- अप्सरा आगा, पुणे
सण आला बाई
मला काडीचीही उसंत नाही!
मी राबते जन्मभरी
मला काडीचीही किंमत नाही..
अशी बायांची कहाणी!
लेखिका लक्ष्मी यादव यांच्या या कवितेच्या ओळी सध्या सुरू असलेल्या रमजानच्या पार्श्वभूमीवर तंतोतंत लागू पडतात. रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. हा महिना जितका आनंदाचा तितकाच त्यागाचा सुद्धा आहे. या महिन्यात मुस्लिम समाज तीस दिवस निर्जळी उपवास म्हणजे 'रोजा' ठेवतो. या महिन्यात कुराण अवतरीत झाले अशी मान्यता आहे, म्हणून रमजान महिना पवित्र मानला जातो. महिन्याच्या शेवटच्या दिवशी मुस्लिम बांधव ईद-उल-फित्र अर्थात 'रमजान ईद' मोठ्या उत्साहात साजरा करतात.
चंद्रदर्शनाने सुरू आणि समाप्त होणाऱ्या या रमजान महिन्याच्या तीस दिवसादरम्यान महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. रमजानच्या महिन्यात रोजा ठेवून कुटुबांचं पालनपोषण करणे. स्वतःला समाधान मिळावं म्हणून दैनंदिन कामाबरोबर इबादत करणे. या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला झोकून देताना महिलांना शारीरिक, मानसिक संतुलन राखणं एकूणच जिकीरीचं असतं. आध्यात्मिक समाधान मिळवताना दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये त्या समाधान मानत असतात. 
मात्र या महिला हे विसरतात की धर्माची संकल्पना ही पुरुषांनीच केली आहे. त्यातल्या रूढी परंपरा या पुरुषांना फायदे देणाऱ्या आहेत आणि स्त्रियांचे शोषण करणाऱ्या आहेत. जे सण महिला साजरे करतात ते सणही महिलांना दुय्यम स्थान देतात, हे महिलांच्याही लक्षात येत नाही. म्हणजे महिलांचं जास्त काम वाढवणाऱ्या आहेत. महिला म्हणतात रमजानमध्ये काम केलं की, आम्हाला आनंद मिळतो. इथे पुन्हा पुरुषी व्यवस्था येते.
बाई म्हणून वाढवताना त्यांना असं वाढवलं जात की त्याग केला पाहिजे. घरातील सगळी काम केली पाहिजेत. ही बाईला वाटत असलेली गोष्ट. मुळात तिला हे कळतंच नसत की तिच्यावर जास्तीचा लोड येतोय. ती चिडचिड करेल, राग येईल, इफ्तारीला थोडंच काहीतरी बनवेल. पण रोजच्या या कचाट्यात आपण अडकलो आहे हे त्यांना कळतच नाही. तरीसुद्धा तिला आनंद वाटतो, चांगलं वाटतं. हे त्यांच्यावर बाई म्हणून लहानपणापासून बिंबवलेलं असतं.
‘’रमजानमध्ये लोकांची सेवा केली की आम्हाला पुण्य मिळतं…’’
रमजानच्या महिन्यात रोजा धरला तसेच रोजा करणाऱ्या लोकांची सेवा केली, त्याचं आम्हाला पुण्य मिळतं... ते माझं कामच आहे, असं महिला म्हणतात. कोणताही सण असो दिवाळी असो वा ईद असो याचा आनंद वाटणं, चांगलं वाटणं हे प्रकारे व्यवस्थेने तिच्यावर बिबवलेलं असतं. महिलांना वाटतं हे आपलंच काम आहे. त्या कामात माझं कस चांगलं होईल यात महिलांची एकमेकांमध्येच चढाओढ असते. चांगली व्यवस्था करणारी, चांगले पदार्थ, स्वयंपाक बनवणारी स्त्री हीच उत्तम असते, असं पुरुषी व्यवस्थेने बिंबवलेलंच आहे.
चांगली स्त्री असणं हे पुरुषी व्यवस्थेला फायदेशीरच असते. महिला आणि पुरुष रमजान महिन्यात इबादत करतात. हे मानत असाल तर पुरुषांना वाटत नाही की आपल्या बायकोला आधार मिळावा, आराम मिळावा ही भावना असते का ? तर ती बहुतांश नसते. क्वचितच एकदा पुरुष असेल की घरकामात मदत करणे वगैरे. दोघांच्या नात्यांमध्ये जो समन्वय असतो, तो दिसत नाही. हे सगळं येत ते पुरुषी व्यवस्थेतूनच येतो.
