राजस्थानचं ते गाव, जे चोरी आणि बेकायदेशीर दारूच्या व्यवसायासाठी ओळखलं जायचं, आज आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातंय. इथल्या अनेकांनी पोलिस, रेल्वे, बँक, केंद्रीय सुरक्षा दळ, मेडिकल, शिक्षण क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळवल्या आहेत. 2020 मध्ये याच गावातील एक मुलगी न्यायाधीश झाली आणि या गावाची ओळख बदलायला सुरूवात झाली.
अभिलाषा जेफ हीचं न्यायाधीश होणं गावासाठी आनंदाचा क्षण होता. गावकऱ्यांनी थाटामाटात तिची मिरवणूक काढली. लोक मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाले होते. यातच सरिता मीणाही होती, जिने त्याच दिवशी आपल्या मुलीला शिकवण्याचं आणि अधिकारी करण्याची शपथ घेतली. राजस्थानच्या नीम का थाना जिल्ह्यातील नयाबास गावातील अनेक मुलींसाठी हा एक महत्त्वाचा दिवस होता. आता जेफ या टोंक जिल्ह्यात न्यायाधीश आहेत आणि सरिता मीणा यांची मुलगी माध्यमिक शाळेत शिकत आहे.
आपल्या घरातील अंगणात बसलेली सरिता म्हणते, “जेव्हा पुरुष निवडले जायचे तेव्हा आम्ही गावात उत्सव साजरा करायचो. पण त्या दिवशी स्त्रियांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. प्रत्येकीनं आपल्या मुलीला शिकवण्याचं स्वप्न पाहिलं. हे सर्व त्या गावात होत होतं जे बदनाम होतं. पण शिक्षणानं हे बदलत आहे.”
जेफ यांच्या आधीही काही मुलींनी असाच इतिहास रचला होता. यात 2010 च्या कॅडरच्या आयपीएस अधिकारी अलका मीणाही आहेत. ज्या सध्या पंजाब पोलिसात डीआयजी म्हणून नियुक्त आहेत. मीणा बहुल या गावात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची मोठी संख्या आहे. मागील चार दशकांत गुन्हेगारीमुक्त होऊन हा गाव अधिकाऱ्यांचा गाव बनला. इथं सध्या सरकारी नोकरीत 500 हून जास्त लोक आहेत.
यात 10 युपीएससी अधिकारी आहेत. दोन डझन लोक राजस्थान प्रशासकीय सेवेत आहेत. नयाबास गावात आता अनेक ठिकाणी टॉपर्सचे फोटो असलेले कोचिंग क्लासेसचे फ्लेक्सबोर्ड दिसून येतात. ‘आयएएस-आयपीएस फॅक्टरी’ म्हणूनही हे गाव आता ओळखलं जातंय. डीआयजी अलका मीणा, भारतीय राजस्व सेवा अधिकारी राम मीणा, भारतीय आर्थिक सेवा अधिकारी अजय जेफ, सहायक पोलिस अधिक्षक राजेंद्र मीणा, आयएफएस अधिकारी विवेक जेफ, निवृत्त आयएएस अधिकारी के. एल. मीणा अशा अनेकांनी गावाचं नाव उंचावलं आहे.

गावातील मुलगी न्यायाधीश झाली आणि...
24 वर्षीय अंकित जेफ बी.एड. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मेहनत घेतोय. सरकारी कॉलेजमध्ये त्याला गणिताचा लेक्चर व्हायचं आहे. त्याचा भाऊ आलोक, अगरताला इथं कस्टम इन्स्पेक्टर आहे. यांच्यासारख्या अनेक मुलांसाठी शिक्षण केवळ एक माध्यम नाही तर चांगलं आयुष्य जगण्याची पद्धतही आहे. अंकित म्हणतो, “इथं पाणी खूप कमी आहे. त्यामुळे आम्ही शेतीवरच जगू शकत नाही. त्यामुळे शिक्षण हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे आमच्यासाठी.” नयाबासच्या तरुणांचंही असंच मत आहे. इथं सारेच शिक्षणाविषयी बोलत असतात.
