- हेरंब कुलकर्णी
शहरी भागातील अनेकांना दारूबंदी वगैरे शब्दांची नफरत वाटते. दारू हा व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडलेला मुद्दा वाटतो. पण गरीब कुटुंबात दारू किती थैमान घालते ? याची त्यांना कल्पना नसते. दारूमुळे माणसे आजारी पडतात. दारूमुळे माणसे मरतात हे आपण ऐकलेले असते, पण एखाद्या वस्तीत जेव्हा दारूने घडवलेले मृत्यू तांडव आपण बघतो तेव्हा त्या समस्येचे गांभीर्य आपल्या लक्षात येते.
नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये एसटी स्टँडला लागूनच एक दलित वस्ती आहे. एका बाजूला बौद्धांची घरे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊ साठेनगर. या भागात मातंगांची 250 घरे आहेत. यातील बहुतेक जण जुन्या काळात आंध्र प्रदेशातून आलेले आहेत. इतकी वर्ष महाराष्ट्रात राहूनही या वस्तीत बहुतेकजण भूमिहीन आहेत. या वस्तीत फक्त 10 जणांना जमिनी आहेत.
बाकीचे भूमिहीन असल्याने त्यातील किमान 100 जण शेतमजुरी करतात. 5 जण व्यापारी आहेत, भाजीपाला विक्री व सफाई कामगार व रोजमजुरी असे त्यांचे व्यवसाय आहेत. इतकी ही कष्ट करून जगणारी माणसं… पण त्यांच्या कष्टाला दारूचा शाप आहे. वस्तीच्या मधोमध देशी दारूचे दुकान आहे. दारूची समस्या भीषण असून अनेक तरुण मुलांचे मृत्यू झाले आहेत.
किनवटच्या साठेनगर येथील दारू दुकानाने खूप जणांचे नुकसान केले आहे. दारूने लिव्हर खराब होतो आणि माणसे मरतात हे माहीत होते पण या वस्तीत केवळ दारू पिऊन किती लोक मेले हा आकडा ऐकला आणि सुन्न झालो. आजपर्यंत या दलित वस्तीत एकूण 54 लोकांचे मृत्यू झाले आहेत. तर 10 व्यक्ती गंभीर आजारी आहेत. 54 माणसे एखाद्या अपघातात मेली तर त्याची राष्ट्रीय पातळीवर बातमी होईल आणि देशाचे लक्ष वेधले जाईल. पण दारू पिऊन इतकी माणसे मरणे ही बातमी होत नाही. एकापाठोपाठ माणसे मरत गेली तरी दुकान मात्र बंद होत नाही.
… पण दारू पिऊन मेलेल्यांची बातमी होत नाही
या वस्तीतला कार्यकर्ता डॉक्टर अशोक बेलखोडे याने या सर्व मृतांच्या नोंदी नीट ठेवल्या आहेत. त्यातील बहुतेक मृत हे वयाने तरुण आहेत. संसार अर्धवट टाकून ते गेले, बायका तरुण आणि मुले लहान आहेत. यातील मृत झालेल्या काही व्यक्तींच्या विधवांना भेटलो तेव्हा भडभडून आलं. सगळ्यांची घरे अंधारी होती. घरात फार वस्तू नव्हत्या, मोजकेच सामान. मुलांना आपले वडील कशाने गेले याची स्पष्टता नव्हती. महिलांच्या चेहऱ्यावर एक करुण वेदना होती. त्या सर्व महिला आता मजुरीला जातात असे सांगितले.
घराचा गाडा पतीच्या निधनाचे दु:ख दूर ठेवून ओढत होत्या...त्यांच्या मरणाने कुटुंबाचे हाल आणखी वाईट झाले... या महिलांच्या चेहऱ्यावर एक विषण्ण वेदना होती. त्या फार बोलत नव्हत्या. शेवटी मृत्यू कशाने झाला हे विचारले तेव्हा ते तात्कालिक कारण सांगत होत्या, पण शेवटी अनेक दिवस दवाखान्यात ठेवून पुन्हा मोठे कर्ज मागे ठेवून ते मृत्यू पावले. त्यामुळे ते कर्ज फेडणे आणि मग संसार करणे अशी जबाबदारी त्या पेलत होत्या.