रमजान महिन्यात मुस्लिम समाजातील लोक रोजा ठेवतात. रोजाची सहरीची (रोजा सुरू करण्याची) वेळ सूर्योदयापूर्वीची असते. त्यावेळी सहरी केल्यानंतर दिवसभर पाणी सुद्धा प्यायले जात नाही. हा रोजा सूर्यास्तानंतर सोडला जातो, त्याला इफ्तारी म्हटलं जातं. प्रत्येक मुस्लिमाने या दिवसात पाच वेळा नमाज पठण करणं आवश्यक असतं. तसेच कुराणच पठण करणं ही मोठी इबादत(आराधना) मानली जाते. 
घरात असलेल्या महिला, घर चालविण्यासाठी रोजगार करणारी महिला किंवा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी रमजान महिना घरातील काम आणि स्वतःचा रोजगार आणि इबादत यांच्यात वेळेच नियोजन करणारा महिना आहे.
‘’मासिक पाळी अली तर आम्ही सात दिवस काहीच करत नाही’’
पर्वती भागात राहणाऱ्या यास्मिन बागवान सांगतात, 'माझ्या घरी एक मुलगी, एक मुलगा, सून आणि त्यांची दोन मूलं आहेत. माझी सून सकाळी लवकर उठून चार जणांच्या सहरीसाठी सकाळी चार वाजता उठून जेवण बनवतो, पाचपर्यंत सहरी करतो. मग कुराण वाचते, नमाज पठण करते. मग थोडा वेळ झोपतो. पण सुनेला जास्त झोपायला मिळत नाही, लहान मुलगा आहे. तो झोपू देत नाही. म्हणून सुनेला जास्त त्रास देत नाही. मुलाचं बघावं लागत, घरातील काम करावी लागतात. हे सगळं करून पाच वेळा नमाज असते, कुराण वाचावं लागत. हे सगळं करताना थोडा त्रास होणारच पण तिला आम्ही मदत करतो.'
पुढे यास्मिन बागवान सांगतात,'माझं आता वय जास्त झालं आहे तरीही मी महिन्याचे रोजे धरते तरीही मला काही त्रास होत नाही. माझा अल्लावर खूप विश्वास आहे. रोजा असला तरी दिवसभर भूक लागत नाही, तहान लागत नाही. कुराण पठण करतो नमाज पडतो. यातच मला आनंद मिळतो. '
'रमजानचा महिना सुरु व्हायच्या आठ-दहा दिवस अगोदरच आम्ही सगळी तयारी करून ठेवतो. मसाले वाटून ठेवणं, चटणी बनवून ठेवतो. भाजीपाला नीटनेटका करून ठेवतो. नंतर रोजा सुरु झालं की जास्त काम लागू नये म्हणून या सगळ्या गोष्टी फ्रिजमध्ये ठेवतो. रोजा असताना कामाचा ताण येऊ नये म्हणून आम्ही रमजानच्या अगोदरच घराची साफसफाई करतो. मासिक पाळी अली तर आम्ही सात दिवस काहीच करत नाही. नंतर ईदच्या शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या बदाम असो काजू कटिंग वैगेरे याची तयारी करून ठेवतो.
जास्तीचा असा लोड नसतो, आम्हाला सवय झालेली असते. महिन्याचं शरीराचं बॅलन्स होतो. खाण्यापिण्याचं बॅलन्स करतो आम्ही. सहरीच्या वेळी खाणपिणं मग इफ्तारीच्या वेळी शरीराला पोषकतत्वे मिळावे म्हणून ज्यूस असतो, शरीराला ताकत मिळेल असच खातो, तळलेलं खात नाही. रोजे धरले तर खूप चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं. आजकाल सगळे उपहास करतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी रमजान महिना चांगला आहे.' असं रिहाना शेख सांगतात.
नोकरी करणाऱ्या आणि रोजे धरणाऱ्या महिलांचा त्रास
नोकरी करणाऱ्या महिलांची रमजान महिन्यात खूप धावपळ होते, तरीही त्यांना रमजानचा महिना आनंद देणारा वाटतो. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी रमजान महिना हा दुहेरी कर्तव्य पार करणारा महिना आहे. एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे इबादत करणारा महिना आहे. नोकरी करणाऱ्या महिलेचा दिवस सकाळी चार वाजता सुरु होतो.
