं काय समजू शकतं? फोन तर सगळ्यांकडेच असतात. आमची इच्छा आहे की मुलांना एखादी चांगली नोकरी मिळावी आणि त्यांच्याकडे जर वेळ असेल तर फोनवर सायबर घोटाळ्यात तो घालवण्याऐवजी त्यांनी पुस्तकं वाचावीत. त्यासाठीच गावात मी लायब्ररी सुरू केली आहे.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