या मुलांचे रोल मॉडेल कोणी सेलिब्रिटी नसून त्यांच्या शेजारचे, कुटुंबातील सदस्यच आहेत जे सरकारी सेवेत आहेत. मार्गदर्शन करणारे जवळच आहेत. या लोकांनी सरकारी नोकरी मिळाल्यानंतर गाव सोडलं पण इथला संपर्क मोडला नाही. त्यांनी बाकी लोकांनाही पुढे जाण्यासाठी मदत केली. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी गावातील प्रश्न आणि तरुणांच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी गावात कार्यक्रम आयोजित केला जातो. यात मान्यवरांना बोलावलं जातं.
यात एक आहेत, नयाबासचेच पण आता मुंबईत राहणारे निवृत्त ओएनजीसी अधिकारी एस. आर. मीणा. ते सांगतात, “मी नेहमीच इथं येतो. गावातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना सांगतो की त्यांनी कोणतं माध्यम घ्यावं, कोणता कोर्स घ्यावा.”
तीन सरकारी शाळांशिवाय, 800 घरांच्या या गावात एक स्वतःचं कॉलेजही आहे, जे इथल्याच निवृत्त आयएएस अधिकारी के. एल. मीणा यांनी उभारलं होतं. इथल्या मुलांना शिकण्यासाठी दूर जावं लागू नये म्हणून. पण इथल्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे की गावात ग्रंथालय नाही. 2000 मध्ये जेव्हा अंकितचा जन्म झाला होता तेव्हा नयाबास त्याच्या आधीच्या बदनामीतून मुक्त होत होतं. तो म्हणतो, “मी जेव्हा जन्माला आलो होतो तोवर गावाची ओळख बदलली होती. इथं मी अभ्यासाचाच माहौल पाहिला.
सर्वांना सरकारी नोकरीच हवी होती. दुसरा कोणता पर्यायच नाही इथं.” नयाबासच्या अन्य लोकांप्रमाणे अंकितचा परिवारही मीणा ऐवजी त्यांचं गोत्र जेफ याचाच आडनाव म्हणून उपयोग करत आहेत. त्यांच्या नव्या ओळखीचा तो एक भाग आहे. नयाबासला आपली ही नवी ओळख तयार करण्यासाठी पाच दशकं लागली. हा एक अवघड प्रवास होता. अरवली पर्वतरांगांमधील हे गाव एकेकाळी गुरांची चोरी, बेकायदा दारूचा व्यवसाय, दरोडेखोरी अशा गुन्ह्यांसाठी कुख्यात होतं. विशेषतः इथले मीणा लोक त्यात जास्त होते. इथला ओबीसी सरपंच सोडला तर इथं त्यांचीच बहुसंख्या आहे.

एकेकाळी गुन्हेगार जमातीचा शिक्का बसला होता…
राजस्थानात मीणा ही एसटी समाजात येते आणि राजस्थानच्या एकूण लोकसंख्येत त्यांची संख्या 7 टक्के आहे. त्यांना 12 टक्के आरक्षण लागू आहे. पण त्यांच्यावर इतिहासातील एक कलंक आहे. ब्रिटीश राज्यात त्यांना गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का बसला होता. राजस्थान सवयीचे गुन्हेगार कायदा 1950 अंतर्गतही त्यांना गुन्हेगार मानलं जायचं.
31 ऑगस्ट 1952 रोजी त्यांची यातून सुटका झाली. पण त्यानंतरही नयाबासचा कलंक गेला नाही. मग 1972 साली एक घटना घडली आणि त्यानं सारं काही बदललं. ही घटना एक इशारा होता आणि गावाला तो देण्यात आला की शिक्षणाशिवाय त्यांच्याकडे नवं आयुष्य जगण्याचा कोणताही दुसरा मार्ग नाही. नयाबासच्या काही लोकांकडे जवळच्या एका गावात काही जमीन होती.