तिच्या बरोबर घरातील रोजे करणाऱ्या लोकांच्या सहरीसाठी जेवण बनवावं लागतं. नंतर थोडा वेळ इबादत करणं, घरातील सर्व काम आवरून कामावर जावं लागतं. दिवसभर कोणतीही विश्रांती मिळत नाही. शारीरिक थकवा असूनही घरी येऊन ईफ्तारीची तयारी करावी लागते. संध्याकाळी तरावीहीची नमाज पढून सकाळच्या सहरीची तयारी करून झोपावं लागतं. कमी झोप, कामाचा ताण, दिवसभर उपाशी यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. 
रमजान आणि महिलांचे आरोग्य
मुस्लिमबहुल भाग असणाऱ्या लोहियानगरमधील डॉ. कपिल जगतात सांगतात,' महिलांचं शरीर हे असं असतं की आजारानंतर सगळ्या आरोग्याच्या गोष्टी लवकर बऱ्या होतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांवर सगळ्यात जास्त कामाचा ताण असतो. पहाटेपासून काम चालू असतं. रमजान महिन्यात तिच्यावर जास्ती कामाचा ताण असतो. सकाळच्या सहीरीची तयारी आदल्या दिवशी करावी लागते. सकाळी पहाटे 4 वाजता उठून सहीरीची तयारी करावी लागते. संध्याकाळी सर्वांच्या नंतर ती झोपते. एकूणच तिच्या अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर परिणाम होतो. हे तिला रमजान चालू असताना समजत नाही, पण ईद वैगेरे झाल्यावर तिला जाणवायला लागत. रमजानच्या महिन्यात शरीराला पाहिजे तेवढं पौष्टिक अन्न मिळत नाही. दिवसभर उपाशी राहिल्यामुळे थकवा येतो. चक्कर येण्याचं प्रमाण वाढत. ऍसिडिटीच प्रमाण वाढतं. डोके दुःखीच प्रमाण वाढतं, स्वभावात चिडचिडपणा येतो, मासिक पाळीच्या तक्रारी खूप येतात.मासिक पाळीच्या काळात जास्त रक्तस्त्राव होतो तर कधी रक्तस्त्राव होत नाही पण पोटात दुखतं, कंबर दुखते. हे रमजाननंतर सुरू होतं. '
अन्वर राजन सांगतात, 'सर्वच धर्मात वर्षभर वेगवेगळे सण असतात . त्यामध्ये जास्तीची काम महिलांनाच करावी लागतात त्याचा ताण महिलांवर पडतो. मुस्लिम धर्मात रमजानच्या महिन्यात रोजा धरून ही सगळी काम करावी लागतात. महिलांना रोजांमधून सूट दिली आहे का तर तशी दिली नाही. त्यांना रोजा करावाच लागतो.
ज्यावेळी विशेषतः महिलांना मासिक पाळीच्या काळात रोजा नाही धरला तरी चालतो. या सगळ्या परिस्थितीत घरची जी सगळी काम असतात ती करावीच लागतात. विशेषतः रमजान ईदला महिलांवर कामाचा ताण वाढतो. खरा मुद्दा हा आहे की, पूर्वीच्या मानाने आता घरकामाचा ताण खूप वाढला आहे. पूर्वी ईदच्या वेळी एक दिवसात घरची साफसफाई होत होती पण आता एवढं सहित्य वाढलं आहे, दोन- तीन दिवस घराच्या साफसफाईत जातात. हा एक महिलांवर कामाचा बोजा आहे.
घरातील जास्तीच्या कामाचा बोजा महिलांवर पडला आहे. महिलांना त्रास होतो. पण त्यात दोन गोष्टी येतात. कष्टाचा जो थकवा असतो तो असतोच पण आनंदाचा भाग कॉम्पेन्सेटिव्ह (compensetive) करतो. उदा, ट्रेकिंगला आपल्याला शारीरिक खूप कष्ट पडतात. कधी कधी पाय प्रचंड दुखतात. तरी आपण ते करतो तर त्यातून आपल्याला आनंद मिळतो. प्रत्येक सणाचा ताणही असतो आणि आनंदही असतो.'