एक कुटुंब तर अगदी थेट त्या दारूच्या दुकानासमोर राहात होते. त्या महिलेचा पती मृत्यू पावला होता. मला त्या दुकानाचा फोटो काढायचा होता. मी फोटो काढू लागताच बाई घाबरली. ज्या दुकानाने तिचा नवरा मारला होता त्या दुकानदाराविरूद्ध ती अजूनही घाबरत होती. मनात आलं की, या 54 विधवा जरी दुकानावर चालून गेल्या असत्या तरी दुकान बंद केले असते पण ते धाडस कोणत्याच महिलेत नाही. उलट पती निधनानंतर या महिला अधिक केविलवाण्या व एकाकी झाल्या. त्यांना काहीच भवितव्य नसल्यासारखे वाटते आहे.
आर्थिक अस्थिरता त्यांना अधिकच वंचित आणि विकल बनवत आहे. त्या उदास झाल्या आहेत. त्या लढू शकत नाहीत, त्यामुळे 54 ही संख्या अधिकच वाढत जाणार अशीच स्थिती आहे. आम्ही गेलो तेव्हा 10 जण गंभीर आजारी होते. मनात आलं की आज त्यातील किती जण जिवंत असतील?? दारूच्या महसुलाचे समर्थन करणारे सरकार आणि तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यवादी एकदा या वस्तीला भेट देतील का? त्यांच्या अश्रूत सारे युक्तीवाद वाहून जातील.
अवघ्या 2300 लोकवस्तीच्या गावात 25 दारूभट्ट्या
दारूने होत असलेल्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या ठिकाणी अशीच माहिती मिळत गेली. वाशिम जिल्ह्यात शेंदोना या 2300 लोकसंख्या असलेल्या गावातून जवळच्या बंजारा वस्तीवर गेलो. त्या वस्तीवर राहणारे प्रमुख कार्यकर्ते नुकतेच एका अंत्यविधीवरून आलेले होते. आम्ही काळजीने विचारले “कोण वारले ?”
ते म्हणाले “ आमच्या गावाच्या माजी सरपंचाचा मुलगा वारला “
“कशामुळे वारला ?”
“दारूमुळे वारला. दुसरा कशाने मरणार ? अहो, या गावात दारुमुळे 45 लोक मृत्युमुखी पडले आहेत, या छोट्या गावात 25 दारूभट्ट्या आहेत.”
आम्ही सुन्न झालो. अवघ्या 2300 लोकवस्तीत आज 25 दारू भट्टी आहेत आणि 45 माणसे मेली तरी पोलीस,लोकप्रतिनिधी कुणीच काही करत नाही. त्या गावातून आमची गाडी आली तेव्हा दिसलं की ठिकठिकाणी चौकाचौकात लोक पत्ते खुलेआम खेळत होते. रस्त्यावरील एका घरात दोन तरुण मुले उघडपणे दारू ग्लासात ओतत होते. इतका खुला मामला होता. याचा अर्थ दारू आणि जुगार उघडपणे सुरु होते. 
एकतर हे धंदे करणारे खूप प्रभावी असले पाहिजेत किंवा पोलीस खूपच भ्रष्ट असले पाहिजेत.. गावात इतके मृत्यू होऊनही काहीच विरोध उमटत नव्हता. त्याबाबत कानोसा घेतला तेव्हा लक्षात आले की सतत तक्रारी करून करून लोक थकून गेले आहेत. किनवट मधील मरणारे 54 लोक आणि या गावातील मरणारे 45 लोक… हे सारे कसे समजून घ्यायचे? तो कार्यकर्ता अतिशय लढाऊ होता पण त्यानेही हा विषय काहीसा सोडून दिला होता. डोळ्यासमोर मरणारी तरुण मुले नुसती मोजत राहायची .... हताशपणे.