त्यावरची न्यायालयीन केस 55 किमी दूर खेतडी इथं सुरू होती. एकदा तिकडे जाताना नयाबासच्या पाच गावकऱ्यांची त्यांच्या विरूद्ध बाजूच्या लोकांनी हत्या केली. नयाबासच्या लोकांनीही एकाला मारलं. यातून ताण वाढला पण तरीही यातून पोलिस कारवाई होईल असं कोणालाही वाटलं नाही.
70 वर्षीय बनवारी लाल मीणा यांना 29 जून 1972 ची आठवण आजही ताजी आहे. ते तेव्हा 15 वर्षांचे होते. एका सरकारी शाळेजवळ चहाचं दुकान चालवायचे. त्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जवळपास 5 हजार पोलिसांनी गावाची नाकेबंदी केली. यात पोलिसांनी शंभराहून जास्त लोकांना अटक केली. बनवारी लाल सांगतात, “पोलिसांनी लहान-मोठं काहीच पाहिलं नाही, सर्वांना त्यांनी पकडलं. आमची घरं लुटली. जे मिळालं ते घेऊन गेले. सारा गाव विस्कटून गेला.” बनवारी लाल यांनाही पोलिसांनी अटक केली.
ही सर्व कारवाई तत्कालिन मुख्यमंत्री बरकतुल्लाह खान आणि गृहमंत्री कमला बेनीवाल यांच्या आदेशावरून झाली होती. बनवारी लाल यांनी आपलं शाळेचं प्रमाणपत्र दाखवून पोलिसांकडून आपली सुटका करून घेतली. गावकरी या कारवाईमुळे प्रचंड नाराज झाले पण त्यांना हेही माहिती होतं की नयाबासच्या कुख्यातीमुळेच पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे.
1972 पर्यंत नयाबास येथील काही लोक कनिष्ठ सरकारी नोकरीत दाखल झाले होते. त्यापैकी एक के. एल. मीणाही होते. ते तेव्हा इंटलिजेंस ब्यूरोमध्ये सब-इनस्पेक्टर होते. त्या दिवशी ते गावातच होते. आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना पोलिस पकडत आहेत, चौकशी करीत आहेत, हे सारं बघणं त्यांच्यासाठी फारच धक्कादायक होतं. त्यांनी ‘दी प्रिंट’ला सांगितलं, “मी त्यानंतर गावकऱ्यांना सांगितलं की काही लोकांमुळे जे चोरी करतात, दारूची तस्करी करतात, त्यांच्यामुळे संपूर्ण गावाला आज हा अपमान सोसावा लागला आहे.” आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी मीणा यांनी सिविल सर्विसेजची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात ते युपीएससी उत्तीर्ण झाले.
मीणा इथले पहिले आयएएस अधिकारी ठरले. मीणा 2005 मध्ये राजस्थानचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. ते सांगतात, “मी जेव्हा 1975 मध्ये आयएएस अधिकारी झालो तेव्हा माझ्या आवाजातही जोर आला. गावकऱ्यांनाही सरकारी नोकरी असलेल्या माणसाला किती सन्मान मिळतो हे समजून आलं.
त्यानंतर गावात शिक्षणाकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं.” मीणा यांचं यश गावातील परिवर्तनाचं प्रतीक होतं. त्यानंतर अनेकांनी त्यांच्याप्रमाणेच यश संपादन केलं.

सरकारी नोकरीमुळे लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधार झाला
सरकारी नोकरीमुळे लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधार झाला. दोन दशकांपूर्वी इथं कच्ची घरं होती. आता सर्वांची पक्की घरं आहेत. मीणा यांनी आपली आईच्या नावावर, श्रीमती रामप्यारी कॉलेज स्थापन केलं. इथं आजूबाजूच्या गावातील मुलं शिकतात. गावात तीन सरकारी शाळा आहेत त्यापैकी एक मुलींचं आहे.
गावात अजून चांगले रस्ते आणि आरोग्य सुविधा यांची गरज आहे, पण गावकऱ्यांना आपल्या गावाच्या प्रगतीचा अभिमान आहे. ओएनजीसीचे निवृत्त महासंचालक एस. आर. मीणा सांगतात, “आम्ही पन्नास वर्षांपूर्वी एक ध्येय समोर ठेवलं होतं. ते आम्ही पूर्ण केलं.