महिलांकडून दारूच्या वेदना ऐकणे हे अतिशय क्लेशदायक असते. झरी येथे बचतगटाच्या बैठकीत गेलो तेव्हा तिथल्या महिलांशी कौटुंबिक समस्येविषयी बोललो. एका बचतगटाच्या महिलेने सांगितले की, नवर्याने दारूच्या नादाने व त्यातून झालेल्या मित्रांच्या संगतीत राहून 8 एकर जमीन विकली आहे. त्यामुळे ती मुलासह माहेरी आईकडे राहायला गेली आहे. इथेही तो मारहाण करतो, एकदा तर सासुला मारले. मजुरीला जात नाही व जास्त बोलले की मुलाला पळवून नेईल असे धमकावतो असे ती महिला सांगत होती.
झरी तालुक्यातील पारबता या महिलेची वेदना पिळवटून टाकते. या महिलेचा नवरा दारूच्या नशेत जळाला. तिने त्यापाठोपाठ कष्ट करून 4 मुलींची लग्न केली. त्यातील एका मुलीला टाकून दिले. तिच्या 13 वर्षाच्या मुलाने दारू प्यायला सुरुवात केली. तो तिला मारहाण करायचा. ती जिथे काम करायची तिथे जाऊन शिव्या द्यायचा. आर्थिक तणाव व मुलाच्या या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. दारुतून मिळणार्या महसुलाचे समर्थन करणार्यांनी अशा एका एका कुटुंबाला भेट देवून मग समर्थन करायला हवे…
25 वर्षाचे गावाचे प्रबोधन एका निवडणुकीने धुळीला मिळवले…
उदगीर शहरातील दूर एका टोकाला वडार वस्ती आहे, त्या वस्तीत गेलो. सकाळी 7 वाजता पोहोचलो. इतक्या सकाळी अनेक लोक दारू प्यालेले. आम्ही लोकांशी बोलायला बसलो तर दारुडे सारखे धिंगाणा घालू लागले..एक महिला म्हणाली “अहो, पहाटे राजकारण गावाला कसे दारुबाज बनवते हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात बघितले. या गावाने 1992 साली दारूबंदी केली, दारूबंदी केल्यावर गावात जो दारू पिताना सापडेल त्याला 500 रुपये दंड ठरविण्यात आला.
गेली 25 वर्षे हा दंड जमा करण्यात आला. जवळपास 6 लाख रुपये दंड जमा करण्यात आला. त्या पैशातून गावात मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्यातून गावातले वातावरण धार्मिक बनले. त्यात जिल्हा परिषदा निवडणुका आल्या आणि पुढार्यांनी तरुण मुलांना दारू पाजायला सुरुवात केली.
हळूहळू तरुण मुले दारू प्यायला शिकली. गावात दारू वाढली आणि निवडणूक संपल्यावर आज 4 ठिकाणी दारू विकली जाते आहे...नेत्यांनीच दारू पाजायला सुरुवात केल्यामुळे आता तक्रार तरी कुणाकडे करायची ? आता कुणी दंड ही भरत नाही आणि आता तरुण मुले, मोठी माणसे पुन्हा दारुबाज झालीत. 25 वर्षाचे गावाचे प्रबोधन एका निवडणुकीने धुळीला मिळवले…
दारूबंदी जिल्ह्यात फिरताना दारूपेक्षा दारूबंदीवर आपल्याकडे जास्त चर्चा होत असते. सर्वात घमासान वादविवाद हा नेहमीच दारू वर होतो. व्यक्तीस्वातंत्र्य हा मुद्दा घेवून आपल्याकडे दारूबंदीला विरोध केला जातो. कोणी काय खावे किंवा काय प्यावे? हे शासनाने ठरवू नये, अशी एक मांडणी असते. दुसरा एक गट दारूबंदी केली तर अवैध दारू किंवा विषारी दारू वाढेल व त्यातून गुन्हेगारी वाढेल असा मुद्दा मांडतात. दुसरीकडे दारूबंदीने महिला सुखी होतात असे अनेक कार्यकर्ते पटवून देतात. त्यामुळे दारूबंदीचे वास्तव काय असते ? हा नेहमीच माझ्या औत्सुक्याचा विषय असतो.