आज नयाबास एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. आम्ही आमच्यावरचा कलंक केवळ मिटवलाच नाही तर नवीन आदर्शही स्थापन केला आहे.” गावातील परिवर्तनाचे साक्षीदार असलेल्या पहिल्या पिढीचे ते सदस्य आहेत.
शिक्षणामुळे लोकांना वाईट कामांपासून दूर ठेवलं. इतकंच नाही तर अनेक अंधश्रद्धा दूर करण्यासही मदत झाली. गावातील भव्य मृत्युभोज, पशु बळी इत्यादी प्रथा लोकांनी समाप्त केल्या. आता इथली नवीन पिढी सरकारी नोकरीच्या पल्याड नव्या यशोगाथा लिहू लागल्या आहेत.
गावकऱ्यांचं म्हणणं आहे की 1995 पर्यंत गावात मोटरसायकलही नव्हती. पण आता रेंज रोव्हर आणि बीएमडब्ल्यू कार असणं सामान्य गोष्ट झाली आहे. गावकरी अनेकदा आपला समृद्ध वर्तमान आणि कलंकित भूतकाळ यांच्यातील फरक सांगत आपल्या पूर्वजांच्या गोष्टी सांगतात.
अंकित जेफ हसत म्हणतो, “1920-30 मध्ये गावकरी आपल्या मुलीचं लग्न त्याच मुलाशी लावायचे ज्याला चोरी करता यायची. कारण तेव्हा तोच पैसे कमावण्याचा एकमेव मार्ग होता.” 25-30 लोकांची टोळी नयाबासमधून राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये दूर दूरपर्यंत जायची आणि दोनतीन महिन्यांनी लूटीचा माल घेऊन परतायची. अंकित म्हणतो की, आधी लोकांना यात काही गैर वाटायचं नाही. चोरीतूनच लोकांची ओळख बनायची. मोठ्या चोरांना प्रतिष्ठा होती. त्यांच्यासाठी चोरी करून गावी परत येणं सुट्टीवर येण्यासारखं असायचं. आता तो कलंकीत भूतकाळ नाहीसा झाला आहे.
पण नवीन पिढीला माहिती आहे की भविष्य आधीच त्यांच्या दारावर थाप मारत आहे. लोकांना आता जाणवत आहे की केवळ सरकारी नोकरीवर ते नेहमीसाठी अवलंबून राहू शकत नाहीत. अंकित सांगतो, “१९७२ नंतर गावात सरकारी नोकरीमध्ये जाण्याचा रिवाज संपलेला नाही.” पण खासगी क्षेत्रातील नोकऱ्या किंवा व्यवसाय गावात अजूनही दिसून येत नाहीत.

पण गावानं वेगळा मार्ग निवडला आहे आणि त्याच्याकडे एक नवीन रोल मॉडेलही आहे. मागील वर्षी 20 वर्षीय सलोनी मीणानं इंडो-नेपाल आंतरराष्ट्रीय तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकत सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे ओढून घेतलं. तिचे वडील महेंद्र मीणा म्हणतात, “जोवर सलोनी राष्ट्रीय आणि जिल्हा स्तरावर खेळत होती, तिच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. पण आंतरराष्ट्रीय पदक जिंकल्यानंतर आता सारेच तिला ओळखू लागले आहेत.” सलोनीकडे भविष्याची योजना तयार आहे.
ती 2028 विषयी विचार करीत आहे. तिला आता भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळायचं आहे. पण महेंद्र यांच्यासाठी सलोनी आधीच त्याहून अधिक महत्त्वपूर्ण गोष्ट करत आहे – नयाबासच्या प्रतिमेची पुनर्व्याख्या करण्याचं काम. ते म्हणतात, “आधी सर्वांचं लक्ष शिक्षणावरच होतं. पण सलोनीनं आता नवीन उदाहरण समोर ठेवलं आहे सर्वांच्या. तिला पाहून आता इतर मुलीही मोठ्या संख्येनं खेळांमध्ये भाग घेतील. नयाबाससाठी हे आणखी एक मोठं यश असेल.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