दारूबंदी असलेल्या चंद्रपूरमध्ये काय परिस्थिती आहे?
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला 2 वर्षे झाली. जेव्हा दारूबंदी जाहीर झाली तेव्हा तिथे गेलो होतो. गावागावात फिरून महिलांना भेटलो होतो, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला होता. त्यामुळे दोन वर्षानंतर काय स्थिती आहे हे बघण्याची उत्सुकता होती.
श्रमिक एल्गारने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे श्रमिक एल्गार संस्थेने 3 दारूबंदी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला या भटकंतीत उपस्थित राहिलो. त्यात ठिकठीकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी खुली दारू विकली जाते व पोलीस सहकार्य करीत नाहीत अशी तक्रार केली.
शहरीभागात व मोठ्या गावात दारू जास्त विकली जाते आहे. त्या तुलनेत छोट्या खेड्याखेड्यात मात्र दारू कमी विकली जाते किंबहुना जिथे विरोध होतो अशा ठिकाणी तर दारू विकली जात नाही. तेव्हा ग्रामीण भागात दारूबंदी यशस्वी तर मोठ्या गावात दारू विकली जाते असे चित्र आहे. मोठ्या गावात वगळता ग्रामीण चंद्रपूर दारूमुक्त होतो आहे. गुन्हे व अपघात महिला मारहाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे हे यशही दिसते आहे.
पोलिसांची दोन वर्षाची आकडेवारी हे यश अधोरेखित करते. खेड्यातील काही गावात गेलो तेव्हा महिला म्हणाल्या, “आमच्या गावात कोणी चोरून दारू विकायला आणली की आम्हाला लगेच समजतं. आम्ही सगळ्या तिथे जातो, पोलिसांना कळवतो. त्यामुळे कोणी दारू विकायची हिंमत करीत नाही, आणि दुसरा एक भाग असा असतो की चोरून विकण्याचे प्रमाण ही तुलनेत कमीच असते.
दारूबंदी असूनही दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते असा प्रचार केला जातो. दारूबंदी आंदोलनाच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांना याबाबत विचारले. तेव्हा त्यांनी आकडेवारी देवून हा दावा खोडून काढला. त्या म्हणाल्या, “दारूबंदी नसताना खुलेपणाने जितकी दारू विकली जाते तितकी दारू कधीही चोरून विकली जात नाही हे वास्तव लपविले जाते. उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नसताना दारू 2.25 कोटी लिटर विकली जात होती आणि त्याचबरोबर चोरटी दारूही विकली जात होती. याचा अर्थ किमान 3 कोटी लिटर दारू विकली जात होती.
पोलिसांनी पहिल्या वर्षात पकडलेली चोरटी दारू ही 15 लाख लिटर होती. त्याच्या किमान 5 पट दारू विकली जाते असे जरी गृहीत धरले तरी ती पूर्वीच्या प्रमाणात फक्त 25 टक्केच होते. त्यामुळे दारूबंदी फसली हा युक्तिवाद फसवा आहे आणि अवैध दारूवर कारवाई करण्याचे कायदे सक्षम नाहीत त्यामुळे अवैध दारू वाढते. अवैध दारू विकल्यावर लगेच जामीन मिळतो. शिक्षा होत नाही. ज्या वाहनातून दारू वाहिली जाते ते वाहन जप्त होत नाही. उत्पादनशुल्कखाते काहीच काम करत नाही “ पारोमिता या कायद्याचे बारकावे समजून सांगत होत्या.
अभय बंग म्हणतात, “गडचिरोलीत मी दारूने नवरा मेला म्हणून रडणाऱ्या बायका बघितल्या आणि दारुडा नवरा का मरत नाही ?असा आकांत करणाऱ्या महिलाही पाहिल्या. पारोमिता गोस्वामीसोबत एक महिला होती. पारोमिताच्या संघटनेने दारूबंदीसाठी जेव्हा चिमूर ते नागपूर असा लॉंगमार्च काढला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत हे बघितल्यावर ती महिला पाठीवरील ब्लाऊज फाडत म्हणाली, “आज मी तिसऱ्या पिढीचा मार खाऊन मोर्च्यात आली आहे.
लहानपणी बाप दारू प्यायचा आणि मारायचा. लग्न झाल्यावर नवरा दारू पिऊन मारायचा आणि आज मोर्च्याला जाऊ नये म्हणून मुलाने मला मारले “ ही वेदना ऐकल्यावर सारेच हलले होते. हा प्रसंग ऐकल्यावर वाटले की दारू हा बुद्धीने नाहीतर हृदयाने समजून घेण्याचा विषय आहे...
जिल्ह्यातील चार आमदारांचीच दारूबंदी उठवा म्हणून मागणी
तीन जिल्ह्यातून जमलेल्या कार्यकर्त्यांची भाषणे ऐकत होतो. अनेकांनी दारू बंदीचे कायदे अधिक कडक करण्याचे व त्यात अधिक लोकसहभाग आणि लोकांना अधिकार देण्याचा मुद्दा मांडला. त्यामुळे दारूबंदी अधिक यशस्वी होऊ शकेल असे सगळेच बोलत होते व ती भूमिका योग्यही आहे. मात्र त्यासाठी ज्या नेत्यांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला त्यांनी पुढाकार घ्यायला हवा.
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात काय स्थिती असते? हे पहायला वर्धा जिल्ह्यात फिरलो दारूबंदी असूनही जिल्ह्यात दारू विकली जाते. गोविंद पेठकर हे सेलू येथील दारूबंदी कार्यकर्ते सांगत होते की, सेलू तालुक्यात 70 पैकी 20 गावात दारू विकली जाते. प्रत्येक गावात 15 ते 20 टक्के गावात दारू विकली जाते. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे. हिंगणीत श्यामभाऊ धरणे यांचा दारूविक्रीला विरोध केला म्हणून खून करण्यात आला.
वर्धा जिल्ह्यातील 4 आमदारांनी दारूबंदी उठवा म्हणून मागणी केली आहे. लोकप्रतिनिधीनी अशी भूमिका घेणे जिल्ह्यातील महिलांना आवडले नाही. अनेक गावात आता महिला एकत्र येवून दारूबंदी मंडळे स्थापन करीत आहेत. वर्धा जिल्ह्यात 17 ठिकाणी अशी मंडळे सुरु करण्यात आली आहेत. या महिला सातत्याने दारूभट्ट्या फोडतात. जिथे महिला गावकरी जागृत आहेत. तेथील दारूबंदी यशस्वी ठरते आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी होऊन आता 25 वर्षे होताहेत. तिथेही आता अनेक ठिकाणी दारूविक्री होताना दिसते. फिरताना एका कार्यकर्त्याला विचारले “सरकार म्हणते की दारूबंदीसाठी सरकार व समाजाने एकत्र आले पाहिजे “ त्यावर तो कार्यकर्ता मिश्किलपणे म्हणाला “ याचा अर्थ समाजाने दारूवाल्यांशी पंगा घ्यायचा.
बायकांनी भांडणे करायची आणि सरकारच्या पोलीस आणि उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांनी पैसे कमावायचे अशी ही समाज आणि सरकारची कामाची वाटणी आहे “ मी विचारले “जेव्हा दारूबंदी होते तेव्हा कार्यकर्ते खूप आग्रही असतात, आक्रमक असतात पण आता का लढत नाहीत ?” तेव्हा तो म्हणाला “ आता दारूबंदी होऊन 20 वर्षे झालीत. किती वर्षे भांडणे करण्याचा उत्साह कायम टिकून राहील...? दारुवाले थकत नाहीत. बायका किती दिवस पोलिसांशी भांडत राहतील. बिचाऱ्या वैतागून जातात आणि मग तुम्ही म्हणणार की दारूबंदी करणाऱ्या महिला आता कुठे गेल्या “ 
आशेची बेटं…
विदर्भात नव्याने उदयाला आलेल्या पंथाने दारुबाबत खूप मोठे काम करून गरीब कुटुंबातील दारू सोडवली आहे. या पंथातील लोकांच्या घरावर ‘दारू पिऊन घरात येण्यास बंदी आहे‘ असे बोर्ड लावले जातात. भंडारा येथील एका झोपडपट्टीत अशी पाटी लावलेली बघून खूप छान वाटले.
गागोदे येथील विनोबानगर या कातकरी वस्तीत तरुण मुले दारू प्यायची. घरात भांडणे व्हायची आज तरुण मुलात दारू अजिबात नाही त्यामुळे भांडणे थांबली आहेत. आम्ही आता तंबाखू पण खात नाही असे तरुण मुले सांगतात. मुलांना आता खेळाची खूप आवड आहे. सतत क्रिकेट खेळत असतात. दारू कमी झाल्याने काम करण्याची क्रियाशीलता वाढली. मुलांनी गेल्या काही वर्षात काम करून आणि बचत करून वस्तीत 26 मोटरसायकल आणल्या आहे.
किल्लारी कारखान्याजवळ असलेल्या मसणजोगी वस्तीत तेथील नेत्यांनी पुढाकार घेऊन दारूबंदी वस्तीत केली आहे. या वास्तीत दारू पिऊन आले की ५० रुपये दंड केला जातोय. अनेक भटक्या जमाती दारुने उध्वस्त केलेल्या बघितलेल्या असताना या भटक्या वस्तीतील ही जाणीव जागृती महत्वाची वाटते. गडचिरोलीत कुरु गावात महिलांनी एका गावात मंडळ स्थापन केले आहे. त्यांनी एका रंगाच्या साड्या घेतल्या आहेत.
तंटामुक्त अध्यक्ष यांनी ही समिती स्थापन केली... या महिलांना दारूवाला घाबरतो. परंतु ज्या मजूर कुटुंबात दारू नाही त्या कुटुंबांनी खूप चांगली प्रगती केली आहे. अशीही अनेक उदाहरणे आढळली. व्यसनापासून दूर असलेल्या पहापळ येथील एका कुटुंबाने मुलींची लग्न मुलांचे इंजिनिअरिंग शिक्षण, घरातील वस्तू व मोठे आजार यातून कर्जबाजारी न होता आर्थिक प्रगती केली आहे अशीही काही उदाहरणे आढळली.
याचा अर्थ गरीबी आणि दारू हे एकमेकाशी जोडलेले प्रश्न आहेत. याचाच दूसरा अर्थ असा की दारिद्र्यनिर्मूलन आणि दारू निर्मूलन हे दोन्हीही एकाचवेळी करावे लागेल. दारिद्रयाच्या समस्येचा विचार दारूचा प्रश्न सोडून होऊ शकत नाही हा मुद्दा प्रत्यक्ष दारुने उसवलेले संसार बघताना पटते.
(हेरंब कुलकर्णी यांच्या फेसबुक वॉलवरून)






